‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘नटसम्राट’ या दोन्ही लोकप्रिय सिनेमांतून झळकलेल्या मृण्मयी देशपांडेने  सिनेक्षेत्रात पुढचं पाऊल उचललं आहे. निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून तिचे काही सिनेमे या वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

एखाद्या कलाकाराचा एक सिनेमा हिट झाला की त्यानंतर येणारा सिनेमा तितकाच यशस्वी होतोच असं नाही. त्या कलाकाराच्या किंबहुना त्या कलाकाराकडून प्रेक्षकांच्या तशा अपेक्षा असल्या तरी तसंच घडतं असं नाही. पण, काही कलाकार यासाठी अपवाद असतात. त्यापैकीच एक मृण्मयी देशपांडे. दिवाळीत प्रदर्शित झालेला ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि नवीन वर्षांच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला ‘नटसम्राट’ या दोन्ही सिनेमांत ती आहे. दोन्ही सिनेमांचा आशय-विषय अतिशय सकस आहे. नाटय़कृतींवर आधारित असलेल्या या सिनेमांमध्ये मृण्मयीने उत्तम काम केलंय. या वर्षी ती अभिनेत्रीसह आणखी वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून तिचे काही सिनेमे या वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘अनुराग’ या सिनेमाची निर्मिती मृण्मयीने केली आहे. निर्मिती क्षेत्रातल्या तिच्या पदार्पणाविषयी ती सांगते, ‘अनुराग हा सिनेमा नात्यावर भाष्य करतो. मानवी भावभावनांवर आधारित या सिनेमाची मांडणी वेगळी आहे. या सिनेमात अभिनेत्री म्हणून काम करताना सिनेमाचे दिग्दर्शक डॉ. अंबरीश दरक आणि सिनेमाटोग्राफर सुरेश देशमाने यांच्यासोबत अनेकदा चर्चा व्हायची. आम्हा तिघांचीही आवड, विचार, दृष्टिकोन जुळत असल्याचं लक्षात आलं. अशा प्रकारे सूर जुळले की घडवत असलेली कलाकृती उत्तमच होते असं माझं मत आहे. शिवाय सिनेमा वेगळं काही मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतोय. वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेला कुठलाही विचार मला भावतो. अशा कलाकृतीचा केवळ अभिनेत्री म्हणून भाग न होता त्यापलीकडे जाऊन आणखी काहीतरी योगदान असावं असं वाटलं. आम्ही तिघांनी एकत्र येऊन एक कंपनी सुरू केली आणि पुढचा प्रवास सुरू झाला.’ लेह लडाखमध्ये  चित्रित केलेल्या ‘अनुराग’ या सिनेमाचा लुक एकदम फ्रेश आहे. सिनेमा प्रामुख्याने दोन व्यक्तिरेखांवर बेतलेला आहे. लेह लडाखमध्ये शूट केल्याने सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

अभिनय-नृत्य-गायन-निर्माती अशा भूमिकांप्रमाणेच मृण्मयी आता दिग्दर्शिकाही होतेय. ‘अठरावा उंट’ या सिनेमाचं दिग्दर्शन ती करतेय. दिग्दर्शनासोबत निर्मितीची धुराही ती सांभाळतेय. सिनेमाच्या नावातच गंमत असल्यामुळे त्याबाबत कुतूहल निश्चितच आहे. हा सिनेमाही मानवी भावभावनांवर बेतलेला आहे. याचं चित्रीकरण या महिन्यात सुरू होणार आहे. नाटक-मालिकेपासून सुरू केलेला मृण्मयीचा प्रवास आता सिनेमाच्या दिग्दर्शनापर्यंत येऊन पोहोचला आहे. वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचं ती सांगते. याच शिकवणीचा तिला आता तिच्या दिग्दर्शनाच्या कामात फायदा होईल.

अभिनयासोबतच तिला नृत्य-गायनाचीही आवड आहे. तिची ही आवड प्रेक्षकांनी वेगवेगळ्या कामांमधून बघितली आहेच. पुरस्कार सोहळा किंवा इतर कार्यक्रमांमधून तिचं नृत्यकौशल्य सादर केलं आहे. पण, गेल्या वर्षभरात मृण्मयी अशा कार्यक्रमांमधून फारशी दिसली नाही. नृत्याची आवड असूनही ती अशा कार्यक्रमांपासून काहीशी लांब राहिली. त्याचं कारण ती सांगते, ‘सध्या इतरही काही कामांमध्ये मी व्यग्र आहे. कामाचा आवाका वाढलाय. त्यामुळे नृत्य-गाणं हे मागे पडतंय हे मलाही जाणवतंय. पण, मे-जूनदरम्यान मी आणि माझ्या नृत्याच्या क्लासच्या काही मैत्रिणी मिळून नृत्याशी संबंधित एखादा कार्यक्रम करण्याचा विचार करत आहोत. त्या कार्यक्रमाचं स्वरूप, सादरीकरणाची पद्धत, मांडणी याबाबत अजून पुरेसा विचार आणि चर्चा झाली नाही. पण, काहीतरी करू हे नक्की. गेल्या वर्षभरात काही कार्यक्रमांमध्ये माझे फारसे परफॉर्मन्स नसल्याचं एक कारण मी इतर कामात व्यग्र आहे हे आहेच, पण मला त्याच त्याच गाण्यांवर परफॉर्म करायचा कंटाळाही आला होता. तोचतोचपणा येऊ लागलाय असं मला वाटल्यामुळे मी ते करणं थांबवलं. तुम्हाला नेमकं काय हवंय याचा निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या कामात एकाग्र होऊन योग्य ते योगदान देऊ शकता. गाण्याच्याबाबतीत मला आणखी थोडी मेहनत घ्यावी लागेल. कारण गायनाचा रियाज खूप महत्त्वाचा असतो. तो व्यवस्थित झाला तरच त्यात पुढे आणखी काम करणं सोयीचं जातं. त्यामुळे गायनक्षेत्रात काम करण्यासाठी मला पुन्हा रियाज सुरू करावा लागेल.’

गेल्या वर्षांत प्रदर्शित झालेला ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि या वर्षी सुरुवातीला प्रदर्शित झालेला ‘नटसम्राट’ या दोन्ही लोकप्रिय सिनेमांमध्ये मृण्मयी आहे. दोन्ही सिनेमांचे विषय वेगळे असल्यामुळे अर्थातच तिच्या दोन्ही भूमिकांमध्ये मोठा फरक आहे. एकीकडे ‘कटय़ार..’मधील शांत, सालस उमा तर दुसरीकडे ‘नटसम्राट’मधील स्पष्टवक्ती विद्या या दोन्ही भूमिका साकारताना मृण्मयीने चोख कामगिरी केली आहे. दोन्ही भूमिकांसाठी प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं ती सांगते. ‘दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक वेगळे असल्यामुळे दोघांचेही दृष्टिकोन वेगळे आहेत. दोन्ही सिनेमे नाटय़कृतींवर आधारित आहेत. कोणत्याही कलाकृतीचं माध्यमांतर होत असतानाची प्रक्रिया बघणं हे कलाकारासाठी आनंददायीच असतं. माझ्या वाटय़ाला हा अनुभव दोनदा आला. दोन्ही माध्यमांतराच्या प्रक्रियेचा साक्षीदार मला होता आलं. दोन्ही नाटकं मी वाचली आहेत. त्यामुळे सिनेमा घडताना मी त्याच्या जास्त जवळ जात होते’, मृण्मयी तिचा अनुभव सांगते.

एखाद्या कलाकाराचे कमी कालावधीत लागोपाठ येणारे दोन चित्रपट यशस्वी होतातच असं नाही. सिनेमाचा विषय, कथा, कलाकार, दिग्दर्शक अशा अनेक गोष्टींवर त्याचं यशापयश अवलंबून असतं. ‘कटय़ार.’ आणि ‘नटसम्राट’ हे दोन्ही सिनेमे त्यात यशस्वी झाले.

‘एखाद्या कलाकाराच्या वाटय़ाला जेव्हा वेगवेगळ्या भूमिका येतात तेव्हा त्या कलाकाराला त्या साकारताना वेगळा अनुभव मिळत असतो. त्या भूमिका साकारताना एक मजा असते. माझे दोन्ही सिनेमे यशस्वी, लोकप्रिय झाले याचा आनंद आहेच. मागचं वर्ष ‘कटय़ार.’मुळे उत्तम गेलं आणि नवीन वर्षांची सुरुवात ‘नटसम्राट’मुळे उत्तम झाली’, मृण्मयी सांगते. ‘कुंकू’, ‘अग्निहोत्र’ या मालिकांमध्ये मृण्मयी घराघरात पोहोचली. लोकप्रिय झाली. आता तिचा प्रवास सिनेमा, दिग्दर्शन, निर्मिती या वेगाने सुसाट धावत आहे.

चित्रपट देखणा वाटण्यासाठी त्यात देखण्या नायकासोबत सुंदर नायिका हवी असा एक समज होता. अशी समजूत आता पूर्ण पुसली गेली आहे. हे चित्र आता बदलतंय. आता काही सिनेमे संपूर्णपणे नायिकेवर आधारित असतात. उत्तम अभिनय करणाऱ्या नायिकांची यादी मोठी आहे. या नायिका आता त्यांची वेगळी ओळख निर्माण करू पाहताहेत. गायिका, निर्माती, दिग्दर्शिका अशा अनेक भूमिकांमधून त्या पुढचं पाऊल टाकताहेत. मृणाल कुलकर्णी, क्रांती रेडकर, मनवा नाईक या नायिका-दिग्दर्शिकांच्या यादीत आता मृण्मयी देशपांडेची भर पडतेय. एकुणात, मृण्मयी देशपांडे हिच्या अभिनयाचं नाणं खणखणीत आहेच. आता निर्माती आणि विशेषत: दिग्दर्शक म्हणून येणाऱ्या सिनेमांची प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता आहे.
चैताली जोशी –
response.lokprabha@expressindia.com
twitter – @chaijoshi11