सिनेमा प्रदर्शित झाला रे झाला की त्याने लाखांचा, कोटींचा व्यवसाय केला याची चर्चा सुरू होते. पण रसिकांना या आकडय़ांमध्ये खरोखरच रस असतो की त्याला अगदी मनापासून चांगल्या सिनेमाचा आनंद घ्यायचा असतो?

आज मराठी चित्रपट प्रदर्शित ‘झाला रे झाला’ की तो चित्रपट पाहिलेला रसिक प्रेक्षक भेटण्यापूर्वीच त्याने ‘गल्ला पेटी’वर किती कोटी रुपयांचा छनछनाट केला याच्या बातम्या चलाखीने पसरवल्या जातात. त्याच्या कमाईचे उंचच उंच आकडे ‘पाहून’ मराठी प्रेक्षक भुलतो/फसतो इतपत मराठी प्रेक्षकांची रुची खरंच खालावली आहे का?
.. मराठी चित्रपटांच्या गुणवत्तेवर मनसोक्त प्रेम करण्याचे ते दिवसच फार वेगळे होते चांगल्या मराठी चित्रपटांवर भरभरून बोलावे असे मराठी चित्रपटांच्या रसिकाला व्हायचे. त्यात त्याला मनमुराद आनंद मिळायचा. मराठी चित्रपटांच्या कथेवर, त्याच्या सादरीकरणाच्या पद्धतीवर, कलाकारांच्या अभिनयावर, संगीतावर किती नि काय काय बोलू-ऐकू असे त्याला होऊन जाई.
आपल्याला आवडलेला मराठी चित्रपट मेंदू व हृदयात भिनवून घ्यायला त्याला प्रचंड आनंद मिळायचा. असे एकमेकांना सांगितल्याने तो चित्रपट एकूणच मराठी समाजाने डोक्यावर कधी बरे घेतला हे समजायचेच नाही.
राजा परांजपे यांचा ‘सुवासिनी’ असेल, मधुकर पाठक यांचा ‘प्रपंच’ असेल, राजा ठाकूर यांचा ‘पुत्र व्हावा ऐसा’ असेल (जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते हे या चित्रपटातील सुमधुर गीत), राम गबाळे दिग्दर्शित ‘छोटा जवान’ असेल (महेश कोठारेंचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट), राजा परांजपे दिग्दर्शित ‘हा माझा मार्ग एकला’ असेल (सचिन पिळगांवकरचा बाल कलाकार म्हणून पहिला चित्रपट), यशवंत पेठकर यांचा ‘मोलकरीण’ असेल (रमेश देव-सीमा व सुलोचनादीदी या तीन प्रमुख व्यक्तिरेखांभोवतीचा हा चित्रपट पाहताना आजही मन हेलावून जाते), राजा परांजपे यांचा ‘पाठलाग’ असेल (याच रहस्यरंजक चित्रपटावरून राज खोसला यांनी ‘मेरा साया’ बनवला), अनंत माने यांचा ‘केला इशारा जाता जाता’ असेल (नाव गाव विचार जा त्याला इत्यादी फक्कड लावणी गीते गाजली), भालजी पेंढारकरांचा ‘साधी माणसं’ असेल (सर्व कलाकारांनी रंगभूषा न करता कामे केली), कमलाकर तोरणे यांचा ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ (देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, हे एव्हाना आठवले असेलच), राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मुंबईचा जावई’ (प्रथम तुझ पाहता जीव वेडावला), गोविंद कुलकर्णीचा ‘सोंगाडय़ा’ (भाबडा चेहरा, गबाळे रूप आणि हाफ पॅन्टमधला वावर असूनही दादा कोंडके समाजाच्या तळागाळात पोहचले), चित्रपती व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ (बाई मला इस्काची इंगळी ठसली, दिसला ग बाई दिसला.. एकाच सिनेमात अकरा गाणी सुपरहिट), जब्बार पटेलचा ‘सामना’ (श्रीराम लागू व निळू फुले यांच्या कसदार अभिनयाची जुगलबंदी), महेश कोठारेचा ‘धडाकेबाज’ (लक्ष्मीकांत बेर्डेने केवढे मनमुराद हसवले), सचिन पिळगांवकरचा ‘अशी ही बनवाबनवी’ (विनोदाचे उत्तम टायमिंग साधलेले ‘महामनोरंजन), कुमार सोहनीचा ‘आहुती’ (केवढे तरी धक्कादायक कथानक), एन.एस. वैद्य यांचा ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’ (दया डोंगरे व वर्षां उसगावकर एकमेकींवर मात करण्याची एकही संधी सोडत नाहीत), चंद्रकांत कुलकर्णीचा ‘बिनधास्त’ (पूर्णपणे स्त्री-पात्रांवरचा चित्रपट हे केवढे वेगळेपण), संदीप सावंतचा ‘श्वास’ (सुवर्ण कमळ पटकावले, आपल्या देशाची ऑस्करसाठीची अधिकृत प्रवेशिका, लगोलग सामाजिक/ सांस्कृतिक क्षेत्रातील वातावरण बदलले), परेश मोकाशीचा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’
किमान चार रसिक पिढय़ांचा हा चित्रपट प्रवास आहे.
असे मनात खूप खूप घर करून राहिलेल्या या चित्रपटांबाबत प्रत्येक पिढीने पुढील पिढीला सांगितले. ते करताना, ‘आम्ही खूप चांगले चित्रपट पाहिले, ते तुम्हीदेखील पहा’ अशी त्यामागे भावना असते.
या प्रवासात रसिकांनी कधीही ‘तिकीट काढताना’ सिनेमाची किंमत केली नाही, तर त्याचे ‘मूल्य’ महत्त्वाचे मानले.
गिरगावातील सेन्ट्रल सिनेमा टॉकिजमध्ये ‘पिंजरा’च्या वेळी स्टॉल दोन रुपये वीस पैसे, अप्पर स्टॉल दोन रुपये पंचाहत्तर पैसे व बाल्कनी तीन रुपये तीस पैसे असे दर होते, आजच्या ‘चलन फुगवटा’मध्ये ते किरकोळ वाटतात. पण तेव्हा काय, तत्पूर्वी काय नि तद्नंतर काय कधीही, पैशाच्या हिशोबात कोणी चित्रपट पाला गेले नाही.
अमुक चित्रपट किती हजारांत (साठच्या दशकात बनत, तेव्हाच्या अर्थकारण व निर्मितीच्या गरजा या दृष्टीने ते बरोबर होते), किती लाखांत बनला (सत्तरच्या दशकांच्या मध्यास खर्च व पैशाचे ‘चलन’ वाढले) अशा ‘बातम्या’ कधीही प्रसिद्ध झाल्या नाहीत. कारण, रसिकांनाही त्या खर्चाशी देणे-घेणे नव्हते (चित्रपट निर्मितीला पैसा लागतो ही वस्तुस्थिती माहीत होती, पण फक्त पैशाच्या बळावरच चित्रपट निर्माण होतो असे ‘मराठी मन’ मानायला तयारच नव्हते. याला भाबडेपणा म्हटलंत तरी चालेल. त्या काळाशी ते सुसंगत होते.)
आपल्या काढलेल्या तिकिटातून या चित्रपटाने ‘मानसिक समाधान’ दिले अथवा नाही एवढेच चित्रपट रसिकांचे ‘एकच लक्ष्य’ असते.. आजही आहे.
त्याच ‘चाली’नुसार यशस्वी मराठी चित्रपटाने किती घसघशीत कमाई केली, निर्मात्याने किती कमावले, त्यात चित्रपटागृह मालक/चालकाचा वाटा किती असे कधीही कोणीही विचारले नाही, अहो, त्याची गरजच ती कशाला भासतेय? चित्रपटाने आपल्याला खूपच आनंद दिला ही ‘कमाई’ मराठी समाजाला पुरेशी वाटे. एखाद्या निर्मात्याने चित्रपटाच्या पैशावर गाडी, बंगला, फार्म हाऊस घेतले काय अथवा त्याने चित्रपटाच्या कमाईतून आणखी काही कमाई केली, हे जाणून घ्यावे अशी आपल्याकडच्या चित्रपट प्रेक्षकांची कधीच संस्कृती नव्हती. त्याचे लक्ष ‘फक्त चित्रपटगृहाचा पडदा!’ अगदी व्हीडिओचे आगमन झाल्यावरही प्रेक्षकांनी कधीही त्यामुळे चित्रपटगृहाचा प्रेक्षक कमी झाला का, त्याचा एकूण उत्पनावर किती परिणाम झाला याकडे पाहिलेच नाही. त्याने सिनेमाशी प्रामाणिक राहणे पसंत केले. उपग्रह वाहिनीच्या आगमनानंतरही त्याची चित्रपटाशी असलेली बांधीलकी त्याने कायम ठेवली.
..आणि आता मल्टीप्लेक्स अथवा मनोरंजन संकुलाच्या युगातही त्याला भावूक ‘काकस्पर्श’ पाहावासा वाटला, ‘दुनियादारी’ची धमाल अनुभवाशी वाटली, ‘कॉफी आणि बरेच काही’चा मार्मिकपणा/ मिस्कीलपणा मजेशीर वाटला, तरी तेव्हा कधीही ‘तिकिटाचा भाव काय’ असे त्रासिक चेहऱ्याने विचारले नाही. एकपडदा चित्रपटगृहाच्या ‘गर्दीत चित्रपट पाह्य़ची मजा काही वेगळीच असते’, असे मानणारा ‘मास’सुद्धा अप्पर स्टॉल चाळीस रुपये, बाल्कनी पन्नास रुपये याचा भेद करीत नाही. त्याला मस्त ‘टाइमपास’ करायचा असतो व ‘लय भारी’ आनंद घेऊन घरी जायचे असते.
.. आपल्या चित्रपट प्रेक्षकांच्या संस्कृतीची तऱ्हा प्रचंड दिलखुलास आहे. तो चित्रपटावर भरभरून प्रेम करताना खिसा सांभाळत नाही (आता क्रेडिट कार्ड) आणि आपल्याला आवडलेल्या चित्रपटाने कोणत्या बरे उत्पन्नाचे विक्रम तोडले/मोडले अशा आकडेमोडीत त्याला तितकासा रस नाही. तशा बातम्या पुन:पुन्हा पेरल्या गेल्याने (गोबेल्स तंत्र) तर कदाचित काही काळ त्याकडे त्याचे लक्ष्य जाईल. जरा या उत्पन्नातून निर्मिती खर्च, प्रसिद्धी, वितरण, विविध प्रकारचे कर हे सगळे कापून गेल्यावर किती मिळकत राहते हे सांगा.
या आकडय़ांच्या खेळावर मात करणारी अशी मराठी चित्रपटांची गुणवत्ता असते (असावी) हे रसिकांवर कवढे तरी बिंबवले गेले आहे.
ख्वाडा, कोर्ट, किल्ला, नागरिक, शटर, बरड असे वेगळ्या वळणाचे चित्रपट येतात तेव्हा अशा निर्मितीचा खर्च आणि गल्लापेटीवरचे उत्पन्न याची चर्चा घडवून आणली जात नाही, अशा कलाकृतीचे अस्तित्व अशा आकडय़ांच्या खेळातून अधोरेखित होत नसते..
हाच ‘खरा मराठी चित्रपट’ यावर रसिकांचा कालही विश्वास होता, आजही आहे व उद्याही राहील.
कारण, कोणत्याही दिखावू/ गुलछबू गोष्टीपेक्षा ‘चांगला चित्रपट’ रसिकांच्या मनावर कायम राज्य करतो.
‘जगाच्या पाठीवर’चे हे सर्वात मोठे सत्य आहे.
दिलीप ठाकूर – response.lokprabha@expressindia.com