आठ एप्रिल २०११ रोजी ‘रिओ’ हा अॅनिमेशन, अॅडव्हेंचर, कॉमेडी प्रकारात मोडणारा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आता रिओचा सिक्वेल ‘रिओ २’ प्रदर्शित होतोय. त्याबद्दल-

रिओ म्हणजे रिओ द जानिरो. ब्राझीलचं एक जगप्रसिद्ध शहर. त्याच्या रसरशीत, रंगतदार, फन लव्हिंग वातावरणासाठी आणि गेली अनेक वर्षे भरणाऱ्या तिथल्या कार्निव्हलसाठी, कोपाकबाना बीचसाठी, बीचवर होणाऱ्या पाटर्य़ासाठी जगभरातल्या रसिकांमध्ये लोकप्रिय असलेलं ठिकाण.
चित्रपटाची कथा होती ब्ल्यू या मिनेसोटासारख्या छोटय़ा शहरातल्या घरगुती झालेल्या मकाऊ पोपटाची. तो पूर्णपणे स्वतंत्र अशा ज्युवेलला भेटतो, तेव्हा रिओ डि जानिरोला त्याच्या स्वप्नातल्या पक्ष्याबरोबर एका साहसी मोहिमेची सुरुवात करतो.
बेबी मकाऊ ब्ल्यूला पक्ष्यांची चोरटी तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पकडून अमेरिकेकडे छुप्या मार्गाने चालवलेलं असतं. मूस लेक, मिनेसोटा येथून जाताना ब्ल्यूला नेणाऱ्या ट्रकमधून अपघातानेच तो असलेलं बॉक्स रस्त्यावर पडतं. लिंडाला, एका साध्या-सरळ मुलीला ब्ल्यू सापडतो आणि ती त्याला प्रेमाने सांभाळते. पंधरा र्वष उलटतात आणि उडता न येणारा ब्ल्यू हा एक माणसाळलेला हुशार पक्षी म्हणून लिंडाबरोबर आरामशीर आयुष्य जगू लागतो.
अचानक एक वागण्या-बोलण्यात सफाईदारपणा असलेला, टय़ुलिओ नावाचा ब्राझिलिअन ऑर्निथॉलॉजिस्ट लिंडाच्या भेटीला येतो आणि तिला समजावून सांगतो की ब्ल्यू या त्याच्या जातीचा शेवटचा पुरुष-पक्षी आहे. त्याच्याकडे रिओ डि जानिरोत ज्युवेल ही स्त्री पक्षीण आहे. मकाऊ जातीच्या या पक्ष्यांची जात नामशेष होण्याचा धोका आहे. त्या दोघांनी मिळून पक्ष्यांची ही जात वाचवावी म्हणून टय़ुलिओ लिंडाला सुचवतो की तिने ब्ल्यूला रिओला आणावं. ब्ल्यू आणि टय़ुलिओबरोबर लिंडा रिओ डि जानिरोकडे प्रवास करते. ब्ल्यू आणि ज्युवेलला ते एका मोठय़ा पिंजऱ्यात ठेवून एका संस्थेत ठेवतात. टय़ुलिओ त्या संस्थेत काम करत असतो. ते रात्रीचे जेवण करत असताना पक्ष्यांचा व्यापार करणारे तस्कर त्या संस्थेत घुसतात आणि विक्रीच्या उद्देशाने ब्ल्यू आणि ज्युवेलला चोरून पळवून नेतात. लिंडा आणि टय़ुलिओ ब्ल्यूला सगळीकडे शोधतात. ब्ल्यूला ज्युवेलबरोबर साखळय़ांनी बांधून एका झोपडपट्टीत लपवून ठेवलेलं असतं. मध्यंतरीच्या काळात, ज्युवेल आणि ब्ल्यू, त्यांना बंदिवान करणाऱ्यांपासून सुटका करून घेतात आणि पक्ष्यांच्या एका गटाशी मैत्री करतात. ते पक्षी त्यांना साखळय़ांपासून मुक्त व्हायला मदत करतात.
त्याच वेळी प्रसिद्ध कार्निव्हलला सुरुवात झालेली असते. तस्कर आणि वाईट कॉकटू निजेल, यांची ब्ल्यू आणि ज्युवेलला परत करायची इच्छा नसते. गर्दीने फुललेल्या रस्त्यावर ते त्यांचा पाठलाग करतात. पुढे काय होतं ते रुपेरी पडद्यावर प्रत्यक्षच पाहता येईल.
चित्रपटाची कथा लिहिली होती कालरेस सालडान्हाने. चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांचंच होतं. चित्रपटाच्या ‘रिओ’ शीर्षकाचा संदर्भ त्याच्या सेटिंगशी आहे. हे सेट्स ११ टक्के यू.एस.ए.त, १७ टक्के रिओत आणि ७२ टक्के रिओच्या शहर आणि उपनगरात लावण्यात आले होते.
चित्रपटाचा बाज कलरफुल होता आणि त्यातलं निसर्गसौंदर्य श्वास रोखून धरायला लावणारं होतं. रिओ डि जानिरोच कार्निव्हल म्हणजे एक जगप्रसिद्ध उत्सव. प्रत्येक वर्षी साजरा होणाऱ्या या उत्सवाला जगातला सर्वात मोठा कार्निव्हल म्हणून गणण्यात येतं. दोनशेहून अधिक सांबा डान्स ग्रुप नृत्य करत परेडमध्ये भाग घेतात आणि प्रत्येक दिवशी दोन मिलियन लोक रस्त्यावर असतात. या वैशिष्टय़पूर्ण परेडमध्ये उत्सवाची मजा लुटणारे लोक, विविध चित्ररथ यांच्यामुळे ती नेत्रदीपक असते.

अॅन हॅथने या सुप्रसिद्ध अॅकॅडमी अॅवॉर्ड विजेत्या नटीने आवाज दिलाय ज्युवेलला, तर जेसे आमसेन बर्गने टायलर ब्ल्यू गुंडरसनला.

काही ब्राझिलियन सिनेरसिकांनी मात्र अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, की ब्राझीलची ‘इमेज’ म्हणजे असा एक देश, ज्याची फक्त कार्निव्हल नग्न स्त्रिया पाटर्य़ा, सॉकर आणि नेहमी मजा करत राहणारे, कोपाकबाना समुद्रकिनाऱ्यावर पहुडलेले लोक, अशी न होता, त्यापलीकडेही या देशाला काही सांस्कृतिक वारसा आहे, शिक्षणक्षेत्रातही त्यांनी योगदान दिलंय, अशीही असावी. तरीही प्रथम आलेला रिओ म्हणजे मुलं आणि कुटुंबासाठीही एक छान करमणूक होती.
त्यानंतर आता येतोय याच महिन्यात प्रदर्शित होणारा रिओ २ हा २०१४चा अमेरिकन थ्रीडी कॉम्प्युटर अॅनिमेटेड-म्युझिकल-अॅडव्हेंचर कॉमेडी प्रकारात येणारा सिनेमा. चित्रपटाची निर्मिती ब्ल्यू स्काय स्टुडिओज, या त्यांच्या ‘आइस एज’ फ्रँचायझीसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेनेच केली आहे. दिग्दर्शन आहे कालरेस सालडान्हा यांचं.
रिओ २ ची सुरुवातदेखील रिओ या ब्राझिलियन शहरातच होते, पण बऱ्याचशा घटना मात्र घडतात अॅमॅझॉन इनफॉरेस्टमध्ये.

पहिल्या चित्रपटाला ज्यांनी उसने आवाज दिले होते, त्याच जेसे आयसेन बर्ग (सोशल नेटवर्क फेम) अॅन हॅथवे, जॅमी फॉक्स, जॉर्ज लोपेझ, ट्रेसी मॉर्गन यांचे आवाज सिक्वेलसाठीही वापरण्यात आले आहेत. मार्च २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचं वितरण झालं आणि ११ एप्रिल २०१४ रोजी हा चित्रपट अमेरिकेतील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
ब्ल्यू, ज्युवेल आणि त्यांची तीन मुलं, अॅमेझॉन रेनफॉरेस्टच्या प्रवासासाठी, त्यांचं रिओ डि जानिरोचं घरगुती आयुष्य सोडून देतात. अॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये, त्यांचे मालक लिंडा आणि टुलिओ एका मोहिमेवर असतात. त्यांना स्पिक्स मकाऊ ही एक छुपी जमात सापडलेली असते. ते मार्गक्रमण करत असताना मनाऊसमध्ये त्यांना त्यांच्या पूर्वीच्या ओळखीच्या निजेल द कॉकाटूने बघितलेलं असतं. तो पॉयझन डार्ट फ्रॉग-गेबी आणि अॅन्टइटर चार्ली यांच्या मदतीने मकाऊंचा सूड उगवण्याचा निर्णय घेतो. अॅमेझॉनमध्ये पोहोचल्यावर या कुटुंबाला ज्युवेलचे खूप काळापूर्वी पारखे झालेले वडील एडुआडरे भेटतात. ते मकाऊ जमातीबरोबर दडून राहात असतात. त्यांच्यात सामावून जायला ब्ल्यूला अडचण असल्याने, निजेल त्या जमातीत शिरकाव करतो आणि मकाऊ तिथे लपून बसलेले असतात. त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करताना लिंडा आणि टय़ुलिओचं बेकायदेशीर लॉगर्सकडून अपहरण करण्यात येतं. त्यांची सुटका होते का, कशी या प्रश्नांची उत्तरं पुन्हा एकदा प्रत्यक्ष सिनेमा पाहिल्यावर.
अॅन हॅथने या सुप्रसिद्ध अॅकॅडमी अॅवॉर्ड विजेत्या नटीने आवाज दिलाय ज्युवेलला, तर जेसे आमसेन बर्गने टायलर ब्ल्यू गुंडरसनला.
लिंडा गुंडरसन, जिने ब्ल्यूला १५ वर्षांपासून दत्तक घेतलंय, तिला आवाज दिलाय लेस्ली मानने. निजेल या दुष्ट आणि परपीडेत आनंद मानणाऱ्या कॉकटूचा आवाज आहे जेम्स क्लेमेंटचा. जॅमी फॉक्सने निको या यलो कॅनरीला आवाज दिलाय. लुईस बुलडॉगला आवाज आहे ट्रेसी मॉर्गनचा.
व्यक्तिरेखेला चपखल बसणारा आवाज आणि त्यामुळे होणारी विनोदनिर्मिती, यांचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रेक चित्रपट मालिकेतील ‘डॉन्की’ ला दिलेला एडी मर्कीचा आवाज. ‘रिओ’त दिलेले आवाज आणि ‘रिओ२’ मधले आवाज, यामध्ये कन्टिन्युटी ठेवल्याने व्यक्तिरेखा परिचित वाटतात.
पहिल्या ‘रिओ’ची पटकथा लिहिणाऱ्या डॉन ऱ्हायमर, ‘रिओ २’ या सिक्वेलच्या पटकथालेखनाचे काम चालू असतानाच्या काळात २८ नोव्हेंबर २०१२ ला, डोकं आणि मानेच्या कर्करोगाशी लढाई देताना मृत्यू पावला. जानेवारी २०१३ त सिक्वेलचं सेटिंग अॅमेझॉन येथे होईल, हे रॉड्रिगो सॅन्टोरी या निर्मात्याने निश्चित केलं. ब्रुनो मार्स या कलाकाराने, पात्रांची व्यक्तिमत्त्वं, आवाज, यांना स्वत:चे टचेस दिले.
चित्रपट संगीतबद्ध केलाय जॉन पॉवेलने, हलकं-फुलकं, रॅप, पॉप म्युझिक श्रवणीय आहे. सोनी क्लासिकलतर्फे आणखी एक आल्बम वितरित झाला आहे.
चित्रपटाचं स्वागत जोमदार झालं, ‘स्क्रीन डेली’च्या मार्क अॅडॅम्सने म्हटलंय की रिओ २ ही प्रसन्नतेचा शिडकावा करणारी थ्रीडी अॅनिमेटेड करमणूक आहे. बॉक्स ऑफिसवर हिट व्हायला चित्रपटाला काही अडचण नसावी, कारण त्यात जंगलातली साहसं, गाणी आणि चमकदार प्रसंग, यांचा मनोवेधक मिलाफ आहे. सर्व वयोगटांतील लोकांची या चित्रपटाने उत्तम करमणूक होऊ शकेल. नवीन वर्षांच्या संध्याकाळचे औचित्य साधून रिओ डि जानिरो शहरात चित्रपट सुरू होतो. तिथल्या कोपाकबाना बीचवर लोक पार्टी करत असतात, त्याच वेळी प्राणी, आणि मुख्यत: पक्षी, ख्राइस्ट द रिडिमरच्या रिओचं विहंगम दर्शन घडवणाऱ्या पुतळय़ावर त्यांची पार्टी करत असतात.

चित्रपटाचा रोख जरी पक्ष्यांवर असला, तरी अॅमेझॉन- प्रदेशातील अवैध जंगलतोड आणि पर्यावरणाचा समतोल ढळू नये यासाठी त्याच्यावर अंकुश ठेवण्याची गरज, यांचाही थोडासा परामर्श घेण्यात आलेला आहे.

चित्रपटाचा रोख जरी पक्ष्यांवर असला, तरी अॅमेझॉन- प्रदेशातील अवैध जंगलतोड आणि पर्यावरणाचा समतोल ढळू नये यासाठी त्याच्यावर अंकुश ठेवण्याची गरज, यांचाही थोडासा परामर्श घेण्यात आलेला आहे. अर्थात ही काही डॉक्युमेंटरी नाही, तर एक करमणूकप्रधान चित्रपट आहे, त्यामुळे अधिक खोलात जाण्याने रसभंगच झाला असता.
‘रिओ २’ ची हिंदी आवृत्ती पण तयार होते आहे. इमरान खानने ब्ल्यूला आणि सोनाक्षी सिन्हाने ज्युवेलला आवाज दिला आहे. ‘आवाज देताना आम्हाला खूप मजा आली आणि हसून हसून आमची पुरेवाट झाली,’ असं त्यांनी नुकतंच प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखत देताना सांगितलं.
उत्कृष्ट आणि त्याचबरोबर भन्नाट अॅनिमेशनमुळे वैशिष्टय़पूर्ण ठरणाऱ्या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या आवृत्त्यांबरोबरच, वेगवेगळय़ा विषयांवर स्वतंत्र अॅनिमेशनपटही निर्माण होणे तेवढेच आवश्यक आहे. तशी निर्मिती जोमाने सुरू होण्यापूर्वी इथल्या मुलांनादेखील ब्ल्यू आणि ज्युवेल तेवढेच प्रिय असतील, यात संदेह नाही.