आपल्याकडे गुरूसाठी एक सुंदर श्लोक आहे, ‘गुरुब्र्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नम:’. याचा अर्थ काय तर गुरू हा जीवनामधील आवश्यक घटक आहे. गुरूचे पाठबळ, मार्गदर्शन मिळाले तर मनुष्य अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो. नुकतेच रिओ ऑलिम्पिक संपले. भारताला सिंधू व साक्षी यांनी दोन पदके मिळवून दिली. दीपा कर्माकरनेदेखील क्रीडा रसिकांची मने जिंकली. या तिन्ही गुणवान खेळाडूंना हे यश प्राप्त झाले ते गुरूंमुळेच. इतकेच कशाला याच ऑलिम्पिकमध्ये जेव्हा जपानी महिला कुस्तीवीराला पदक मिळाले तेव्हा तिने काय केले; गुरूला दोनदा धोबीपछाड देऊन मग त्यालाच खांद्यावर घेऊन व्हिक्टरी लॅप मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरू-शिष्याचे नाते हे खूप घट्ट असते. प्रसंगी ते बाहेरून कठोर भासते, अगदी मेंटल टॉर्चर असल्यागत! पण यालाच घटाला आकार देणे म्हणतात. गोपीचंद हे सायना नेहवाल व सिंधू दोघांचे गुरू. सिंधूने जेव्हा रौप्य पदक मिळविले तेव्हा या गुरूचे योगदान जगापुढे आले. आपल्या शिष्येच्या, बॅडमिंटन नेटजवळील हालचाली व तिचा कोर्टवरील एकंदरीतच वावर चित्याच्या चपळतेने व्हावा यासाठी तिचे वजन न वाढू न देणे गोपीचंद यांना अत्यावश्यक वाटत होते. म्हणूनच सिंधूने चॉकोलेट, बिर्याणी व आईसक्रीम खाऊ नये अशा त्यांच्या ऑर्डर्स होत्या. सोबत त्यांच्या अ‍ॅकेडेमीमध्ये साखर व पाव पूर्णपणे वज्र्य होते. प्रसंगी सिंधूच्या ताटातील जेवण बाजूला काढून ठेवायचा कठोर निर्णय गोपीचंद घ्यायचे. पण ते इथेच थांबले नाही. आपली शिष्या आपल्या सोबत सर्व करणार आहे त्यामुळे आपणदेखील तितकेच तंदुरुस्त राहिले पाहिजे या जबाबदारीतून गोपीचंद यांनी स्वत: देखील पिष्टमय पदार्थाचे सेवन व्यर्ज केले. सिंधूचे लक्ष्य फक्त ऑलिम्पिक पदक हेच राहावे, तिच्या साधनेत कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून तिचा मोबाइल तीन महिने गोपीचंद यांच्या ताब्यात होता. पदक विजेते खेळाडू निर्माण करून दाखवेन हे वचन गोपीचंद यांनी अ‍ॅकेडेमीच्या दात्याला दिले होते. सायना नेहवाल व सिंधूच्या रूपाने गोपीचंद यांनी ते पूर्ण करून दाखविले. शीतपेयाच्या हानिकारक परिणामांची जाणीव असल्याने, गोपीचंद यांनी स्वत: ऐन भरात असताना शीतपेयाच्या जाहिरातीसाठी मॉडेल बनायचे नाकारून एक आदर्श पायंडा आपल्या चाहत्यांपुढे व शिष्यांपुढे पाडला होता. गुरूच लीड बाय एक्झाम्पल (lead by example) असे वागल्यावर शिष्येलादेखील गोपीचंद यांच्या या जाचक अटी मान्य करणे गौरवास्पदच वाटले असेल नाही का?

साक्षीच्या गुरूबद्दल देखील काय सांगावे. जेव्हा साक्षी लढतीमध्ये ५-०  अशी पाठीमागे होती तेव्हा त्यांनी एक गुरूमंत्र आपल्या शिष्येला दिला; ‘हाथ छुडा के पटका मार.’ अहो आश्चर्यम! आणि साक्षीने बाजी पलटवली. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये देखील असाच एखादा मेंटॉर आपल्याला लाभला तर तो आपले करिअर उजळवून टाकतो.

केंटकी वन हेल्थ या कंपनीमध्ये प्रत्येक प्रतिभावान कर्मचाऱ्याला एक मेंटॉर दिला जातो. कंपनीबद्दल इत्थंभूत माहिती, इंडस्ट्रीबद्दल माहिती, करिअर प्लॅनिंग व लीडरशिप स्टाइल या चार गोष्टींबद्दल हा मेंटॉर, कर्मचाऱ्यांना यशाची गुरूकिल्ली देतो.

बोब्रिक वॉशिंग इक्विपमेंट कंपनीमध्ये तर चक्क एक सॉफ्टवेअरच मेंटॉरचा रोल निभावत आहे. या सॉफ्टवेअरचे नाव आहे ‘मेन्टॉिरग कम्प्लिट’.

स्लेटर व बारमन हे दोघे मित्र नेपाळमध्ये भ्रमंती करत असताना त्यांना आढळले की नेपाळचे लोक खूप मोठय़ा प्रमाणावर ज्यूस पितात. आपणदेखील डी हायड्रेशन रोखण्यासाठी व शक्तिवर्धक पेय देण्यासाठी एखादी ज्यूस विकणारी कंपनी काढावी असे त्यांच्या मनात आले. कॅनडामध्ये व्हॅनक्युवर येथे परतल्यावर त्यांनी कॅनडीयन युथ बिझनेस फाउंडेशनशी संपर्क साधला. हे फाउंडेशन वित्त पुरवठय़ासोबत उत्तम मेंटॉरदेखील पुरवितात. ज्यूस ट्रक नावाचा स्टार्ट अप बिझनेस चालू करण्यासाठी या लोकांना डेवोन नावाची मेंटॉर असाइन करण्यात आली. ‘ब्लो ब्लो ड्राय बार’ या फ्रेंचाइजची मालकीण असल्याने डेवोनने ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या न्यायाने या जोडगोळीला स्टार्ट अपसाठी काही कडू उपदेशाचे डोस पाजले. दोन पुरुष मिळून जेव्हा एखादा धंदा सुरू करू इच्छितात तेव्हा एका स्त्रीच्या दृष्टीने त्या धंद्यातील प्लस व मायनस काय असू शकतात हेदेखील डेवोनने स्लेटर व बारमन यांना सांगितले. यामुळेच ‘ज्यूस ट्रक’ यशस्वी स्टार्ट अप ठरला.

कार्लिन यांचा बिल्डिंग इंडस्ट्रीमधील क्लायंटना स्पेशल माहिती पुरविण्याचा व्यवसाय आहे . पाच वर्षे यशस्वी धंदा केल्यानंतर त्यांना जाणवू लागले की त्यांचा आता व्यवसाय खुंटला आहे. नवीन क्लायंट त्यांना मिळेनासे झाले आहेत. अशा वेळी त्यांनी रसेल फ्रीमॅन या मेंटॉरची मदत घेतली. रसेल यांची स्वत:ची कॉस्च्युम कंपनी आहे व त्यांना ४० वर्षे व्यवसाय करण्याचा अनुभव आहे. सेल्स प्रोसेस इम्प्रूव्ह करणे व सेल्स करत असताना अधिक आत्मविश्वास दाखविणे या दोन गोष्टी रसेल यांनी कार्लिनला सुचवल्या. या सोबतच वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत रसेल यांनी मेंटरिंग केले. त्यामुळे कार्लिनचा व्यवसाय परत एकदा वृद्धिंगत होऊ लागला.

कधी कधी दुर्गम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना मेन्टॉिरग प्रोग्रॅमसाठी शहरामध्ये येणे शक्य नसते किंवा त्यांना घर सोडून ऑफिस कामासाठी दोन-चार दिवस बाहेर राहणे शक्य नसते. अशा लोकांसाठी ई-मेन्टॉिरग कार्यक्रम बनविण्यात येतो. एका पोर्टलद्वारे त्यांना सेल्फ लर्निगसाठी मटेरियलची सॉफ्ट कॉपी देण्यात येते, ई-मेल द्वारे मौलिक सूचना दिल्या जातात. गरज पडल्यास टेली सेमिनार्स घेण्यात येतात. थोडक्यात काय; गुरू डोळ्यासमोर असेल तरच मेन्टॉिरग होऊ शकते असे नाही. त्याचप्रमाणे गुरूमुळे फक्त शिष्याचाच विकास होत नाही तर गुरूदेखील शिष्याकडून काही तरी नवीन शिकत असतोच. हाच कन्सेप्ट तर खरा मेंटॉर-मेंटी कार्यक्रमाचा आत्मा असतो. तेव्हा वेळोवेळी गुरूमंत्र कानावर पडेल याची सुनिश्चिती करा व आपल्या करिअरला नवीन पंख द्या.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व कॉर्पोरेट कथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporate stories by prashant dandekar
First published on: 18-11-2016 at 01:13 IST