विजया जांगळे –response.lokprabha@expressindia.com

टाळेबंदी, विलगीकरण, अंतरभान, मृत्युदर.. महासाथीच्या काळात काही शब्द आपण अक्षरश: हजारोवेळा उच्चारले. कोविडशी थेट संबंध नसलेला, मात्र या काळात अनंत वेळा वापरला गेलेला आणखी एक शब्द म्हणजे कंटाळा. काल परवापर्यंत सतत कशाच्या तरी मागे धावणारी आयुष्यं अचानक एका खोक्यात बंद झाली. घराच्या त्याच चार भिंती, त्यात वावरणारे तेच चार चेहरे, तीच कामं, तेच एकटेपण आणि तीच अनिश्चितता.. या साऱ्यातून कधी नव्हे एवढय़ा घाऊक प्रमाणात उद्भवलेली भावना म्हणजे कंटाळा. पण एक टप्पा असा येतो की कंटाळ्याचाही कंटाळा येऊ लागतो आणि मग धडपड सुरू होते, ती त्या भावनेतून सुटका करवून घेण्याची.. अशी धडपड सर्जनशील मनांसाठी पोषकच. सारं जग कंटाळ्याने ग्रासलेलं असताना यातूनही काही सुंदर घडवता येईल, यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि तो सार्थ ठरेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले.

खरं तर टाळेबंदी ही तुम्हा-आम्हासाठी नवखी आणि कंटाळवाणी अवस्था. पण तासन् तास स्टुडिओत रमणाऱ्या, नवं काही सुचेपर्यंत दुसरं काहीच न सुचणाऱ्यांना, शून्यातून काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्याची क्षमता लाभलेल्यांना यात काही नवं वाटण्याचं कारण नाही. त्यांच्याशी बोलताना जाणवतं की हे संकट तर त्यांच्या प्रतिभेसाठी संधी घेऊन आलं. जग एका जागी थबकलं असताना, नैराश्याशी, अनिश्चिततेशी, चिंतांशी झगडत असताना त्यांनी त्यांच्या मनातल्या याच साऱ्या अमूर्त आंदोलनांना हाती येईल त्या माध्यमातून मूर्त स्वरूप दिलं. नवी माध्यमं आजमावून पाहिली, स्वत:ला आव्हानं देऊन पाहिली. अनिश्चिततेच्या पोकळीत जन्माला आलेल्या अर्थपूर्ण रंग, रेषा, आकारांविषयी..

ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते सांगतात, ‘टाळेबंदी हा अनेकांसाठी कंटाळवाणा काळ असला, तरी माझ्यासाठी ती संधीच होती. मला माझ्या मनासारखं काम करायला, प्रयोग करायला भरपूर वेळ मिळाला. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, यावर ठाम विश्वास असेल, तर कंटाळा कधीच येणार नाही. या काळात मी जवळपास १०० पेंटिंग्ज केली. रंगांच्या माध्यमातून कॅनव्हासवर व्यक्त होणं हा माझ्या जगण्याचा एक भाग आहे. त्यामुळे कोविडच्या काळातही माझा दिनक्रम नेहमीप्रमाणेच सुरू आहे. वाचन-लेखन-पेंटिंग असं काही ना काही दिवसभर सुरूच असतं. एखादं पेंटिंग एका दिवसात होतं तर एखादं मनासारखं व्हायला चार-पाच दिवसही लागतात. पण या काळात थोडं नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याची संधी मिळाली. कॉलेजमध्ये असताना आम्हाला कॅनव्हास परवडत नसे. त्यावेळी चार बाय चार फुटांचा कॅनव्हास साधारण १० रुपयांना असे, पण तेव्हा खिशात तेवढे पैसे नसायचे. त्यावर पर्याय म्हणून आमच्या शिक्षकांनी एक युक्ती शिकवली होती. आम्ही चार-पाच विद्यार्थी मिळून बाजारातून खादीसारख्या जाडय़ा-भरडय़ा कापडाचा मोठा तागा आणायचो. तो ताणून त्यावर एक विशिष्ट सोल्युशन लावायचो. ते वाळलं की कॅनव्हास तयार व्हायचा. त्यातून आम्हाला प्रत्येकी तीन तरी कॅनव्हास मिळायचे. या टाळेबंदीच्या काळात मी अशाच स्वरूपाचा प्रयोग करून पाहिला. आपण लादी पुसायला बारदान वापरतो, ते आणून त्यापासून याच पद्धतीने कॅनव्हास तयार केला. हा प्रयोग यशस्वी झाला आणि तशा स्वरूपाच्या कॅनव्हासवर मी १५ पेंटिंग्ज केली. माझ्याकडचे विद्यार्थीही सांगायचे की कॅनव्हास मिळत नाही. त्यांनाही मी ही प्रक्रिया शिकवली. हे कॅनव्हास जास्त टिकाऊ असतात, असा माझा अनुभव आहे.’

‘कला समीक्षक जॉन बर्जर यांचं ‘वेज ऑफ सीईंग’ नावाचं एक अत्यंत उत्तम पुस्तक आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांंना आणि कलेत स्वारस्य असणाऱ्या सर्वांनाच ते वाचण्याचा सल्ला देत असतो. या टाळेबंदीच्या काळात मी त्याचा अनुवाद केला. ते काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. पूर्ण झालं की मी त्याच्या प्रकाशनाची प्रक्रिया सुरू करेन.’

‘अलीकडे चित्रकला शिकायला येणारे विद्यार्थी त्यातून किती पैसे मिळणार यावर लक्ष ठेवूनच असतात. गायतोंडेंचं एक चित्र ४० कोटींना विकलं गेल्याचं ऐकतात आणि मग त्यांना वाटतं की आपणही असं काहीतरी करू, पण माझ्यामते विद्यार्थ्यांंनी आपल्याला चित्रकलेकडून काय मिळणार याचा विचार करण्याऐवजी, आपण चित्रकलेला काय देणार, या क्षेत्रात आपलं योगदान काय असायला हवं यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.’

‘बरे झाले देवा, केले तू वाटोळे’ यावर माझा विश्वास आहे. एखादं संकट हे आपल्या भल्यासाठीच येत असतं, अशा सकारात्मक वृत्तीने आयुष्याकडे पाहिलं तर संकटातल्या संधी गवसतात. जिवंत राहणं सोपं आहे, जगणं कठीण आहे, हे आपल्या लक्षात येणं महत्त्वाचं असतं. अशी संकटं हे लक्षात आणून देतात.’

अशोक हिंगे हे सतत प्रयोग करत राहणारे कलाकार. त्यांच्या मते चित्रकाराचं आयुष्य हे एखाद्या संशोधकासारखंच असतं. तो सतत नव्याच्या शोधात असतो. त्यासाठी प्रयोग करत राहतो. काही वेळा हे प्रयोग फसतातसुद्धा, पण फसलेल्या प्रयोगातूनही त्याला काही तरी नवं गवसलेलं असतंच. एक छोटासा दुवा पकडून तो आणखी नवं काही तरी शोधू लागतो. साथीच्या या काळात असे प्रयोग करायला त्यांना वेळ मिळाला आणि अशा अव्यक्त राहिलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आपल्या या अनुभवाबद्दल ते सांगतात, ‘मी साधारणपणे अ‍ॅक्रेलिक रंगांतून माझ्या चित्रकृती साकारतो. संवेदनांची आवर्तने, लिव्हिंग लाइन्स आणि कॉमास्केप्स या संकल्पनांवर मी गेल्या काही वर्षांपासून काम करतोय. रंगांतून साकारलेल्या या संकल्पना वायर, लाकूड, बांबू, धातू अशा आणखी वेगवेगळ्या माध्यमांतून मांडण्याचा प्रयत्न करून पाहायचा होता. टाळेबंदीच्या काळात हा प्रयोग करण्यासाठी पुष्कळ वेळ होता, मात्र तेव्हा दुकानं बंद असल्यामुळे आवश्यक साहित्य उपलब्ध होत नव्हतं. मग त्या काळात मी कागद हे अगदी सहज उपलब्ध असलेलं माध्यम स्वीकारलं. हे असं माध्यम आहे की त्याचा प्रत्येकाशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संबंध असतो आणि त्याच वेळी प्रत्येकाचे संदर्भ मात्र वेगळे असतात. त्यामुळे कागदाचे तुकडे वापरून माझ्या संकल्पनेतल्या कलाकृती साकारण्याचा प्रयत्न केला. रंगाचा एखादा फटकारा मारून तो कापून नंतर तशाच स्वरूपाचे अनेक आकार तयार केले आणि त्यांचा कोलाज केला. कॉमास्केप्समध्येही कागद वापरून काही प्रयोग करून पाहिले. हे प्रयोग करताना समाधान तर लाभलंच पण पुढच्या अनेक कलाकृतींचा पाया रचला गेला. आता याच संकल्पनांवरच्या कलाकृती मी स्टील, लाकूड वगैरे माध्यमं वापरून साकारणार आहे.’

संतोष काळबांडे यांच्या चित्रकृतींमध्ये टाळेबंदीचे सामान्यांच्या आयुष्यात उमटलेले पडसाद दिसतात. संतोष सामान्यपणे मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन्स) आणि त्रिमितीय रचना करतात. त्यांनी काडेपेटीच्या काडय़ा वापरूनही विविध कलाकृती तयार केल्या आहेत. पण अचानक टाळेबंदी लागू झाली आणि स्टुडिओमध्ये पुरेसं साहित्यही उपलब्ध नव्हतं. अशा स्थितीत काय करायचं असा प्रश्न कोणालाही पडला असता. संतोष यांनी त्यावर उत्तर शोधलं. त्याविषयी ते सांगतात, ‘टाळेबंदीमुळे हाती भरपूर वेळ होता. तो एखादं मोठं आणि नेहमीपेक्षा वेगळं काम करण्यात सत्कारणी लावायचा असं मी ठरवलं. स्वत:च स्वत:ला आव्हान द्यायचं ठरवलं. सात बाय नऊ फुटांच्या कॅनव्हासवर काम सुरू केलं. अथक धावणारी शहरं आणि माणसं टाळेबंदीमुळे अक्षरश: थिजून गेली होती. स्टॅण्ड स्टिल स्वरूपातलं हे जग दर्शवणारं स्टिल लाइफ नावाचं पेंटिंग मी केलं. यात भीतीचंही चित्रण केले आहे. प्रत्येकाच्या मनातल्या भीतीचं स्वरूप वेगवेगळं असतं. काही वेळा लहानपणी आलेला एखादा भीतिदायक अनुभव मनावर कायमचा कोरला जातो. अशा स्वरूपाच्या माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित प्रतीकांचाही वापर मी यात केला आहे.’ स्थिर चित्र ज्या पद्धतीने चितारलं जातं साधारण त्याच पद्धतीने त्यांनी हे काम केलं. स्टोअर रूममध्ये उपलब्ध साहित्याची रचना केली आणि ती रचनाच कॅन्व्हासवर चितारली. त्यांच्या या चित्रातून टाळेबंदीच्या त्या सुरुवातीच्या काळात निर्माण झालेलं भीतीचं, संशयाचं वातावरण आणि थबकलेलं आयुष्य प्रतिबिंबित होतं.

या काळत त्यांनी असंच आणखी एक अर्थगर्भ पेंटिंग साकारलं. त्याचं शीर्षक आहे, ‘पनिशमेन्ट’. टाळेबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी बडगा उगारला होता. अशा व्यक्तींना भर रस्त्यात शिक्षा करण्यात येत होती. ओणवं होऊन हात मागे बांधून उभं राहणं— सामान्यपणे ज्याला कोंबडा करणं म्हटलं जातं, तशा स्थितीत उभं राहण्याची शिक्षा झालेल्या व्यक्तींची दृश्यं रोज वृत्तवाहिन्यांवर दिसत होती. संतोष यांच्या चित्रात असाच एक कोंबडा झालेला माणूस दिसतो. त्याविषयी ते सांगतात, ‘मुळात ही पनिशमेन्ट आली कुठून तर निसर्गातून. निसर्गाशी खेळण्याचा प्रयत्न मानवाने केला आणि त्याचीच शिक्षा आपण सगळे आज भोगत आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न मी या चित्रातून केला आहे. याला नकाशाची, त्यातल्या अक्षांश रेखांशांची पाश्र्वभूमी आहे. या रेषा निसर्गाने आखलेल्या नाहीत. निसर्ग एकच आहे, आपणच त्याचे भाग पाडले. सीमा निश्चित केल्या आणि आज आपण निसर्गाची हानी करत आहोत, हे पोहोचवण्याचा प्रयत्न मी या चित्रातून केला आहे.’

आपल्या अंतरंगात डोकावण्याएवढी उसंत कोविडकाळाने लोकांना दिली. या काळाने सामान्यांत दडलेले कलाकारही जगासमोर आणले. कलाकाराला गरज असते ती प्रेरणेची. कोणाला ती कुठून मिळेल, सांगता येत नाही. ठाण्यातल्या रुपेश बुधे या तरुणाला ती मिळाली शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातून. शिवाजी महाराजांविषयी त्याला लहानपणापासूनच आकर्षण होतं आणि खास कुतूहल होतं ते त्यांच्या आरमाराविषयी. त्या काळातली जहाजं कशी असतील, ती कशाप्रकारे बांधली जात असतील, याची माहिती तो मिळवू लागला आणि त्यातूनच त्याला छंद जडला, तो या जहाजांच्या प्रतिकृती तयार करून पाहण्याचा. त्याविषयी रुपेश सांगतो, ‘मला हस्तकलेत काहीना काही प्रयोग करून पाहण्याचा छंद लहानपणापासूनच होता. सुरुवातीला मी ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ चित्रपटातल्या जहाजाची प्रतिकृती तयार केली होती. ती करताना मजा आली. नंतर शिवाजी महाराजांच्या आरमारातल्या युद्धनौकांच्या, व्यापारीनौकांच्या प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न सुरू केला.’ टाळेबंदीच्या काळात रुपेशची नोकरी गेली, पण त्याची कला त्याच्या सोबत होती. हाती भरपूर मोकळा वेळ राहू लागल्यामुळे त्याने जहाजांच्या प्रतिकृतींवर लक्ष अधिक केंद्रित केलं. ‘गुराब, गलबत, पाल या युद्धनौका, शिबाड ही व्यापारी नौका, तिरकाठी गुराब, मचवा, पडाव, पाटीमार, एचएमएस व्हिक्ट्री, एचएमएस हंटर, एचएमएस इंटरसेप्टर, सांता मारिया पोर्तुगीजा, आयएनएस तरंगिणी, युनिकॉर्न अशा अनेक नौकांच्या प्रतिकृती मी तयार केल्या आहेत. शिवकालीन नौकांपैकी ज्यांच्या लांबी—रुंदी—उंची विषयीची माहिती उपलब्ध आहे, त्यांच्या त्याच प्रमाणातल्या प्रतिकृती साकारल्या. बाकीच्या प्रतिकृती मात्र अंदाजे तयार केल्या. सर्व प्रतिकृतींसाठी माऊंट बोर्ड हे माध्यम वापरलं आहे. सुरुवातीला प्रतिकृती पुरेशा मजबूत तयार होत नव्हत्या, मात्र प्रयोग करता करता ही समस्या दूर करण्यात यश आलं. आता मी तयार केलेल्या प्रतिकृती सहा—सात र्वष सहज टिकतात.’

शिवकालीन नौकांच्या प्रतिकृती अचूक तयार व्हाव्यात म्हणून रुपेशने विविध पुस्तकांचा संदर्भ घेतला. गजानन भास्कर मेहंदळे यांचं ‘शिवछत्रपतींचे आरमार’, डॉ. सचिन पेंडसे यांचं ‘मराठा आरमार’, बी. के. आपटे यांचं ‘हिस्ट्री ऑफ मराठा नेव्ही अँड मर्चन्ट शिप्स’, मनोहर माळगांवकर यांचं ‘कान्होजी आंग्रे’, डॉ. द. रा. केतकर यांचं ‘भारतीय नौकानयनाचा इतिहास’ इत्यादी पुस्तकं अभ्यासल्याचं रुपेश सांगतो. याव्यतिरिक्त मराठा आरमाराचा अभ्यास करणाऱ्या काही व्यक्तींशीही त्याने फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली आहे.

नौदल या विषयात स्वारस्य असणाऱ्या आणि शिवकालीन इतिहासाविषयी कुतूहल असणाऱ्या व्यक्तींकडून रुपेशने तयार केलेल्या या प्रतिकृतींना मागणी आहे. या प्रतिकृतींच्या छायाचित्रांचा वापर करून शिवरायांच्या आरमाराविषयी माहिती देणारी दिनदर्शिकाही तयार करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त एका संग्रहालयानेही शिवकालीन जहाजं आणि बोटींची माहिती सांगण्यासाठी रुपेशने तयार केलेली छायाचित्रं वापरली आहेत.

विलगीकरण खरं तर कंटाळवाणं आणि निराशाजनक. पण साथरोगामुळे सक्तीने वाटय़ाला आलेलं हे एक प्रकारचं विलगीकरणच या सर्जनशील मनांना बरंच काही देऊन गेलं. काहीतरी साकारण्यासाठी आवश्यक असलेली शांतता, एकाग्रता त्यांना या काळाने मिळवून दिली. स्वत:च आखायचं आणि स्वत:च खोडायचं, मांडायचं आणि मोडायचं, आपल्या कल्पनेच्या अधिकाधिक जवळ पोहोचण्यासाठी धडपडत राहायचं, हेच तर कलाकाराचं आयुष्य असतं. ही अखंड धडपड विनाव्यत्यय सुरू ठेवण्याएवढी उसंत हा काळ त्यांना देऊन गेला..