27 October 2020

News Flash

प्रासंगिक : टिकटॉकचे तारे जमींपर

टिकटॉक अॅपचं गुगल प्ले स्टोअरवरचं रेटिंगची आठवडय़ात ४.६ वरून १.२ पर्यंत घसरण.

चिनी कंपनी असल्यामुळे टिकटॉकभोवती कायमच संशयाचं धुकं दाटलेलं असतं.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

प्ले स्टोअरवर आठवडय़ात ४.६ वरून १.२ पर्यंत घसरण

कोणत्याही भल्या-बुऱ्या मार्गानी का असेना, पण टिकटॉकने गेल्या दोन वर्षांत भारतात बस्तान बसवलं. २० कोटी युझर्स असलेल्या या अ‍ॅपचं गुगल प्ले स्टोअरवरचं रेटिंग गेल्या आठवडय़ापर्यंत ४.६ एवढं होतं, पण आठवडय़ाभरात हे रेटिंग १.२ पर्यंत घसरलं. नेमकं असं काय घडलं?

सुमारे एक कोटी ३४ लाख फॉलोअर्स असलेल्या आमिर सिद्दिकी या टिकटॉक स्टारने यूटय़ूबर्सविरोधात रँटिंग (टीका) करणारा एक व्हिडीओ ८ मे रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘यूटय़ूबर्स टिकटॉकर्सचा आशय चोरतात आणि ब्रँड्समध्ये टिकटॉकर्स त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत,’ असा दावा त्याने या व्हिडीओतून केला होता. आता याला यूटय़ूबर्स उत्तर न देते तरच नवल. अजय नागर म्हणजेच ‘कॅरीमिनाटी’ या लोकप्रिय यूटय़ूबरने आमिरचं रोस्टिंग करणारा (खरपूस समाचार घेणारा) एक व्हिडीओ पोस्ट केला आणि संतापलेल्या यूटय़ूबर्सनी आणि त्यांच्या फॅन्सनी त्याला विक्रमी प्रतिसाद दिला. तब्बल सात कोटी लोकांनी तो पाहिला. आक्षेपार्ह भाषा हा रोस्टिंगचा एक अविभाज्य भाग झाला आहे आणि कॅरीने आमिरचा या व्हिडीओतून यथेच्छ समाचार घेतला होता. अर्थातच लाइक करणारे होते, तसे आक्षेप घेणारेही होतेच. कॅरीने आपल्या रोस्टिंगमध्ये ‘मीठा’, ‘छक्का’ असे आक्षेपार्ह शब्द वापरले होते. आता त्याचं म्हणणं आहे की व्हिडीओचे संदर्भ लक्षात न घेता, हिंदीचं इंग्रजीत भाषांतर करून अर्थाचा अनर्थ करण्यात आला, पण त्यातून त्याने समलैंगिकांचा रोष ओढावून घेतलाच. यूटय़ूबवर टिकटॉकर्सही आहेतच. अनेकांनी हा व्हिडीओ रिपोर्ट केला, म्हणजेच तो आक्षेपार्ह असल्याची तक्रार यूटय़ूबकडे नोंदवली. त्यामुळे यूटय़ूबने तो काढून टाकला.

वाद एवढय़ावर संपणं शक्यच नव्हतं. कारण यूटय़ूब-टिकटॉकमधली ही अहमहमिका काही आजची नव्हती. असंतोष दोन्हीकडे आधीपासूनच धुमसत होता. यूटय़ूबर्सना लक्ष्य करणाऱ्या टिकटॉकरवरचा रोस्टिंग व्हिडीओ काढून टाकणं, हे यूटय़ूबप्रेमींना अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटलं. त्याचे पडसाद प्रत्येक समाजमाध्यमावर उमटले. ट्विटरवर #BanTiktokInIndia #YoutubeVsTiktok, #TiktokRoasted ट्रेंड झाले. परस्परांची खिल्ली उडवणारी अनेक मिम्स व्हायरल झाली.

टिकटॉकवर धार्मिक विद्वेश पसरवणारे, असिड हल्ल्याला प्रोत्साहन देणारे, प्राण्यांवरील क्रौर्याचं चित्रण असलेले, पोर्नोग्राफीचे, महिलांवरील अत्याचारांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याची उदाहरणं समाजमाध्यमांच्या वेशीवर टांगण्याचा सपाटाच यूटय़ूबर्सनी लावला. इथवर सगळं अपेक्षितच होतं, पण पुढे टिकटॉक ‘अनइन्स्टॉल’ करण्याचं आवाहन यूटय़ूबप्रेमी करू लागले. आधी नमूद केलेल्या आरोपांसह डेटा चोरीसारखे गंभीर आरोपही टिकटॉकवर अनेकदा झाले आहेत. पण या प्रकरणाला करोनामुळे चीनविरोधात निर्माण झालेल्या असंतोषाची अतिरिक्त पाश्र्वभूमीही लाभली. आधीच चिनी कंपनी असल्यामुळे टिकटॉकभोवती कायमच संशयाचं धुकं दाटलेलं असतं. त्यात नोव्हेल करोना व्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेतच तयार करण्यात आल्याचे, साथीची माहिती चीनने वेळीच जगासमोर आणली नसल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे चीनशी संबंधित प्रत्येक गोष्टीविषयी असंतोष निर्माण झाला आहे. टिकटॉकविरोधी चळवळीला या असंतोषामुळे खतपाणीच मिळालं. सच्चे देशभक्त असाल, तर टिकटॉक अनइन्स्टॉल करा, अशी भावनिक आवाहनंही करण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला, की अनेकांनी हे अ‍ॅप अनइनस्टॉल केलं.

यूटय़ूबप्रेमींनी गुगल प्ले स्टोअरवर टिकटॉकला एक तारांकित मानांकन देणारे अभिप्राय लिहिण्यास सुरुवात केली आणि गेल्या दोन वर्षांत भारतीयांच्या गळ्यातला ताईत झालेल्या या अ‍ॅपचे तारे आकाशातून जमिनीवर अक्षरश: कोसळले. हे नुकसान रोखण्यासाठी टिकटॉकने बरेच प्रयत्न केले. ज्या व्हिडीओजविषयी आक्षेप नोंदवण्यात आले होते, त्यातले काही व्हिडीओ डिलिट केले, तर काहींची अकाउंट्सच डिलिट करण्यात आली. आपण आपल्या युझर्ससाठी नियमावली यापूर्वीच जारी केल्याचं टिकटॉकने ट्विटरवर जाहीर केलं आणि जानेवारी २०२०मध्ये लागू केलेली नियमावली सोबत जोडली. पण शेवटी व्हायचं ते झालंच. प्ले स्टोअरवर गेल्या आठवडय़ापर्यंत ४.६ तारे असलेलं हे अ‍ॅप १.२ ताऱ्यांपर्यंत गडगडलं.

ही समस्या कमी होती म्हणून की काय, फैजल सिद्दिकी या आणखी एका टिकटॉकरने याच दरम्यान अ‍ॅसिड हल्लय़ाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यामुळे आगीत तेल ओतलं गेलं. त्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली. ‘या व्हिडीओतून केवळ महिलांवरच्या अत्याचारांना प्रोत्साहन देण्यात आलेलं नाही, तर पुरुषसत्ताक मनोवृत्तीही त्यातून अधोरेखित होत आहे, त्यातून समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो,’ अशी भीती आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली. यातला महत्त्वाचा भाग म्हणजे हा फैजल सिद्दिकी यू-टय़ूब – टिकटॉक वादाला तोंड फोडणाऱ्या आमिर सिद्दिकीचा भाऊ आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने हे पाऊल उचलल्यानंतर फैजलने आपल्या कृत्याचं स्पष्टीकरण दिलं. ‘यामागे आपला चुकीचा हेतू नव्हता, माझा व्हिडीओ कापून दाखवण्यात येत आहे,’ असं फैजलचं म्हणणं आहे.

आता, हे सारं रामायण कशासाठी? वरवर पाहता आशययुद्ध वाटणारा हा वाद प्रत्यक्षात समव्यावसायिकांतलं युद्ध आहे. ही सारी धडपड व्हिडीओच्या जगतात सर्वश्रेष्ठ आपणच हे सिद्ध करण्यासाठी सुरू आहे. फॉलोअर्स, लाइक्स, व्ह्य़ूव्ज ही आता केवळ लोकप्रियतेची पोचपावती राहिलेली नाही. अ‍ॅप तयार करणाऱ्या कंपन्यांचा, त्यावर आशयनिर्मिती करणाऱ्यांचा, तिथे आपापली उत्पादनं, सेवा विकणाऱ्यांचा तो व्यवसाय झाला आहे. व्यवसाय म्हटलं की स्पर्धा ही आलीच. पण ती करताना भल्याभल्यांचा विवेक लयाला जातो आणि जेव्हा स्पर्धेतले बहुतांश खेळाडू अपरिपक्व, अप्रशिक्षित, अल्पानुभवी असतात तेव्हा तर अविवेकी वर्तनाला उधाणच येतं. इथेही तेच झालं आहे. व्यवसायात वाटा सांगणारे खेळाडू वाढले आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात असुरक्षिततेची भावना आहे. त्यातून हे प्रकार होत आहेत.

रँटिंग किंवा रोस्टिंग हे मुळातच अतिशय अर्वाच्य शिवीगाळ असणारे प्रकार. परस्परांच्या कामावर टीका करणं, कामाच्या दर्जाची चिरफाड करणं तर ठीकच आहे, पण समोरच्याची शारीरिक व्यंगं, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती एवढंच नव्हे तर त्यांची लैंगिकता यातून अतिशय निर्दय आणि निर्लज्जपणे जगाच्या वेशीवर टांगली जाते. यातला कॅरीमिनटी हा अवघा २० वर्षांचा तर आमिर २५ वर्षांचा आहे. कॅरी वयाच्या अवघ्या ११व्या वर्षांपासून यू-टय़ूब कंटेट क्रीएटर आहे. ‘स्टील द फिअर्झ’, ‘अडिक्टेड ए वन’, ‘कॅरी देओल’ अशा वेगवेगळ्या नावांनी त्याने चालवलेली यू-टय़ूब चॅनल्स फारशी लोकप्रिय झाली नाहीत. मग २००६मध्ये त्याने कॅरीमिनटी या नावाने नवं चॅनल सुरू केलं आणि तिथे तो यू-टय़ूबवरचे गायक, नर्तक यांचं धडाधड रोस्टिंग करू लागला. यू-टय़ूबवर प्रचंड लोकप्रिय झालेल्या भुवन बामचं रोस्टिंग त्याने केलं आणि त्याच्या फॅन्सचा रोष ओढवून घेतला. भारतात तेव्हा रोस्टिंग काय आहे, हे लोकांना फारसं माहीत नव्हतं. पण स्वत: भुवनला मात्र कॅरीने केलेलं रोस्टिंग खूप आवडलं. त्याने तशी प्रतिक्रियाही दिली आणि रातोरात कॅरीचे सबस्क्रायबर्स वाढू लागले. पण रोस्टिंग हे इतकं टोकाचं विडंबन असतं, की ते सर्वानाच झेपेल, असं नाही. काही जण त्यामुळे बिथरतात आणि कॉपी राइट्स स्ट्राइकचं हत्यार उगारतात. एखाद्या यू-टय़ूब चॅनेलवर असे तीनपेक्षा जास्त स्ट्राइक्स आले, की यू-टय़ुब ते चॅनेल डिलिट करून टाकतं आणि ते चॅनेल चालवणाऱ्याला नवं चॅनेलही सुरू करू देत नाही. कॅरीच्या बाबतीत असं होण्याची वेळ आल्यानंतर त्याने सावध पवित्रा घेतला. कलाकारांची पूर्वपरवानगी घेऊन रोस्टिंग करण्यास सुरुवात केली. आज त्याच्या चॅनेलचे १.८६ कोटी सबस्क्रायबर्स आहेत आणि तो टिकटॉकवर नाही.

आमिर सिद्दीकीचे टिकटॉकवर दोन कोटी ६० लाख फॉलोअर्स आहेत, तर यूटय़ूबवर फक्त १ लाख ८२ हजार फॉलोअर्स आहेत. यूटय़ूबर्सविरोधातलं रँटिंग हे आमिरसाठी ‘आ बैल मुझे मार वर्गातलं’ कृत्य ठरलं. यूटय़ूबसाठी व्हिडीओ तयार करताना चित्रीकरणाचं ठिकाण, प्रकाशयोजना, वेशभूषा-रंगभूषा, संगीत आणि महत्त्वाचं म्हणजे आशयाचं भान ठेवावं लागतं. या संपूर्ण प्रक्रियेत अनेक लोक सहभागी असतात. त्यासाठी त्यांनी खर्चही केलेला असतो. त्या तुलनेत टिकटॉकसाठी व्हिडीओ तयार करताना तेवढा वेळ, पैसा आणि मनुष्यबळ लागत नाही. एक व्यक्ती स्वत:च मोबाइल कॅमेरा वापरून व्हिडीओ तयार करू शकते, पण तरीही त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे आणि पर्यायाने त्यांच्याकडे वळणारे ब्रँड्सही वाढू लागले आहेत. आपण अतिशय मेहनतीने, पैसे गुंतवून अर्थपूर्ण आशय तयार करतो, पण टिकटॉकर्स हलक्या दर्जाचा, उथळ, अश्लील आशय तयार करतात आणि तरीही लोकप्रिय होतात, अशी यूटय़ूबर्सची भावना आहे, तर यूटय़ूबर्स आपला आशय चोरतात आणि तरीही त्यांना आपल्यापेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळतो, असं टिकटॉकर्सना वाटतं. शहरी आणि ग्रामीण, पुढारलेले आणि मागासलेले असंदेखील हे वर्गीकरण आहे. टिकटॉकवरचे बरेच ‘एन्फ्लुएन्सर्स’ हे गावांतून किंवा निम्न आर्थिक स्तरातून आलेले आहेत. यूटय़ूबर्स त्या तुलनेत शहरी आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम वर्गातले आहेत.

तर, मुळातच धुमसत असणाऱ्या या असंतोषात आमिरचा रँटिंग व्हिडीओ एखाद्या जळत्या काडीप्रमाणे पडला. खरेतर लाखोंच्या संख्येने व्हिडीओज असलेल्या या माध्यमांवरचे हे दोन सामान्य व्हिडीओज. एवढय़ा आशयाच्या गर्दीत त्यांची महती ती काय असणार, पण आमिर आणि कॅरीमधला हा वाद अवघ्या काही दिवसांत टिकटॉक आणि यूटय़ूबच्या चाहत्यांमधला वाद ठरला. यूटय़ूबने हा व्हिडीओ डिलिट केला नसता, तर कदाचित हे प्रकरण एवढं वाढलं नसतं. पण जे झालं ते यूटय़ूबच्या पथ्यावरच पडलं आणि स्पर्धक ठरू पाहणाऱ्या टिकटॉकचं तारांकन धडाधड कोसळू लागलं. स्पर्धकाला नेस्तनाबूत करण्याची ही संधी यूटय़ूबर्सनी पुरेपूर साधली. याचा फटका टिकटॉकवरच्या प्रत्येकालाच बसला. टिकटॉक उथळ मनोरंजनाचं साधन म्हणून ओळखलं जात असलं तरी, तिथेही काही सर्जनशील कलाकार आहेत. या वादापासून दूर राहून आपली कला सादर करून त्यातून प्रसिद्धी आणि पैसे मिळवू पाहणाऱ्या सरसकट सर्वच टिकटॉकर्सना याचा फटका बसला.

प्रकरण अंगाशी आल्यानंतर आमिरने माफी मागून सारवासारव केली, मात्र यूटय़ूबर्स आता हा मुद्दा सोडायला तयार नाहीत. यूटय़ूब भारतात २००५ पासून आहे. आपल्याला हव्या त्या विषयावरची माहिती मिळवण्यासाठी आता आपण सर्वच जण सहज यूटय़ूबवर जातो. हे माध्यम आता भारतात रुजलं आहे. टिकटॉक २०१७ मध्ये भारतात आलं. गाणी किंवा संवादांवर ‘लिपसिंकिंग’चे छोटे व्हिडीओ तयार करण्याचं अ‍ॅप ही त्याची सुरुवातीची ओळख होती. पुढे त्यावर अन्यही विनोदी व्हिडीओ तयार केले जाऊ लागले आणि अवघ्या काही सेकंदांचे हे व्हिडीओज लोकांना तासन्तास खिळवून ठेवू लागले. तिथल्या आशय निर्मात्यांचा चाहता वर्ग अल्पावधीत तुफान वाढला.

कोणताही विक्रेता गर्दीच्या ठिकाणीच दुकान मांडतो आणि सतत नवी गर्दी शोधत असतो. ब्रँड्सचंही असंच आहे. समाजमाध्यामांद्वारे ग्राहक निर्माण करू पाहणाऱ्या ब्रँड्सचं जाहिरातींवरचं बजेट आता टिकटॉक आणि यूटय़ूबमध्ये वाटलं गेलं आणि दोन्हीकडच्या आशय निर्मात्यांमध्ये एकमेकांविषयीची असूया वाढू लागली. सोशल मीडियात स्टार्सना ‘एन्फ्लुएन्सर्स’ म्हणजेच समाजावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती म्हणून संबोधलं जातं आणि त्यांच्या या प्रभावाचा वापर करून घेणं हा ब्रँड्सचा उद्देश असतो. तो प्रभाव चांगला आहे की वाईट, याच्याशी ब्रँड्सना काही देणंघेणं नसतं. आशय निर्माते नृत्य, संगीत, अभिनय, सद्य:स्थितीवर भाष्य, पुस्तकं-चित्रपटांचं मूल्यमापन, पाककला, एखादी कला शिकवणारे व्हिडीओज पोस्ट करून त्यांचे लाइक्स, फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स वाढवतात त्यांच्या बळावर त्यांना ब्रँड्सच्या जाहिराती करण्याची संधी आणि त्यातून पैसेही मिळतात. पण गर्दीची मानसिकता अनेकदा अनाकलनीय असते. अनेकदा अतिशय सुमार, टुकार आशयही तुफान लोकप्रिय होतो. आता कोणता आशय चांगला, कोणता वाईट हे कसं ठरवणार? एकासाठी उत्तम ते दुसऱ्यासाठी सुमार असूच शकतं. यात दुमत नाही, पण काही गोष्टी निर्विवाद असतात.

दारू पिऊन धिंगाणा घालणं, सिगारेट-हुक्क्याचा धूर सोडणं, धार्मिक तेढ पसरवणं, बायका-मुलांना मारणं, अंगविक्षेप किंवा अश्लील हावभाव करणं आणि केवळ फॉलोअर्स वाढवण्यासाठी ते जगाच्या चव्हाटय़ावर मांडणं हे समर्थनीय असू शकत नाही. टिकटॉक विरोधात आक्षेप आहे, तो हा! यूटय़ूबवर अशा प्रकारचा आशय तयार होतंच नाही, असं म्हणणं पक्षपाती ठरेल, पण त्याचं प्रमाण तिथे तयार होणाऱ्या एकूण आशयाच्या तुलनेत मर्यादित आहे. यूटय़ूब हे सुरुवातीपासूनच उपयुक्त माध्यम म्हणून ओळखलं गेलं आहे आणि आजही त्याची उपयुक्तता निर्विवाद आहे. तिथले व्हिडीओ पाहून भाषा, संगीत, नृत्य, व्यायाम, हस्तकला, पाककला शिकणारे अनेक आहेत. टिकटॉकवरही अशा स्वरूपाच्या आशयाला स्थान आहे आणि अनेक टिकटॉकर्स असे माहितीपूर्ण व्हिडीओज पोस्टदेखील करतात. पण त्यावरील उथळ मनोरंजनाच्या गर्दीत ते झाकोळलेलेच राहतात.  उपयुक्त अ‍ॅप म्हणून टिकटॉकची गणना करण्यास कोणीही धजावणार नाही.

वरवर दिसणारी आशयाची स्पर्धा हा एका मोठय़ा व्यावसायिक स्पर्धेचा भाग आहे. सध्या उद्भवलेल्या या विशिष्ट प्रकरणात यूटय़ूब किंवा टिकटॉकचा थेट संबंध नाही. सध्या तरी हा वाद दोन्ही माध्यमांतले आशय निर्माते आणि त्यांचे चाहते यांच्यापुरताच मर्यादित आहे. पण समाजमाध्यमांतल्या युद्धाने अमेरिका विरुद्ध चीन असं स्वरूप कधीच घेतलं आहे. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, इन्स्टाग्राम ही सगळी लोकप्रिय अ‍ॅप्स अमेरिकन कंपन्यांची आहेत. गेली कित्येक र्वष अमेरिकेने या क्षेत्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे आणि त्यातून तिथल्या कंपन्यांनी भरघोस नफाही कमावला आहे. टिकटॉकवरचा डेटा सुरक्षित नाही, अशी ओरड करण्याची संधी अमेरिकन कंपन्या सोडत नाहीत, पण इंटरनेट वापरात खासगी असं काहीही राहात नाही, याचं भान आता बहुतेक वापरकर्त्यांना आलं आहे. त्यामुळे एकटय़ा टिकटॉकला किंवा हॅलोला लक्ष्य करणंही पक्षपाती ठरेल. त्याच वेळी अन्य देशांतल्या गर्दीला आपल्या समाजमाध्यमांकडे खेचायचं पण आपल्या देशात मात्र इतर देशांतल्या समाजमाध्यमांना फिरकूही द्यायचं नाही, हा चीनचा दुटप्पीपणाही अयोग्यच!

समाजमाध्यमं चालवणाऱ्या कंपन्यांतली आणि त्यांच्या सेवांचा वापर करून व्यवसाय उभारणाऱ्यांतली ही भांडणं सुरूच राहतील, त्यामागे नफ्या-तोटय़ाची गणितं आहेत. पण समाजमाध्यम म्हणजे समाजासमोर धरलेला आरसा. आशय निर्माते म्हणून असो वा चाहते म्हणून असो, आपला तिथला वावर जबाबदारच असायला हवा. आपण अंगविक्षेप, मारहाण, अश्लील चाळे करणारे किंवा आवडणारे म्हणून ओळखले जाणं योग्य आहे का, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. बाकी कॅरीमिनाटीच्या एका व्हिडीओने टिकटॉकसारख्या मोठय़ा कंपनीच्या गेल्या दोन-तीन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरलं आहे, हे नक्कीच. हा वाद कुठवर जाणार, त्याचे परिणाम किती काळ टिकणार हे तिथल्या वापरकर्त्यांवरच अवलंबून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:19 am

Web Title: tiktok rating down on google playstore dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २२ ते २८ मे २०२०
2 गुलजार तुमच्या घरी…
3 १०८ वर्षांच्या आजींनी १०० वर्षांत पाहिल्या दोन महासाथी….
Just Now!
X