‘‘काय हो, हे सर्व तुम्ही कशासाठी करता?’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘काय?’’

‘‘हेच ते, वेगवेगळे दिवस साजरे करणं, परधर्मातल्या लोकांना जरा अतिच कौतुकाने वागवणं, सणासुदीला घरात राहून गोडधोड करण्याऐवजी कुठेतरी भटकत राहणं, भेटकार्ड, फुलं वाटणं, अनोळखी लोकांना मिठाया भरवायच्या, तरुण मुलांना जगावेगळे उद्योग करायला सांगायचे.. नस्त्या उठाठेवी! तुम्हाला काय वाटलं, यासाठी तुम्हाला कुठला महान पुरस्कार वगैरे मिळणार आहे? की तुमची नातेवाईक मंडळी तुमचं अगदी तोंड भरून कौतुक करणार आहेत? असले फालतू उद्योग करण्यापेक्षा स्वत:कडे, घराकडे जरा जास्त लक्ष द्या!’’

आमचे स्नेही आमच्यावर संतापले होते. आणि त्यांचा राग अनाठायी नव्हता. त्यांच्याकडच्या घरगुती समारंभाला त्यांनी अगदी निवडक जवळच्या मित्रमंडळींना आमंत्रण केले होते. त्यात अर्थात आमचा समावेश होता. पण आमच्या पितृदिनाच्या कार्यक्रमामुळे आम्हाला त्यांच्याकडे जाता आले नाही. त्यामुळे ते दुखावले होते. आमच्यासाठी हे नित्याचेच झाले आहे. कारण कुठलाही सणसमारंभ किंवा कौटुंबिक सोहळा आणि आमचे हे प्रवाहाविरुद्ध जाणारे कार्यक्रम यांच्यातील संघर्ष कायमचे झाले आहेत आणि आमचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. आमच्या स्नेह्यांनी त्यांच्या मनातील खदखद उघडपणे व्यक्त केली इतकेच. पण काही बोलून न दाखवणाऱ्या प्रियजनांच्या मनात राग, तिरस्कार किंवा तत्सम भावना धुमसत असणार, हे नि:संशय!

आमच्या स्नेह्यांच्या या सरबत्तीने आमच्या मनात विचारांचे मोहोळ उठले.

खरंच, आपण आपल्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना व मित्रपरिवाराला गृहीत धरू लागलो आहोत का? त्यांच्या प्रेमाबद्दल, नातेसंबंधांबद्दल आपण बेफिकीर होत चाललो आहोत का? या अशा लष्करच्या भाकऱ्या भाजून आपण जगातील लांबलांबच्या लोकांना जवळ आणत आहोत, पण जीवीच्या जिवलगांना दूर लोटत आहोत का? तसे होत असेल तर हा सगळा खटाटोप व्यर्थच नाही का?

नाही, नाही, ‘घरच्यांना लाथा आणि बाहेरच्यांना मिठय़ा’ अशी कुटिल नीती आमच्या मनात निश्चितच नाही. मग जवळचे आप्त नाराज का? त्याचे कारण कदाचित असे असेल की सणसमारंभ साजरे करताना किंवा कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी आपल्या समाजातील दु:खी-कष्टी लोकांना, तसेच तथाकथित ‘परधर्मीयां’ना त्यात सामावून घेण्याची आपली वृत्ती हवी, हे सग्यासोयऱ्यांना पटवून देण्यात आम्ही कमी पडत आहोत. पण आमची त्या वृत्तीशी प्रामाणिक बांधिलकी आहे, आणि एक ना एक दिवस ही बांधिलकी आपल्या जवळच्यांपर्यंत पोहोचेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तेवढी प्रतीक्षा करण्याची आमची तयारी आहे.

मात्र ही तयारी ठेवताना एका तथ्याचे आम्हाला पूर्ण भान आहे, आमच्या व आमच्या सुहृदांमधील मतभेद हे पृष्ठभागावरील मतभेद नाहीत. तर ते जीवनदृष्टीविषयी मतभेद आहेत. आपले वाढदिवस साजरे करताना वंचितांना बरोबर घेतल्याशिवाय आमच्या घशाखाली केक उतरणारच नाही. किंवा दसरा-दिवाळीसारखे सण साजरे करताना, ज्यांना या सणांचा आनंद कधीच घेता येत नाही त्यांना बरोबर घेतल्याशिवाय आमचे ‘सेलिब्रेशन’ कसे होणार?

‘मातापिता मुलेबाळे।

तैसे दु:खित सुखविले लडिवाळे।।

ती सेवाभक्तीही मिळे। परमेश्वरास।।’

ही आमची जीवनधारणा आहे. रंजल्यागांजल्यांची सेवा करणे व त्यांना प्रेम देणे, ही आमच्या दृष्टीने सर्वोच्च भक्ती आहे. कारण त्यामुळे मानवातील परमेश्वरी अंशाशी आमचे नाते जोडले जाते. हे नाते जोडले जाताना समोरची व्यक्ती कुठल्या धर्माची आहे, हा प्रश्न आम्हाला पडत नाही, कारण आमच्या मनात असा कुठलाही भेदाभेद नाही. निसर्ग हा आमचा गुरू आहे. आपल्या साधनसंपदेची जगावर उधळण करताना तो जसा मुक्तहस्ताने व समभावाने करतो, तेच आमच्या अंगी बाणवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ज्या इतरांना ‘लष्करच्या भाकऱ्या’ वाटतात, ते आमच्या दृष्टीने प्रेमाचे प्रयोग आहेत.

जी गोष्ट सणसमारंभांची, तीच तरुणवर्गाला वेगळ्या वाटांवर चालायला प्रोत्साहित करण्याची. येथेही आम्ही निसर्गाचे शिष्यत्व पत्करून आपल्यातील नैसर्गिक सुप्त गुणांचा पूर्ण आविष्कार करण्याच्या प्रक्रियेचा परिचय तरुणाईला करून देण्याचा प्रयत्न करतो. निसर्गात स्पर्धा आहे का? दोन झाडे, दोन पक्षी, दोन नद्या परस्परांकडे स्पर्धक म्हणून बघतात का? मग आपण आपल्या मुलांना शर्यतीत धावणारे स्पर्धक म्हणून का घडवायचं? त्यांना त्यांच्या निसर्गदत्त क्षमतांना फुलवण्याची संधी मिळाली पाहिजे. पण औपचारिक शिक्षणाच्या बाहेरील परिघात तरुण मनांची मशागत करणे हे आपल्या सर्वाना शक्य आहे. आम्ही ते आवडीने करतो. आमच्या विविधरंगी कार्यक्रमांमधून तरुणवर्गाला अनेक प्रकारच्या व्यवस्थापनाचे शिक्षण सहजपणे मिळते. संघभावना, वक्तशीरपणा, शिस्त, संवादकौशल्य, आपत्तीव्यवस्थापन, निर्भीडपणा, स्वावलंबन, संवेदनशीलता, तर्कशुद्ध विचार, व्यक्तित्वविकास यांची जोपासना कुठल्याही महागडय़ा क्लासेसना न जाताच होते. नावीन्याचा शोध घेण्याच्या त्यांच्या स्वाभाविक प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळते, त्यातूनही नवीन कार्यक्रमांचा जन्म होतो. पण या व्यापक शिक्षणाबरोबर त्यांना आपल्या अवतीभवती अस्तित्वात असणारी आधुनिक, ‘चेतनाचिंतामणींची गावे’ दाखवण्याचाही प्रयत्न आम्ही करतो. केवळ शाळा-कॉलेजच नव्हे, तर सर्व जगच त्यांच्यासाठी शिक्षण खुले करते.

आता हे सर्व करणे म्हणजे, लष्करच्या भाकऱ्या भाजणे आहे का? ज्यांना असे वाटते त्यांना वाटो बापडे! कधीकाळी त्या सर्वाना आमच्या प्रेमाच्या प्रयोगांबद्दल आपुलकी वाटेल, याची आम्हाला खात्री आहे. जरी नाही वाटली तरी आमचा खटाटोप सुरूच राहील. कारण आम्ही प्रयोगशील ऋषींचे वारसदार आहोत!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व प्रेमाचे प्रयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love helping others
First published on: 24-06-2016 at 01:11 IST