वधूच्या दागिन्यांची खरेदी हा खऱ्या अर्थाने ‘सोहळा’ असतो. नथीपासून पैंजणापर्यंतची संपूर्ण खरेदी करताना नवऱ्या मुलीचा दागिन्यांवर भरपूर अभ्यास झालेला असतो. पारंपरिक, आधुनिक आणि इतर प्रांतीय दागिने या सगळ्याची सांगड घालत वधू दागिने खरेदी साजरी करते.

खरेदी हा मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय. मग ती खरेदी छोटी असो वा मोठी. खरेदी करण्यातून त्यांना जो आनंद मिळतो तो शब्दातून मांडता येणं तसं थोडं कठीणच. या प्रांतात न बसणाऱ्या काही मोजक्याच मुली असाव्यात. त्यातही एका खरेदीसाठी दहा दुकानं फिरणं हा त्यांचा अलिखित नियम असतो. सणासमारंभ, ताई-दादाचं लग्न, पिकनिक, ट्रेकिंग अशा अनेक कारणांसाठी खरेदी करणं म्हणजे मुलींसाठी सोहळाच असतो. मग जर त्यांच्याच लग्नाची खरेदी करायची असेल तर? तर हा खरेदीचा सोहळा महासोहळा होण्यात जराही वेळ लावत नाही. मग टिकलीपासून ते नेलपेंटपर्यंतची सगळी खरेदी अगदी व्यवस्थितच व्हायला हवी, असा त्यांचा पणच! कॉस्मॅटिक्स, हेअरस्टाइल अ‍ॅक्सेसरीज, पर्स, क्लच, चपला, साडय़ा, शरारा इत्यादी, इत्यादी.. या यादीला पूर्णविराम नाही. या यादीत न मांडलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दागिने. दागिन्यांची खरेदी करणं मुलींचं आवडतं काम. इतरांच्या लग्नात जाण्यासाठी इमिटेशन ज्वेलरीची खरेदी किंवा खऱ्याखुऱ्या म्हणजे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतानाच त्या इतक्या उत्साही असतात की स्वत:च्या लग्नात काय होत असेल हे वेगळं सांगायलाच नको. स्वत:च्या लग्नात कसं दिसायचं हे त्यांनी त्यांच्यापुरतं पक्कं ठरवलेलं असतं. लग्नाच्या दिवशी कोणत्या वेळी कोणता दागिना घालायचा, त्यात कसं वैविध्य असायला हवं, कसं वेगळपण वाटलं पहिजे, कशी जुन्या-नव्याची सांगड घालायची या सगळ्याचं विचारमंथन आधीच झालेलं असतं. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट. त्यातही पारंपरिक पद्धतीने लग्न होणार असेल तर सगळ्या हौसमौज पूर्ण केल्या जातात. त्यामुळे मुलींसाठी लग्नाचे दागिने हा अत्यंत जवळचा विषय असतो. त्यांच्या लग्नातल्या दागिन्यांची खरेदी त्या मनसोक्त साजरी करतात.

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

‘फॅशन किप्स ऑन चेजिंग’ असं म्हणतात. पण, ही फॅशन स्वत:मध्ये बदल करताना जुन्याचा आधार घेताना दिसून येते. म्हणूनच सेव्हंटीजच्या काळातले तोकडे कुर्ते-स्लॅक्स, केसाला हेअरबॅण्ड लावण्याची स्टाइल, पफ काढून केसांची रचना करणे अशा अनेक गोष्टी या काळात पुन्हा जिवंत झाल्या. पारंपरिक पण, त्यात नवलाईचा टच असलेली फॅशन तरुणींनी उचलून धरली. बघता बघता तो ट्रेण्ड झाला. या फॅशनला नावं ठेवणाऱ्याही या ट्रेण्डकडे झुकू लागल्या. मुद्दा हा की, जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने आल्यानंतर तरुणींना त्याबद्दल कुतूहल वाटू लागतं. दागिन्यांचंही तसंच आहे. आता दागिन्यांचे मोठमोठाले ब्रॅण्ड्स असले तरी स्वत:च्या लग्नासाठी मात्र मुली पारंपरिक दागिन्यांचा विचार प्राधान्याने करतात. इतरांच्या लग्नात इमिटेशन ज्वेलरीचा अतिरेक करतील कदाचित पण, त्यांच्या लग्नात पारंपरिक दागिने असण्याचा आग्रह त्या करतातच. लग्नात विधींसाठी नऊवारी साडी नेसण्याचा ट्रेण्ड सध्या जोरदार आहे. त्यामुळे इतर वेळी जीन्स-टी-शर्टवर वावरणाऱ्या मुली यावेळी मात्र ‘मराठमोळ्या’ दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात. अर्थात ही बाब सकारात्मकच आहे. अशा वेळी मोर्चा वळतो तो ठुशी, तन्मणी, शाहीहार, चपलाहार, कोल्हापुरी साज, चिंचपेटी, नथ, मोहनमाळ, बोरमाळ, पिचोडय़ा, बुगडी, वाकी, बाजुबंद अशा अनेक पारंपरिक दागिन्यांकडे. या सगळ्या नावातच गंमत आहे. या सगळ्याच दागिन्यांचं सौंदर्य डोळ्यांत भरून येतं. स्वत:च्या लग्नात हे दागिने वापारायचे म्हणून पहिल्यांदाच या दागिन्यांचा अनुभव घेणाऱ्याही काही मुली असतात. पण, त्यांचा हा पहिलाच अनुभव त्यांना निश्चितच आनंद देऊन जातो.

लग्नासारखी महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात राहावी, त्या दिवसातला प्रत्येक क्षण नंतरही तितकाच स्पष्टपणे आठवावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यामुळे या खास दिवशी चांगलं दिसणंही त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. आता बहुतांश मुली विधींच्या वेळी नऊवारी साडी नेसतात. त्यामुळे नऊवारी साडीला साजेसे दागिने इथे परिधान केले जातात. या वेळी सगळ्यात जास्त पसंती असते ती मोत्यांच्या दागिन्यांना. मोत्यांमध्येही पांढरे, पिवळे, लालसर आणि पाणीदार असे प्रकार आहेत. पाणीदार रंगाचे मोती सोन्यावर जास्त उठून दिसतात. नऊवारी साडी पुष्कळदा पिवळ्या रंगाची असून त्याला हिरवा, लाल, जांभळ्या रंगाचे काठ असतात. त्यामुळे नव्वारी साडय़ांवर जर मोत्यांचे दागिने घालायचे ठरवले तर त्यात त्या काठांनुसार एखादा तरी खडा असतो. या विशिष्ट रंगाच्या खडय़ामुळे त्या दागिन्याला शोभा येते. नेहा कुलकर्णी हिनेही तिच्या लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. तिचाही मोत्यांच्या दागिन्यांकडेच कल होता. ती सांगते, ‘नऊवारी साडीवर मी मोत्यांचेच दागिने घालणार हे मी ठरवलं होतं. बांगडय़ा, पैंजण, कंबरपट्टा, बुगडी-वेल, झुमके, मोहनमाळ, शाहीहार, बिंदी हे सगळे दागिने मोत्यांचेच होते. याशिवाय हेअरस्टाइल करतानाही त्यात मोत्यांच्या वेलचा उपयोग केला होता. तसंच चिंचपेटी हारही मी घातला होता. नऊवारी साडीवर मोत्याचे दागिने चांगले दिसतात, असं ऐकलं होतं आणि इतर मुलींचं बघितलंही होतं. विधी करताना मला पारंपरिक लुक हवा होता. हा लुक नऊवारी साडीने येतोच पण, त्यावर मोत्यांचे दागिने असतील तर तो आणखी खुलून दिसतो असं मला वाटतं. म्हणून मी मोत्याच्या दागिन्यांना प्राधान्य दिलं. रिसेप्शनला मात्र थोडं वेगळं ठरवलं होतं. मंगळसूत्र, मणी मंगळसूत्र, राणी हार, ठुशी, चांदीचा छल्ला, चांदीचे पैंजण असं घातलं होतं.’ या दागिन्यांची संख्या  खूप वाटत असली तरी लग्नानंतर इतर सण-समारंभांना या दागिन्यांचा चांगला उपयोग होत असल्याचं अनेकींचं म्हणणं आहे. याबाबत नेहा सांगते, ‘लग्नाच्या निमित्ताने घेतलेले दागिने इतर सणांना किंवा लग्न, मुंज, पूजा अशा समारंभाना जाताना घालता येतात. इतरांच्या लग्नात इतके दागिने घालत नसल्यामुळे माझ्या लग्नातल्या दागिन्यांचेच अनेक सेट तयार झाले आहेत.’

मुलींमध्ये सध्या नथीची खूप क्रेझ आहे. गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्र, संक्रांत अशा विविध सणांना साडी नेसली तर त्यावर नथ असतेच. चापाची नथ हा नाक न टोचलेल्या मुलींसाठी उत्तम पर्याय आहे. हिऱ्याची नथ हाही प्रकार अलीकडे बघायला मिळतो. त्यामुळे नथ घालण्याची हौस तरुण मुली पुरवून घेतात. ठुशीमुळे गळ्याला वेगळीच शोभा येते. ठुशीतल्या पेंडंटचा भाग हिऱ्यांनी किंवा खडय़ांनी सजलेला दिसतो. चिंचपेटी हा दागिना वेगळा लुक देतो. सोन्याची आणि मोत्यांची चिंचपेटी असे त्याचे दोन प्रकार आहेत. मोत्याच्या चिंचपेटी मुली प्राधान्य देतात. नऊवारी साडीवर तो जास्त उठून दिसत असल्यामुळे हा दागिना मुलींना आवडतो. गळ्याला घट्ट बसलेला हा दागिना चेहरा खुलवतो. याशिवाय मोहनमाळ, बोरमाळ अशा माळांपैकी एखादीचा आपल्या दागिन्यांमध्ये समावेश करण्याचा मुलींचा प्रयत्न असतो. या पारंपरिक दागिन्यांमध्ये थोडा आधुनिकतेचा रंग भरल्यानंतर त्याच दागिन्याचं वेगळं रूप दिसू लागतं. म्हणूनच चिंचपेटी, ठुशी, कोल्हापुरी साज अशा दागिन्यांमध्ये थोडी मीनाकारी, कुंदनचा वापर केला जातो. त्यामुळे पारंपरिकतेला नवलाईची झालर यानिमित्ताने दिसून येते. दागिन्यांमधले हे प्रयोग तरुणींना आकर्षित करतात. तन्मणी हा दागिना खूप साधा पण, लक्ष वेधून घेणारा ठरतो. पण, आता यातही प्रयोग होताना दिसत आहे. या दागिन्यातलं पेंडंट त्रिकोणी किंवा चौकोनी आकाराचं असतं. पण, आता त्यात गोलाकार पेंडंटही मिळू लागलंय. यात मुख्यत: डाळिंबी रंगाचा खडा वापरला जातो. पण, आता यातही वैविध्य आलं आहे.

दागिन्यांची निवड करताना साडय़ांचे रंग, साडय़ांच्या काठांचे रंग याही गोष्टी मुलींसाठी महत्त्वाच्या ठरतात. पिवळी नऊवारी साडी असेल तर त्या साडीच्या काठाच्या रंगानुसार दागिन्यांमध्ये त्याच रंगाचा खडा वापरला जातो. हिरवा, लाल, गुलाबी, जांभळा असे चार रंग अधिक प्रमाणात दिसून येतात. काही वेळा काही मुली याच्या एकदम उलट करतात. साडय़ांच्या काठाच्या रंगाच्या विरुद्ध रंगाचा खडा दागिन्यात वापरतात. दर्शना माळी हिने हाच प्रयोग केला होता. ती सांगते, ‘माझ्या नऊवारी साडीचा काठ जांभळा होता पण, मला मिसमॅच हवं होतं. म्हणून मी नऊवारी साडीवरच्या दागिन्यांमध्ये डाळिंबी रंगाचा खडा वापरला होता. रंगांच्या या कॉन्ट्रास्टमुळे साडी आणि दागिने हे दोन्ही उठून दिसत होते. कंबरपट्टा, बाजूबंद, ठुशी, पैंजण, राणीहार, बांगडय़ा, पाटल्या हे दागिने नऊवारी साडीवर मी घातले होते. रिसेप्शनच्या वेळी पूर्णपणे सोन्याचे दागिने वापरले होते. राणीहार, हिरवा चुडा, बांगडय़ा, पाटल्या असे दागिने होते. मी दोन्ही म्हणजे नव्वारी साडी आणि रिसेप्शनची साडी अशा दोन्हीवर बिंदी वापरली होती. पण, दोन्ही वेळच्या बिंदी नाजूक होत्या. नाजूकच घेण्यामागचं कारण असं की, कपाळ झाकलं जाता कामा नये आणि बटबटीत वाटायला नको.’

लग्नात काही दागिने सासरकडून दिले जातात. जोडवी या त्यापैकीच एक. साधारणत: सासरकडून मिळणाऱ्या गोष्टींमध्ये नवऱ्या मुलीला फारशी आवडनिवड नसते. त्यातही जोडवीसारख्या छोटय़ा दागिन्यात तर शक्यता कमीच असते. पण, आता काळ बदलतोय. मंगळसूत्रापासून ते जोडव्यांपर्यंत

जे-जे दागिने सासरकडून दिले जातात त्यासाठी नवऱ्या मुलीची पसंती विचारली जाते. जोडवी हा दिसायला लहान दागिना असला तरी त्याचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे आता यातही वधूला पर्याय आहेत. जोडव्यांमध्ये आता प्रयोग होऊ लागले आहेत. यातही नावीन्य दिसतंय. मध्यभागी खडे असलेले, बारीक घुंगरूचे लटकन असलेल्या, बारीक-जाड जोडवी अशा जोडव्यांच्या विविध डिझाइन्स बघायला मिळतात. एरवी अँकलेटला पसंती देणाऱ्या मुलींचा लग्नात मात्र पैंजण घालण्याचा आग्रह असतो. पैंजणांमध्येही आता विविध प्रकार मिळतात. सोने-चांदीचे पैंजण याव्यतिरिक्तही यात वैविध्य आलं आहे. नऊवारी सगळा साज मोत्यांचा असतो म्हणूनच पैंजणही मोत्यांचे बघायला मिळतात. तसंच आता नऊवारी साडीवर आणि रिसेप्शनसाठी घालायचे वेगळे असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे पैंजण बघायला मिळतात. रिसेप्शनसाठी घालण्याच्या पैंजणांमध्ये बारीक घुंगरू असलेले भरगच्च पैंजण, खडय़ांचे पैंजण, ऑक्साडाइजमधले बारीक व जाड पैंजण असे प्रकार आहेत.

लग्नातले विधी आणि रिसेप्शन अशा दोन्ही वेळा दोन वेगवेगळा लुक दिसायला हवा असाही काही मुलींचा विचार असतो. अशा वेळी दागिन्यांची निवड महत्त्वाची ठरते. वेगवेगळ्या विधींसाठी काही ना काही क्रिया सुरूच असते. या क्रिया सुरू असताना बांगडय़ा, कानातले, गळ्यातलं, अंगठय़ा, पैंजण असे दागिने वारंवार दिसून येतात. या विधींचे ‘इन अ‍ॅक्शन’ असे फोटोजही काढले जातात. त्यामुळे साहजिकच विधींच्या वेळी जास्तीत जास्त दागिने घालून फोटोत ते उठून दिसावे हा विचार मुलींनी केलेला असतो. म्हणूनच रिसेप्शनपेक्षा विधींच्या वेळी मुलींच्या अंगावर दागिने जास्त असल्याचं आढळून येईल. हाच नेमका विचार संपदा भत्तेने केला होता. ती सांगते, ‘मला दोन वेगवेगळे लुक करायचे होते. त्यामुळे पहिला लुक दुसऱ्यापेक्षा वेगळा कसा होईल याचा मी विचार केला. म्हणून नव्वारी साडीवर मोती आणि सोने असे दोन्हीचे दागिने घातले होते. खरं तर सोन्याचेच दागिने पण, त्यात मोती वापरले होते. बांगडय़ा, हार, कंबरपट्टा, नथ, कानातले डुल असे बरेच दागिने नव्वारी साडीवर मी घातले होते. यामुळे विधींच्या वेळी पारंपरिक लुक तयार झाला. रिसेप्शनच्या वेळी नेहमीचा ठरलेला शालू किंवा डिझायनर साडी नेसायची नव्हती. घागरा शिवून घेतला होता. घागरा असल्यामुळे कुंदनचा संपूर्ण सेट घेतला होता. मंगळसूत्र आणि मणी मंगळसूत्रासोबत कुंदनचा हार, कानातले आणि बिंदी असं घेतलं होतं. बांगडय़ा मात्र त्याच ठेवल्या होत्या. खरं तर मला घागऱ्यानुसार बांगडय़ा बदलायची संधी होती पण, मीच त्या बदलल्या नाहीत. कारण मला तसाच कॉन्ट्रास्ट लुक हवा होता. लग्नाचा हिरवा चुडा मला उतरवायचाही नव्हता. विधींच्या वेळी जास्तीत जास्त आणि रिसेप्शनला थोडे कमी असा दागिन्यांचा थाट मी केला होता.’

बांगडय़ांमध्ये पाटल्या, पिचोडय़ा अशा प्रकारांनाही मुली पसंती देतात. हिरव्या चुडय़ाच्या मागे-पुढे सोन्याच्या बांगडय़ा, पाटल्या पिचोडय़ा रचल्या की मेहंदीने सजलेला हात आणखी खुलून दिसतो. त्यातही काहींना कमी तर काहींना जास्त बांगडय़ा हव्या असतात. मग अशा वेळी त्यांच्या आवडीनुसार पाटल्या-पिचोडय़ांची रचना केली जाते. वधूची मेहंदी हा चर्चेचा विषय असतो. ती किती रंगली इथपासून ते त्या मेहंदीत काढलेल्या डिझाइन्सपर्यंत ही चर्चा रंगते. आता या चर्चेत भर पडते ती मेहंदी किती लांब काढल्याची. वधू आता मेहंदी थेट दंडापर्यंत काढतात. या दंडापर्यंतच्या मेहंदीला शोभा येते ती बाजूबंद आणि वाकी हे दागिने घातल्यानंतरच. किंबहुना दंडापर्यंत मेहंदी काढण्याचं काही जणींसाठी हे कारणच असतं. म्हणजे बाजुबंद किंवा वाकी घालायची आहे. दंड सुंदर दिसायला हवा म्हणून मेहंदीची लांबी तिथवर वाढवली जाते. कारण काहीही असो, दिसतं ते सुंदरच. त्यामुळे त्यांच्या या विचारमंथनाचं खरं तर कौतुकच करायला हवं. बाजुबंद नेहमीचा वापरला जात नाही. त्यामुळे मुली आता यातही शक्कल लढवतात. बाजुबंद नंतर हार म्हणून घालता येईल असं बनवण्याबाबतही ज्वेलर्समध्ये विचारतात. अशी विचारणा ज्वेलर्सकडे वारंवार होत असल्यामुळे दागिने करणारेही आता त्यांना पर्याय विचारू लागले आहेत. तसंच काहीसं पैंजणांचंही आहे. पैंजणांचे दोन जोड करणार असतील तर त्यातला एक जोड चांदीचा बारीक डिझाइनचा केला जातो. जेणेकरून नंतर ते ब्रेसलेट म्हणून वापरता येईल. ‘मल्टिपल युज’ हा या तरुणींचा मंत्र त्या इथेही वापरतात. वेल, बुगडी, झुमके, कुडी कानातल्यांचे प्रकारही लक्ष वेधून घेतात. कुडीमध्ये असलेले टपोरे मोती साधे असले तरी आकर्षक वाटतात. कानाच्या आकाराचे नवे कानातलेही आता आले आहेत. वेल या प्रकारातही आता वैविध्य दिसून येतं. यात पूर्ण सोन्याचे वेल, मोत्यांचे वेल, खडय़ांचे वेल असे प्रकार आहेत. तर काही वेल हे हेअरस्टाइलला जोडले जातील इतके लांब असतात. असे मोठे वेल घेतले तर त्यानुसार हेअरस्टाइल ठरवली जाते किंवा हेअरस्टाइलनुसार वेलाची लांबी ठरवली जाते.

विधी झाल्यानंतर रिसेप्शनच्या वेळी मात्र वधूचा वेगळाच लुक असतो. या वेळी इमिटेशन ज्वेलरी वापरण्यास अनेक मुली प्राधान्य देतात. तेव्हाची साडी बहुतेकदा डिझायनर साडी असते किंवा काही जणी घागऱ्याला पसंती देतात. त्या वेळी सोन्याचे किंवा मोत्याचे दागिने उठून दिसत नाहीत. अशा वेळी वेगळ्या डिझाइन्सचे दागिने घालण्यास त्या सरसावतात. यात कुंदनच्या दागिन्यांचा वापर अधिक असतो.

वधूचा लग्नासाठीचा ‘खरेदी सोहळा’ बराच मोठा आणि भव्य असतो. कधी, काय आणि कसं घातल्यानंतर चांगलं दिसेल याचा भरपूर अभ्यास करूनच समस्त वधुमंडळी खरेदीचा श्रीगणेशा करतात. अर्थात त्यासाठी त्याआधी वेळोवेळी इतरांच्या लग्नातले दागिने, इमिटेशन ज्वेलरी यांचं भरपूर निरीक्षण करून झालेलं असतं. तो अभ्यास मग स्वत:च्या लग्नातल्या दागिन्यांचा विचार करताना चांगलाच उपयोगी पडतो. शिवाय आताच्या  मुली फक्त दागिने घ्यायचे आणि लग्नात घालायचे एवढाच विचार करत नाहीत. तर त्याचा नंतर कसा, किती उपयोग करता येईल याचाही विचार करून मगच खरेदी करतात. लग्न ठरल्या क्षणापासून ते लग्न दोन दिवसांवर येईपर्यंत हा खरेदी सोहळा सुरू असतो. लग्नात वधूच्या अंगावरचे वैविध्यपूर्ण दागिने बघून ‘व्वा.. काय सुंदर दागिने आहेत. किती गोड दिसते आहेस गं’ असे उद्गार वधूला ऐकू येतात तेव्हाच तिला हा खरेदी सोहळा संपन्न झाल्यासारखा वाटत असावा..!

मांगटिका, कुंदन आता मराठीतही…
पारंपरिक दागिन्यांसोबत वेगवेगळ्या राज्यांतल्या काही दागिन्यांचाही विचार आता वधू करू लागली आहे. आपली परंपरा नसली तरी विशिष्ट दागिन्यात सौंदर्य असल्यामुळे इतर प्रांतातल्या दागिन्यांचा समावेश त्या त्यांच्या लग्नात करू लागल्या आहेत. मांगटिका हा दागिना खरं तर मराठी नाही, पण अनेकींना तो वापरायचा असतो. काहींचं कपाळ मोठं असतं आणि ते फोटोत नेहमी चांगलं दिसतं असं नाही. कपाळ थोडं कव्हर करण्यासाठी आणि वेगळा लुक येण्यासाठी मांगटिका वापरला जातो. मारवाडय़ांच्या या दागिन्याला मराठमोळ्या लग्नांमध्ये मागणी आहे. विधींच्या वेळी मुंडावळ्या असल्यामुळे मोठा मांगटिका फारसा चांगला दिसत नाही. म्हणून आता छोटय़ा आकाराचा मांगटिकाही मिळतो. रिसेप्शनच्या वेळी घागरा, शरारा, डिझायनर साडी यावर मोठय़ा आकाराचा मांगटिका इथे वापरता येतो. दक्षिण भारतीय लग्नांमध्येही फुलाफुलांचा आणि जाड पट्टीचा कंबरपट्टा वापरला जातो. साडी आणि इतर दागिन्यांसोबत उठून दिसायला हवा म्हणून या कंबरपट्टय़ालाही मुली आता प्राधान्य देतात. महाराष्ट्र, बंगाल आणि दक्षिण भारत या तीन राज्यांमध्ये पारंपरिक पोशाखात रंगाचा फार ठळकपणे वापर केला जातो. महाराष्ट्रात पिवळा-हिरवा-लाल, बंगालमध्ये पांढरा-लाल आणि दक्षिण भारतात केशरी-सोनेरी असे रंग वापरले जातात. हे रंग खूप ठळकपणे वापरले जातात, त्यामुळे त्यावर दागिने उठून दिसणं गरजेचं असतं. म्हणूनच इथल्या दागिन्यांमध्ये भरगच्चपणा आढळून येतो. इथे बारीक नक्षीकाम केलेले दागिने फारसे नसतात. दक्षिण भारतातील चोटी हा एक प्रकार आपल्याकडे दिसू लागला आहे. फुलांची डिझाइन असलेली ही चोटी वेणीसोबत चांगली दिसते. ज्यांचे केस लांब आहेत आणि ज्यांना वेगळ्या प्रकारच्या वेणीची हेअरस्टाइल करायची असेल त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. मुस्लीम लग्नांचा पगडाही आपल्यावर झालेला दिसतो. त्यांच्या लग्नात झुमर वापरला जातो. हा झुमर आता आपल्याकडे रिसेप्शनमध्ये दिसू लागला आहे. झुमरमुळे हेअरस्टाइलला वेगळा लुक येतो. नवाबी स्टाइल यायला हवी म्हणून कुंदन हार वापरले जातात. कुंदन हे मुळचं राजस्थानी आहे. पण, सध्या कुंदन आणि जडाऊचा ट्रेण्ड आहे. इमिटेशन ज्वेलरीमध्ये होणारे नवनवीन प्रयोग विधींमध्ये वापरता येत नसले तरी रिसेप्शन, हळद, संगीत, साखरपुडा अशा समारंभांना वापरले जातात. आता रिसेप्शनच्या घागरा किंवा शराऱ्यानुसार चुडाही बदलला जातो. यासाठी दोन्ही घरच्यांची संमती हवी. कारण आपल्याकडे हिरव्या चुडय़ाला महत्त्व आहे. एकदा घातल्यानंतर तो उतरवण्याची विशिष्ट वेळ असते. पण, जर संमती मिळाली तर मुली यातही प्रयोग करतात. एकीने तिच्या लग्नात लाल-पांढऱ्या रंगाचा शरारा घातला होता. त्यावर हिरवा चुडा तिला विसंगत वाटत होता. त्यामुळे तिने पंजाबी लोकांमध्ये असलेला लाल-पांढऱ्या रंगाचा चुडा रिसेप्शनसाठी घातला होता. लोकप्रिय कलाकार शाहीद कपूरच्या लग्नाची चर्चा बरीच रंगली. शाहीदची बायको मीरा राजपूतने चुडय़ामध्ये थोडा बदल केला होता. खरं तर त्यांच्यात लाल रंगाचा चुडा घालतात. पण, गुलाबी रंगाचा तिचा लेहंगा असल्यामुळे तिने चुडाही त्यात रंगाचा घातला होता.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com @chaijoshi11