स्त्रियांनी सुंदर कपडे घालून नटायचं-मुरडायचं आणि पुरुषांनी मात्र कपडे अंगावर चढवायचे हेच आपल्या समाजात रुढ आहे. आता परिस्थिती बदलतेय. स्वत:च्या दिसण्याविषयी जागरुक असणाऱ्या पुरुषांची वर्णनं इंग्रजी भाषा कशी करते?

केसांनी बिघडवले काय?
जे वळविशी वारंवार।
का न वळविशी मनास रे?
जिथं दडले विषय-विकार॥
‘आत्मतत्त्वाकडे लक्ष द्या, देहबुद्धी बनू नका.’ असा उपदेश आपल्या संतांनी केलाय. केस, कपडे, जोडे, वगरे बारूपाकडे अधिक लक्ष देणाऱ्या माणसांबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी, मराठीत ‘पोषाखी’ हा शब्द आहे. पश्चिमी वस्त्रपद्धती अन् शिष्टाचार आता आपल्याकडेही रूढ झालेत. नव्या जगात नीटनेटकं, स्मार्ट दिसणं हा कामाचाच भाग बनलाय. दारोदार फिरणारा मेणबत्ती किंवा साबण विक्रेतासुद्धा आता टाय लावून बूट वाजवत येतो. पुरुषांच्या वस्त्रप्रावरणांची भव्य दालनं आणि त्यांना रूपसंपन्न बनवण्याचा दावा करणारी पार्लर्स, या पोषाखीपणाची साक्ष देत उभी आहेत. अशा पोषाखी पुरुषांसंबंधी अलीकडेच एक लेख छापून आलाय. शीर्षक आहे- Dandy dudes (पोषाखी पठ्ठे)
dandy  (डॅन्डि) – a man who cares a lot about his appearance and always wears fashionable clothes; पोषाखी.
उदा. 1) He’s a real dandy. He dresses carefully even before retiring for bed.

2) I was surprised to know that the fashionably dressed dandy was our new teacher.

dude (डय़ूड) – a man; माणूस ; पठ्ठया.
उदा. 1) It is a school where students greet their teachers with ‘Hay dude’. 

2) The young chap is a real dashing dude.

स्वतच्या दिसण्याविषयी जागरूक असणारे, पुरूष ही अलिकडची घटना आहे. त्याआधी काय स्थिती होती? Macho men of the past never bothered about their looks. (पूर्वीचे बाप्पे स्वतच्या दिसण्याची मुळीच पर्वा करायचे नाहीत.)
macho (मॅचो)-male in an agressive way.
(macho म्हणजे पारंपरिक, नमुनेदार पुरुषासारखा अर्थात बळकट, धाडसी आणि भावनांचं प्रदर्शन न करणारा.)
उदा. 1) He is bored of playing the role of hard macho man in films.

2) He is too macho to admit he was hurt when his girlfriend left him.

लेखात पुढं म्हटलंय, Dandies were considered effeminate and were frowned upon. (पोषाखी पुरुष बायले समजले जायचे आणि त्यांच्याबद्दल नापसंती दर्शवली जायची.)
effeminate (इफेमिनट्) – an effeminate man looks, behaves, or speaks like a woman; बायल्या.
उदा. 1) An effieminae man called Mavashi is a typical role in tamasha.

2) My computer teacher is not just weak. He is effeminate.

frown upon (फ्राउन अप्ऑन) – to disapprove of something; नापंसती दर्शवणे.
उदा. 1) Even though divorce is legal, it is still frowned upon in India.

2) Personal phone calls are frowned upon at work.

Dandy dudes संबंधी चच्रेचा समारोप एका पोषाखी शब्दानेच करूया.
sartorial (सारटॉरिअल) – relating to clothes, especially the style of clothes that a man wears.
उदा. His sartorial elegance was a credit to his fashion designer wife.
[रा. स्व. संघाच्या गणवेशातली अर्धी चड्डी बदलण्यावर विचार चालू आहे, या बातमीचं शीर्षक होतं Sartorial-soul-searching (पोषाखी-आत्म-शोध)]
स्टाईल है तो सबकुछ है, स्टाईल नही तो कुछ भी नही। हे आधुनिक पोषाखी पठ्ठयांचं म्हणणं एका प्राचीन संस्कृत कवीनं कसं चपखलपणे मांडलंय पहा. किं वाससा? तत्र विचारणीयं, वास: प्रधानं खलु योग्यताया:। कपडय़ांचा महिमा काय? तर खरोखर कपडेच माणसाची योग्यता ठरवतात. पीतांबरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां, दिगंबर वीक्ष्य विषं समुद्र:॥ (समुद्रमंथन प्रसंगी) पीतांबरधारी विष्णूला समुद्राने आपली कन्या लक्ष्मी दिली पण वस्त्रहीन शंकराला मात्र विष दिले.