News Flash

महागडा, पण बहुपयोगी…

एसर म्हणजे महाविद्यालयीन तरुणांसाठीचे लॅपटॉप्स बाजारात आणणारी लोकप्रिय कंपनी, असेच समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये झाले आहे.

| February 6, 2015 01:08 am

एसर म्हणजे महाविद्यालयीन तरुणांसाठीचे लॅपटॉप्स बाजारात आणणारी लोकप्रिय कंपनी, असेच समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये झाले आहे. एसरची अस्पायर ही लॅपटॉप मालिका तुलनेने स्वस्त असल्याने महाविद्यालयीन तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली. प्रत्येक दहा विद्यार्थ्यांमध्ये पाच जणांकडे तरी एसरचा लॅपटॉप असतो, असे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. पण ही महाविद्यालयीन तरुणांसाठीची स्वस्त लॅपटॉप देणारी कंपनी ही प्रतिमा खोडून काढण्याचा प्रयत्न एसरने त्यांच्या अस्पायर आर-१३ या नव्या लॅपटॉपच्या माध्यमातून केला आहे. या लॅपटॉपची किंमतच आहे तब्बल ८३ हजार ९९९ रुपये.

काम आणि निवांत वेळ या दोन्हींसाठी उपयुक्त अशी त्याची रचना करण्यात आली आहे. त्याची रचना हाच त्याच्या या किमतीमागचा महत्त्वाचा घटक आहे. हा लॅपटॉप तुम्हाला सहा वेगवेगळ्या प्रकारांनी फोल्ड करून वापरता येतो. चित्रकार कॅनव्हॉससाठी इझेल वापरतात, त्याप्रमाणे या लॅपटॉपची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे, बसून, झोपून, दूर ठेवून अशा वेगवेगळ्या प्रकारांनी त्यावर काम करता येते किंवा त्यावरील बाबींचा आनंद लुटता येतो.
गोरिला ग्लास थ्री
त्यासाठी कॉर्निग गोरिला ग्लास थ्रीचा वापर स्क्रीन म्हणून करण्यात आला आहे. त्याची जाडी केवळ एक इंच, वजन केवळ दीड किलो आहे. त्यामुळे त्याची ने-आण करणे वापरकर्त्यांला सोपे जाईल.
एसर अ‍ॅक्टिव्ह पेन
सध्याचा जमाना हा टचस्क्रीनचा असला आणि त्याच माध्यमातून सारी कामे होणारी असली तरी अनेकांना आजही पेनचीच सवय असते. कलावंतांनाही पेन्सिल हाती असेल तर काम करण्याचा उत्साह दुणावतो. हे लक्षात घेऊनच कंपनीने या लॅपटॉपसोबत एसर अ‍ॅक्टिव्ह पेनचा पर्याय दिला आहे. त्यामुळे यावर लिखाण करणे, प्रसंगी चित्रण करणे हा आनंददायक अनुभव ठरावा.
डब्लूक्यूएचडी
एचडीचा जमानाही आता मागे पडलाय. म्हणूनच या लॅपटॉपचा स्क्रीन डब्लूक्यूएचडी प्रकारचा अद्ययावत असा आहे. त्यासाठी वीजबचत करणाऱ्या आयजीझेडओ तंत्रज्ञानाचा वापरही कंपनीने केला आहे. कोणत्याही अँगलमध्ये ठेवल्यानंतर दिसणाऱ्या चित्रणात फरक पडत नाही, कारण त्यासाठी आयपीएस तंत्रज्ञान वापरण्याची काळजीही कंपनीने घेतली आहे.
सिनेमॅटिक सराऊंड साऊंड
लॅपटॉपवर सिनेमा पाहायचा असेल तर त्यासाठी यामध्ये सिनेमॅटिक डॉल्बी डिजिटल प्लस होम थिएटर सराऊंड साऊंड तंत्रज्ञान कंपनीने वापरले आहे. त्यामुळे आपण लॅपटॉपवर सिनेमा पाहतोय, असे वाटतच नाही. थेट सिनेमाघरात असल्याचाच भास होतो.
वीजबचत
लॅपटॉपच्या स्क्रीनमध्येच वेगवेगळे सेन्सर्स बसविण्यात आले असून त्यामुळे बाहेरच्या प्रकाशानुसार, लॅपटॉपच्या स्क्रीनचा प्रकाश गरजेनुसार स्वयंचलित पद्धतीने कमी-अधिक होतो. त्यामुळे भर उन्हात त्याचप्रमाणे अंधारातही वाचणे किंवा चित्र पाहणे नजरेला त्रासदायक ठरत नाही.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग
तुम्ही एवढा महागडा लॅपटॉप घेणारच असाल तर त्याचा वापर व्यवसायासाठी करणेही तेवढेच साहजिक आहे. हेच लक्षात घेऊन यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय देण्यात आली आहे. त्यामध्ये आजूबाजूचे आवाज कमी करणारे सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे केवळ तुमचाच आवाज स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला ऐकू जातो. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग टूलला स्काइपने प्रमाणित केले आहे.
एसएसडी
कार्यालयीन कामापासून ते सिनेमा पाहण्यापर्यंत अशी सर्व कामे जर तुम्ही या लॅपटॉपवर करणार असाल तर मग त्यामुळे लॅपटॉप हँग होतोय, असा अनुभव तुम्हाला अनेकदा घ्यावा लागेल, ते टाळण्यासाठीच एसरने यामध्ये एसएसडी तंत्राचा वापर केला आहे. वन टीबीटूच्या वापरामुळे कामाचा कितीही ताण आला तरी त्याच्या वेगावर कोणताही परिणाम होत नाही.
भारतीय बाजारपेठेतील किंमत- रु. ८३,९९९/-
वैदेही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2015 1:08 am

Web Title: acer laptops
टॅग : Technology
Next Stories
1 नव्या जुन्याचे मिश्रण…
2 टीव्ही घेताना…
3 इंटेक्स क्लाऊड एफएक्स सर्वाधिक स्वस्त स्मार्ट फोन
Just Now!
X