आयुष्य डिझाइनसारखे असते का? ते एखाद्या डिझाइनप्रमाणे जगता येते का? जे छान, सुंदर, मोहक भासते, त्यात जिवंतपणा किती असतो? अस्ताव्यस्तपणा आणि शिस्तबद्धता यांची संगती राखता येऊ शकते का? माणसाच्या आयुष्याचे डिझाइन नेमके आहे तरी कसे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाथरूममध्ये जमिनीवर लावलेल्या टाइल्स, त्यावर असलेल्या समांतर उभ्या-आडव्या रेषांनी तयार झालेले असंख्य चौकोन आणि त्या चौकोनांमध्ये एखाद्या डिझाइनप्रमाणे मांडून ठेवलेल्या जेम्सच्या रंगीत गोळ्या. पाहताक्षणी लक्षात येते की, या डिझाइन आणि रंगांमध्ये काही एक विशिष्ट संगती आहे. पण हे सारे आपल्याला बाथरूमच्या टाइल्सवर मात्र अपेक्षित नसते..

दुसऱ्या एका फोटोमध्ये सुरुवातीस डाव्या बाजूस झाडाची पाने दिसतात आणि खालच्या बाजूस असंख्य रंगीत शंकरपाळ्यांच्या आकाराचे रंगीत चौकोन. कदाचित तो िपट्रेड कागद असावा. थोडे बारकाईने पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्याच रंगीत डिझाइनचे काही चौकोनी कागद त्यावर कापून ठेवलेले आहेत किंवा पत्त्यांच्या त्रिकोणी बंगल्यासारखी रचना त्यावर केलेली आहे..

इतर काही छायाचित्रांमध्ये रंगीत वस्तू अतिशय नेटकेपणाने मांडून ठेवलेल्या दिसतात. काही ठिकाणी त्या चौरसाकृती ठोकळ्यांवर आहेत. तर काही ठिकाणी त्या स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर ठेवलेल्या आहेत.

एका छायाचित्रात कृत्रिम हिरवळीवर विविध झाडांच्या पानांचे नमुने चिकटवून त्याची एक रचना तयार केलेली दिसते. तर दुसऱ्या एका छायाचित्रात एका अप्रतिम निसर्गदृश्य असलेल्या छायाचित्रावर सर्वत्र मुंग्या फिरताना दिसतात.

एवढे सारे स्वच्छ, सुंदर, नेमके आणि रंगीबेरंगी पाहून नजरेला छान वाटते खरे. पण एवढे सुंदर व नेटके पाहण्याची सवय आपल्याला कधीच नसते. घर असो अथवा कार्यालय अस्ताव्यस्तच पडलेले असते, असा अनेकांचा अनुभव असतो. ही छायाचित्रे टिपणारा अँड्रय़ू मेयर्स यालाही असेच वाटते. तो म्हणतो, मला अनेकदा वाटते की, सारे काही नेटके असावे. प्रत्यक्षात तसे कधीच होत नाही. तेच सारे मला वाटणारे मी या छायाचित्रांसाठी घडवले आहे. केवळ मांडणीशिल्प नव्हे तर मांडणीशिल्पांचे रचनाछायाचित्र असा हा प्रकार आहे.

एवढेच नाही तर त्याही पलीकडे खूप गोष्टी आपल्याला दाखविण्याचा प्रयत्न हा छायाचित्रकार करतो. तो थेट काहीच न सांगता अप्रत्यक्षपणे सुचवतो. कृत्रिम हिरवळीवर खऱ्याखुऱ्या झाडांची पाने नमुन्यादाखल मांडणे किंवा बर्फाळ पर्वतरांगांच्या पाश्र्वभूमीवर पत्त्यांचा बंगला. यात सूचन बरेच असते. ते समजून घेण्यासाठी नजर आणि मेंदू दोन्हीला तयार करावे लागते.

सर्वप्रथम हे समजून घ्यावे लागते की, समोरच्या दृश्यामध्ये दिसणारे छान रंग हे आपल्यासमोर दृश्यसंवेदनांचा एक वेगळा पट उलगडणारे आहेत. त्यामध्ये एक संगतीही आहे आणि सूचनही. वापरलेले सर्व रंग नजरेला भुलवणारे आहेत. या भुलवण्यामध्ये फसगत आणि गंमत दोन्ही आहे. या दोन्ही दृश्य जाणिवांची मजा लुटता आली तर त्यातून वेगळीच अनुभूती रसिकांना येणार आहे.

हे करताना हाही विचार करणे अपेक्षित आहे की, आपल्या बेशिस्तीतील शिस्त इथपासून प्रत्यक्ष आयुष्यात सुरू होणारा हा प्रवास या कलाकृतींपर्यंत येताना शिस्तबद्ध नेटकेपणाच्या दिशेने येताना सुंदर वाटतो, त्यात खरेच तेवढा जिवंतपणा आहे की, केवळ कोरडे सौंदर्यच ?

एकाच व्यक्तीमध्ये दोन प्रकारचे व्यक्तिमत्त्व दडलेले असते. पहिले जे जसे आहे तसे म्हणजेच कदाचित काहीसे अस्ताव्यस्त आणि दुसरे त्याला जसे व्हायचे आहे ते मनातील आदर्शवत. म्हणजेच नेटके, सुबक, सुंदर, शिस्तबद्ध.

आयुष्य डिझाइनसारखे असते का? ते एखाद्या डिझाइनप्रमाणे जगता येते का? जे छान, सुंदर, मोहक भासते, त्यात जिवंतपणा किती असतो? अस्ताव्यस्तपणा आणि शिस्तबद्धता यांची संगती राखता येऊ शकते का?  की, ही दोन्ही टोके हीच अंतिम शक्यता असते? माणसाच्या आयुष्याचे डिझाइन नेमके आहे तरी कसे?

आपल्याच व्यक्तिमत्त्वाच्या या दोन किंवा अनेक बाजू समजून घेण्यासाठी आपल्याला या छायाचित्रांचा उपयोग होऊ शकतो का?

होय, कदाचित!
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com

मराठीतील सर्व समकालीन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photographer andrew myers
First published on: 18-11-2016 at 01:31 IST