20 November 2017

News Flash

विकास आराखडय़ाला शिस्त लावणे गरजेचे

‘मुंबई बुडितखाती!’  या मथळ्याखाली आलेली बातमी (३०ऑगस्ट ) वाचली.

लोकसत्ता टीम | Updated: August 31, 2017 2:38 AM

‘मुंबई बुडितखाती!’  या मथळ्याखाली आलेली बातमी (३०ऑगस्ट ) वाचली. मुंबई याआधी २६ जुलै २००५ रोजी पाण्याखाली गेली होती. तेव्हा पावसाचे प्रमाण नगर आणि उपनगरात २४ तासांत साधारण ९००-९५० मि.मी. होते आणि यंदा हे प्रमाण साधारण २००- ३०० मि.मी. आहे. तरीही मुंबई तुंबली. नगरविकासाचे सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ ‘विकास’ करण्याच्या नावाखाली हे शहर नियोजनाच्या पूर्ण अभावामुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे, तसेच देशाची आíथक राजधानी म्हणून असलेल्या महत्त्वामुळे साधन सामग्रीवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले आहे. मुळातच या शहराला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यामुळे या शहराच्या भौगोलिक वाढीला निसर्गत:च काही मर्यादा आल्या आहेत (भविष्यात ग्लोबल वॉर्मिगमुळे समुद्रपातळीत वाढीचा होणारा धोकाही आहे) ही गोष्ट कोणी लक्षात घ्यायलाच तयार नाही. या शहरात रोज येणारे लोकांचे लोंढे, त्यामुळे वाढणारी लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी झालेली अर्निबध बांधकामे, झोपडपट्टय़ांमधीलच नव्हे, तर उंचउंच ‘टॉवर’मधील मलापाणी वाहून जाण्याच्या अपुऱ्या सुविधा, भराव टाकून केलेली बांधकामे, बेसुमार वृक्षतोड यामुळे पावसाचे पडणारे पाणी नसíगकरीत्या वाहून निचरा न होता सर्वत्र साचते. त्यात भरीस भर म्हणून अस्ताव्यस्त पडलेला, विघटन न होणारा प्लास्टिकयुक्त कचराही वाहात येऊन गटारांमध्ये अडकतो आणि पाणी सर्वत्र तुंबते. अनेक जीवघेण्या आजाराला कारणीभूत ठरते.

भविष्यात इतर शहरांचंही कमी अधिक प्रमाणात हेच होणार आहे किंवा होऊ द्यायचे नसेल तर साऱ्या ‘पालिकां’नी आणि नागरिकांनीही यातून योग्य तो बोध घेऊन त्या दिशेने पावले उचलणे आणि आपापल्या तथाकथित विकास आराखडय़ाला थोडी शिस्त लावणे गरजेचे आहे.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

 

थोडय़ाच मार्कानी नापास’?

‘२९ ऑगस्ट’च्या पावसात लोकांचे जे हाल झाले, त्याबाबत लोकसत्ताच्या (३०ऑगस्ट) अंकातील महापौर सूर्यकांत महाडेश्वर यांची प्रतिक्रिया वाचून ‘पेपर कठीण होता. सरांनी पेपर कडक तपासले म्हणून मी थोडय़ाच मार्कानी नापास झालो,’ असे वडिलांना सांगणाऱ्या मुलाची आठवण झाली!

गजानन गुर्जर पाध्ये, दहिसर (मुंबई)

 

वजन मापांची मेट्रिक पद्धतच वापरावी

वजन मापांची मेट्रिक पद्धत सर्व जगात फक्त तीन (मागासलेले!) देश वापरत नाहीत. म्यानमार, लायबेरिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने. भारत यात नाही. गेली ५० वष्रे नाही. पण ही वार्ता ‘लोकसत्ता’सारख्या दर्जेदार वृत्तपत्रापर्यंत अद्याप पोहोचलेली दिसत नाही. ‘महाबळेश्वरला एका दिवसांत ४ इंच पाऊस झाला’, ‘धरणाची पातळी १०० फुटाने वाढली’, ‘मुंबईपासून ४० मलांवर’ अशा ओळी वाचताना खडय़ासारख्या बोचतात. कृपया कटाक्षाने मेट्रिक पद्धतच वापरावी.

डॉ. शरद अभ्यंकर, वाई

 

स्वप्न विकासाचे, ‘साखळीहिंदुत्ववादाची

‘बवानाची घोरपड’ (३० ऑगस्ट ) हा अग्रलेख वाचला. एका छोटय़ा विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने अतिबलाढय़ भाजपचा पराभव करणे भाजपला निश्चितच भूषणावह नाही. भाजपने आता लोकसभेत ३५० जागांचे लक्ष्य ठेवले असताना, डोळ्यांत तेल घालून सजग राहावे तसेच हिंदुत्वाच्या नावाखाली अतिरेकी आचरटपणा करणाऱ्या आपल्या स्वयंसेवकांना व नेत्यांना वेळीच आवरावे..अन्यथा मोदी विकासाचे स्वप्न पाहत आहेत आणि त्यांचे शिलेदार विकासाला हिंदुत्वाच्या साखळीत बांधत आहेत अशा विरोधाभासात मतदारांचा हिरमोड होण्याची शक्यता भाजपला धोकादायक ठरू शकते, हे या निमित्ताने लक्षात घेणे काळाची गरज आहे.

प्रदीप करमरकर, ठाणे

 

घोरपडी मुबलक, मावळे कुठे आहेत?

‘बवानाची घोरपड’ हा अग्रलेख वाचला. दिल्लीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्वत्र भाजपची विजयी घोडदौड दिसत असली तरी अस्वस्थताही का वाढत आहे याचे विश्लेषण त्यात आले आहे. त्याखेरीज भाजपच्या ‘हक्काच्या’ मतदारांनाही चक्रावून टाकणारे निर्णय घेतले गेले आहेत. केंद्राच्या रेरा कायद्यात बिल्डरधार्जणिे बदल महाराष्ट्रात केले म्हणून वर्तमानपत्रांत बरेच लिहिले गेले, पण विरोधकांनी तो मुद्दा प्रभावीपणे लावून धरला नाही. मुंबईच्या सीमारेषांवरील, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अन्याय्य टोल तसाच सुरू आहे, पण तोही मुद्दा कोणी उचलत नाही. विविध अर्थसंकल्पांमधून अगोदरच कर भरणाऱ्या नागरिकांवर अधिक करांचा / उपकरांचा बोजा टाकला जात आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘सुगम्य भारत’ असे अनेक ‘सेस’ भरूनही तसा भारत- अगदी त्याची सुरुवातसुद्धा दिसत नाही. मोठमोठे सागरी मार्ग, समृद्धी मार्ग बांधण्याच्या घोषणा होत असताना सध्याच्याच रस्त्यांवरच्या रहदारीला किमान शिस्त लावण्याची इच्छाशक्ती प्रशासनात दिसत नाही. तसे करू पाहणाऱ्या पोलिसांनाही बिनदिक्कत चोप दिला जातो हे सर्रास दिसू लागले आहे. जनतेच्या रोजच्या जीवनाशी संबंधित अशा अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधकही लढताना दिसत नाहीत. विरोधक वातानुकूलित वाहनांतून संघर्षयात्रा काढण्यातच मश्गुल आहेत.

द्रोणागिरीचे कडे अनेक आहेत, घोरपडीही खूप आहेत, पण कडय़ावर चढून लढण्याकरता मावळेच नसतील तर सिंहगड जिंकणार तरी कसा आणि कोण?

 –प्रसाद दीक्षित, ठाणे

 

इतरांना येऊ न देण्यासाठी..

‘बवानाची घोरपड’ हे संपादकीय (३० ऑगस्ट) वाचले.  वस्तुत दिल्लीतील विधानसभेची जागा जिंकल्यावर ‘आप’ कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे जल्लोष केला तोही अनाठायीच. कारण दिल्ली हा आपचा बालेकिल्लाच आहे. तेव्हा संपादकीयात म्हटल्याप्रमाणे ‘आप’ने हुरळून जाऊ नये. पण यामुळे विरोधी पक्षांना थोडी संजीवनी मिळाल्यागत वाटायला हरकत नाही. भाजपला या पराभवाचा फारसा फरक पडत नसला तरी पराभवाची कारणे जाणून घेण्याची गरज आहे. इतरत्रच्या यशाने गाफील न राहता त्यांनी पाय जमिनीवर ठाम ठेवायची गरज आहे. विरोधी पक्षाची घोरपड यशावर नखं रोवती झाली आहे. आता इतरांना तिथे येऊ न देण्यासाठी भाजपने दक्ष राहिले पाहिजे.

माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

First Published on August 31, 2017 2:38 am

Web Title: loksatta readers letter part 78 2