रस्ते खड्डामुक्त करण्याचे विडे खूप वर्ष उचलतय शासनाचे एक नियुक्त कार्यालय! अगदी पुरस्कार जाहीर करून ‘खड्डा  दाखवा, पाच हजार मिळवा!’  हे आवाहन फार पोरकट वाटते. त्या कार्यालयाच्या आचारसंहितेतच रस्ते व सडका निधरेक व दोषरहित असायला हव्या त्या आदेशाचे पालन अपेक्षित आहे. त्यात रस्ते तशाच प्रकारे जतन व्हायला हवेत हे गृहीत आहे. मग हे खड्डा प्रकरण उद्भवतेच कसे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण वर्षांनुर्वष वाढत जाणारी रस्त्यांची दुर्दशा आणि त्यावर फसवेपणाने केलेली पूर्ततेची कार्यवाही इतकी हास्यास्पद होत चालली आहे की ही समस्या सरकारच्या डोकेदुखीचा भाग झालाय. त्यातली वास्तविकता अशी की जे पादचारी असतात, त्यांच्याच पायांचा आणि रस्त्यांचा दररोज घनिष्ट संबंध येतो. उच्चपदस्थांच्या मोटारी सुसाट वर पळत असतात, त्यांची लेन त्या विलक्षित वेळी ठीकठाक ठेवण्यासाठी खास बंदोबस्त असतो. त्यांचे पाय कधीच रस्त्याला लागत नाहीत असे उच्चपदाधिकारी-मोटार भुर्र्र झाली की त्या उखडलेल्या रस्त्याचे ते कुणी लागत नाहीत.

मध्यंतरी केव्हातरी पेव्हर ब्लॉक्स नावाचा प्रकार सुरू झाला. रस्ते होते ते बरे म्हणावे असे प्रथम उखडायचे, मग ते नक्षीदार किलवरवाले किंवा चौरस पेव्हर ब्लॉक्स बसवायचे. मधला भराव इतक्या निकृष्टपणे सांधलेला की दुसऱ्या दिवशी ते डुगुडुगू होतात. काम संपूर्णची फाईल वरिष्ठांकडे. वर्षांनुर्वष योजना या अशा बनावट रीतीने राबवल्या जातायत. स्थित्यंतर कोणतेच नाही. म्हणून वाटते की खड्डेमुक्त रस्त्यांचं स्वप्नरंजन विसरून जाऊ या व त्याजागी खड्डेयुक्त रस्ते ही अभिनव योजना अमलात आणू या.

खड्डेमुक्त रस्ता योजनेत व्यवहाराने अर्धे काम हाताशी आले आहे आणि खड्डेयुक्त योजना ही खर्चीक नाही, फक्त एक कुदळ हवी. मजुरीचा काय तो खर्च! भराव घालायला निदान भेसळ सिमेंट, दगडगोटे, चिंध्या, पत्रे, प्लॅस्टिक वगैरे माल लागतो. खड्डेयुक्त रस्ते या योजनेत हा कच्चा माल परत हाताशी येईल तो पुर्नवापरासाठी दुसऱ्या अशाच योजनासाठी कामी येईल. खड्डेयुक्त रस्ते ही नवीन संकल्पना रुजू होईल. जनतेच्या अंगवळणी पडेल. प्रत्येक बदल अंगवळणी पाडून घेणारा एक वर्ण असतोच त्यालाच सामान्य जनता म्हणतात. विशेष म्हणजे हा एक सिद्धांतिक ऐतिहासिक प्रयोग ठरेल. आज खड्डय़ांतून चालण्याचा रियाज तर चालूच आहे. त्यातून पाय मुरगळणे, फ्रॅक्चर होणे, ज्येष्ठांना अंथरुणावर आडवे पडून राहावे लागणे यांतून समाज सावरेल-पंथ थोडा सोपा सरळ होईल. मध्येच खड्डा येतो तेव्हा अपघात संभवतो. इथे सलग खड्डायुक्त सावरणारा पथ-उंच घरकुलांतून रस्त्यावर उतरले की पायाखाली या देशाची माती, त्यात भेसळ कुठली? ही माती डोईला लावून देशासाठी कितीजण लढले, आपले पाय निदान रोज त्या मातीवर पडतील. पाय पडला नि तिथे खड्डा पडला की अनुचित संभवते. सलगतेत तो प्रश्नच नाही. पेव्हर ब्लॉक बसवणाऱ्यांची आणि त्यांना ओके प्रमाणपत्र देणाऱ्यांची क्षमता आपण पारखलीच आहे. तेव्हा खड्डय़ांतल्या मार्गिका कसबाने कार्यान्वित करण्यासाठी नवीन मंडळींचा शोध घ्यायलाच नको. आजचाच ताफा आणि कंत्राटदार नियोजित केले की काम चोख होईल. आज आपल्या सेवेत अशी मंडळी विपुल आहेत- वाण भासणार नाही, उलट त्यांची खरी गुणवत्ता प्रकर्षांने कारणी लागेल वाटते असे आवाहन करावेच. आजच्या सगळ्या सक्षम कंत्राटदारांनो, त्यांच्या हाताखालील प्रशिक्षित मजुरांनो आणि ही यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या शासन अधिकाऱ्यांनो, आता हा विडा उचला. अध्र्याहून अधिक काम त्यांनी पूर्णत्वास नेलेच आहे. पुढचे त्यांच्या कार्यकुशलतेवर सोपविल्यास जनतेसाठी एक अभिनव आणि कल्याणदायी योजना ठरेल.

आपण सर्वसामान्य जनांनी या योजनेच्या प्रारंभाचा गांभीर्याने पाठपुरावा केला, तर खड्डय़ांत पाय जाण्याचा अपघात न होता तो सरावाचा भाग होईल – मग- ‘शुभास्ते पंथान: सन्तु।’ म्हणत निर्वेध होऊ आपण।
सुमन फडके – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व वाचक लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on road
First published on: 11-11-2016 at 13:08 IST