scorecardresearch

इंटिरिअर विशेष : परंपरांच्या सान्निध्यात..

आपला देश हा पुरातन काळापासून सौंदर्यनिर्मितीला वाहून घेतलेल्यांचा आणि तेवढय़ाच रसिकतेने सौंदर्याची प्रशंसा करणाऱ्यांचा देश आहे.

traditional touch
अंतर्गत सजावटीत संरचनेला जेवढं महत्त्व (डिझायनिंग) आहे, तेवढंच महत्त्व सजावटीलादेखील आहे.

गौरी प्रधान – response.lokprabha@expressindia.com / @LlpPradhan
अंतर्गत सजावटीत संरचनेला जेवढं महत्त्व (डिझायनिंग) आहे, तेवढंच महत्त्व सजावटीलादेखील आहे. भिंतीवर रंगाचे पोत तयार करणं असो वा विविधरंगी पडदे लावणं असो. भिंतीवरील फ्रेम असोत नाहीतर टेबलवरील फुलदाण्या हे सारं काही गृहसजावट या सदरातच मोडतं.

आपला देश हा पुरातन काळापासून सौंदर्यनिर्मितीला वाहून घेतलेल्यांचा आणि तेवढय़ाच रसिकतेने सौंदर्याची प्रशंसा करणाऱ्यांचा देश आहे. विविध हस्तकलांचा वारसा आपल्याला लाभला आहे. इथल्या निसर्गाचं, परंपरांचं प्रतिबिंब कलांमध्ये उमटलेलं दिसतं. प्रत्येक प्रांत कोणत्या ना कोणत्या हस्तकलेने समृद्ध आहे. मग ती चित्रकला असो, विणकाम, भरतकाम असो किंवा अन्य काही. सध्याची पिढी कलांचं हे संचित आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द करताना दिसते. यातील बरेचसे कला प्रकार विकसित झाले, ते गृहसजावटीच्या उद्देशाने. गृहसजावटीची कला आणि परंपरा फार पूर्वीपासून अस्तित्वात होती. फक्त दळणवळणाची साधनं मर्यादित असल्यामुळे या कलांचा प्रसार होऊ शकला नव्हता. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. दळणवळण किंवा माहितीची देवाणघेवाण ही आता समस्या उरलेली नाही. त्यामुळे आपल्या इतिहास, भूगोल, परंपरांचं प्रतिबिंब असलेल्या या कलासंचिताला आपल्या घराच्या सजावटीत स्थान देणं सहज शक्य झालं आहे. फक्त त्यासाठी आपल्याला त्यांच्याशी परिचय करून घ्यायला हवा. या कलावस्तूंच्या निर्मितीमागची कारणपरंपरा, त्यातले बारकावे समजून घ्यायला हवेत.

आपल्या अगदी जवळ विकसित झालेल्या वारली चित्रकलेपासून सुरुवात करूया. आपल्या महाराष्ट्रातील ही कला वारली आदिवासी समाजाने निर्माण केली आहे. यासाठी वापरलं जाणारं साहित्य अगदी साधं, आदिवासींच्या रोजच्या उपयोगातलं आहे. तांदळाच्या भिजवलेल्या पिठात बांबूचं टोक बुडवून घराच्या भिंतींवर ही चित्रं  साकारली जातात. या चित्रांचं वैशिष्टय़ म्हणजे बाकी अनेक लोककला या देवादिकांच्या कथांवर आधारित असताना वारली चित्रं मात्र आदिवासींच्या दिनचर्येवर आणि त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटनांवर, सणवार-लग्नकार्यावर आधारित असतात. ही चित्रं कुडाच्या भिंतींवर रेखाटली जात. आजच्या आधुनिक घरांमध्ये ही चित्रं रेखाटल्यास आपल्या इतिहासाशी जोडले गेल्याची अनुभूती येते.

आपल्या शेजारील राज्यातील लिंपन कामाविषयीही जाणून घेऊ. गुजरातमध्ये कच्छ भागातील स्त्रिया गाढवाच्या किंवा गाईच्या शेणाने घराच्या भिंती लिंपून त्यावर लहान लहान आरसे जडवून सुरेख कलाकुसर करतात. ही कला लिंपनकाम म्हणून ओळखली जाते. अलीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग करूनदेखील काही कलाकार लिंपनकामाची पॅनल तयार करतात. याचा उपयोग आपण बेड हेड बोर्ड किंवा घरातल्या एखाद्या पार्टिशनसाठी करू शकतो. यातून घरात कच्छचा आभास निर्माण करता येईल.

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यतील मधुबनी चित्रकलेचा वापर घरांच्या सुशोभीकरणात केल्यास त्यातील सुंदर रंगरेषांनी घराचं रूप पालटू शकतं. या कलाप्रकारात रामायण, महाभारतातील प्रसंग चितारलेले असतात. त्याचबरोबर तुळस, दिवे या पारंपरिक शुभचिन्हांचा वापर केला जातो. याचं वैशिष्टय़ म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करूनच ही चित्रं रंगवली जातात. तांदळाचं पीठ वापरून काढलेल्या या चित्रांत एकही जागा रिकामी सोडली जात नाही. अगदी प्रत्येक कानाकोपरा पानाफुलांनी सजवला जातो. पूर्वी फक्त एका गावापुरती मर्यादित असणारी ही कला आज मात्र देशाच्याही सीमा ओलांडून पुढे गेली आहे. या कलेचा वापर करून फक्त भिंतीच नाही तर फर्निचरदेखील सजवलं जाऊ शकतं.

ओरिसाची पट्टचित्रं असोत वा आंध्र प्रदेशातली कलमकारी, आपापल्या आवडीप्रमाणे गृहसजावटीत या विविध पारंपरिक कलाप्रकारांचा उपयोग करता येऊ शकतो. ओरिसा आणि पश्चिम बंगालची खास ओळख असणारी पट्टचित्रे ही एकाखाली एक अशा रीतीने लांबच लांब कापड अथवा कागदाच्या पट्टय़ावर काढण्याची प्रथा आहे. यात मुख्यत्वे वैष्णव परंपरेतील चित्रं दिसून येतात. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशातला कलमकारी हा कलाप्रकारदेखील कापडावरच्या नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. कलमकारी केलेल्या कापडाचा वापर साडी, कुर्ता, स्कर्ट आणि काही प्रमाणात शर्टसाठीही केलेला दिसतो. त्यामुळे विशेषत महिलावर्गामध्ये कलमकारी लोकप्रिय आहे. मात्र प्रत्यक्षात या कलेमागचा उद्देश हा कापडावर नक्षीकाम करून भिंती सजविणे हा होता. आपल्या घराच्या सजावटीत आपण या कलेला स्थान देऊ शकतो. तिचा उपयोग केवळ भिंतीवरच करता येतो, असं नाही. कलमकारी केलेलं कापड वापरून पडदे, उशांचे अभ्रे किंवा बेडशीटदेखील तयार करून घेता येतात. वरील सर्व कला उच्च अभिरु चीसंपन्न असल्या तरीही आर्थिकदृष्टय़ा परवडण्यासारख्याच म्हणायला हव्यात, पण काही पारंपरिक कला प्रकारांत मात्र सोने, चांदी अशा मौल्यवान धातूंचाही वापर करण्यात येतो. दक्षिणेतील तंजावूर येथील तंजावूर पेंटिंगदेखील त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अस्सल सोन्याच्या रंगांमुळे ्रगेली काही शतके प्रसिद्ध आहे. तंजावूर येथील नायक राजांच्या काळात या चित्रकलेला प्रारंभ झाला. या चित्रांमध्ये अस्सल सोन्याचा वर्ख वापरला जातो, ज्यामुळे चित्रांना सुंदर चमक येते. याचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तंजावूर येथे मराठय़ांनी वर्चस्व निर्माण केल्याने या चित्रशैलीवर मराठी संस्कृतीचादेखील प्रभाव दिसून येतो. थोडा जास्त खर्च करण्याची आपली तयारी असेल, तरी ही तंजावूर शैलीतील चित्रंदेखील आपल्या भिंतींची शोभा वाढवू शकतात.

एकदा जहांगीर आर्ट गॅलरीत एक रांगोळी प्रदर्शन पाहायला मिळालं. रांगोळी खरं तर भारतीयांसाठी हातचा मळ. महाराष्ट्रातील जुचंद्र हे गाव तर खास रांगोळी कलाकारांसाठी ओळखलं जातं. पण रांगोळी कितीही सुंदर असली तरी तिचं आयुष्य फार थोडं, परंतु याच समजाला या प्रदर्शनात फाटा दिला होता. तिथे पाहिलेल्या रांगोळ्या या छान टिकाऊ पद्धतीने काढून त्या फ्रेमबद्ध केलेल्या होत्या. त्यामुळे त्या सहज भिंतींवर टांगता येण्यासारख्या होत्या.

या साऱ्या लोककलांप्रमाणेच भारतातील कोरीव काम, शिल्पकलादेखील प्रसिद्ध आहे. राजस्थानात गेल्यावर तिथले राजवाडे आणि त्यावर केलेले कोरीव काम पाहून नक्कीच नजर दिपते. जम्मू-काश्मीरमधल्या हाऊसबोट हादेखील कोरीवकामातून केलेल्या सजावटीचा अप्रतिम नमुना. भलेही संपूर्ण जशीच्या तशी सजावट करणं आपल्याला शक्य नसेल, पण त्यापासून स्फूर्ती घेऊन घरातला देव्हारा किंवा एखादा कोनाडा किंवा घराचं प्रवेशद्वार त्याच प्रकारे सजवून घराला एक वेगळेपण प्रदान करता येऊ शकतं.

यातील एखाद्या संकल्पनेनुसार गृहसजावट करून आपण त्या संस्कृतीच्या सान्निध्यात राहण्याची अनुभूती आपल्याच घरात घेऊ शकतो. फक्त केवळ भारतातल्याच नव्हे, तर परदेशांतल्याही विविध लोककलांचा उपयोग कस्टमाइझ वॉलपेपर, फर्निचर, पडदे या स्वरूपांत करता येऊ शकतो. त्यामुळे त्या कलेचा आनंद तर आपल्याला घेता येतोच, शिवाय त्यानिमित्ताने या लोककलांना आणि त्यांचं जतन करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहनदेखील मिळू शकतं.

(छायाचित्र सौजन्य : संदेश बेंद्रे)

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interior special issue traditional touch dd

ताज्या बातम्या