ब्रह्मगिरीला उमग पावणारी गोदामाय जवळपास अर्धा महाराष्ट्र आणि आंध्र-तेलंगणाची तहान भागवत समुद्राला मिळते. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असा भेद न करता, उसासाठी की पिण्याच्या पाण्यासाठी असा भेद न करता ती सारे पाणी तिच्या लेकरांना देते. तिच्या किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने मंदिरे आणि घाट बांधले गेले आहेत. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेली मंदिरं जागोजागी पाहायला मिळतात. असाच एक सुंदर नमुना मराठवाडय़ात सोनपेठजवळ पाहावयास मिळतो. तो म्हणजे मुद्गल.

बहुतेक सगळी मंदिरं नदीच्या किनाऱ्यावर असतात. परंतु, मुद्गलचे मंदिर नदीच्या पात्रात आहे. मंदिराची हेमाडपंथी बांधणी दुरूनच नजरेस भरते. काळ्या दगडातील हे मंदिर नदीपात्रात उठून दिसते. गर्भगृह आणि खांबांवर तोललेला सभामंडप दुरूनही स्पष्ट दिसतो. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्यांचा घाट उतरून नदीपात्रात प्रवेश करावा लागतो. सुमारे ३०-४० सुबक बांधणीच्या या दगडी पायऱ्या थोडय़ा अरुंद आहेत. धरण, बंधारे किंवा कमी पावसामुळे नदीपात्रात फार तर फूटभर पाणी असते. त्यामुळे चालत मंदिरापर्यंत जाता येते. २०-२५ वर्षांपूर्वी नदीला भरपूर पाणी असायचे. त्यामुळे उन्हाळा सुरू होईपर्यंत मंदिराचा अधिकांश भाग पाण्याखाली असायचा. सध्या अस्तित्वात असलेल्या घाटाच्या बाजूला आणखी एका घाटाचे, त्याच्या पायऱ्यांचे अवशेष आढळतात. पात्रात उतरल्यानंतर प्रथम घुमटीवजा एक मंदिर लागते. इथे ‘मुद्गल गणेश’मूर्ती सुंदर आहेच; पण त्याच्या दोन्ही बाजूला कोरलेल्या चार मूर्त्यांही अप्रतिम आहेत. रथारूढ सूर्यनारायण, देवी, महादेव आणि सर्वात उजवीकडे नृसिंह अशा सुरेख मूर्त्यां छोटय़ा कोनडय़ांमध्ये चितारलेल्या आहेत. पुढे पात्रात मुद्गलेश्वर महादेवाचे मुख्य मंदिर आहे. अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. याचे वैशिष्टय़ असे की, इतर मंदिरांत आतमध्ये आढळणारा नंदी इथे मात्र दरवाजातच आढळतो. गर्भगृहात जाताना दरवाजाच्या उजव्या बाजूला एक शिलालेख आढळतो. गर्भगृहात मुख्य शिवलिंगासोबत आणखी दोन शिवलिंगे दिसतात. कित्येक वष्रे पाण्यात असूनही मंदिराला कसलाही धक्का लागलेला नाही. मंदिराच्या मागील बाजूस घडीव दगडांची पानासारखी रचना आहे. एका आख्यायिकेनुसार मुद्गल ऋषींच्या तपाचरणाचे हे स्थान आहे. सुबक रचना, शिलालेख आणि सुंदर सभागृहामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते.

why Nivdunga temple in pune called pune's pandharpur
VIDEO : ‘पुण्याचे पंढरपूर’ माहितीये? पुण्यातील ‘या’ मंदिराला ‘पंढरपूर’ का म्हणतात?
thane saibaba temple balkum marathi news
ठाणे: बाळकूम भागात मोठे वाहतूक बदल
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग

drmohi44@gmail.com