चित्रपट सुरु होतो. नदीकिनारी शेळ्या, मेंढय़ा, त्यांची अखंड बे बे बे, धनगराचे विशिष्ट शब्दांनी त्यांना चुचकारणे, धनगराचा तरणाबांड धाकटा दंड बैठका घुमवितोय, मिसरुडावरुन हात फिरवित स्वप्नातदेखील रमतोय, धनगरी बोली भाषेची विशिष्ट लय तुम्हाला सादवतेय, आजूबाजूची मोकळी रानं, क्षितिजापर्यंतचं अवकाश आणि त्यात खुल्या आकाशाखालचा धनगराचा फिरता प्रपंच (वाडा). पुढच्या प्रसंगात चाऱ्याच्या शोधात वाडा स्थलांतरीत करताना धनगरी गीताचे बोल, घोडय़ावरच्या बिऱ्हाडात बसलेलं धनगराचं सहा-सात वर्षांचं पोर, मध्येच येणारा जाणारा रामराम करतोय, एखादा गाडीवाला जरा गुरगुरत जातोय आणि हे सारं पाहताना आपल्याला प्रश्न पडू लागतो की हा चित्रपट आहे की माहीतीपट, धनगरांचं जगणं मांडणारा. पण, धनगरी भाषेचा लहेजा आणि वाडय़ाचे सारे बारकावे टिपत चित्रफीत पुढे सरकू लागते आणि हळूहळू आपणदेखील त्या वाडय़ाबरोबर रानोमाळ भटकू लागतो. त्यांच्या सुख-दु:खात रमू लागतो. कथानकाची पकड बसते आणि त्या वाडय़ाला पडलेला खोडा आपल्यालादेखील जाणवू लागतो. त्या पात्रांची, त्यांच्या भाषेची, त्यांच्या भावनांची, मुक्या शेळ्या, मेंढय़ांची या साऱ्या कथानकाची एक हळूवार झिंग चढते. त्याच धुंदीत असताना चित्रपटाचा शेवट थेट आपल्या अंगावर आदळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटीय भाषेची उमज असलेला दिग्दर्शक सक्षम कथानकाला कसा उत्तम न्याय देऊ शकतो त्याचं ‘ख्वाडा’ हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. प्रत्येक फ्रेम न् फ्रेम दिग्दर्शकाच्या डोक्यात इतकी फिट्ट बसलेली आहे की त्याला जे हवं ते सारं काही तुमच्यापर्यंत पोहोचते. दिग्दर्शनाची पाश्र्वभूमी नाही, कसलेले अनुभवी कलाकार नाहीत, स्टुडिओचा रचनाबद्ध अवकाश नाही, सारं काही खुल्या छताखालचं आणि त्याच खुलेपणातून ही कलाकृती आकार येते. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कथानकातून साकारलेलं असते. ना कसली तांत्रीक उणीव, की ना अनुनभवी कलाकारांचा बुजरेपणा. कथानक, संवाद, ध्वनी, चित्रीकरण अशा सर्वच बाबींना पुरेसा न्याय देत साकारलेलं अफलातून टिमवर्क म्हणजे ‘ख्वाडा’ म्हणावं लागेल.

मराठीतील सर्व सिने रिव्ह्यू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie khwada review by lokprabha
First published on: 23-10-2015 at 12:51 IST