विनायक परब – response.lokprabha@expressindia.com,  @vinayakparab
समुद्राच्या लाटा येतात आणि जातात.. सुरुवातीस संथ.. भरती सुरू झाल्यानंतर त्यांचा वाढणारा वेग.. काहीसा भीतीदायकही.. कधी येऊन थेट थडकणारा.. हे सारे दिसते ते थेट नाही तर समुद्राशेजारीच त्याला खेटून उभ्या राहिलेल्या इमारतींमधील खिडक्यांच्या काचांवरील प्रतिबिंबांमध्ये. समुद्राचा शेजार हा असा काँक्रिटबंद झालेला.. त्याच काँक्रिटच्या जंगलामध्ये केवळ काही तुकड्यांमधून दिसणारा.. हेच आहे आजचे वास्तव!वास्तवाची जाणीव मीरा देवीदयाल आपल्याला प्रखरतेने करून देतात ते काही रेखाचित्रे, छायाचित्रे आणि व्हिडिओ मांडणीशिल्पाच्या माध्यमातून. केमोल्ड प्रेस्कॉट रोड कलादालनात अलीकडेच या प्रदर्शनाला सुरुवात झाले.

छायाचित्रांमधून तसेच एकाच वेळेस समोर तीन स्क्रीन्सवर सुरू असलेल्या व्हिडिओ मांडणीशिल्पांमधून समुद्र आपल्याला दिसत राहातो. तो दिसतो आणि आपण ऐकतोदेखील त्याचे गरजणे.. काँक्रिटचे जंगल असलेल्या इमारतींच्या मधून तुकड्यांसारखा दिसतो तो; समुद्राशेजारी उभ्या राहिलेल्या इमारतींच्या काचेच्या तावदानांवर. भर दुपारी तो चंदेरी दिसतो आणि दिवस मावळत जातो तस तसा तो सोनेरी होत जातो. सकाळी उजाडल्यापासून ते सायंकाळपर्यंत तो अनेक रूपे दाखवतो. कधी ओहोटी तर कधी भरती. कधी अगदीच संथ, तर कधी वेगवान लाटा.. त्याच्याच साक्षीने माणसाचे सारे ‘व्यवहार’ सुरू असतात दिवसभर. कुणी फोनवर बोलतोय तर कुणी ऑफिसमध्ये चर्चा करतोय. साक्षीला सोबत असते तावदानावरचे ते प्रतिबिंब. पण त्या शहरी कष्टकऱ्यांच्या तर खिजगणतीतही नाही तो. फक्त‘व्यवहार ’सुरू आहेत शहरवासीयांचे. या व्यवहारांनाच तर आता सर्वत्र शहरांमध्ये महत्त्व आले आहे म्हणून देविदयाल यांच्या काही चित्रांमध्ये समुद्रकिनारी उभ्या असलेल्या इमारतींवर नोंटाचीच छाप दिसते. कारण व्यवहारात त्यालाच अधिक महत्त्व आहे.

शहरीकरणाच्या या विकास प्रक्रियेत आपण समुद्राला मागे हटवतो आहोत. बिल्डर्स त्याच्या पाण्याला बांध घालताहेत.. आणि शहराचे सांडपाणीही आपण त्याच्यामध्येच सोडून देतोय. या आशयाची एक कविताही चित्रांसोबत पाहायला मिळते. काही चित्रांमध्ये सागरीकिनारी दुरुस्ती सुरू असलेली बोट दिसते. तर काही रेखाचित्रांमध्ये समुद्रातीन शहरातील आरेखन केलेल्या इमारतींच्या दिशेने जाणारा पाण्याखालचा एक भासमान मार्ग. तर एका चित्रात लाटांवर हेलकावणारी कागदी होडी दिसते. तर काही चित्रांमध्ये रौद्र्र तर काहींमध्ये शांत लाटा.

‘सी हॅज मेमरी’ ही कविताही खूप बोलकी आहे.

सी हॅज मेमरी,

पासिंग थ्रू हर फ्लोटिंग वेव्ज

द सी रिमेम्बर्स

व्हेन यू वॉक इन

अ स्टोरी ऑफ युवर जर्नी

पूटस् अ लािस्टग मार्क ऑन हर स्किन

द सी हॅज मेमरी

ऑफ एन्शन्ट फूटस्टेप्स स्टँडिंग स्टील

डिसअपिएरन्स ऑफ एव्हरी साइन

ऑफ आल द फरगॉटन लाँिगग्ज

दुसरी कविता आहे

हाऊ स्टिल

हाऊ स्ट्रेंजली स्टिल

द वॉटर इज टूडे

इट इज नॉट गूड

फॉर वॉटर

टू बी सो स्टिल दॅट वे

समुद्राला मन आणि आवाजही आहे कदाचित एवढेच नव्हे तर आठवणही आहे.. माणसासोबत तो आहे दीर्घकाळ इथेच. किंबहुना जीवसृष्टीची सुरुवात त्याच्यामध्येच तर झाली. उत्क्रांतीलाही तोच साक्षी होता. मानवी इतिहासाचे महत्त्वाचे स्थलांतरणही झाले त्याच्याच माध्यमातून. पण आज मात्र आपण त्याचा कचरा करतोय आपल्याच कृतीने. कचराही त्याच्यामध्येच लोटतोय. त्याला बांध घालून विकासाच्या मार्गावर चाललो आहोत.. हे सारे प्रखरपणे या प्रदर्शनात जाणवते. ..मनावर ठसतो तो तुकड्यांमधला शहरी समुद्र!

आवर्जून पाहावे असे हे प्रदर्शन १२ मेपर्यंत पाहाता येईल.