News Flash

जठराचा कर्करोग

नेपोलिअन बोनापार्ट, त्याचे वडील, काका व भावंडे या सर्वाना एकाच आजाराने मृत्यू आला. तो म्हणजे जठराचा कर्करोग. अन्ननलिकेचा पुढील भाग म्हणजे जठर.

| May 22, 2015 01:08 am

avinashनेपोलिअन बोनापार्ट, त्याचे वडील, काका व भावंडे या सर्वाना एकाच आजाराने मृत्यू आला. तो म्हणजे जठराचा कर्करोग. अन्ननलिकेचा पुढील भाग म्हणजे जठर. आपले जठर (Stomach) किंवा पोट हे इंग्रजी J अक्षरासारखे असून आपल्या उदर पोकळीत वरच्या बाजूला पसरलेले असते. खाल्लेल्या अन्नाचे पचनही येथूनच सुरू होते.

जठराच्या कुठल्याही भागात होणारा कॅन्सर हा सुरुवातीस अगदी छोटय़ा/लहान प्रमाणात असतात. सुरुवातीस काही काळ तो हळूहळू वाढतो. कॅन्सरच्या या स्टेजमध्ये रुग्णाला काहीच त्रास होत नाही. यामुळे कॅन्सर वाढून पोटाचा त्रास झाल्याशिवाय रुग्ण डॉक्टरकडे जात नाही व त्यामुळे निदान होण्यास विलंब होतो. ज्या वेळी रुग्ण डॉक्टरकडे जातात, तेव्हा कर्करोग पुढे गेलेला असतो व अशा वेळी फार काही करता येत नाही. कर्करोग सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर दुर्बणिीद्वारे पोटाच्या आतील भागाचे निरीक्षण करून त्याचे निदान होऊ शकते.
खालील गोष्टींमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
१) अतितिखट, अतितेलकट, अति खारवलेले खाणे वरचेवर खाल्ल्यामुळे. उदा. लोणचे, तळलेले पदार्थ, खारे मासे इत्यादी यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे
२) धूम्रपान
३) दारूचे व्यसन
४) B-12 Vitamin च्या कमतरतेने होणारा (Pernicious anemia) अनिमिया
५) एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला पोटाचा कॅन्सर असल्यास इतरांना (भाऊ, काका, मुलगा इ.) कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.
६) Helicobactor Pylcri या जंतूच्या प्रदीर्घ संसर्गामुळे पोटभर सूज येते व कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
७) A+ve रक्तगट व्यक्तींना (विशेषत: पुरुषांना) कॅन्सर जास्त प्रमाणात होतो.
८) पोटाला आतून छोटय़ा छोटय़ा गाठी (Polyps) असतील तर त्या पुढे वाढून त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये घडू शकते.
जठराच्या कर्करोगाची लक्षणे
जठराच्या कर्करोगामध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा कॅन्सर वाढतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात.
१) काळजाकडे जळजळ, बेचनी जाणवणे, अस्वस्थता जाणवणे. २) वजन घटत जाणे ३) थोडेसे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे. ४) मळमळ किंवा उलटय़ा होणे.
खरं पाहता ही लक्षणे म्हणजे कॅन्सरच झाला आहे असे कुणी समजू नये. कारण अ‍ॅसिडिटीमुळे वा पोटाच्या अल्सरमुळेदेखील वरील त्रास जाणवू शकतो. तसेच वजन कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात.
पोटाचा कॅन्सर जर बराच पसरलेला असेल (advanced cancers) तर
१) सतत उलटय़ा होत राहतील. २) पोटात दुखू लागेल/ गाठी लागतील. ३) उलटीतून किंवा संडासातून रक्त जाऊ लागेल. ४) वजन अतिप्रमाणात घटू लागेल.
पोटाच्या कॅन्सरचे निदान
१) डॉक्टर तुमचे पोट तपासून त्यात पाणी साठलंय का? पोटाला सूज आहे का? काही गाठी लागत आहेत का? कावीळ झाली आहे का? हे तपासतात.
२) रक्ताच्या तपासण्या करतात.
३) एन्डोस्कोपी – दुर्बिणीद्वारे पोटाचे पूर्ण आवरण तपासून पाहतात. कॅन्सरची सुरुवातदेखील इथे बरोबर पकडता येते व कॅन्सरचे निदान लवकर होते.
४) बायोप्सी (Biopsy): एन्डोस्कोपमधूनच पाहून पोटात एखादी संशयित गाठ आढळल्यास तिचा छोटासा तुकडा काढून तो तपासासाठी पाठवला जातो.
५) पोटाचा सीटी स्कॅन करून तुम्हाला पोटात अजून कुठे गाठ असल्यास व कॅन्सर पसरला असल्यास कळू शकते.
६) लॅप्रोस्कोपी- केव्हा केव्हा आजार पोटामध्ये किती पसरला आहे हे पाहण्यासाठी पोटाला छिद्र पाडून लॅप्रोस्कोप आत घातला जातो व आजूबाजूला गाठी आढळल्यास त्याही काढून (म्हणजे बायोप्सी करून) घेतल्या जातात व तपासल्या जातात व रोगनिदान अचूक करता येते.
उपचार
जठराच्या कर्करोगाचा उपचार हा आजार कुठल्या अवस्थेत (स्टेज) आहे त्यावर अवलंबून असतो. म्हणजेच गाठ किती मोठी आहे, किती पसरलेली आहे, किती खोलवर गेलेली आहे, आजार इतर अवयवांमध्ये (यकृत इ.) पसरला आहे का? याप्रमाणे उपचार पद्धती ठरते.
शस्त्रक्रिया
जर गाठ मर्यादित स्वरूपात असेल म्हणजेच पसरलेली नसेल तर ती शस्त्रक्रिया करून जठराचा भाग गाठीसकट काढून टाकतात.
जर जठराचा जास्त भाग खराब झाला असेल तर तो भाग काढून जठर आतडय़ास जोडले जाते. जर पूर्ण जठरभर कर्करोग पसरलेला असेल तर पूर्ण जठरही काढून अन्ननलिकेस आतडे जोडतात.
शस्त्रक्रिया करताना सर्जन आजूबाजूच्या lymphnode च्या गाठीही काढतात व कॅन्सरसाठी तपासून घेतात.
१. केमोथेरपी – अनेकदा शस्त्रक्रियेआधी केमोथेरपी देतात जेणेकरून गाठ छोटी होते. त्यामुळे कॅन्सरची गाठ आकसून जाते व शस्त्रक्रिया सुकर होते. केमोथेरपी कॅन्सरच्या पेशींना मारक अशी औषधे देऊन त्या पेशी काही प्रमाणात नष्ट करता येतात.
२. शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा गाठी तपासल्या जातात तेव्हा जर कॅन्सरच्या काही पेशी राहिल्या असल्याचा पुरावा किंवा संशय असेल तर केमोथेरपी दिली जाते. याने रुग्णाचे आयुष्यमान काही काळाने वाढते.
३. जठराच्या कर्करोगासाठी या बाबी फार खर्चीक व त्यामानाने कमी परिणामकारक असतात.
पोटाचा कॅन्सर होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
१) अतितिखट, अतितेलकट, अति खारवलेले पदार्थ टाळावे.
२) शिळे पाके, जंतुसंसर्ग झालेले अन्न टाळावे.
३) मद्यपान व धूम्रपान अतिप्रमाणात टाळावे.
४) जेवणात कच्चे सॅलडस, कोिशबीर, पालेभाज्या, फळभाज्या यांचा आवर्जून समावेश करावा.
५) रोज दोन-तीन फळे खावीत.
पुढे गेलेला जठरांचा कर्करोग लक्षात आल्यानंतर रुग्ण साधारणत: चार-सहा महिन्यांत दगावतो, परंतु लवकर लक्षात येऊन योग्य शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण अनेक वष्रे जगतात.
डॉ. अविनाश सुपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2015 1:08 am

Web Title: stomach cancer 2
Next Stories
1 एन्डोस्कोपीतील नवीन उपचार पद्धती
2 एन्डोस्कोपी – दुर्बिणीद्वारे तपासणी व उपचार
3 पोटाच्या तपासण्या
Just Now!
X