News Flash

तंत्रज्ञान : आयपॅड प्रो आणि बरंच काही

अ‍ॅपलच्या चाहत्यांना आणि अभ्यासकांना उत्सुकता असते ती अ‍ॅपलच्या दरवर्षीच्या इव्हेंटची.

आयपॅड, आयपॅड मिनीनंतर यंदाच्या इव्हेंटमध्ये अ‍ॅपलने अ‍ॅपल आयपॅड प्रो लोकांसमोर आणला आहे.

आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com

अ‍ॅपलच्या चाहत्यांना आणि अभ्यासकांना उत्सुकता असते ती अ‍ॅपलच्या दरवर्षीच्या इव्हेंटची. नवनवीन गॅजेट्सबरोबरच एकापेक्षा एक सरस गोष्टी या इव्हेंटमध्ये लोकांसमोर येत असतात. गेल्या आठवडय़ात अ‍ॅपलच्या स्प्रिंग लोडेड इव्हेंटमध्ये आयफोन ट्वेल्व्हचे नवीन रंग, आयमॅक, आयपॅड प्रो, एअरटॅग्स आणि फोर के टीव्ही अशा एकापेक्षा एक सरस गोष्टी लाँच झाल्या.

आयपॅड प्रो

अ‍ॅपलच्या आयपॅडचे चाहते जगभरात आहेत. दरवर्षी येणाऱ्या आयपॅडच्या वेगवेगळ्या मॉडेल्सना लोकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसतो. आयपॅड, आयपॅड मिनीनंतर यंदाच्या इव्हेंटमध्ये अ‍ॅपलने अ‍ॅपल आयपॅड प्रो लोकांसमोर आणला आहे. त्यात एम वन प्रोसेसर आणि अत्याधुनिक फाइव्ह जी कनेक्टिव्हिटी फीचर्स  देण्यात आले आहेत. याआधीच्या आयपॅडच्या व्हर्जन्सच्या तुलनेत हा प्रोसेसर ७५ टक्के अधिक वेगवान आणि आधुनिक असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ही चिप खास करून मॅकबुक आणि मॅक मिनीसाठी तयार केली जाते. या वेळी पहिल्यांदाच आयपॅडसाठी तिचा वापर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये स्टोरेजचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात.

या आयपॅड प्रोमध्ये थेट दोन टीबीपर्यंत स्टोरेजचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे, याचबरोबर १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी, एक टीबी स्टोरेजचे पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीने प्रथमच एवढय़ा जास्त स्टोरेजचा पर्याय दिला आहे. यामध्ये लिक्विड रेटिना एक्सडीआर मिनी एलईडी डिस्प्ले  देण्यात आलेला आहे. नवीन आयपॅड प्रो ट्वेल्व्ह मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड फ्रंट कॅमेरा सोबत येतो.

अल्ट्रा वाइड कॅमेरा, स्टुडिओ क्वालिटी माइक आणि LiDAR स्कॅनर सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे. तो डेप्थ टू डेप्थ सेंन्सिंग टेक्नॉलॉजीवर काम करणार आहे. अशी वेगवेगळी नवीन फीचर्स यामध्ये देण्यात आलेली असली तरी खासकरून दोन टीबी स्टोरेजच्या पर्यायामुळे सध्या सोशल मीडियावर हा आयपॅड सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.

आयमॅक

स्लिम डिस्प्ले हे सुरुवातीपासूनच अ‍ॅपलचं आवडतं फीचर राहिलेलं आहे. नवीन आयमॅकमध्येसुद्धा हाच प्रयत्न दिसून येतो. यामध्ये स्लिम ४.५ के रेटिना ट्र टोन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये फेसटाइम फुल एचडी कॅमेरा देण्यात आलेला आहे. आयमॅकमध्ये अ‍ॅपलचा एम वन प्रोसेसर असणार आहे. यामुळे एडिटिंग किंवा मल्टीमिडिया वापरासाठी या मॉडेलची निवड ही उत्तम निवड ठरणार आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेमध्ये याचा प्रोसेसिंग स्पीड चांगला असल्याने आयमॅकला ग्राहकांची पसंती मिळेल असा अंदाज आहे. कंपनीने आयमॅकमध्ये आधीच्या तुलनेत वेगवेगळे छोटे छोटे अपग्रेड दिले आहेत. याचबरोबर याच्या अंतर्गत रचनेमध्येसुद्धा काही छोटे बदल करण्यात आले आहेत. यातील जुनी थर्मल सिस्टीम बदलून दोन छोटय़ा पंख्यांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. या बदलांमुळे ८५ टक्के प्रोसेसिंग स्पीड वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

याची सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलेली गोष्ट म्हणजे याचे नवीन डिझाइन. आयमॅकचा पारंपरिक लुक बदलून त्याला नवीन लुक देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. अ‍ॅपलच्या जुन्या मॉडेल्सची आठवण यांमध्ये होते. प्रत्येक मॉडेल आपल्या लुकने ओळखता यावे हा यामागचा विचार आहे.

यामध्ये यूएसबी सी टाइप पोर्ट, थंडर बोर्ड पोर्ट असणार आहे. त्याचबरोबर अ‍ॅपलचा मॅजिक माऊस आणि की बोर्ड यामध्ये असणार आहे. विविध सात रंगांत आयमॅक उपलब्ध असणार आहे.

फोर के अ‍ॅपल टीव्ही

नेटफ्लिक्स, अ‍ॅॅमेझॉन प्राइम या आघाडीच्या सेवांना टक्कर देत आपला ब्रॅण्ड पुढे नेण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरलेल्या अ‍ॅपलने अ‍ॅपल टीव्हीचे नवीन मॉडेल इव्हेंटमध्ये प्रस्तुत केले. आधुनिक व्हिडीओ फीचर्स आणि सिरी रिमोट ही फीचर्स यामध्ये देण्यात आली आहेत. फोर के व्हिडीओ क्वालिटीमुळे लोकांना एक वेगळा अनुभव यामध्ये मिळणार आहे. एचडीआर सपोर्ट, नवीन प्रोसेसर यामुळे हा टीव्ही अधिक चांगली पिक्चर क्वालिटी देऊ शकणार आहे. याचबरोबर अ‍ॅपल टीव्हीसाठी नवीन रिमोटसुद्धा देण्यात येत आहे. या रिमोटला सिरी सपोर्ट असणार असून व्हॉइस कमांडद्वारेसुद्धा टीव्ही ऑपरेट होऊ शकणार आहे. जुन्या अ‍ॅपल टीव्हीसाठीसुद्धा हा रिमोट सपोर्ट करणार असून फक्त रिमोटसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. अ‍ॅपल टीव्हीच्या ग्राहकांना विविध गेम्सचा प्रीमियम अ‍ॅक्सेससुद्धा कंपनीकडून देण्यात आला आहे. याचबरोबर आयफोन किंवा अ‍ॅपल डिव्हाइसद्वारेसुद्धा हा टीव्ही वापरता येणार आहे. घरातील सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा उपकरण यांसाठीसुद्धा हा टीव्ही वापरता येऊ शकणार आहे. याचबरोबर कंपनीने अ‍ॅपल वन सबस्क्रिप्शन सुरू केले असून याअंतर्गत अ‍ॅपलच्या प्रीमियम सेवा एकत्रित स्वरूपात मिळणार आहेत.

इतर आकर्षक फीचर्स

याशिवाय इतर आकर्षक सेवांचा समावेश अ‍ॅपल इव्हेंटमध्ये होता. स्पोटीफाय या पॉडकास्ट सव्‍‌र्हिसला टक्कर देणारी नवीन सव्‍‌र्हिस अ‍ॅपलने सुरू केली आहे. या अंतर्गत आता अ‍ॅपल पॉडकास्टच्या माध्यमातून त्यातील युजर्सना पैसे मिळण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर अ‍ॅपल कार्ड्समध्ये कुटुंबासाठी फॅमिली कार्डचा पर्याय देण्यात आला असून याद्वारे कुटुंबीयांना घरातील कोणाचेही कार्ड पेमेंटसाठी डिजिटली वापरता येणार आहे.

एअर टॅग

बऱ्याचदा आपण एखादी वस्तू कुठेतरी ठेवतो आणि गरजेच्या वेळी ती आपल्याला सापडत नाही. यावर उपाय म्हणून एक नवे टूल अ‍ॅपलने आणले आहे. एअर टॅगच्या माध्यमातून तुम्ही हव्या असलेल्या वस्तूचा शोध घेऊ शकता. टॅगचा वापर करून वस्तू शोधण्याचे अन्य पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. जिओ टॅगला स्पर्धा म्हणून आता अ‍ॅपलने एअर टॅगच्या माध्यमातून यामध्ये उडी घेतली आहे. तुम्हाला हव्या त्या वस्तूंना हा एअर टॅग लावल्यावर मोबाइलवर त्या वस्तूचे ठिकाण तुम्हाला दिसू शकते. त्यामुळे मोबाइलच्या दिशादर्शकाद्वारे आपल्याला हव्या त्या वस्तूपर्यंत पोहोचता येणार आहे. याशिवाय एअर टॅग हरवला तर कंपनी त्यातील चीपच्या माध्यमातून एअर टॅग शोधायला मदत करू शकते.

तंत्र ‘ज्ञान’ वू

आपल्या वेगवेगळ्या, आकर्षक गॅजेट्समुळे सामान्यांच्या मनामध्ये अ‍ॅपलचे एक स्वतंत्र स्थान आहे. तो दर्जा आजही अ‍ॅपलने टिकून ठेवलेला आहे. येत्या काळात आयफोन १३, मॅकबुक यांसारख्या नवीन गॅजेट्सकडेसुद्धा सर्वाचे लक्ष असणार आहे. जगभरातील अ‍ॅपलच्या चाहत्यांसाठी ही सर्व प्रॉडक्ट्स नक्कीच आकर्षक आहेत. भारतातील युजर्ससाठीसुद्धा ही प्रॉडक्ट आकर्षक असली तरीही त्याची किंमत मात्र सर्वाच्या खिशाला परवडणारी नाहीत. एखाद्याला ही सर्व अ‍ॅपल प्रॉडक्ट्स हवी असतील तर त्यासाठी खर्च करण्याची तयारी असली पाहिजे.

ही आहेत नवी उत्पादने

  • आयफोन ट्वेल्व्ह : पर्पल रंगामध्ये. हा रंग केवळ याच प्रकारात उपलब्ध (भारतातील किंमत ७९ हजार ९०० रुपये)
  • आयमॅक : नवीन डिझाइन. सात नवीन रंगात उपलब्ध. एम वन चिपसेट, अधिक स्लिम, २४ इंची रेटिना आय डिस्प्ले, १०८० पिक्सल फेसटाइम, एचडी कॅमेरा (भारतातील किंमत एक लाख १९ हजार ९०० रुपये)
  • आयपॅड प्रो : एम वन चिपसेट, ५० टक्के कार्यक्षमता वाढविली (भारतातील किंमत ९९ हजार ९०० रुपये)
  • अ‍ॅपल टीव्ही फोर के : ए ट्वेल्व्ह बायोनियक चिप, सिरी व्हॉइस कमांड सपोर्ट (भारतातील किंमत १८ हजार ९०० रुपये)
  • एअर टॅग : नवीन ट्रॅकिंग गॅझेट. (भारतातील किंमत तीन हजार १९० रुपये)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 4:27 pm

Web Title: ipad pro and many apple gadgets tantradnyan dd 70
Next Stories
1 राशिभविष्य : ७ ते १३ मे २०२१
2 नागरी कर्तव्य!
3 दुसऱ्या लाटेला राजकारणीच जबाबदार?
Just Now!
X