00gajananहृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला ताबडतोब नेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते, पण तिथे जाईपर्यंत, जाताना आणि जाण्याआधी कोणती काळजी आणि कशा प्रकारे घ्यायची असते याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

हृदयाची कोरोनरी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते, रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित होतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते, ते दुर्बल बनतात. याला हृदयविकाराचा झटका आला, असे म्हणतात.
योग्य उपचार लवकर मिळाले नाहीत तर हृदयाच्या स्नायूंचे न भरून येण्यासारखे कायमचे नुकसान होते. हृदयाची कार्यक्षमता कमी होते. हृदयाची रक्तवाहिनी जेवढी जास्त वेळ बंद राहील तेवढेच हृदयाचे जास्त नुकसान होते. जितक्या लवकर हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपचार होतील, त्याप्रमाणात हृदयाच्या स्नायूंची इजा व नुकसान कमी होते.
म्हणूनच हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण दिसल्यावर वेळ न दवडता औषधोपचार सुरू करणे हे अत्यावश्यक असते. झटका आल्यावर दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पूर्ण विश्रांती व तात्काळ उपचार!
विश्रांतीमुळे हृदयावरील ताण कमी होतो आणि स्नायूंना इजा कमी होण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असलेल्या व्यक्तीला शक्य तितक्या आरामशीर झोपवावे. अंगावरचे घट्ट कपडे सैल करावेत. फोन करून लवकरात लवकर रुग्णवाहिका बोलवावी. रुग्णाला रग्णवाहिकेतून कोणत्याही चारचाकी अथवा अॅटोरिक्षामधूनच रुग्णालयात न्यावे. चालत नेणे किंवा दुचाकीवरून नेणे टाळावे. जवळपास डॉक्टरचे क्लिनिक असेल तर ते डॉक्टर रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्णाला ‘ऑस्पिरीन’ ही रक्त पातळ करणारी गोळी देतात. तोंडात विरघळणारी एक अॅस्पिरीनची (Disprin- 325 mg) गोळी रक्तवाहिनीत अडकलेल्या रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत करते. रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल असेल तर त्याला सॉब्रिट्रेट (Sorbitrate) नावाची नायट्रोग्लिसरीनची गोळी जिभेखाली ठेवण्यासाठी देण्यात येते. उपलब्ध असेल तर डॉक्टर क्लोपीडोग्रील, स्टाटीन्सच्या गोळ्या आणि इनॉस्कॉपॉरिन नावाचे इन्जेक्शन त्वचेच्या आत देऊ शकतो.. पण रुग्णाला लवकरात लवकर सर्व सुविधा असलेल्या आय.सी.सी.यू.मध्ये स्थलांतरित करणे आवश्यक असते.
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टर रुग्णाला तपासतात. त्याच्या हृदयाचे ठोके, नाडी, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण याची त्वरित नोंद घेण्यात येते. सर्वप्रथम रुग्णाचा हृदयविद्युत आलेख (ECG) काढला जातो. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचे निदान होते आणि त्याची तीव्रता समजते.
ईसीजीद्वारे हृदयविकाराचा झटका सिद्ध झाल्यास त्याला अतिदक्षता विभागात ठेवले जाते. मॉनिटरद्वारे त्याच्या हृदयाची गती, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण यावर सतत लक्ष ठेवण्यात येते. हाताच्या शिरेतून वेदनाशामक इन्जेक्शन दिले जाते. नाकाद्वारे नळीतून प्राणवायू सुरू केला जातो. नंतर हार्ट अटॅक नक्की आलेला आहे हे बघण्यासाठी इतर तपासण्या करण्यात येतात. त्या खालीलप्रमाणे आहेत..!!!
हार्ट अटॅकचे निदान :
नक्की हार्ट अटॅकच आहे ना हे ठरविण्यासाठी खालील गोष्टींचे अवलोकन केले जाते.
१) छातीतील वेदना :
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सुरू झालेली वेदना छातीच्या मध्यात स्टर्नम हाडाखाली जाणवते. या वेदना तीव्र असतात. पूर्ण छातीत आवळल्यासारखे वाटते. दाटून येणे, छातीवर दगड ठेवला आहे असे वाटणे. ही अवस्था ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ असते. सोबतच घाम येणे, थकवा येणे, उलटय़ा होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
२) हृदयविद्युत आलेख (ई.सी.जी.) :
हृदयविकाराचा झटका आला की ई.सी.जी.मध्ये वेगवेगळ्या लहरींमध्ये काही ठरावीक बदल आढळतात. त्यातल्या त्यात एसटी सेगमेंट (ST Segment) उंचावणे आणि टी वेव्हज् (T Waves) खालावणे हे हार्ट अटॅकचे निदान करण्यास पुरेसे आहेत. एसटी सेगमेंट (ST Segment) खालावणे आणि क्यू वेव्हज् (Q Waves) येणे हेसुद्धा हार्ट अटॅकचे निदान करतात.
३) रक्तातील घटकाचे चढ-उतार (Cardiac Enzymes Changes) :
रक्तातील विशिष्ट ईन्झाईमची तपासणी, रुग्णाला हार्ट अटॅक आला आहे का, तो किती तीव्र आहे या सर्व गोष्टींचे निदान करते. सिरिअल इन्झाईम तपासणीद्वारे हार्ट अटॅक हा औषधोपचाराला कसा प्रतिसाद देतो आहे याचेपण मूल्यमापन होऊ शकते.
CK-MB, Total CK, CK-MB Mass Index, कार्डिअॅक ट्रोपोनिन्स याची रक्तातील वाढलेली पातळी हार्ट अटॅकचे निदान करते.
४) एकोकार्डिओग्राफी (हार्टची सोनोग्राफी) :
कधी कधी ईसीजी नॉर्मल असतानापण हृदयाच्या कप्प्यांमधील भिंतीच्या हालचालीवरून हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करता येते. हार्ट अटॅकने झालेली हृदयाची हानी, स्नायूंचे झालेले नुकसान, इकोमध्ये कळते. औषधोपचाराला हृदय कसे प्रतिसाद देते आहे याचीसुद्धा कल्पना इकोद्वारे येते. हार्ट अटॅकमुळे काही गुंतागुंत झाली आहे का, हृदयाच्या भिंतीला छिद्र पडले आहे का, झडपांना इजा झाली आहे का या सर्व गोष्टींचे उत्तर इकोद्वारे मिळते.
५) अॅन्जिओग्राफी :
सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे अॅन्जिओग्राफी. या तपासणीमध्ये कोणती रक्तवाहिनी बंद झाली आहे हे निश्चितपणे कळते. पुढे काय करायचे.. किती स्टेंटस् लागणार वगैरेबाबत निर्णय घेता येतात.
हार्ट अटॅकचे निदान निश्चित झाले की, काय उपाययोजना करायची, जेणेकरून हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ववत होईल, हे ठरवले जाते. यात दोन प्रकारच्या अॅन्जिओप्लास्टी तंत्राचा वापर केला जातो.
प्रायमरी अॅन्जिओप्लास्टी :
हृदयविकाराचा झटका आल्यावर रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन न देता रुग्णाला थेट कॅथलॅबमध्ये घेऊन जाऊन जी रक्तवाहिनी बंद आहे तिला उघडून स्टेंट टाकून तो अडथळा दूर केला जातो.

heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

lp32
रेस्क्यू अॅन्जिओप्लास्टी :
ज्या रुग्णामध्ये रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन दिल्यावरपण छातीत दुखणे, ईसीजीमध्ये सुधार न होणे, रक्तदाब कमी राहणे, दम लागणे किंवा काही गुंतागुंत वाढणे ही लक्षणे दिसतात अशा रुग्णाच्या लवकर सुधारणेसाठी, जीव वाचवण्यासाठी अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते.
हार्ट अटॅकचे निदान नक्की झाले की औषधोपचार सुरू करण्यात येतो.
हृदयविकाराच्या झटक्याचे औषधोपचार
हृदयविकाराचा झटका हा रक्तवाहिनीत अडकलेल्या रक्ताच्या गुठळीमुळे येतो हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे ती गुठळी विरघळविणे अत्यंत महत्त्वाचे असते. गुठळी विरघळविणारी औषधे आहेत..
स्ट्रेप्टोकायनेज, युरोकायनेज किंवा टीपीए (TPA) (टिश्यू प्लाझ्मिनोजेन अॅक्टिव्हेटर- Tissue Plasminogen Activator)- टेनॅक्टाप्लेज.
यांपैकी एक औषध हे शिरेतून दिले जाते. पहिल्या दोन-तीन तासांत हे दिल्यास रक्ताची गुठळी विरघळून रक्तवाहिनी उघडण्याचे आणि रक्तपुरवठा सुरळीत होण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते. तेच प्रमाण तीन ते सहा तासांत ६० टक्क्यांपर्यंत आणि पुढील सहा ते बारा तासांत ३०-४० टक्क्यांपर्यंत घसरून कमी होते. बारा तासांनंतर हे औषध देणे योग्य नाही.
रक्तवाहिनी उघडली की, रुग्णास छातीत दुखायचे कमी होते किंवा पूर्णपणे थांबते. ईसीजीपण सुधारतो. रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा कमी होते.
नुकताच पक्षाघाताचा झटका (पॅरेलिसिसचा झटका)आला असेल, मेंदूतील रक्तस्राव झाला असेल, जठरव्रणातून रक्तस्राव होत असेल, रक्तदाब खूपच वाढलेला असेल तर अशा व्यक्तींना हे औषध देणे धोकादायक असते.
या औषधाबरोबर रुग्णाला इतरही औषधे देण्यात येतात.
१) नायट्रोग्लिसरीन नावाचे औषध सलाईनद्वारे शिरेमधून दिले जाते. या औषधाने नसा रुंद होण्यास व त्यामुळे रक्तपुरवठा वाढण्यास मदत होते. या औषधाने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे हे औषध चालू असताना रक्तदाबाचे सतत मोजमाप ठेवणे आवश्यक असते.
२) रक्त पातळ करणारी औषधे :
अ : अॅस्प्रीन नावाचे औषध :
तोंडात विरघळणारी सोल्यूबल अॅस्पिरीन (Disprin- 325 mg) रक्तवाहिनीतील रक्ताची गुठळी विरघळवण्यास मदत करते.
lp33ब : ‘क्लोपिडोग्रिल’ नावाच्या औषधाच्या चार गोळ्या रक्त पातळ करण्यास मदत करतात.
क : इनॉक्सॉपॉरिन नावाचे इन्जेक्शन सात दिवस देण्यात येते. जेणेकरून उघडलेली नस पुन्हा बंद होण्याचे प्रमाण कमी होते.
ड : GP II b/ III a Inhibitor (जीपी टू बी/ थ्री ए इन्हिबिटर्स) यामुळेसुद्धा रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास खूप मदत होते आणि त्या पुन्हा होण्याचे प्रमाण कमी करते.
३) स्टॉटीन्स : कोलेस्टेरॉल कमी करणारी ही औषधे ४० ते ८० मि.ग्रॅम मात्रा डोसामध्ये दिली जातात. त्याच्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतील पापुद्रय़ाला इजा कमी होते.
४) बिटा ब्लॉकर्स- ही औषधे हृदयाची गती कमी करतात. दुखण्यामुळे आणि तणावामुळे हृदयाची गती खूप वाढलेली असते. त्यामुळे हृदयावरील ताण वाढलेला असतो. इजा झालेले हृदय हा अतिरिक्त ताण सहन करू शकत नाही. त्यामुळे हृदयाचे अधिकच नुकसान होते.
बिटा ब्लॉकर्स या औषधांमुळे हृदयाची गती आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे हृदयावरील ताणही कमी होतो. आधीचक्षीण झालेल्या हृदयाला या औषधांमुळे बराच आराम मिळतो. त्यामुळे हृदयाला कमी इजा होते. हृदयाच्या स्नायूची थरथराट (Ventricular Fibrillation) होण्याचे प्रमाणसुद्धा बिटा ब्लॉकर्स या गोळ्यांनी कमी होते.

lp35
५) ACE Inhibitors (ए.सी.ई. इन्हिबिटर्स) या औषधोपचाराने हृदयाचा आकार आणि पम्पिंगक्षमता यावर चांगला परिणाम होतो. या औषधांनी रक्तदाबपण कमी होऊन हृदयावरील ताण कमी होतो.
ही औषधे रुग्णाच्या गरजेप्रमाणे तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानेच वापरली जातात.
हृदयविकाराच्या झटक्याचे कारण असलेली रक्तवाहिनीतील गुठळी विरघळविणारी औषधे (म्हणजेच स्ट्रेप्टोकायनेज किंवा TPA – टेनॉक्टाप्लेज) फक्त ६० ते ७० टक्केच रुग्णांत परिणामकारक ठरतात. रुग्ण जितका उशिरा रुग्णालयात दाखल होतो, तितका या औषधांचा परिणाम कमी होतो. भारतामध्ये रुग्ण खूप उशिरा दाखल होतात. यामुळे या औषधांनी होणारा फायदा फार कमी होतो.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेथे रक्ताची गुठळी जमा होते, तेथे सहसा अवरोध असतो (Block) किंवा रक्तवाहिनीचा पापुद्रा (आतला अस्तर) फाटलेला, उद्ध्वस्त झालेला असतो. जोपर्यंत हा अवरोध, अडथळा किंवा फाटलेले अस्तर ठीक होत नाही, तोपर्यंत रुग्णाला सतत त्रास होऊ शकतो. अशा वेळी रुग्णाला रक्तवाहिनीतील रक्ताची गुठळी विरघळण्याचे औषध न देता ताबडतोब त्याची अॅन्जिओप्लास्टी करणे हे जास्त हिताचे, अधिक फायद्याचे असते. अशा अॅन्जिओप्लास्टीला ‘प्रायमरी अॅन्जिओप्लास्टी’ असे म्हणतात.
‘प्रायमरी अॅन्जिओप्लास्टी’मध्ये रक्तवाहिनीमधील गुठळीसोबत त्यातील अडथळापण साफ करून तेथे स्टेंट टाकण्यात येतो. म्हणजे पुन्हा पुन्हा रक्तवाहिनी बंद होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. रक्तपुरवठा १०० टक्के सुरळीत होतो. याचे यशस्वी होण्याचे प्रमाणसुद्धा ९८-९९ टक्के आहे.
अधिकाधिक हृदयरोगतज्ज्ञ रुग्णाला प्रायमरी अॅन्जिओप्लास्टीचा सल्ला देतात. यात मर्यादा फक्त एकच आहे की, ही उपचारपद्धती फक्त मोठय़ा कॅथ लॅबने सुसज्ज अशाच रुग्णालयांतच उपलब्ध आहे आणि यासाठी खर्चपण थोडा जास्त येतो. पण त्याचे रुग्णाला होणारे फायदे बघता ही ‘गोल्ड स्टॉडर्ड’ ट्रीटमेट ठरते.
हृदयविकाराचा झटका आणि त्यांची गुंतागुंत (Complication of Heart Attack) :
ज्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि काही गुंतागुंत निर्माण झाली नाही, अशा रुग्णाला दोन ते तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्वरित रोगनिदान आणि तत्परतेने उपचार केल्यामुळे lp34रुग्णास जीवदान मिळते.
पण काही रुग्णांमध्ये उशिरा पोहोचल्यामुळे म्हणा किंवा हार्ट अटॅक मोठा असल्यामुळे म्हणा, उत्तम उपचार करूनही आरोग्याची गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते.
जेव्हा हार्ट अटॅक मोठा असतो तेव्हा हृदयाचा मोठा भाग निकामी होतो. हृदयाचे पम्पिंग कमी होते. जेव्हा पम्पिंग खूप कमी होते तेव्हा रक्तदाब कमी होतो, फुप्फुसामध्ये पाणी जमा होते. रुग्णाला धाप लागणे, दम लागणे, चक्कर येणे यासारखा त्रास होतो. किडनीचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते. किडनी निकामी होण्यास सुरुवात होते. त्याला (cardiogenic shock) कार्डिओजेनिक शॉक असे म्हणतात. ही गंभीर समस्या असून त्यात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
अशा रुग्णाचे रक्तदाब डोपामीन, डोब्युटामाईन अॅड्रीनालिनसारख्या औषधांनी वाढवता येते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी आणि हृदयावरील ताण कमी करण्यासाठी काही रुग्णांमध्ये आय.ए.बी.पी. (Intra Aortic Balloon Pump) महारोहिणीत फुगा टाकून यंत्राच्या साहाय्याने हृदयाची पम्पिंगक्षमता वाढवण्यास येते. या रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी करून जीवदान मिळू शकते. फुप्फुसात पाणी जमा झाल्यावर खूप दम लागतो. अशा वेळी व्हेंटिलेटरच्या साहाय्याने रुग्णास कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात येतो आणि लॅसिक्स नावाच्या इन्जेक्शनद्वारे फुप्फुसातील कन्जेशन, पाणी कमी करण्यात येते.
काही रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात. काही रुग्णांमध्ये हृदयाची गती वाढून हृदयाच्या स्नायूंमध्ये थरथराट निर्माण होऊन हृदय बंद पडते. अशा वेळेस डिफिब्रिलेटरने विजेचा एक तीव्र झटका रुग्णाच्या छातीवर देण्यात येतो आणि हृदय पूर्ववत चालू होण्यास मदत होते. तर काही रुग्णांमध्ये हृदयाची गती अत्यंत कमी होते किंवा हृदयाचे ठोके थांबतातसुद्धा. अशा वेळी मानेतून किंवा जांघेतून हृदयात एक वायर टाकली जाते व तिला ‘पेसमेकर’ या विशिष्ट यंत्राला जोडून हृदयाची गती वाढवली जाते.
अशा पद्धतीने गुंतागुंत जितकी जास्त तितका अधिक काळ रुग्णास अतिदक्षता विभागात राहावे लागते. मॉनिटर्सद्वारे रुग्णावर सतत लक्ष ठेवावे लागते. अशा प्रकारे अतिदक्षता घेतल्यामुळे मोठय़ा हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे.
डॉ. गजानन रत्नपारखी – response.lokprabha@expressindia.com