News Flash

अलंकार : फॉर्मलवेअरची सोनेरी झळाळी!

मोठाले पारंपरिक दागिने घेण्यापेक्षा रोजच्या वापरात येतील असे देखणे, नाजूक दागिने घेण्याकडे त्यांचा कल वाढत आहे.

सोन्याचांदीने पारंपरिक निमित्तांची सीमा ओलांडून आता ऑफिसमध्ये प्रवेश केला आहे.

मृणाल भगत

‘आणि उद्यापासून देशभरात कडक लॉकडाऊन सुरू होत आहे..’ मार्च महिन्यामध्ये ही घोषणा झाली आणि गाडीला अचानक ब्रेक लागावा अशा पद्धतीने सगळ्यांचीच आयुष्यं काही क्षणासाठी थांबली. आज ऑक्टोबर महिना सरत असताना या घोषणेला आठ महिने पूर्ण होत आले, तरीही लॉकडाऊनची टांगती तलवार अजूनही काही प्रमाणात या सगळ्यांच्या डोक्यावर आहेच. दरम्यान, कित्येकांचे लग्नाचे बेत पुढे ढकलले गेले. असंच काहीसं एका मित्रासोबत झाले. मे महिन्यामध्ये लग्नाचे ठरलेले बेत त्यांना रद्द करावे लागले. काही दिवसांपूर्वी सहज त्याच्याशी पुन्हा बोलणं झालं.  डिसेंबरमध्ये लग्नाचा बार उडवून द्यायचा या तयारीत असताना पहिलं लक्ष्य म्हणजे दागिने खरेदी हा अजेंडा त्याच्यासमोर होता, पण लॉकडाऊननंतर सोन्याच्या दुकानांमध्ये कसं चित्र आहे? गर्दी आहे का याबद्दल आमची चर्चा सुरू असताना तो हसून म्हणाला, ‘‘अगं गर्दी? सोन्याचं दुकान नाही एखादा मासळी बाजार असावा अशी गर्दी लोकांनी केलीय. लोक सोनं खरेदी करायला आलेले की भाजी हेच कळेनात.’’ त्यानंतर न राहून आमचं संभाषण सोन्याचे दर ५० हजापर्यंत पोहोचल्यावरसुद्धा लोकांची सोनं खरेदी करण्याची हौस काही मिटत नाही हे कसं? या विषयावर पोहोचलं.

पण भारतीयांना सोन्याचांदीच्या दागिन्यांचं वेड हे पूर्वापार आहे यात वाद नाही. प्रसंगी कर्ज काढू, पण सोन्याचा लखलखाट हा तिजोरीमध्ये हवाच असतो. पहिल्या शतकात रोमन साम्राज्य बुडित निघालं; भारतीय व्यापाऱ्यांनी मसाले आणि कापडाच्या मोबदल्यात केलेली प्रचंड सोनेखरेदी हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं. लग्न, सणसमारंभाच्या निमित्ताने दागिन्यांची हौस मिरविण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. आजच्या पिढीला हे महागडे दागिने खरेदी करून बँकेच्या तिजोरीमध्ये ठेवून वर्षांतून एकदा काढणं हे गणित काही पटत नाही. ‘वस्तू घेतली तर त्याचा उपभोग घेता आला पाहिजे’ या तत्त्वाला अनुसरूनच ते आज सोन्याचांदीमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे मोठाले पारंपरिक दागिने घेण्यापेक्षा रोजच्या वापरात येतील असे देखणे, नाजूक दागिने घेण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे सोन्याचांदीने पारंपरिक निमित्तांची सीमा ओलांडून आता ऑफिसमध्ये प्रवेश केला आहे. एके काळी ज्या फॉर्मलवेअरला सोन्याचांदीचा भडकपणा निषिद्ध होता त्यालाच आता त्यांची नजाकत आणि रुबाब खुणावत आहे. एरवी रोज वेगवेगळी फॅशन ज्वेलरी बदलण्यापेक्षा नजरेला भरेल असा एखादा दागिना घालण्याकडे तरुणाईचा कल अधिक आहे.

ऑफिसमध्ये दागिने, विशेषत: सोन्याचांदीचे दागिने घालायचे म्हणजे फॉर्मलवेअरसोबत खुलून दिसायला हवेत. त्यामुळे नाजूक पेंडंट्स, ब्रेसलेट्स, अंगठय़ा, कानातले डूल अशा नेमक्या दागिन्यांना पसंती मिळते आहे. या दागिन्यांचा नाजूकपणा फॉर्मल लुकसोबत जुळून येतो. इंडो-वेस्टर्न लुकचे चाहते असाल तर मात्र झुमके, बाजूबंद, कडे अशा काही दागिन्यांचे प्रयोग करता येतात.

दागिन्यांचा आधुनिक लुक

नाजूक घडणावळीचे, छोटय़ाशा, पण उठावदार मोटिफने खुलणारे दागिने ऑफिसवेअरसोबत सहज जुळून येतात. या दागिन्यांना भडक तेज नसतं. पारंपरिक दागिन्यांच्या तुलनेने यामध्ये सोन्याचा पिवळेपणा थोडा फिका असतो. बहुतेकदा पिवळ्या सोन्याला रोझ गोल्डची गुलाबी छटा, व्हाइट गोल्डची चंदेरी छटा पर्याय म्हणून वापरली जाते. चांदीचा वापर या दागिन्यांमध्येही आवर्जून केला जातो, पण सोन्याच्या दागिन्यांना जादा पसंती मिळते. मोटिफचा उल्लेख करावा तर वेगवेगळ्या राशींची चिन्हे किंवा नावाचं आद्याक्षर यांना पहिली पसंती असते. त्याखेरीज सूर्य, चंद्र, नाजूक फूल, वर्तुळ, भौमितिक आकार यांचा वापर केला जातो. या स्वरूपातील एखादं नाजूक पेंडंट किंवा ब्रेसलेट घातलं तरी लुकला उठाव येतो. एक मोठी अंगठी हातात घालण्यापेक्षा दोन किंवा तीन नाजूक अंगठय़ा वेगवेगळ्या बोटांमध्ये घालण्याकडे कल अधिक दिसतो.

नावीन्यपूर्ण डिझाइन्सचा विचार

फॉर्मलवेअरमध्ये पारंपरिक डिझाइनचे दागिने वापरण्यापेक्षा काही हटके, नजरेत भरणाऱ्या डिझाइन्सना अधिक मागणी असते. विशेषत: भौमितिक आकार या प्रकारामध्ये अधिक पसंत केले जातात. वर्तुळ, चौकोन, एकमेकांना छेदणाऱ्या रेषा, त्रिकोण यांची सरमिसळ केलेल्या डिझाइन्स या प्रकारात पाहायला मिळतात. हे करताना दागिन्याचा किंवा मोटिफचा आकार थोडा मोठा झाला तरी हरकत नसते. तसंच दागिन्यांमध्ये एकाच रंगाचा धातू वापरण्यापेक्षा वेगवेगळ्या रंगांची गुंफण केली जाते. गुलाबी, चंदेरी, पिवळा अशा वेगवेगळ्या सोन्याच्या छटा असलेल्या नाजूक अंगठय़ांची जोडी बनवून घालणे, पेंडंटची चेन आणि मोटिफ वेगवेगळ्या रंगांमध्ये निवडणे, ब्रेसलेटमध्ये धातूच्या दोन भिन्न रंगांचा वापर करणे हे प्रयोग या दागिन्यांमध्ये पाहायला येतात.

धातूचा पोत किंवा टेक्स्चरमध्येसुद्धा प्रयोग केलेले पाहायला मिळतात. गुळगुळीत पोतासोबतच खडबडीत, रेघोटय़ा ओढलेले, ओबडधोबड पोतसुद्धा पसंत केले जातात. भौमितिक आकारांमध्येसुद्धा सममिती नसलेले आकारही वापरले जातात. तसंच निसर्गातील काही घटकांमधून प्रेरणा घेऊन तयार केलेली बोधचिन्हांत्मक मोटिफसुद्धा वापरली जातात. विशेषत: झाडे, फुले, नदी, पाने, पृथ्वी आणि इतर  ग्रह, वाघ, मोर, तत्सम प्राणी आणि पक्षी यांचा वापर करून तयार केलेली बोधचिन्हं या दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात.

तसंच सोन्याचांदीला मोती, निरनिराळे खडे यांची जोडही देण्यात येते. विशेषत: अंगठीमध्ये नाजूक नक्षीकामापेक्षा मोठा खडा किंवा मोती वापरल्यास ती चटकन नजरेत भरते. स्वत:च्या राशीनुसार साजेसे खडे घालण्यासाठीसुद्धा या दागिन्यांचा विचार केला जातो.

इंडो-वेस्टर्न लुक आणि चांदीचा वापर

अँटिक चांदी हा तरुणाईच्या आवडीचा विषय आहेच. विशेषत: इंडो-वेस्टर्न धाटणीतील दागिने हे लोकप्रिय आहेतच. ऑफिसवेअरमध्ये इंडो-वेस्टर्न लुकचे चाहतेसुद्धा या दागिन्यांना आवर्जून पसंती देतात. साडी, कुर्ता, ड्रेसेस, सलवारसूटसोबत हे दागिने सुंदर दिसतात. या लुकमध्ये थोडे मोठे पारंपरिक पद्धतीचे दागिनेसुद्धा वापरता येतात. विशेषत: नेहमीच्या दागिन्यांपेक्षा बाजूबंद, छोटी नथ, कानातले डूल, हातफूल, हेअरपिन, कडे, लांब नेकलेस, चोकरचा वापर नक्कीच करता येतो. त्यामुळे पेहरावातील वेगळेपण उठून दिसते. चांदी, तांबे, पंचधातूंचा वापर या स्वरूपातील दागिन्यांमध्ये होऊ लागलेला आहे. दक्षिण भारतीय टेम्पल ज्वेलरी, ट्रायबल आर्टवरून प्रेरणा घेतलेले मोटिफ या दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात. अर्थात हे दागिने घालण्यासाठी ऑफिसमध्ये एखाद्या समारंभाचे निमित्त शोधण्याची गरजही नसते. इंडो-वेस्टर्न स्वरूपातील सोन्याचे दागिने मात्र ऑफिसमध्ये पार्टी, सणाच्या निमित्ताने ठेवलेला समारंभ अशा निमित्तांसाठी राखीव ठेवले जातात.

बजेटचा विचार 

फॉर्मलवेअरमध्ये दागिने खरेदी करताना खर्चाचा विचार आधी केला जातो, कारण इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे दागिने विकत घेतानाही पगारातील पैशांची जुळवाजुळव करणं हे मोठं आव्हानं असतं. कित्येकदा पहिला पगार किंवा नोकरीमध्ये एखादं लक्ष्य गाठल्यावर स्वत:ला बक्षीस म्हणून असा दागिना घेतला जातो. साहजिकच अशा वेळी ‘पैसे’ हा मोठा मुद्दा ठरतो. त्यामुळे सोन्याचांदीच्या दागिन्यांमध्येसुद्धा गुंतवणूक करताना पाच ते वीस हजारांच्या बजेटचा विचार केला जातो. तसंच एकच दागिना रोज वापरण्यापेक्षा पेहरावानुसार वेगवेगळे दागिने घालण्याकडे तरुणाईचा कल असतो. त्यामुळे काही हजारांची गुंतवणूक करून एक दागिना घेण्यापेक्षा बजेटनुसार दोन-तीन जादाचे दागिने घेणे हे कधीही पसंत केलं जातं. त्यामुळे कित्येकदा ऑफिसमधील सहकारी, मित्रमैत्रीण यांना भेट म्हणून इतर कोणतीही वस्तू देण्यापेक्षा या दागिन्यांचा विचारही आवर्जून होतो.

त्यामुळे या दागिन्यांच्या घडणावळीमध्ये १८ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. अगदी बजेटचा विचार करायचा झाल्यास चांदीला सोन्याचा मुलामा दिलेले दागिने वापरण्याससुद्धा तरुणाईला हरकत नसते. चांदीचे दागिने सोन्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतात, त्यामुळे तितक्याच बजेटमध्ये अजून एखाददुसरा दागिनाही कलेक्शनमध्ये जोडता येतो.

दागिने वापरण्याच्या टिप्स:

  • पारंपरिक लुकप्रमाणे कानातले डूल, नेकलेस, बांगडय़ा असे सगळेच दागिने एकत्र वापरण्याचा मोह इथे आवरता घ्यायला हवा. त्याऐवजी एखादं ब्रेसलेट, अंगठय़ांचा सेट किंवा पेंडंट असा एक पण उठून दिसणारा दागिना निवडा.
  • ऑफिसवेअर दागिने निवडताना तुमच्या कपडय़ांची निवड आणि दागिने याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही कॉलरचे शर्ट, बंद गळा ड्रेस किंवा जॅकेट वापरत असाल तर पेंडंटमध्ये गुंतवणूक करू नका. तसंच पूर्ण बाह्य़ांचे कपडे घालत असाल, तर ब्रेसलेट, कडे घेण्यापेक्षा एखादं मोठं घडय़ाळ उठून दिसतं.
  • वेगवेगळ्या रंग किंवा पोतांच्या धातूंची सरमिसळ करताना ते एकमेकांसोबत जुळून येत आहेत ना याची खात्री करून घ्या. कधी तरी जाहिरातीमध्ये किंवा मासिकामध्ये दिसणारे दागिने प्रत्यक्षात तसेच दिसतील असे नाही.
  • हल्ली कित्येक ऑनलाइन ब्रँड फॉर्मलवेअर कलेक्शन बाजारात आणत आहेत, पण त्यातील सोन्याचे कॅरेट, त्याची जाडी याची नक्की खात्री करून घ्या. तसेच सोन्याचांदीच्या दागिन्यांना दिले जाणारे प्रमाणपत्र किंवा मार्किंग याची खात्री करून घ्या. कित्येकदा या दागिन्यांची जाडी अतिशय पातळ आणि नाजूक असते. अशा वेळी ऑनलाइन मागवलेल्या दागिन्याबद्दल भ्रमनिरास होऊ शकतो.
  • तुमचा चेहऱ्याच्या रंगानुसार दागिन्यांच्या रंगाची निवड करा. कित्येकदा या दागिन्यांच्या चेन्स खूप पातळ असतात. अशा वेळी त्या प्रत्येक चेहऱ्याच्या रंगावर उठून दिसतीलच असे नाही. त्यामुळे दागिना अगदीच झाकोळला जाईल. काही ऑनलाइन वेबसाइट सध्या तुम्हाला घरी दागिने घालून नंतर विकत घेण्याची मुभा देतात. या सोयीचा वापर नक्की करा, कारण कित्येकदा दुकानातील प्रकाशामध्ये दागिना उठून दिसतो, पण नंतर मात्र तो तितका नजरेत भरत नाही. त्यामुळे हे दागिने नैसर्गिक प्रकाशात कसे दिसतात याची नक्की खात्री करून घ्या.
  • सध्याच्या ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळामध्ये व्हिडीओ कॉलवर एखादी मीटिंग असल्यास गळ्यामध्ये छानसं पेंडंट किंवा कानात एखादं डूल घातलं तर तुमचा लुक लगेच उठून दिसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 8:15 am

Web Title: formal wear gold ornaments alankar dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २३ ते २९ ऑक्टोबर २०२०
2 १६ व्या गरोदरपणात मृत्यू…
3 समाजमाध्यमं द्वेषाची केंद्र! -हॅरी- मेगन
Just Now!
X