आज चालताना रस्त्यात एका मामांना पुढची वाट विचारली. ‘‘त्या म्हवाच्या झाडापासून डावीकडे.’’ त्यांनी सांगितलं. सातपुडय़ात मोहाची झाडं पावलोपावली दिसायची. पण येथे आंबोली परिसरात मोहाचं झाड म्हटल्यावर थोडं आश्चर्यानेच पुढे चालताना अजून एकाला विचारलं तेव्हा उलगडा झाला. इथं घाटमाथ्यावर असलो तरी जिल्हा सिंधुदुर्ग. भाषा कोकणी. कोकणीत ‘म्हव’ म्हणजे मध. म्हवाचं झाड म्हणजे मधाचं मोठालं पोळं असलेलं झाड. मोहाचं नव्हे. हा उलगडा झाला आणि ‘वॉकिंग ऑन द एज’ मोहिमेतल्या सुरुवातीच्या सातपुडय़ातील ‘मोहा’पासून आता गोवासीमेपर्यंतच्या ‘म्हवा’पर्यंतचा प्रवास तरळून गेला. २६ मार्चला महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील भराडपासून सुरू झालेली मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सातपुडय़ातून चालायला सुरुवात केली तेव्हापासून ७४ व्या दिवशी म्हणजेच ८ जूनला महाराष्ट्र-गोवा-कर्नाटकाच्या सीमा एकत्र येतात त्या चोर्लाघाटात मोहीम संपणार. आज रम्य आंबोली परिसरात हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळच्या चौकुळ या शांत-सुंदर गावात बसून हा लेख लिहतोय.

आत्तापर्यंतच्या सुमारे ७०० किमीच्या घाटमाथ्यावरच्या या पायी भटकंतीत रोजचा दिवस निसर्गाची वेगवेगळी रूपं घेऊन सामोरा येत होता. पहिल्या चार-पाच दिवसांत सातपुडय़ाशी नवी मैत्री जुळली. तिथल्या बोडक्या डोंगररांगांचं अनोखं सौंदर्य. पुढे तापी नदीचा सखल भाग ओलांडून सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर आलो. आधी खुरटय़ा झाडांचा टेकडाळ प्रदेश. पुढे इगतपुरीला आकाशात घुसणारी सह्य़ाद्रीची शिखरं. हरिश्चंद्रगडाजवळची वेड लावणारी दृश्यं. भीमाशंकरचं अंजनाचं जंगल. लोणावळ्याजवळचा नित्य परिचयाचा परिसर, त्यानंतर तोरणा, राजगडचा मावळ पट्टा, पुढे रायरेश्वर, कोळेश्वराची विस्तीर्ण पठारं ओलांडून कोयना चांदोलीच्या अभयारण्यांना वळसा घालत जाणारा मोहिमेचा मार्ग. आणि मग कोल्हापूर जिल्ह्य़ात दक्षिणेकडे सरकताना राधानगरी परिसरातला घनदाट अरण्यांचा विपुल जलसंपदा असलेला प्रदेश. असं वेगवेगळ्या अंगानं वेगळं दिसणारं सह्य़ाद्रीचं रूप. पण यातलं अधिक सुंदर कोणतं याचा निर्णय मात्र कधीच न होऊ शकणारा.

जसा निसर्ग बदलला तशी लोकांची राहणी आणि बोली. सातपुडय़ात बरीचशी घरं बांबूच्या न लिंपलेल्या बांबूच्या जाळीदार भिंतींची. घरं ऐसपैस, पण आत खोल्या पाडायची पद्धत नाही. एका कोपऱ्यात चूल, एकीकडे गुरं आणि शेळ्या, एकीकडे वावरायची, झोपायची जागा. सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर घरांचा आकार सातपुडय़ाच्या तुलनेने लहान झाला. कधी कुडाच्या लिंपलेल्या भिंती, क्वचित मातीच्या. बऱ्याचदा घरं विटांची. पण मावळ परिसरात, काही जुन्या घरांची जोतीआणि कधी कधी भिंतीसुद्धा काळ्या दगडांच्या. कोल्हापूर जिल्ह्य़ात याची जागा जांभ्याने घेतली. इथं मात्र जुनी अथवा नवी बहुतेक घरं जांभ्याचीच.

बारा कोसांवर भाषा बदलते याचा प्रत्ययही ठायी ठायी आला. सातपुडय़ात केवळ बोली नव्हे, तर भाषाच वेगळी. न समजणारी. तिथल्या चार दिवसांच्या अंतरातही तीन वेगळ्या बोली. अर्थात लोकांनी सांगितलं म्हणून समजलं, एरवी आपल्याला फरक कळत नाही. तापी ओलांडल्यावर मावची गावीत भाषा, तीही न समजणारी. सह्य़ाद्री पठार चढल्यावर मराठी सुरू झाली. पण साल्हेर परिसरात काही ठिकाणी सगळं बोलणं समजत नाही. ‘इथे – तिथे-कुठे’ला ‘‘अठं, तठं, कठं’’ असे शब्द. त्र्यंबकेश्वरजवळ येत गेलं तसं पूर्ण समजणारं मराठी सुरू झालं. पण त्यातही किती प्रकार. नाशिक जिल्ह्य़ातल्या घाटमाथ्यावरची बोलण्याची लय, मोटारसायकलला जागीच अ‍ॅक्सिललेटर देताना ‘घुर्रऽऽऽ, घुर्रऽऽऽ’ अशी लय येते तशी. पुढे मावळात रंबलर्सवरून गाडी जावी तशा वाक्यातल्या शब्दांचा जोर वर-खाली होणारा. साताऱ्यात बोलीचा वेगळाच बाज. निवांतपणे बोलणं. पण कोल्हापूर जिल्ह्य़ात दक्षिणेकडे सरकावं तसं बोलणं घाईचं.मोठा श्वास घेतल्यासारखा, पहिला शब्द सावकाश आणि दमदार, पण पुढे वाक्य चटचट पूर्ण होणारं.‘गवाऽऽ शेतात घुसतोय की नई..’. हे ‘की नई’ म्हणजे इथलं वैशिष्टय़. मध्येच दाजीपूरला मालवणी. इथे आंबोली परिसरातही मालवणी कोकणीच. पण राधानगरी परिसरात थोडा बेळगावी ढंग. तेथे एका मामांनी आम्ही काय करतोय विचारल्यावर डोंगरा-जंगलातून पायी चालतोय असं सांगितलं, तेव्हा मिश्किलपणे कपाळावर हात मारताना त्यांच्या तोंडून आलेलं ‘‘पायीऽऽ म्हणजे हाऽऽलच कीहोऽऽ’’असं अगदी पुलंच्या रावसाहेबांसारखं बोलणं.

पण या सगळ्या वैविध्यातला समान दुवा, म्हणजे डोंगरातल्या या लोकांचा मायाळूपणा. ‘कोकणी मायाळू, तिकडे पलीकडे लोकंडॅम्बिस’, ‘महादेव कोळी मायाळू माणूस’, ‘मावळात तुम्हाला कोणी उपाशी पाठवणार नाही’, ‘कोल्हापूरच्या आमच्या पट्टय़ात लोक प्रेमळ.’ अशी वाक्यं मी प्रवासात अखंड ऐकतोय आणि त्यांचा प्रत्यय घेतोय. प्रत्येकाला आपलाच पट्टा मायाळू वाटत असला तरी थोडक्यात काय तर हा सगळा डोंगराळ भागच मायाळू. सह्य़ाद्रीने त्याची विविध रूपं दाखवून आनंद दिला, तर त्याच्या लेकरांनी मायेनं वागवून. गेल्या ७२ दिवसांत ओंजळीत पडत गेलेल्या अनुभवांचं आता मोठं गाठोडं झालंय. ते घेऊनच घरी जाणार. सह्य़ाद्रीनं आणि इथल्या लोकांनी दिलेला हा अनमोल ठेवा. आयुष्यभरासाठी. सह्य़ाद्री, मी तुझा ऋणी आहे. तुझा आणि तुझ्या या लेकरांचा.

प्रसाद निक्ते walkingedge@gmail.com