avinashगेल्या लेखात आपण अ‍ॅसिडिटी म्हणजे काय व त्याची कारणे पाहिली. या लेखात आपण अ‍ॅसिडिटीवरील उपचारांबद्दल माहिती घेऊ या. 

अ‍ॅसिडिटी – तपासण्या
एखाद्याला कधी तरी अ‍ॅसिडिटी झाली, तर ते समजण्यासारखे असते. अशा कधीतरी होणाऱ्या अ‍ॅसिडिटीवर काहीही उपचार करण्याची फारशी गरज नसते. परंतु अ‍ॅसिडिटीचा त्रास जास्त काळ असेल, वारंवार होत असेल तर अ‍ॅसिडिटी-अल्सरचे निदान करण्यासाठी जुन्या तपासण्याबरोबर गॅस्ट्रोस्कोपी, सोनोग्राफी व बायोप्सी इत्यादी अनेक तपासण्या कराव्या लागतात.
१. सोनोग्राफीने पोटातील विविध अवयवांच्या आजारांचे निदान करता येते. तसेच पोटात पाणी झाले आहे का तेही कळते.
२. बेरियम तपासणीमध्ये घट्ट दुधासारखा बेरियम प्यायलावर अन्ननलिका, जठर व लहान आतडय़ाचा काही भाग क्ष-किरणाद्वारे तपासून त्यामध्ये काही जखम, अल्सर व गाठ असल्याचे समजते. हल्ली हा तपास फार कमी वेळा करतात.
३. एन्डोस्कोपीमध्ये तोंडातून लवचीक एन्डोस्कोप घालून अन्ननलिका, जठर व लहान आतडय़ाचा काही भाग यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाते. अ‍ॅसिडिटी जास्त प्रमाणात असेल, तर अन्नमार्गाच्या वरच्या भागाची एन्डोस्कोपी करतात.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
save hasdeo forest
हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?

अ‍ॅसिडिटीवरील इलाज-
* अ‍ॅन्टासिडचे सिरप व गोळ्या- ही औषधे पोटाच्या म्हणजे जठराच्या अंत:त्वचेवर पसरतात व अ‍ॅसिडमुळे होणारा पोटाचा दाह (जळजळ) कमी करतात; परंतु याचा परिणाम तात्पुरता असतो. नवीन प्रकारच्या गोळ्या पोटात अ‍ॅसिड तयार होण्याची क्रिया कमी करतात. त्यामुळे अ‍ॅसिडिटीला आराम पडतो. (Ranitidine, Omeprazole, Rabeprazole) इत्यादी. अल्सर असल्यास ही औषधे ४-६ आठवडे किंवा जास्त काळ घ्यावी लागतात.
* मानसिक ताण कमी करणारी औषधे- जर अ‍ॅसिडिटी ताणतणावाने होत असेल, तर ही औषधे वापरल्याने अ‍ॅसिडिटीचे प्रमाण कमी होते.
* स्वत:च्या जीवनपद्धतीत बदल करणे- अति आंबट, तिखट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
* योग्य वेळी योग्य जेवण घ्यावे. जेवण वेळेवर घ्यावे व सात्त्विक असावे. सात्त्विक म्हणजे वरण, तूप, भात, पोळी-भाजी, दही, कोिशबीर इ.युक्त असावे.
* पुरेशी व शांत झोप घ्यावी. रात्रपाळीचे काम शक्य झाल्यास टाळावे. जागरण करू नये. प्रत्येकाला नियमित झोप आवश्यक असते.
* मद्यपान, धूम्रपान करू नये/ प्रमाणात करावे.
* ब्रुफेनसारख्या वेदनाशामक गोळ्या घेणे कमी करावे. कुठलेही वेदनाशामक औषध फार काळ घेऊ नये.
* मानसिक ताणापासून स्वत: रिलॅक्स कसे होता येईल ते पाहावे. (मेडिटेशन करून हे शक्य आहे.)
* अ‍ॅसिडिटीमुळे जठरात व आतडय़ातील पहिल्या भागात अल्सर होण्याची शक्यता असते. हल्ली औषधांमुळे हे आजार बहुतांशी बरे होतात. ज्या रुग्णांना रक्ताची उलटी किंवा अन्न अडकते त्यांनाच शस्त्रक्रियेची गरज पडते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
दूध पिणे- अ‍ॅसिडिटी झाली असता दूध प्यावे का?
बऱ्याच वेळा अ‍ॅसिडिटी झाली म्हणजे थंड दूध प्यावे असा समज आहे. दूध प्यायल्यानंतर थोडा वेळ नक्कीच बरे वाटते; परंतु दोन तासांनंतर पुन्हा अ‍ॅसिडिटी उफाळून वर येण्याची शक्यता असते. पूर्वी अ‍ॅसिडिटीवर प्रभावी औषधे उपलब्ध नव्हती तेव्हा दर दोन तासांनी दूध पाजत असत; परंतु आज प्रभावी औषधे उपलब्ध आहेत, त्यामुळे आज दर दोन तासांनी दूध देण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा Ranitidine, Pantaprazole, Rabeprazole यांसारखी प्रभावी औषधे आहेत, त्यामुळे अ‍ॅसिडिटी दिवसभर नियंत्रित राहते.

उपवासामुळे अ‍ॅसिडिटी वाढते?
कडक उपवासामुळे अ‍ॅसिडिटी वाढते. कडक उपवास करू नये. फळ, फळांचे रस, दूध इ. घेत राहावे. रमझानमध्ये संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत चार वेळा विशिष्ट आहार घेतला जातो. नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणाऱ्यांना जळजळ होते.

प्रवासात किंवा विदेशात अ‍ॅसिडिटी वाढते का?
जे शाकाहारी विद्यार्थी/आयटी व्यावसायिक विदेशी जातात, त्यांना बरेच वेळा पिझ्झा, केचप, कोकवर राहण्याची वेळ येते. काही जण प्रवास करताना ठेपला, दशम्या इत्यादी पदार्थ लोणच्याबरोबर खातात. या सर्वामध्ये छातीत जळजळण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. भारतातील प्रवासात पिझ्झा किंवा पावभाजीसारखे पदार्थ खाण्यात येतात. िलबू, जास्त प्रमाणात कच्चा कांदा, लोणी यांसारख्या पदार्थाबरोबर पावभाजी घेतली जाते, तर शीतपेये, केचप हे पदार्थ पिझ्झ्याबरोबर घेतले जातात. अशा वेळी वरील पदार्थाबरोबर एखादा साधा पदार्थ घ्यावा.

लहान मुलांना अ‍ॅसिडिटी होते?
योग्य व पुरेशा प्रमाणात अन्न न खाणे, अभ्यासाचा ताणतणाव, काही विशिष्ट प्रकारची औषधे घेणे व लठ्ठपणामुळे लहान मुलांना अ‍ॅसिडिटी होते. सतत उलटय़ा होणे, घशाशी सतत जळजळ होणे, कफ होणे व पोटात दुखणे ही त्याची लक्षणे आहेत.

गर्भवती महिलांना होणारी अ‍ॅसिडिटी
बहुतांशी गर्भवती महिलांना शेवटच्या तीन महिन्यांत छातीत जळजळ होते. जठरावरील ताणामुळे व अंत:स्रावामुळे असे होते. त्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात- १. दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे जेवा. २. हळूहळू खा. ३. तळलेले, मसालेदार किंवा तुपकट पदार्थ टाळावेत. ४. जेवणानंतर लगेच झोपू नका. ५. आपल्या डोक्याकडे उंच उशी ठेवा ६. छातीत जळजळ थांबण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भावस्थेच्या काळात सुरक्षित अशी औषधे घ्या.
शेवटी अ‍ॅसिडिटी हे वरवर पाहता साधे दुखणे वाटते. बहुतेक वेळा त्यावर स्वत:च औषधे घेतली जातात. ओवा खा, नाही तर हाजमोला/ईनो घ्या; परंतु अ‍ॅसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल, तर त्याबाबत योग्य तपासण्या करून डॉक्टरांकडून उपचार करून घेणे आवश्यक असते.
डॉ. अविनाश सुपे