lp04गेल्या वर्षीच्या गणेश विशेषांकामध्ये आम्ही ‘बुद्धीम् आह्वयामि’ म्हणजेच गणेशाला बुद्धीच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन केले होते. गणेश नेमका कुठून आला, त्याचे उगमस्थान काय, तो एवढा लोकप्रिय कसा काय झाला या साऱ्याचा शोध भावनेच्या नव्हे तर बुद्धीच्या आधारे घ्यायला हवा. कारण तो बुद्धीदाता मानला जातो, असे म्हटले होते. मात्र भावनाच प्रधान मानणाऱ्यांनी त्याला धार्मिक कारणांनी विरोध दर्शविला होता. गणेशाची प्रतिमा ही हिंदूू नव्हे तर इतर कोणत्या तरी धर्म- पंथातून पुढे आली, असे म्हटले तर त्याचे महत्त्व कमी होत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. किंबहुना त्याचे महत्त्व वाढतेच, कारण तो अफगाणिस्तानच्या मुस्लीम दग्र्यापासून ते बौद्ध स्तूपांवर आणि जैन मूर्तीच्या पंचकामध्येही आढळतो. जैन त्याची पूजा कुबेर आणि देवीसोबत करतात. इंडोनेशिआ, जावा, सुमात्रा, जपान, चीन, व्हिएतनाम सर्वत्र आग्नेय आशिया आणि पूर्व आशियामध्ये त्याचे वर्चस्व आहे. त्याच्या लोकप्रियतेचे गमक काय? किंवा तो एवढा जनमानसात खोलवर रुजण्याचे कारण काय याचा शोध घ्यायला हवा. फ्रेंच तज्ज्ञ पॉल मार्टिन दुबोस यांनी तो शोध भावना बाजूला सारून शास्त्रकसोटय़ांवर घेतला. म्हणूनच यंदाच्या लोकप्रभा गणेश विशेषांकामध्ये त्यांची कव्हरस्टोरी समाविष्ट केली आहे.
गणेश केवळ प्राचीन किंवा पुराणकाळात अथवा ऐतिहासिक कालखंडात महत्त्वाचा होता, असे नाही तर आज एकविसाव्या शतकातही त्याचे महत्त्व टिकून आहे; नव्हे वाढतेच आहे. जसा तो मुस्लीमबहुल अफगाणिस्तान, इंडोनेशिआ इथे त्याचे पूजन का होते, मुंबईत प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला सर्वधर्मीय का येतात, तसेच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत पहाटे भेंडीबाजार या मुस्लीमबहुल वस्तीमध्ये मुस्लीम भगिनी आरती घेऊन ओवाळण्यासाठी तिष्ठत का उभ्या असतात, गणेशाच्या त्या रूपाकारामध्ये सर्वधर्मीयांच्या थेट हृदयाला हात घालणारे असे काय आहे, याचा शास्त्रीय शोध घ्यायलाच हवा.. कारण कदाचित त्यामध्येच आपल्याला उद्याच्या जगातील शांततेची बीजेही सापडतील! गणेशाच्या त्या रूपाकाराचे भ्रमण सर्व जातीधर्मामध्ये झालेले दिसते. सर्वानीच त्याला आपले म्हणत स्वीकारले आहे, त्याच्याकडे असे काही तरी आहे, जे प्रत्येकालाच आपले वाटते. त्याच्यातील आदिम आकर्षणाची मानववंशशास्त्रातील किंवा आपल्या डीएनएमधली नोंद आपल्याला गवसेल, त्या दिवशी कदाचित जगातील शांततेची गुरुकिल्ली गवसलेली असेल. तसे झालेच तर भारताने शून्यानंतर जगाला दिलेली ती सर्वात मोठी देणगी असेल!
01vinayak-signature
विनायक परब