विजया जांगळे

लोकल ट्रेनमधली गर्दी, रस्ते-रेल्वे अपघातांतले बळी, पावसाच्या पाण्यात बुडणाऱ्या वस्त्या, वाहून जाणारी माणसं.. मुंबईतला प्रत्येक दिवस म्हणजे संघर्ष आहे. या शहराच्या काठावर वसलेल्या वसई-नालासोपाऱ्यातून रोज मुंबई गाठणाऱ्यांचं आयुष्य तर एखाद्या न संपणाऱ्या खडतर प्रवासासारखंच! ‘बॉम्बे लोकल कलेक्टिव्ह’ हा प्रवास आपल्या रॅप्समधून-बिट्समधून मांडतं. त्यांचं रॅप ऐकल्यावर कोणीही म्हणेल, ‘बहोत हार्ड है बन्टाय..’

लोकल ट्रेन फ्लो, लोकल ट्रेन फ्लो

साथ ले के चलते सबको, जैसे कोई रेल हो

उलटी सिधी बाते नही, बदलने आये गेम को

लोकल ट्रेन फ्लो, लोकल ट्रेन फ्लो

गाडीयों के निचे आना, तो यहा पे आम है

मरते-मरते जी लेती, ऐसी ये आवाम है

खुदकी पहचान, ढुंढता मैं इस भीड में

हरएक धक्के को शाबासी, समझा अपनी पीठ पे

वो चाहे हमको गाडना, पर हम तो बीज थे

खून और पसीने हमको, मिलके यहा सिचते

सिखते हम स्ट्रीट से, बाते करते बीट पे..

लोकलच्या गर्दीत गुदमरणारं, रस्ते-ट्रॅकवर चिरडलं जाणारं मुंबईतलं आयुष्य मांडणारं ‘बॉम्बे लोकल कलेक्टिव्ह’ हे आता नालासोपारा, वसईतल्या हिप-हॉप सबकल्चरचं प्रतीक झालं आहे. त्यांचा प्रभाव एवढा की, या परिसरातली १२-१४ वर्षांची मुलंही रॅप, बिट बॉक्सिंग शिकण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. हिप-हॉप ही अमेरिकेतल्या वर्णद्वेषाविरोधातला आवाज म्हणून पुढे आलेली संस्कृती. ती नंतर अनेकांनी स्वीकारली. समाजातल्या विरोधाभासांवर बोट ठेवण्यासाठी, आपल्या हक्कांवर दावा करण्यासाठी हिप-हॉपने रॅपिंग, ग्राफिटी रायटिंगसारखी ‘शस्त्रं’ प्रभावीरीत्या वापरली. अनेक रॅपर्स आणि ग्राफिटी आर्टिस्टनी शब्द चित्रांतून आपले क्रांतिकारक विचार मांडले. ‘बॉम्बे लोकल कलेक्टिव्ह’ त्यापैकीच एक!

बिहारमधून येऊन नालासोपाऱ्यात स्थायिक झालेल्या आमीर शेख अर्थात ‘शेखस्पिअर’ने २००८ पासून एक-एक कलाकार शोधून ‘बॉम्बे लोकल’चा पाया रचला. नालासोपारा हे मुळातच बी-बॉइंगचं हब होतं. त्यामुळे डान्सर मिळणं कठीण नव्हतं. आव्हान होतं ते हिप-हॉपचे त्याव्यतिरिक्तचे पैलू एकत्र आणण्याचं. रॅपिंग म्हणजे केवळ अंधानुकरण नाही. ही संस्कृती आहे, अन्यायाविरोधातली चळवळ आहे याचं भान असलेल्या हिप-हॉप आर्टिस्टना त्याने ‘बॉम्बे लोकल’मध्ये एकत्र आणलं. आमीरचं ‘इन्किलाब झिंदाबाद’ हे गीत गाजलं. ‘हम भगतसिंग के साथी है, मिलकर लायेंगे सुबह नयी,’ असा विश्वास व्यक्त करत त्याने या गाण्यातून कलबुर्गी-पानसरे हत्या, गोहत्येच्या संशयातून होणाऱ्या हत्या, लव्ह जिहाद, राजकीय स्वार्थातून दोन समाजांत निर्माण केली जाणारी तेढ अशा अनेक मुद्दय़ांवर बोट ठेवलं. त्यांच्याच कलेक्टिव्हचा ग्रॅव्हिटी म्हणतो..

‘एकतर्फा है कमल, और एकतर्फा है ये हाथी

एतर्फा है घडी, और एक इंजिन को चलाती

सर्वनाशी है ये सारे, इनको मिटाना मेरा धर्म’

संपूर्ण व्यवस्थाच त्याने नाकारली आहे. बॉम्बे लोकलकडे ‘बिटरॉ’ आणि ‘डी-सायफर’सारखे बिटबॉक्सर्स आणि ‘अल्केमी’ सारखा ग्राफिटी आर्टिस्ट आहे. अनेक रॅपर्स त्यांच्या कलेक्टिव्हशी जोडले गेले आहेत. विविध आंदोलनांमध्ये सहभागी होऊन ते भूमिका मांडतात. अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांनी हिप-हॉपची चळवळ उभी केली आहे.

ग्रॅव्हिटी (अक्षय पुजारी)

कमिजो में छिपती शराफत ये तेरी है,

उसको उतार दो आफत ये गहरी है

समाने सच्चाई और जनता ये बहरी है

मोहरे, मोहरे, बन चुके सारे ये मोहरे,

खौले खौले, फिर क्यू न खूँन ये खौले?

यहाँ पर आख भी लडाई,

तो फिर आग सी लडाई,

जला कर राख करते, वो बन जायेंगे हरजाई

आज अंधेरे मे है होने वाली, सारी ये तबाही

दिन मे हम उठाये लाशे, मर चुकी है बेगुनाही..

ग्रॅव्हिटी खणखणीत आवाजात जोशात-वेगात गातो. ‘समाजातले अनेक नियम निर्थक आहेत. आजूबाजूचं वास्तव भयाण आहे. या सगळ्याविषयी माझ्या मनात प्रचंड चीड होती आणि ती लेखनातून मांडण्याची  सवयही होती. रॅपर नव्हतो तेव्हाही मी कथा, कविता वगैरे लिहीत होतोच. माझ्यासाठी लोकप्रियता कधीच महत्त्वाची नव्हती आणि असणारही नाही,’ ‘ग्रॅव्हिटी’ म्हणजेच अक्षय पुजारी ठाम स्वरात सांगतो.

‘आई-वडिलांचा रॅपिंगला विरोध नव्हता, पण मी शिक्षण घ्यावं, नोकरी करावी असं त्यांना वाटायचं. पैसे मिळवणं मात्र अत्यावश्यक होतं. कॉलेजनंतर एका जाहिरात कंपनीत नोकरी केली. पण ती लवकरच सोडायची आहे हे ठरलेलंच होतं,’ अक्षय सांगतो. ‘बॉम्बे लोकल’चा भाग होण्यापूर्वीपासून त्याचं स्वतचं ‘डेथ क्लच म्युझिक’ नावाचं कलेक्टिव्ह होतं. नालासोपाऱ्यात राहायला आल्यावर तिथल्या एका रॅप इव्हेंटमध्ये त्याची शेखस्पिअरशी ओळख झाली. त्यानंतर काही दिवसांनी आमीर म्हणाला, ‘हिप-हॉप कलेक्टिव्ह शुरू करना है. मुव्हमेंट आगे बढाना है.’ त्याने अक्षयला कलेक्टिव्हमध्ये येण्याविषयी विचारलं. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ‘बॉम्बे लोकल हे नावंही मीच सुचवलं होतं,’ अक्षय सांगतो.

‘बॉम्बे लोकल’ने एकत्र कार्यक्रम, ध्वनिमुद्रण सुरू केलं. जागेचा प्रश्न होता. भाडय़ाची जागा परवडत नव्हती. मग त्यांनी समाजमाध्यमांतूनच संपर्कात राहणं सुरू केलं. ‘आमचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, फेसबुक पेजेस, यूटय़ूब चॅनल्सही आहेत. ज्याला जे सुचतं, ते आम्ही तिथे मांडतो.’ कलेक्टिव्हसाठी विविध कामं सुरू असतानाच अक्षयने स्वतंत्र गाणी करणंही सुरूच ठेवलं आहे.

(संपूर्ण लेखासाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)