राशिभविष्य : दि. २२ ते २८ ऑक्टोबर २०२१

चंद्र-गुरूचा केंद्र योग हा आर्थिक उन्नती दर्शवतो. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. त्याचा आपणास लाभ होईल.

zodiac-sign
साप्ताहिक राशिभविष्य : असा असेल तुमचा आठवडा

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-गुरूचा केंद्र योग हा आर्थिक उन्नती दर्शवतो. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. त्याचा आपणास लाभ होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार कराल. एखाद्याचे बोलणे फारसे मनावर न घेता त्याकडे दुर्लक्ष कराल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. वरिष्ठांच्या सूचना तंतोतंत पाळल्यास आपल्याकडे बोट दाखवायची वेळ येणार नाही. सहकारी वर्गाच्या मदतीने कामाला गती येईल. जोडीदाराची साथ मिळेल. मुलांना योग्य दिशा सापडेल. श्वासाकडे लक्ष द्या.

वृषभ चंद्र-शनीचा नवपंचम योग हा चिकाटीदर्शक योग आहे. चंद्राच्या चंचलतेला शनीच्या सातत्य आणि मेहनतीने अंकुश लागेल. त्यामुळे लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठ आपल्यासह आपुलकीने वागतील. मार्गदर्शक सल्ला देतील. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. जोडीदाराच्या कामकाजातील प्रश्न सोडवताना त्याची अधिक दमछाक होईल. मुलांच्या हुशारीचे कौतुक कराल. वातविकार आणि उष्णतेचे विकार बळावतील.

मिथुन रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यश आणि मान देणारा योग आहे. उच्च पद भूषवाल. नोकरी-व्यवसायात आपण सुचवलेल्या गोष्टी विचारात घेतल्या जातील. वरिष्ठांची नाखुशी पत्करावी लागली तरी धीर सोडू नका. संयम राखा. सहकारी वर्ग अधिक मेहनतीची तयारी दाखवेल. जोडीदाराच्या मनाविरुद्ध घटना घडतील. एकमेकांना सांभाळून घ्यावे लागेल. मुलांना आपल्या कार्यात यश मिळेल. परंतु जागरूक राहावे लागेल. शारीरिक तक्रारींसह मानसिक ताणही जाणवेल.

कर्क चंद्र-नेपच्यूनचा केंद्र योग हळवेपणा देईल. चंद्र आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह भावनाप्रधान आहेत. शांत डोक्याने विचार करून भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवावा लागेल. सहकारी वर्गावरील अन्याय उघडकीस आणाल. जोडीदार आपल्या कामात अधिक व्यस्त होईल. मुलांच्या समस्या चर्चेने सोडवाल. त्यांचे म्हणणे आणि मत आधी ऐकून घ्याल. हवामानातील बदलामुळे सर्दी-खोकला होईल.

सिंह शुक्र-नेपच्यूनचा केंद्र योग हा स्फूर्तिदायक योग आहे. शुक्र व नेपच्यून हे दोन्ही ग्रह कला आणि सादरीकरणाशी निगडित असल्याने आपल्यातील उत्स्फूर्तता वाढेल. भाषेवरील प्रभुत्व उपयोगी पडेल. नोकरी-व्यवसायात काही निर्णय बदलावे लागतील. पण हा बदल लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाकडून कामे वेळेत पूर्ण करून घ्याल. आपल्या मार्गदर्शनामुळे कामाची पत उत्तम असेल. अडचणींवर मात करत जोडीदार आगेकूच करेल. पायाच्या बोटांचे सांधे दुखतील.

कन्या चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा व्यक्तींची पारख करणारा योग आहे. चंद्राची भावनिक दृष्टी आणि बुधाची गुणग्राहकता यामुळे योग्य व्यक्तींवर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपवाल. नोकरी-व्यवसायात प्रगती कराल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाला आवश्यक ते प्रशिक्षण द्याल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. मुलांवर केलेले संस्कार कामी येतील. जखम झाल्यास ती चिघळेल. पू होईल.

तूळ चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा उत्साह आणि उत्कंठावर्धक योग आहे. कामातील आणि समाज-कार्यातील उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना संपूर्ण अभ्यास करून सभेपुढे मांडाल. सहकारी वर्ग आणि वरिष्ठांकडूनही स्वीकृती मिळेल. जोडीदारासह लहान-मोठय़ा बाबतीत मतभिन्नता आढळेल. विषय वाढवू नका. आपला समतोल ढासळू देऊ नका. मुले आपल्या क्षेत्रात नाव काढतील. रक्ताभिसरण संस्थेमध्ये अडथळे निर्माण होतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृश्चिक चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांचा समसप्तम योग हा उत्साहवर्धक आणि आनंद देणारा योग आहे. कामाव्यतिरिक्त आपल्या छंदामध्येही मन रमेल. ताणतणाव दूर होईल. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त दूरचे प्रवास संभवतात. वरिष्ठांच्या ओळखीतून कामे सुलभपणे पार पडतील. सहकारी वर्ग बुद्धिचातुर्य पणाला लावेल. मोठी जबाबदारी एकत्रितपणे पार पाडाल. कामाच्या ठिकाणी जोडीदाराचा रुबाब वाढेल. मुले स्वतंत्र विचार करतील. डोळ्यांची काळजी घ्यावी.

धनू चंद्र-बुधाचा केंद्र योग आपणास अधिक व्यवहारी बनवेल. मागील हिशोब पूर्ण कराल. जवळच्या व्यक्तींचे मन दुखवू नका. नोकरी-व्यवसायात कामातील खटकलेले मुद्दे अभ्यासपूर्वक सादर कराल. आपला स्पष्टवक्तेपणा कामी येईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्ग आपल्याशी सहमत नसतील, याची जाण ठेवा. जोडीदाराची  साथ मिळेल. त्याच्यावर अधिक कामे सोपवली जातील. मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल. डोळे व नाकासंबंधी प्रश्न उभे राहतील.

मकर चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा ज्ञानाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घ्यायला शिकवेल. आपल्या गुरूंची शिकवण सदैव स्मरणात ठेवाल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कामातील राजकारण ओळखून डाव टाकाल. वाईटपणा ओढवून घेऊ नका. ज्येष्ठ वरिष्ठांची संमती मिळेल. सहकारी वर्गाशी संबंध सुधारतील. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल. मुलांच्या आनंदात भर पडेल. वातविकार बळावल्यास वैद्यकीय तपासणी करावी लागेल.

कुंभ चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा उत्स्फूर्तता देणारा योग आहे. नव्या कल्पना सुचतील. नोकरी-व्यवसायात आश्चर्यकारक पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त कराल. वरिष्ठांची संमती मिळवाल. प्रत्येक गोष्ट कष्टाने साध्य करावी लागेल. सहकारी वर्गाकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासेल. जोडीदाराच्या कामातील अडचणी दूर होतील. मुलांना बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. उष्णतेचे विकार आणि सर्दी पडसे यामुळे अधिक थकवा जाणवेल. पौष्टिक व चौरस आहार घ्यावा.

मीन गुरू-शुक्राचा लाभ योग हा भाग्यकारक योग आहे. गुरूचे ज्ञान व शुक्राची कलात्मक दृष्टी यामुळे कामात अचूकता आणि रेखीवपणा येईल. नोकरी-व्यवसायात ज्या बाबींची आगाऊ सूचना मिळेल त्यासंबंधीचे काम वेगाने तयार ठेवाल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. सहकारी वर्गाची कामाबाबत कुरबुर असेल. जोडीदाराच्या बुद्धिचातुर्याचा अनुभव लाभदायक ठरेल. मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. गुह्येंद्रियांच्या तक्रारी उद्भवल्यास दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Astrology 22 to 28 october 2021 horoscope rashibhavishya bhavishya zodiac sign dd