सुनीता कुलकर्णी

आजकाल सगळ्या घडामोडी समाजमाध्यमांमधूनच होत असतात. एखादी गोष्ट आवडली, नावडली तर लगेचच फेसबुक, ट्वीटरवरून त्याबद्दलच्या प्रतिक्रिया उमटतात. नवाकोरा सिनेमा पाहिल्यानंतर त्याच्याबाबतची आपली प्रतिक्रिया अनेकजण फेसबुक, ट्वीटरवर लिहितात. २०२० मध्ये करोनाच्या महासाथीमुळे टाळेबंदी होऊन बरेच सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरूनच प्रदर्शित झाले. ट्वीटरने त्यापैकी कोणत्या पाच सिनेमांबद्दल सर्वाधिक ट्वीट केलं गेलं त्याची यादी प्रसिद्ध केली आहे.

दिल बेचारा
मुकेश छाब्रिया दिग्दर्शित, सुशांत सिंग राजपूत तसंच संजना सांघी अभिनित ‘दिल बेचारा’ या सिनेमाबद्दल २०२० मध्ये सर्वाधिक वेळा ट्वीट केलं गेलं. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित या सिनेमाबद्दल सर्वाधिक ट्वीट का केलं गेलं ते तर उघडच आहे. १४ जूनला सुशांत सिंग राजपूतने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्याचा हा शेवटचा चित्रपट तेव्हा पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यावर होता. सिनेमागृहं बंद असल्यामुळे तो हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. सुशांतवरच्या प्रेमापोटी, त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सिनेमा सर्वाधिक लोकांनी बघितला.

छपाक
त्या खालोखाल २०२० या वर्षात ज्याच्याबद्दल सर्वाधिक ट्वीट केलं गेलं असा दुसरा सिनेमा म्हणजे ‘छपाक’. एकतर्फी प्रेमातून मुलींवर होणारे अॅसिड हल्ले असा गंभीर विषय असलेला हा सिनेमा मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या सुमारात दिल्लीत जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. त्याला आपला पाठिंबा देण्यासाठी दीपिका पदुकोण दिल्लीत जेएनयूमध्ये पोहोचली आणि लगेचच ट्वीटरवर एकीकडे तिला पाठिंबा देणाऱ्यांचं तर दुसरीकडे बॉयकॉटछपाक म्हणणाऱ्यांचं उधाण आलं. समीक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं असलं, ट्वीटरवर ट्रेण्डिंग असला तरी तो रसिकांना सिनेमागृहात खेचून आणू शकला नाही.

तानाजी: द अनसंग वॉरियर
‘छपाक’ला सिनेमागृहांमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही, त्याच काळात अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या एेतिहासिक सिनेमाला मात्र रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘सिनेमाचं राजकारण करणं धोकादायक आहे तसंच सिनेमा खऱ्या इतिहासाचं चित्रण करत नसतो’ या सैफ अली खानच्या विधानामुळे ‘तानाजी’वरून बरीच चर्चाही झाली. तो ट्वीटरचर्चित तिसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला.

थप्पड
त्याखालोखाल ट्वीटरवरून चर्चा झाली ती अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ या सिनेमाची. तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेल्या या नायिकाप्रधान सिनेमात नवऱ्याने बायकोला लगावलेली एक थप्पड सगळ्या पुरुषप्रधान संस्कृतीचा गाल हुळहुळा करून गेली. या सिनेमाने पतीपत्नीच्या नातेसंबंधातील राजकारणाची चर्चा घडवून आणली.

गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल
ट्वीटरवर चर्चा झालेला गेल्या वर्षभरातील पाचव्या क्रमांकाचा सिनेमा होता, ‘गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल’. भारतीय वायुदलातील महिला अधिकारी गुंजन सक्सेना यांच्यावरील या बायोपीकमध्ये जान्हवी कपूरने मुख्य भूमिका केली होती. या सिनेमात वायुदलामधले अधिकारी स्त्रीद्वेष्टे दाखवण्यात आल्यामुळे बरीच नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सिनेमावर बंदी आणण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली.
समाप्त