हळदाणीचा घाट चढल्यापासून बारा-तेरा दिवस सह्यद्रीच्या पठारावरून दक्षिणेकडे चालत होतो. या भागात सह्यद्री पठार टप्प्याटप्प्याने पश्चिम किनारपट्टीकडे उतरत जातं. त्यामुळे पठाराच्या कडेनेच चालत असलो तरी सह्यद्रीचा पश्चिम कडा नजरेत भरावा असा काही फारसा दिसला नव्हता. पण, इगतपुरीहून कुलंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या कुरुंगवाडीला पोहोचलो आणि कोकणपट्टीत उभे उतरणारे पठाराचे कडे दिसायला लागले. आता अक्षरश: घाटाच्या कडेवरून चालत होतो. ‘वॉकिंग ऑन द एज.’

कुरुंगवाडीतून चालायला सुरुवात केल्यानंतर डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या डोंगरातून मार्ग काढू लागलो. आधी कळसुबाई-अलंग-कुलंगची रांग, मग रतनगडाजवळून कात्राबाईची खिंड आणि २३ एप्रिलला पाचनईमार्गे हरिश्चंद्रगड. मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा सर केला. २४ एप्रिलला सकाळी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर गेलो होतो. तिथल्या खोबण्यात पाय सोडून बसलो. खालचं दृश्य पाहत असताना मनात आलं की, आज चालण्याचा तिसावा दिवस. महाराष्ट्राच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत घाटमाथ्याने चालत जाण्याच्या ६० दिवसांच्या मोहिमेचा हा मध्यबिंदू. पाहता-पाहता एक महिना झालासुद्धा. क्षणार्थात या मोहिमेच्या तयारीचा काळ डोळ्यासमोर तरळून गेला.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

मोहिमेची कल्पना तीन-चार वर्षांपासून मनात असली तरी खरी उचल खाल्ली गेल्या वर्षी. अर्थात, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग चालणारा जरी मी एकटा असणार होतो तरी योग्य टिमच्या मदतीशिवाय मोहीम प्रत्यक्षात येणं शक्यच नव्हतं. डोंगरभटक्या मित्रांशी चर्चा झाली. मोहिमेचा मार्ग ठरवण्यात येऊ लागला.  डोंगरभटकंतीचा निखळ आनंद तर हवा होताच, पण घाटमाथ्यावरच्या लोकजीवनाचं दस्तावेजीकरण करणं हेदेखील मोहिमेचं एक मुख्य उद्दिष्ट. नियोजनाचं काम तर मार्गी लागलं होतं. पण, होणाऱ्या खर्चाची सोय निश्चित झाल्याशिवाय मोहीम सुरू तरी कशी होणार? पायी चालायचं असल्यानं प्रवासखर्चाचा प्रश्नच नव्हता. जेवणखाणं, डोंगरात सोबत घ्यावा लागणारा वाटाडय़ा, दर काही दिवसांनी गरजेच्या वस्तू पुरविण्यासाठी येणाऱ्या टीमच्या सदस्याचा प्रवासखर्च, सॅक आणि ध्वनिचित्रणासाठी लागणारी उपकरणं यासाठी बऱ्यापैकी रकमेची गरज होती. मग, डोंगरवेडेच पुढे सरसावले. राजेश गाडगीळांनी जाई काजळच्या माध्यमातून प्रायोजकत्व दिलेच, पण वैयक्तिक मदत देखील देऊ केली. वसंत वसंत  लिमये यांच्याकडूनही भरघोस मदत मिळाली.  अनेक डोंगरभटक्यांनी छोटीमोठी भर घातली आणि मोहिम सुरु करता येईल याची खात्री झाली.

अर्थात डोंगरमित्रांकडून जशी मदत मिळाली तशीच मदत थेट गिरिजनांकडून मिळू लागली. मोहिमेत एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली. सातपुडय़ापासून ते साधारण त्र्यंबकच्या  पट्टय़ातल्या लोकांना केवळ आनंद, हौस म्हणून डोंगरात भटकणारे ट्रेकर्स फारसे सवयीचे नाहीत. अक्कलकुव्यासारखं शहर किंवा सातपुडय़ाजवळचं हातगडसारखं ठिकाण सोडलं तर तिथे पर्यटनासाठी फारसे कोणी फिरकतही नाही. त्यामुळे आलेल्या प्रवाशाला मोबदला घेऊन जेवण-राहणं किंवा वाटाडय़ासारखी सेवा देणं हा प्रकार तिथे रूढ नाही. त्यामुळे कुठल्याही गावात जेवायचे किंवा राहायचे पैसे देऊ केले तरी कुणी घेतले नाहीत. आपुलकीनं जेवू घातलेल्या घरात पैसे विचारायचे की नाही याबाबत द्विधा मन:स्थिती होती. तीच गोष्ट वाटाडय़ाची. अगदी आग्रहानं दिल्यावरच वाट दाखविण्यासाठी येणारा पैसे घेई. पण, इगतपुरीनंतर चित्र पालटलं. कळसुबाई-हरिश्चंद्रगड भागातला पट्टा आता ट्रेकिंग आणि इको-टुरिझमसाठी व्यवस्थित विकसित झाला आहे. अनेक हुशार आणि मेहनती स्थानिक येणाऱ्यांची चांगली सोय करतात. वाटाडय़ा म्हणूनही अनेक जण काम करतात. डोंगरभटक्यांची सोय आणि स्थानिकांसाठी मिळकतीचं साधन यांचा इथे चांगला मेळ जमला आहे. अशाच प्रकारे सातपुडा, बागलाण वगैरे भागातही हे सुरू झालं तर तिथल्या स्थानिकांना उत्पन्न मिळेल आणि डोंगरभटकेही तुलनेनं दुर्लक्षित अशा या भागाकडे वळायला लागतील.

आज हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर खोबण्यात पाय सोडून बसलो असता इथवरची मोहीम डोळ्यासमोर आली. अजून बराच पल्ला बाकी आहे. कोकणकडय़ावरचं दृश्य नेहमीच भारावून टाकतं. जगाचा विसर पडतो, तसाच स्वत:चाही. आजही कडय़ावरून एकटक खाली बघत असताना तसाच भारावून गेलो आणि का कोणास ठाऊक, अचानक डोळ्यांत पाणी आलं. कालपासून सोबत आलेल्या धनंजय मदन यांना बहुतेक लक्षात आलं. अलगद शेजारी बसत त्यांनी हलकेच पाठीवर थाप मारली. त्यात त्यांच्यासारख्या अनुभवी ट्रेकरने केलेलं कौतुक होतं, दिलासाही होता. मग, मी पुन्हा नव्या जोमाने त्यांच्यासोबत चालू लागलो.

प्रसाद निक्ते  walkingedge@gmail.com