पोझिटिव्ह थिंकिंग ऊर्फ सकारात्मक विचारसरणी म्हणजे एक सांसर्गिक रोग आहे. जो या रोगाच्या संपर्कात येतो, त्याच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारते. पण बरेचदा बाहेरील जग हे स्पर्धा, गलिच्छ राजकारण, स्वार्थीपणा, असुरक्षितता यांनीच बजबजलेले असते असा गैरसमज झाल्याने ही सकारात्मक ऊर्जा माणसांकडून दडवून ठेवली जाते. आसपासच्या जगातील नकारात्मकता जर कमी करायची असेल तर ही सकारात्मक विचारसरणी फुलून डवरून बहरली पाहिजे व त्यासाठी प्रत्येक माणसाने हा संसर्गजन्य रोग जास्तीत जास्त पसरविला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदा जमिनीत दोन बिया शांतपणे पहुडलेल्या असतात. त्यातील एक बी बाहेरचे जग पाहायला आसुसलेली असते, तर दुसरीने त्या जगाचा धसका घेतलेला असतो. सकारात्मक विचारसरणी असलेली बी आपली मुळे खोलवर नेण्यासाठी खूप आसुसलेली होती, तर नकारात्मक विचार करणारी बी, आपल्यासाठी त्या खोलवर अंधारात काय दडवून ठेवले असेल या भीतीने मुळे घट्ट कवटाळून बसलेली होती. उत्साही बी जमिनीच्या वर डोकावून, सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघण्यास तयार होत होती; आपली जमिनीवर फुटणारी पालवी वसंतोत्सवाची वर्दी देण्यासाठीच आहे याची तिला खात्री होती तर नैराश्याने ग्रासलेल्या बीला आपण जर जमिनीशी संघर्ष केला तर आपला लुसलुशीत अंकुर खरचटला जाईल याची चिंता होती. ऊर्जेने रसरसलेल्या बीला आपल्या पानांना दवबिंदूंचा हार घालण्याची घाई झाली होती; तर उदास बीला आपली पालवी, गोगलगाय फस्त करेल अशी जीवघेणी भीती होती. शेवटी व्हायचे तेच झाले. उत्साही बी तरतरून आल्यावर एका लहान मुलाने तिला खत-पाणी घालण्यास सुरुवात केली. याउलट भेदरलेली बी जमिनीतच झोपून राहिली व एके दिवशी भुकेल्या कोंबडीने ती बी गट्टम करून टाकली. तात्पर्य काय तर नकारात्मक विचारसरणीने फक्त नुकसानच होते. त्यामुळे करिअर करताना आपल्या मनात फक्त सकारात्मक विचारसरणीचेच बीज रुजावे यासाठी आपण खास प्रयत्न केले पाहिजेत.

मराठीतील सर्व कॉर्पोरेट कथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Positive thinking
First published on: 26-08-2016 at 01:15 IST