फुलपाखरू व तरंग

‘एव्हरी अ‍ॅक्शन हॅज अ रिअ‍ॅक्शन.’ हे एक वैज्ञानिक सत्य म्हणून सांगितले जाते.

20-lp-minal‘एव्हरी अ‍ॅक्शन हॅज अ रिअ‍ॅक्शन.’ हे एक वैज्ञानिक सत्य म्हणून सांगितले जाते. आपल्या प्रत्येक कृतीचे काही ना काही परिणाम असतातच. एवढेच नव्हे, तर प्रत्येक लहान-मोठया घटनेचेही कुठे ना कुठे पडसाद उमटत असतात. अगदी समर्पक उदाहरण द्यायचं झालं तर फुलपाखरू त्याच्या पंखांची उघडमीट करतं, तेव्हा त्या इतक्या चिमुकल्या घटनेचा जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी परिणाम घडून येत असतो. आपल्याला वाटेल की फुलपाखरांचे पंख किती नाजूक, त्यांची हालचाल किती क्षुल्लक, याचे असे काय परिणाम होणार! पण लहान वा मोठी, त्याच्याशी सुसंगत अशी प्रतिक्रिया उमटतच असते. वैज्ञानिक परिभाषेत याला ‘बटरफ्लाय इफेक्ट’ असे संबोधले जाते.

‘‘हे म्हणजे आपल्या कर्मसिद्धान्तासारखेच झाले. आपल्या प्रत्येक बऱ्या-वाईट कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागतोच. त्यातूनच हे जन्म-मृत्यूचे चक्र अखंडपणे फिरत राहते. बघा, आपल्या संस्कृतीत जे हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे, ते वैज्ञानिक आत्ता नवीन शोधून काढल्यासारखं दाखवताहेत.’’

अशा युक्तिवादांसमोर आम्ही सपशेल शरणागतीच पत्करतो. वैज्ञानिक संशोधनात निष्पन्न होणारी सर्व सत्ये आपल्या महान संस्कृतीत पूर्वीपासूनच ज्ञात व प्रस्थापित होती, यावर अनेकांचा दृढ विश्वास असतो. आम्हाला त्या विश्वासाला धक्का लावायचा नाही, मात्र या ठिकाणी कर्मसिद्धान्त व बटरफ्लाय इफेक्ट यांचा तौलनिक विचार करणे अगत्याचे ठरेल.

आपला वर्तमानकाळ हा आपल्या भूतकाळाचा परिणाम असतो व आपला भविष्यकाळ आपल्याला घडवायचा असेल तर त्याची तजवीज आतापासूनच म्हणजे वर्तमानकाळात करायला हवी. हे कर्मसिद्धान्ताचे प्राथमिक स्वरूप ‘जे पेराल ते उगवेल’ या वाक्प्रचारात प्रतििबबित झालेले दिसते. मानवी जीवन हा जन्म-पुनर्जन्मांची अनादिअनंत साखळी आहे आणि तिचे नियमन करणारे तत्त्व म्हणजे कर्मसिद्धान्त अशी आपल्या पूर्वजांची धारणा होती. मात्र या सिद्धान्तांचे स्वरूप प्रामुख्याने नतिक आहे व त्यानुसार मानवी कर्माना व त्यांच्या परिणामांना पापपुण्याची वस्त्रे चढवली जातात.

परंतु बटरफ्लाय इफेक्ट अशा पापपुण्यांच्या भाषेत बोलत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो केवळ मानवी जीवनाबद्दल भाष्य न करता एकूण विश्वातल्या घडामोडींबद्दल बोलतो. फुलपाखरांच्या पंखांसारखंच दुसरं उदाहरण द्यायचं तर आत्ता येथे टाचणी पडली तर त्याचे पडसाद (प्रतिध्वनी नव्हे!) जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी उमटतीलच. आपल्याला ते दिसतील अथवा नाही, आपल्या हयातीत ते घडतील अथवा नाही, पण पडसाद उमटतीलच.

आम्हाला आमच्या प्रेमाच्या प्रयोगांना प्रोत्साहित करणारे तत्त्वच या बटरफ्लाय इफेक्टमध्ये सापडले. आमच्या अनेक उपक्रमांच्या बाबतीत आमची थट्टा, टिंगलटवाळी करणारे, आम्हाला नामोहरम करू पाहणारे आमचे अनेक ‘हितचिंतक’ आमच्या अवतीभवती असतात. त्यांचा एक मुख्य प्रश्न असतो, ‘‘हे सर्व करून काय साधणार आहे? जग बदलणार आहे का?’’ याला यथोचित उत्तर म्हणजे बटरफ्लाय इफेक्ट. आम्ही जे करत आहोत त्याचे आज ना उद्या, आमच्या हयातीत वा पश्चात परिणाम घडून येतीलच. आमच्या कामाची पावती आम्हाला आजच मिळावी, या अपेक्षेने आमचे उपक्रम चाललेलेच नाहीत. ते निरपेक्ष प्रेमसिंचन आहे, पण ते वाळूत पाणी ओतल्यासारखं नाही. त्याचे कुठेतरी, केव्हातरी सकारात्मक परिणाम होतील, या विश्वासाच्या पायावर हे प्रयोग उभे आहेत.

जंगलात वणवा पेटलेला असतो आणि सर्व प्राणी सरावैरा पळत असतात. एक चिमणी आपल्या चोचीत पाणी घेऊन ते आगीवर टाकत असते. ते बघून कावळा कुत्सितपणे तिला विचारतो, ‘‘तुझ्या या थेंबभर पाण्याने ती आग विझणार आहे का?’’ त्यावर चिमणी उत्तरते, ‘‘ते मला माहीत नाही. पण उद्या जेव्हा या घटनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये लिहिलं जाईल हे नक्की.’’

ही खरंच फार उदात्त भावना आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही या इतिहासलेखनाचाही विचार करत नाही. म्हणजे आणखी काही वर्षांनी जगाच्या इतिहासात या प्रेमाच्या प्रयोगांची नोंद सुवर्णाक्षरांत होईल, अशी स्वप्नं आम्ही बघत नाही. आम्हाला फक्त जग सुंदर करायचंय. आणि त्यामागचं आधारभूत तत्त्व म्हणजे बटरफ्लाय इफेक्ट.

आमच्या प्रेमाच्या प्रयोगांच्या वाटचालीत आम्हाला आणखी एक सुखद प्रचीती आली ती तरंग परिणामाची. एका शांत जलाशयात लहानसा खडा टाकला तर तरंग निर्माण होतात. जलाशयाच्या केंद्रस्थानापासून परिघापर्यंत तरंग मोठेमोठे होत जातात, मोठे होताना जणू संपूर्ण जलाशयालाच आपल्या कवेत घेतात.

प्रेमाच्या प्रयोगांच्या बाबतीत हा तरंग परिणाम पदोपदी अनुभवाला आला. या प्रयोगांचे बीज रोवले गेले तेव्हा मूठभर सवंगडी होते. हळूहळू त्यांची संख्या वाढू लागली, प्रयोगागणिक त्यामध्ये भर पडत गेली, अगदी ‘कारवाँ बनता गया’ अशा पद्धतीने आमच्या समविचारी मित्रांची संख्या वाढत गेली. प्रारंभी एका शहरापुरते मर्यादित असणारे हे प्रयोग आज शहरांच्या, राज्यांच्या, देशांच्या सीमा ओलांडून वैश्विक होऊ पाहात आहेत. जात, धर्म, भाषा, िलग, वय ही बंधने या प्रयोगार्थीना कधीच नव्हती, आजही नाहीत. ज्यांच्यासाठी प्रयोग करायचे, ते आज प्रयोगार्थी झाले आहेत. प्रयोगांची संख्या, प्रयोजने यांच्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. साहजिकच तरंगांची व्याप्तीही वाढत चालली आहे.

समर्थ रामदासांच्या शब्दांत सांगायचं तर

‘‘लिहीला प्रत्ययो आला।

मोठा आनंद जाहाला।

चढता वाढता प्रेमा।

आनंदवनभुवनी॥’’

या जगाचं आनंदवनभुवन व्हावं यापेक्षा वेगळं काय हवं आहे?
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व प्रेमाचे प्रयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Love

ताज्या बातम्या