जय पाटील

मोती, रेशीम, शंख-शिंपले, मोरपीसं, मखमल, डोरेमॉन, छोटा भीम असं बरंच काही राखीमध्ये दिसतं. पण राखीतून एखादं भन्नाट फ्लेवरचं चॉकलेट, छोटासा विडा, काजू कतली, कप केक असं काही मिळालं तर? यंदा अशी शब्दशः गोड राखी बांधण्याची संधी मिळू शकते. अनेक मिठाईच्या दुकानांत अशा राख्या उपलब्ध आहेत. काही जण ऑर्डर घेऊन अशा राख्या तयारही करून देत आहेत.

एडिबल राखी गेल्या काही वर्षांपासून बाजारात स्वतःचं स्थान निर्माण करू पाहात आहे. यंदा कोविडच्या निमित्ताने ती संधी चालत आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर त्याला मिठाई किंवा साखर भरवून तोंड गोड करण्याची पद्धत असते. यंदा बहिणी भावांच्या घरी जाऊ शकतील की नाही, शंकाच आहे. पोस्टाने किंवा कुरिअरने राखी पाठवली जाते, पण तोंड कसं गोड करणार हा प्रश्न शिल्लक रहातोच. या खाण्यायोग्य राख्या त्यावर उत्तर ठरू शकतील, अशी चिन्हे आहेत. यात फॉन्डन्ट, चॉकलेट, कपकेक आणि कुकीज असलेल्या विविधरंगी आणि नानाविध स्वादांच्या राख्या उपलब्ध आहेत. काहींनी वेगवेगळ्या रंगांच्या आणि स्वादांच्या चॉकलेट्सचे एकावर एक थर लावून थ्रीडी राख्या तयार केल्या आहेत. भाई, दादा अशा अक्षरांच्या किंवा भावाच्या नावाची, त्याच्या टोपण नावाची तसंच नावाच्या अद्याक्षरांची राखीही तयार करून घेता येणार आहे.

केवळ लहान मुलेच नाहीत, तर मोठ्यांमध्येही या राख्या लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. २० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत त्या उपलब्ध आहेत. खाद्य राख्या नाविन्यपूर्ण असल्या तरी त्या खरेदी करताना योग्य काळजी घ्यायला विसरू नये. विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच त्या खरेदी कराव्यात. त्या किती दिवस उत्तम स्थितीत राहू शकतात, याची माहिती घ्यावी. राखी तयार करण्यासाठी वापरलेलं इतर साहित्य आणि त्यावरचं आच्छादन खाद्यपदार्थांसाठी योग्य आहे ना, याची खारतरजमा करून घ्यायला विसरू नये.