तरुण अपत्याचा मृत्यू ही आईवडिलांसाठी काळीजाचे तुकडे करणारी गोष्ट.. पण अशा प्रसंगानंतर जप्तीवाले दाम्पत्य आपलं दु:ख कुरवाळत बसलं नाही, तर त्यांनी लेकीच्या स्मृती जपण्यासाठी कामाचा डोंगर उभा केला.

कोणाच्या तरी बेदरकार गाडी चालवण्यामुळे दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण नेहमीच पाहातो. पण कधी असे अपघात निमित्त ठरतात आणि असे एखादे सामाजिक कार्य उभे राहाते की, ज्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्याचे कल्याण होते.
सुनंदा आणि चंद्रहास जप्तीवाले हे पुण्यात राहणारं एक सामान्य जोडपं. त्यांच्या तरुण मुलीचा अश्विनीचा अपघातामध्ये मृत्यू झाला. तिच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली. तिची अनुपस्थिती भरून निघावी, ती सर्वाच्या आठवणीमध्ये कायमची राहावी यासाठी जप्तीवाले दाम्पत्याने ‘अश्विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठान’ची स्थापना केली. ते नुसती ट्रस्टची स्थापना करून थांबले नाहीत. या ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटलं आणि त्यातून त्यांच्या आयुष्याचा वेगळाच प्रवास सुरू झाला. अश्विनीचा मृत्यू १ ऑगस्ट २००५ ला झाला. त्यानंतर वर्षभरातच ट्रस्ट सुरू झाला. अश्विनीने पगारातून साठवलेले पसे, तिचे विम्याचे पसे आणि तिच्या लग्नासाठी म्हणून ठेवलेले पसे यांच्यातून ट्रस्ट सुरू झाला. ट्रस्टमधील पसे आणि व्याज यांच्या जोरावर प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य चालते. सेवाभावी संस्था म्हणून बाहेरून एकाही पशाची देणगी घेतली जात नाही. आमचा जीव लहान आणि आम्हाला त्याची गरजही नाही, असे सुनंदाताई सांगतात. विविध सामाजिक संस्थांना देणग्या, गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत आणि संस्थांमधील लहान मुलांसाठी शिबिरं हे प्रतिष्ठानचं मुख्य काम.
पुण्यामधील मुलांसाठी अनेक संस्था आहेत. या संस्थांमध्ये दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिबिरं घेतात. आतापर्यंत चाळीस शिबिरे झाली आहेत. पण अशा प्रकारची शिबिरं घ्यायची असं काही ठरवलं नव्हतं. ते योगायोगाने घडलं. याची सुरुवात २००६ मध्ये ‘आपलं घर’ या संस्थेपासून झाली. जप्तीवाले दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आपला वाढदिवस कोणत्या तरी संस्थेमध्ये जाऊन साजरा करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे सुनंदाताईंच्या बहिणीच्या यजमानांची साठी ‘आपलं घर’मध्ये साजरी करण्यात आली. त्या वेळी त्यांनी तेथील मुलांबरोबर वेळ घालवला, खेळ खेळले. तेव्हा ‘आपलं घर’चे व्यवस्थापक विजय फळणीकर यांनी जप्तीवालेंना सुचवलं की, त्यांची मुलं सुट्टीमध्ये घरी जात नाहीत. त्यांना इतर मुलांप्रमाणे बाहेर शिबिराला पाठवता येत नाही, त्यामुळे तुम्हीच येथे येऊन त्यांच्यासाठी शिबीर का घेत नाही. त्यांनाही हा विचार आवडला आणि २००६ सालच्या मे महिन्यामध्ये आठ दिवसांचं पहिलं शिबीर घेतलं. पहिल्या शिबिरामध्ये जादूचे प्रयोग, बाहुलाबाहुलीचे लग्न, रांगोळी यांसारख्या गोष्टी होत्या. गेल्या आठ-नऊ वर्षांत चाळीस शिबिरं झाली. कालानुरूप शिबिरांमध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचं स्वरूप बदलत गेलं. त्यांची संख्या वाढली. उपक्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचं प्रमाण वाढलं आणि ज्या संस्थांमध्ये ही शिबिरं घेतली जातात त्या संस्थांची संख्याही वाढली. आता अनेक संस्थांमध्ये दरवर्षी शिबिरं घेतली जातात. ज्यांच्यासाठी शिबिरं घेतली जातात ती मुलं दरवर्षी तीच असल्यामुळे मागच्या वेळच्या शिबिरात झालेला एकही उपक्रम पुन्हा घेता येत नाही. त्यामुळे दर वेळी काहीतरी नवीन द्यायचे हे एक आव्हान ठरते. पण जप्तीवाले दाम्पत्याने हे आव्हान चांगले पेलले आहे. मुलांना नवीन काहीतरी द्यायचं या ध्यासापायी ते नवीन माणसं शोधत गेले. काहींशी फोनवरून संपर्क साधला, तर काही दुसऱ्यांच्या ओळखीतून भेटली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, जलतरंगवादक पंडित मििलद तुळणकर यांच्यापासून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींपर्यंत यांचा परिवार विस्तारलेला आहे. आता चाळीसहून अधिक स्वयंसेवक स्वखुशीने तयार होतात. शिबिरांमध्ये जप्तीवाले स्वत: सहसा कोणताही उपक्रम घेत नाहीत. त्यांनी फक्त संस्थांशी आणि स्वयंसेवकांशी बोलून शिबिराच्या तारखा आणि वेळ ठरवायची, कोणता स्वयंसेवक कधी येणार हे ठरवायचं. प्रत्यक्ष शिबिरात मुलांकडून उपक्रम करून घेणारी व्यक्ती वेगळी असते. मुलांचा आणि त्या व्यक्तीचा मेळ घालून देण्याचं काम यांचं.
शिबिरांमध्ये हस्तकला, चित्रकला, गाणी, गोष्टी या नेहमीच्या गोष्टी तर असतातच; पण त्याशिवाय शुद्धलेखन, मूर्तिकला, वर्तमानपत्राच्या पिशव्या, पेपर क्विलिंग यांच्याबरोबर भातुकली, रांगोळी, विज्ञान, गणिताचे खेळ, कथाकथन, वारली पेंटिंग, अभिनय, नृत्य आणि कथाकथन या आणि इतर अनेक उपक्रमांचा समावेश असतो. मुलांच्या आवडीनुसार त्यात बदल केला जातो. त्यांना इंटरेस्ट वाटला पाहिजे, शिबीर संपल्यानंतर त्यात शिकवलेली एखादी गोष्टी करावीशी वाटली तर करता आली पाहिजे, परवडणारी पाहिजे अशा गोष्टी शिकवण्याकडे कल असतो. याच कारणासाठी सिरॅमिक पेंटिंगसारख्या गोष्टींकडे वळलो नाही, असे चंद्रहास जप्तीवाले सांगतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकत्रेही शिबिरांमध्ये येतात. वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून मुलांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्नही चालू असतो. हिमोग्लोबिनचं महत्त्व सांगणारा पोवाडा, मोबाइलचे दुष्परिणाम सांगणारं गाणं, महात्मा गांधींचं गाणं अशी मुलांना रस वाटेल अशी गाणी तयार करून ती मुलांना शिकवली जातात. सांगली आणि साताऱ्यामध्येही एक-दोन शिबिरं झाली आहेत; पण स्वयंसेवकांना त्या ठिकाणी घेऊन जाण्यावर मर्यादा येत असल्यामुळे त्यांनी पुण्यातील संस्थांपर्यंतच मजल मारली आहे.
शिबिरं हे अश्विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठानचं एक काम झालं. हल्ली लोकांना गरजवंतांना मदत करण्याची इच्छा खूप असते. पण त्यांच्याकडे त्यासाठी वेळ नसतो आणि कोणाला मदत करायची, हा प्रश्नही त्यांना पडलेला असतो. अशा वेळी जप्तीवाले मदतीला धावून येतात. त्यांनी शिबिरांच्या निमित्ताने किंवा आणखी कोणत्या कारणाने अनेक सेवाभावी संस्थांना भेटी दिल्या आहेत. अनेक संस्थांची माहिती त्यांच्याकडे आहे. या माहितीचा दुसऱ्यांनाही चांगला उपयोग होतो. देणगी देणाऱ्या व्यक्तीची आणि संस्थेची गाठ घालून देण्याचं काम ते करतात. लोकांकडे वेळ नाही, आमच्याकडे आहे, तर हाच वेळ आम्ही या कामासाठी वापरतो. बऱ्याचदा मदत तयार असते; पण ती कोणत्या गरजवंताला द्यायची हे शोधण्यातच खूप वेळ जातो. संस्थेची माहिती हातात मिळाली की कामाला वेग येतो. आम्ही स्वत: देणगी घेत नाही म्हटल्यावर लोकही विश्वासाने विचारतात. हीच त्यांची विश्वासार्हता आहे, असे ते मानतात.
प्रतिष्ठानकडून बारावी उत्तीर्ण गरजू मुलींच्या पुढील शिक्षणासाठी दरवर्षी आíथक मदत केली जाते. तसेच दरवर्षी विविध संस्थांना ५० हजार रुपयांपर्यंतची आíथक मदतही केली जाते. सन २००९ पासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना ‘अश्विनी संजीवन’ पुरस्कारही दिला जातो. समाजासाठी झटणाऱ्यांचे कौतुक व्हावे आणि अश्विनीचे नाव पुढे राहावे हा त्यामागचा उद्देश. सुरुवातीला अश्विनीच्या नावे वृद्धाश्रम काढण्याचा त्यांचा विचार होता, पण मग त्यातले अडथळे आणि मर्यादा लक्षात घेऊन तळेगाव येथील वानप्रस्थ या वृद्धाश्रमाला सभागृह बांधून दिले. आता तिथे अश्विनीच्या स्मृतिदिन आणि जयंतीला कार्यक्रम होतातच, पण त्याशिवाय वृद्धाश्रमाला त्या सभागृहाच्या भाडय़ामधून आíथक मदतही होते.
जप्तीवाले दाम्पत्याला स्वस्थ बसणं माहीत नाही. शिबिरं किंवा आणखी काही काम नसतं तेव्हा ‘सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघा’चे काहीतरी उद्योग चालूच असतात. सुनंदाताई संघाच्या कोषाध्यक्ष आहेत; तर तेथील म्युझिक ग्रुपला मार्गदर्शन करतात. याशिवाय इतरही अनेक उद्योग चालू असतात.
अश्विनीच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मुलगी गेल्यानंतर हे आमच्याच बाबतीत का घडलं असं म्हणत ते रडत बसू शकले असते. तिच्या स्मृतीसाठी वृद्धाश्रमाला एक सभागृह बांधून देऊन थांबू शकले असते. त्यातूनही तिचं नाव कायम राहिलंच असतं; पण तेवढय़ावरच न थांबण्याची सुबुद्धी त्यांना होती आणि दातृत्वही होते, म्हणूनच आज अनेकांना त्यांची मदत होते आहे. एका अश्विनीच्या जाण्याने सुरू झालेली ‘अश्विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठान’ ही संस्था कोणाला शिक्षणासाठी, कोणाला स्वत: देणगी देऊन, कोणाला देणगीदाराशी गाठ घालून देऊन, तर कोणाला आणखी कोणत्या तरी वेगळ्या स्वरूपात मदत करीत आहे आणि करीत राहील. आज अश्विनी जर वरून बघत असेल तिला तिचे नाव जगात राहिले आहे यापेक्षा तिचे आई-बाबा इतरांना करीत असलेली मदत पाहून त्यांचा नक्कीच अभिमान वाटेल.