lp5601youthमी मांगटिकाच्या बाबतीत खूप ऐकलं आहे, पण तो नेमका कसा घालावा हे कळत नाही. या मांगटिकाचे प्रकार आणि त्याला घालण्याची पद्धत सांगशील का?
– सुप्रिया कदम, २३.

खरंच सुप्रिया, मांगटिका दिसायला फार सुंदर दिसतो. मुळात तो मारवाडी विवाहित स्त्रियांनी घालायचा दागिना आहे. आपल्याकडे पायात जोडवी घालतात, तसं त्यांच्याकडे हा मांगटिका घालतात. त्यांच्याकडे लग्नात सासू आपल्या होणाऱ्या सुनेला हा मांगटिका देते. पण हल्ली मालिकांमुळे तो घराघरात पोहोचला आहे आणि विवाहित स्त्रियांनीच घातला पाहिजे हे बंधनसुद्धा बाजूला पडलंय. बाजारात दोन प्रकारचे मांगटिका दिसतात. एक म्हणजे मोठे दोन किंवा तीन पदर असलेले आणि दुसरे छोटेसे, एखाददुसरा खडा किंवा कुंदन असलेले. त्यातल्या लहान मांगटिकांना बिंदी पण म्हणतात. मांगटिका घालताना आधी केसांचे पार्टिशन कोणत्या बाजूला करायचे आहे ते ठरवणे गरजेचे असते. शक्यतो मिडल पार्टिशन केले जाते, पण तसे करताना केसाची एखादी बट मांगटिकावरून घेता येईल, याकडे लक्ष ठेव. जेणेकरून मांगटिका मागची चेन त्यामागे लपवता येईल. मांगटिकाच्या मागे हेअरस्टाइल करताना केसांचा पफ ठेवल्यास उत्तम, कारण कित्येकदा मांगटिका लावताना, भरपूर पिना वापरल्यामुळे केस बसले जातात आणि हेअरस्टाइल फ्लॅट दिसते. मांगटिका लावताना पुरेशा पिना वापरणे गरजेचे असते, नाहीतर काही वेळाने तो कपाळावर सरकण्याची शक्यता असते. हल्ली नेकपीसचा वापर मांगटिका म्हणून करतात. हेअरस्टाइलच्या दृष्टीने ही सोप्पी आणि स्टायलिश ट्रिक आहे. नेहमीच्या बनसोबत एखादा नेकपीस मांगटिका म्हणून लावल्यास छान दिसतो.

lp55माझ्या ताईचं लग्न आहे. लग्नात मी अनारकली घालणार आहे. पण माझे केस शॉर्ट असल्याने त्यावर कोणती हेअरस्टाइल करू हे सुचत नाही. मला नुसते केस सुटे ठेवायचे नाहीत. तर मला काही हेअरस्टाइलचे पर्याय सांगशील का?
– ऋचा देशपांडे, २४.

शॉर्ट हेअरकट असलेल्या मुलींना हेअरस्टाइल करताना ही समस्या नेहमीच भेडसावत राहते. त्यामुळे ऋचा तुझी काळजी मी समजू शकते. हा, पण म्हणून केस शॉर्ट ठेवूच नये, असं काही नाही बरं का.. उलट, शॉर्ट हेअरकट असलेल्या मुली बोल्ड, स्पष्टवक्त्या आणि कॉन्फिडंट समजल्या जातात. त्यामुळे अगदी ऐटीत तू तुझे शॉर्ट हेअर मिरव, नॉट टू वरी. आता प्रश्न आला हेअरस्टाइलचा. तर आधी मला सांग, तुला हेअरकलर करायला आवडेल का? छान र्बगडी, शॉकिंग ब्लू, चॉकलेट शेडचे हायलाइट्स करायला हरकत नाही. चॉकलेट शेड सध्या पॉप्युलर आहे, त्यामुळे त्याचा विचार आधी कर. नाहीतर तुला नॅचरल शेडच मिरवायची असेल तरी काहीच हरकत नाही. सध्या मुस्लीम स्टाइल मांगटिका म्हणजेच झुमर किंवा पासाचा ट्रेंड आहे. अनारकलीवर तो छान उठून दिसेल. तो केसांच्या साइड पार्टिशनला लावायचा असतो. याशिवाय सध्या मस्त टिआरा पाहायला मिळतात, हेअरबॅण्डऐवजी त्यांचा विचार करू शकतेस. फ्लोरल क्लिप्ससुद्धा मिळतात बाजारात. केसात एखादे फूल माळल्याचा फील येतो त्याने, त्या घालून बघ किंवा तुझ्याकडचा एखादा ब्रोच, एखादी मोत्यांची नाजूक माळ केसात खोवू शकतेस. एक्सपिरीमेंट हा तुझ्या लुकचा मेन एलिमेंट असेल, त्याला बाजूला ठेवू नकोस, हे लक्षात असू देत.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत