अलीकडेच इंग्लंडमध्ये झालेल्या कॅरम विश्व अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या प्रशांत मोरेने जगज्जेतेपद पटकावले. पुरुषांमध्ये पहिले चार क्रमांक भारताचेच होते, तर महिला एकेरीमध्येही पहिल्या तीन महिला भारताच्या होत्या. या संदर्भात भारतीय संघाचे प्रशिक्षक अरुण केदार यांची मुलाखत-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताने अद्भुत कामगिरी केली, त्याबद्दल काय वाटते?

या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर मी समाधानी आहे, कारण या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताचा पुरुष संघ अनुनभवी होता. कारण पुरुष संघातील खेळाडू जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले नव्हते, त्याचबरोबर त्यांचा फॉर्मही म्हणावा तितका चांगला नव्हता. योगेश परदेशीने विश्व अजिंक्यपद पटकावले असले तरी त्याला थेट प्रवेश मिळाल्याने तो भारतीय संघात नव्हता. या वेळी जो विश्वविजेता ठरला त्या प्रशांत मोरेची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. आर. एम. शंकरने दहा वर्षांपूर्वी जेतेपदाला गवसणी घातली होती, पण गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये त्याचा फॉर्म चांगला नव्हता, कारण त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नव्हती; पण या वर्षांत त्याने काही सामन्यांमध्ये चांगला खेळ केला होता. संदीप देवरुखकरकडून मला मोठय़ा आशा होत्या, कारण त्याची खेळण्याची शैली, मानसिकता आणि अनुभव यामुळे तो जेतेपदासाठीचा प्रमुख दावेदार होता. रियाज अकबर अलीने आयसीएफ चषक जिंकला होता. त्यामुळे त्याच्याकडूनही मला मोठय़ा अपेक्षा होत्या; पण कॅरमसारख्या खेळात प्रत्येक क्षणाला खेळ बदलतो. त्यामुळे कामगिरीत सातत्य राखणे फार कठीण असते. रियाज आणि संदीप यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नसली तरी प्रशांतचे जेतेपद सुखावह आणि अनपेक्षित होते.

महिलांच्या संघाविषयी काय सांगाल?

काजल कुमारी ही सर्वात फॉर्मात होती आणि तिने या स्पर्धेत चांगली कामगिरीही केली. अपूर्वा देवीकडे चांगला अनुभव असला तरी तिचा फॉर्म चांगला नव्हता. रश्मी कुमारी ही फार गुणी खेळाडू आहे, पण तिला थेट प्रवेश दिल्यामुळे तीदेखील संघात नव्हती. परिमला देवी चांगला खेळ करत असली तरी तिचा दबदबा कुठेच दिसत नव्हता.

या स्पर्धेत नेमक्या कुठे चुका झाल्या, असे तुम्हाला वाटते?

या स्पर्धेत आम्हाला पुरुष गटाचे सांघिक जेतेपद पटकावता आले नाही, ही रुखरुख मनात कायम आहे, कारण हा सामना आम्ही तिथे गेल्यावर काही तासांमध्येच खेळवण्यात आला होता. भारत आणि इंग्लंड यांच्या वेळा भिन्न आहेत आणि याचाच फटका आम्हाला बसला, कारण हे सामने इंग्लंडच्या वेळेनुसार रात्री १०.१३ ते ११ या सुमारास खेळवले गेले. त्या सुमारास आपण भारतामध्ये साखरझोपेत असतो. त्यामुळे खेळाडूंना मानसिक संतुलन राखता आले नाही. पराभवाची कोणतीही कारणे द्यायची नसतात, त्यामुळे हा पराभव या संघाचा प्रशिक्षक म्हणून मी स्वीकारला. त्याचबरोबर या स्पर्धेत मला संदीप आणि रियाझकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या; पण संदीपला पुरुष एकेरीमध्ये गतविजेत्या श्रीलंकेच्या फर्नाडोने पराभूत केले, तर या स्पर्धेत सर्वात चांगला खेळ करणाऱ्या श्रीलंकेच्या शमिल कुरेने रियाझला पराभूत केले; पण प्रशांतच्या जेतेपदाने सारे काही भरून काढले.

एवढे सर्व खेळाडू, त्यांची खेळण्याची शैली भिन्न, मानसिकता वेगळी, त्यामुळे तुम्ही या साऱ्यांना कसे एकत्र आणले?

यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंवर अतिरिक्त दडपण टाकले जायचे. तुम्हीच सर्वोत्तम आहात आणि सर्वच स्पर्धात तुम्ही जेतेपद पटकावले पाहिजे, असे दडपण त्यांच्यावर आणले जायचे; पण मी एक खेळाडू असल्यामुळे या साऱ्या गोष्टी मीदेखील अनुभवल्या होत्या. त्यामुळे मी एक प्रशिक्षक म्हणून कधीच त्यांच्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी मी त्यांच्यावरील तणाव कमी करण्याचे काम केले. प्रामाणिकपणे तुम्ही भरपूर मेहनत करा. मी माझी मते कधीही त्यांच्यावर लादली नाही. उलटपक्षी त्यांच्याकडून मी सल्ले घ्यायचो, याचे कारण म्हणजे आपल्याला कुणी तरी समजून घेत आहे, हे त्यांच्या मनामध्ये बिंबवले.

सराव करत असताना तुम्ही कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघटनेने आम्हाला पोटॅटो स्टार्च पावडर उपलब्ध करून दिली, त्यामुळे त्यांचे आभार मी मानतो, कारण भारतामध्ये बोरिक पावडरवर कॅरम खेळला जातो; पण युरोपियन देशांमध्ये पोटॅटो स्टार्च पावडरचा वापर केला जातो. या दोन्ही पावडरमध्ये कमालीचा फरक आहे. पोटॅटो स्टार्च पावडरवर खेळताना खेळ फार जलद होतो, कारण कॅरम गुळगुळीत होतो, तर स्ट्रायकर घरंगळत जातो. या वेळी खेळावर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्त्वाचे समजले जाते. सराव शिबिरातील पहिल्या दोन दिवसांमध्ये प्रत्येक खेळाडूचे ‘डय़ू’ होत होते. या वेळी हे का होते, कसे होते, हे खेळाडूंना समजत नव्हते. या वेळी प्रशिक्षकाची जबाबदारी फार महत्त्वाची असते. त्या वेळी तर प्रशांत आणि अपूर्वा हे दोन्ही खेळाडू हवालदिल झाले होते, कारण त्यांचे खेळावर नियंत्रण राहत नव्हते. त्या वेळी या पावडरमुळे काय होते, त्या वेळी कसा खेळ करायचा, कसे फटके मारायचे, खेळावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे सारे मार्गदर्शन मी त्यांना केले आणि त्याचाच फायदा त्यांना झाला असावा, कारण सरतेशेवटी मी प्रशिक्षक आहे. मी मार्गदर्शन करेनच, पण खेळाडू खेळत असतात आणि ते हे मागदर्शन कसे अमलात आणतात हे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे या कामगिरीचे श्रेय खेळाडूंनाच द्यायला हवे.

तुम्ही एक कॅरमपटू आहात आणि तुम्हीदेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे नाव उंचावले आहे; पण या वेळी प्रशिक्षकाच्या भूमिकेत होतात. त्यामुळे या खेळाडूंना मार्गदर्शन करताना तुमच्यातील खेळाडूचा कितपत फायदा झाला?

माझ्या मते फार झाला, कारण एक खेळाडूच दुसऱ्या खेळाडूला चांगला ओळखू शकतो, कारण त्याने बऱ्याच समस्यांचा सामना केलेला असतो. त्या समस्या आता आल्यावर त्या कशा सोडवायच्या यामध्ये जास्त वेळ जात नाही. मी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलो तेव्हाचे नियम वेगळे होते, पोटॅटो स्टार्च पावडरही त्या वेळी नव्हती; पण समस्या जास्त काही वेगळ्या नसतात. त्यामुळे स्पर्धेला जाण्यापूर्वीच मी खेळाडूंना सांगितले होते की, ‘‘स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यावर बऱ्याच गोष्टी विरोधात असतात. तिकडच्या प्रेक्षकांचा पाठिंबा नसतो, पावडर कशी असेल सांगता येत नाही. राहण्याची, खाण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये असेलच असे नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्या मला सांगायच्या, मी त्यांचे निराकारण करेन. तुम्ही फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करायचे.’’ त्यामुळे खेळाडूंचे लक्ष फक्त खेळावरच राहिले आणि त्यामुळेच आम्ही यशस्वी ठरलो.

खेळातील कौशल्याबरोबरच मानसिक पाठबळही खेळाडूसाठी महत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले?

खेळाडूंना मी मोकळीक देण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी एवढेच सांगितले की, खेळाचा आनंद लुटा, निर्णयाचा विचार करू नका. कारण जेव्हा एखादा खेळाडू खेळाचा आनंद घेत असतो तेव्हा त्याची कामगिरी चांगलीच होत असते. त्याचबरोबर मी त्यांना कोणत्याही क्षणी सामना सोडू नका, असेही सांगितले होते, कारण सामना कोणत्याही क्षणी कलाटणी घेऊ शकतो. त्याचबरोबर संघात मी अमुक खेळाडू सर्वोत्तम आहे, अशी गोष्ट ठेवली नव्हती. त्याचबरोबर कोणालाही कमी लेखले नाही. प्रत्येकाला त्याच्या खेळानुसार मी मार्गदर्शन करत गेलो. या खेळाडूंमध्ये मी कधीही सामने खेळवले नाहीत. त्याचा कदाचित विपरीत परिणाम आमच्या तयारीवर झाला असता. मी पुरुष आणि महिला यांचे सामने खेळवण्याचा प्रयोग केला आणि हा प्रयोग यशस्वी झाला; पण हा प्रयोग फसला असता तर त्याचे विपरीत परिणाम निकालावर झाले असते.

आता भारतीय खेळाडू विश्वविजेते आहेत, पण पुढे त्यांनी काय करायला हवे?

विश्वविजयाचा आनंद आहेच, त्याचा काही दिवस आनंद उपभोगायला हवा. काही सत्कारही आमचे होतील, हे सारे प्रेम स्वीकारायला हवे; पण त्यानंतर मात्र आपणच विश्वविजेते आहोत आणि आपल्याला कुणीही पराभूत करू शकत नाही, या भ्रमात राहू नये. कोणताही खेळाडू कायम सर्वश्रेष्ठ असू शकत नाही. सातत्याने सराव करायला हवा. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या खेळाचाही अभ्यास करायला हवा. या स्पर्धेत श्रीलंकेचा संघ चांगला होता, पण त्यांचे दुर्दैव, कारण आम्ही चांगला खेळ केला; पण यापुढेही असेच होत राहणार नाही. त्यामुळे आता ही वाढलेली जबाबदारीही स्वीकारायला हवी. आता खेळावर अधिक मेहनत घेणे भाग आहे. यापुढील प्रत्येक सामन्याला नव्याने सामोरे जायला हवे. विश्वविजयाच्या आविर्भावात कायम राहिलो तर चांगली कामगिरी होणार नाही. त्यासाठी सराव आणि अधिक मेहनत घेणे भाग आहे.
प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व लोकप्रभा क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7th carrom world championship
First published on: 02-12-2016 at 01:17 IST