दरवर्षी ऑस्कर पारितोषिकासाठी चुरस तगडय़ा स्पर्धकांमध्येच असली, अन् त्यांचे निकाल धक्कादायक असले, तरी यंदा त्याचे प्रमाण अंमळ अधिक असणार आहे. अंदाजपंडित चित्ररसिकांपासून ते समीक्षकांच्या मतांना यंदा हमखास तडाखे बसण्याची शक्यता आहे. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये नामांकनापासून वादातीत असलेली ऑस्कर स्पर्धा यंदा आडाख्यांना चकवणारी म्हणूनच जास्त ओळखली जाऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणत: ऑस्कर निकाला दिवशीच विजेता ठरत असला, तरी दरेक वर्षी एखादा चित्रपट पुरस्कारासाठी संभाव्यतेमध्ये अधिक वरचढ असतो. अगदी कितीही तगडे आणि बहुनामांकनाचे चित्रपट समोर असताना एखाद्या चित्रपटाची बऱ्यापैकी पुरस्कारमाळासाठी आधीपासूनच चर्चा रंगलेली असते. अलीकडच्या काळात ‘स्लमडॉग मिलिऑनेर’, ‘किंग्ज स्पिच’, ‘आर्टिस्ट’ ते गेल्या वर्षीच्या ‘बर्डमॅन’पर्यंत अपवादात्मक स्थितीत ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे भाकीत महिनाभर आधीच झालेले होते. अन् त्यामुळे प्रत्यक्ष पुरस्कार घोषणेच्या वेळी त्या निकालाने धक्का दिला नाही.

यंदाच्या पुरस्कारांचे वैशिष्टय़ म्हणजे नामांकनापासून असलेले त्यातले वेगळेपण. सर्वोत्कृष्ट ठरेल अशा विषयावरच्या ‘ट्रम्बो’सारख्या चित्रपटाचा नामांकनात समावेश नाही. त्याच वेळी कॅरल, ब्रुकलिन या अतिकलात्मक चित्रपटांना आणि ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’सारख्या तद्दन व्यावसायिक चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठीच्या पंगतीत बसायचा मान आहे. सवरेत्कृष्ट चित्रपटापासून अभिनेते, अभिनेत्री, पटकथा यांच्याबाबत कुठलेही समीकरण चुकावे याच पद्धतीने नामांकनाची रचना आहे. चित्रपटांच्या वैशिष्टय़ांवरून अमेरिकेची (अन् जगाला झळ पोहोचविणाऱ्या) आर्थिक मंदीची गोष्ट अत्यंत रंजकपणे डॉक्युफिल्मद्वारे दाखविणारा ‘बिग शॉर्ट’ हा नामांकनात बलाढय़ चित्रपट असला, तरी त्याचसोबत चर्चमधील दांभिकता वेशीवर आणणारी पत्रकारिता मांडणारा ‘स्पॉटलाइट’ हा देखील विजेत्याची संभाव्यता कमावून आहे. अन् या दोघांना उडवून चक्क बर्डमॅननंतर सलग दुसऱ्यांदा असलेला दिग्दर्शक अलेहान्द्रो इनारितूचा चित्रपट ‘रेव्हनण्ट’ही बाजी मारू शकतो. म्हणजे नक्की तिघांपैकी कुणीतरी एक संभाव्य विजेता असण्याचे, मात्र ठामपणे कोणता ते न सांगता येऊ शकण्याची स्थिती असणारे, यंदाचे कुणालाही चाचपडायला लावणारे असे स्पर्धक सिनेमांचे चित्र आहे.

बरे हे तिन्ही चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत. प्रत्येकाचा विषयवैविध्य आणि चित्रप्रकार वेगळा असला तरी मांडणी आणि प्रयोगाच्या दृष्टीने सरसपणात हे तिन्ही चित्रपट समसमान आहेत.

नैतिक-अनैतिक संघर्ष

सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दावेदार असणाऱ्या तिघांमध्ये नैतिक-अनैतिक संघर्षांचे स्वरूपही गडद आहे. रेव्हनण्ट हा ऐतिहासिक सूडपट असला तरी, त्यात त्याविषयीचे मूलभूत प्रश्न उपस्थित आहेत. एककल्ली नायक, अद्भुत निसर्गचित्रण आणि सूडापलीकडे सूड विषयाचे चिंतन त्यात आहे. चित्रपटासाठी लिओनाडरे डी कॅपरिओला अभिनयाचे आणि अलेहान्द्रो इनारितू याला दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळण्याची शक्यता आहे. पण यातही ठामपणे सांगता येऊ शकत नाही. व्हिज्युअल इफेक्ट्सबाबत रेव्हनण्ट स्पर्धेत सर्वाधिक उजवा आहे.

२००८ साली आलेली अमेरिकेतील मंदी लाखो लोकांना एका रात्रीत गरीब अन् बेघर करणारी होती. तिचे जागतिक पडसादही भीषण होते. जास्तीत जास्त कर्ज देऊन अमेरिकी बँकांनी आपल्याच पायावर धोंडा मारण्याची तयारी केली होती. व्यवसाय वाढविण्याच्या नादात भरकटलेल्या या बँका क्षणार्धात बुडाल्या. शेअर बाजाराने तळ गाठला. यातील वृत्तविषय ही सर्वाच्या परिचयाची बाब असली, तरी हे नेमके कसे झाले आणि कशाप्रकारे कर्जअतिरेकाने मंदीचा विळखा घट्ट झाला याची अधिक सोपेपणाची कहाणी दिग्दर्शक अ‍ॅडम मॅकेचा ‘बिग शॉर्ट’ मांडतो. यात नायकांऐवजी सगळेच ननायक आहेत अन् आर्थिक हुच्चगिरीचे टोकाचे दर्शन आहे. मायकेल लुईसच्या अकथनात्मक पुस्तकावरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मंदीच्या घटनांच्या आर्थिक संकल्पनाच मांडणाऱ्या या पुस्तकाला सोबत घेऊन चित्रपटानेही अकथनात्मक रूप धारण केले आहे. तरी ती डॉक्युमेण्ट्री नसून डॉक्यफिल्मच आहे. इथला प्रयोग हा, की चित्रपटाची पात्रे थेट प्रेक्षकांशी कधीही आणि कोणत्याही वेळी संवाद साधतात. चित्रपट अर्थशास्त्रातील अवघड संकल्पना समजावून देण्यासाठी क्षणार्धात थांबतो. लक्ष नीट लागावे यासाठी अत्यंत कठीण संकल्पनांकडे मादक सेलिब्रेटींच्या तोंडून त्या वदवतो. चित्रपटाला त्रोटक कथा आहे, ती मायकेल बरी (क्रिश्चन बेल) या गुंतवणूकदाराला २००५ साली अमेरिकेतील गृहकर्जाचा फुगा फुटणार याचा अंदाज लागण्याची. मंदीच्या तिनेक वर्ष आधी या कर्ज फुगाफुटीचा आपल्याला फायदा किती होईल, या अनुषंगाने मग तो गुंतवणूक करीत जातो. सुरुवातीला मूर्ख वाटणाऱ्या मायकेल बरीवर लक्ष ठेवणाऱ्या इतर आर्थिक हुच्चांना त्याच्या दूरदृष्टीचा सुगावा लागतो. मग सुरू होतो, तो ‘टाळूवरील लोणी’ आधीच अधिकाधिक ओरपण्यासाठी धडपडण्याचा प्रकार. या कर्ज फुगाफुटीचा सामान्य नागरिकांना फटका बसेल, ते रस्त्यावर येतील, जागतिक पडसाद गंभीर उमटतील, याचा नैतिक विचार न करता चालणारी पांढरपेशी आर्थिक गुन्हेगारी चित्रपट विनोदाचा पुरेपूर वापर करीत दाखवून देतो. २००८च्या मंदीविषयक आतापर्यंत आलेल्या डॉक्युमेण्ट्री किंवा चित्रपटांपैकी हा सर्वात उजवा सिनेमा ठरावा. भावनाप्रधानतेचा लवलेश नसलेला, मांडणीच्या विविध मार्गानी अवघड विषय असूनही गुंतवून ठेवणारा असा हा चित्रपट आहे.

‘बिग शॉर्ट’इतक्याच ताकदीचा मात्र एका शहरातील बालकांच्या लैंगिक शोषणाचे चर्चने दाबून टाकलेले प्रकरण उकरून काढणाऱ्या ‘बोस्टन ग्लोब’च्या पत्रकारितेची कथा मांडणारा टॉम मॅकार्थी दिग्दर्शित ‘स्पॉटलाइट’ हा चित्रपटही नैतिक-अनैतिक संघर्षांचे प्रातिनिधिक रूप दाखविणारा आहे. एका विशिष्ट घटनेसंदर्भातील पुलित्झर पारितोषिकप्राप्त ठरलेल्या लेखांची मालिका चित्रपटासाठी वापरण्यात आलेली आहे. नव्या संपादकाच्या सांगण्यावरून ग्लोबमधील चार जणांची विशेष वृत्तासाठी नेमून दिलेली ‘स्पॉटलाइट’ टीम दोन दशकांपूर्वी घडलेल्या (आणि अद्याप न थांबणाऱ्या) चर्चमधील धर्मगुरूंच्या बालकांच्या लैंगिक शिक्षणाचे दडपलेले प्रकरण पुन्हा शोधायला निघते. या शोधात चर्चची दांभिकता स्पष्ट होतेच. शिवाय लैंगिक शोषणाच्या पीडितांना शोधताना ‘स्पॉटलाइट’ चमूकडून बातम्या मिळविण्यासाठी, चर्चचा पर्दाफाश करण्यासाठी केल्या जाणाऱ्या धडपडींची वृत्तकथा सादर होते. पत्रकारांच्या मूलभूत प्रवृत्तींचे अत्यंत तपशिलातील बारकावे चित्रपटात नमूद झालेले आहेत. पुराव्यांसाठी जंगजंग पछाडण्याची अस्सल पत्रकारी प्रवृत्ती यातल्या कलाकारांनीही उत्तमरीत्या साकारली आहे. वरील तीन चित्रपटांना क्रमांक द्यायचे झाले, तर तिसऱ्या क्रमांकात स्पॉटलाइटचे स्थान असले, तरी देखील हा चित्रपटही संभाव्य विजेता आहे.

दिग्दर्शनाचे वाटेकरी…

जॉन क्रॉलीचा ‘ब्रुकलिन’, क्वेन्टीन टेरेन्टीनोचा ‘हेटफूल एट’, टॉम हूपरचा ‘डेनिश गर्ल’, अलेक्स गार्लण्डचा ‘एक्स मशिना’, रायन कुगलरचा ‘क्रीड’ डॅनी बॉयलचा ‘स्टीव्ह जॉब’ आणि जे रोशचा ‘ट्रम्बो’, सलग दोन वर्षे नामांकनात राहिलेला हेव्हिड ओ रसेलचा यंदाचा ‘जॉय’ , रिडले स्कॉटचा ‘द मार्शियन’ आदी दादा दिग्दर्शकांच्या चित्रपटांकडे पाहिले असता, या दिग्दर्शकांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या पंगतीतून वगळले गेल्याचे आश्चर्य वाटू लागते. पैकी ‘ट्रम्बो’ हा चरित्रपट तर हॉलीवूडच्या अज्ञात इतिहासाचे खरे रूप उलगडून दाखविणारा. ‘एड वूड’ आणि ‘द आर्टिस्ट’ चित्रपटांच्या परंपरेतला असूनही नामांकनातून चलाखपणे वगळला गेला आहे. ‘डेनिश गर्ल’सारख्या अत्यंत नाजूक विषयाला ताकदीने हाताळणाऱ्या टॉम हूपरला नामांकन न मिळणे गमतीशीर बाब आहे. नामांकनात कृष्णवंशीय कलाकार, दिग्दर्शकांच्या अनुपस्थितीवरून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही काही काळ रान उठले होते. क्वेन्टीन टेरेन्टीनोचा चित्रपट हामखास दिग्दर्शन, पटकथेच्या गटात समाविष्ट असणारा म्हणून ओळखला जातो. यंदा या गटातून टेरेन्टीनोचा सिनेमा बाद झाला आहे. (साहाय्यक अभिनेत्री, पाश्र्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफीच्या नामांकनावर चित्रपटाला समाधान मानावे लागले आहे.)

दिग्दर्शनाचे पारितोषिक यंदा अ‍ॅडम मॅके, टॉम मॅकार्थी आणि अलेहान्द्रू इनारितू यांपैकी कुणीतरी एक जिंकू शकेल. जॉर्ज मिलर (मॅड मॅक्स : फ्युरी रोड) आणि लेनी अब्रॅमसन ( द रूम) पारितोषिकासाठी कच्चे स्पर्धक म्हणावे लागतील.

अभिनय आणि अभिनेत्री

पाच वेळा ऑस्करच्या नामांकनामध्ये असूनही पुरस्कार न पटकावू शकणारा लिओनाडरे डीकॅपरिओ यंदा सहाव्या नामांकनात बाजी मारेल, याचा सर्व माध्यमांतून आडाखा मांडला जात आहे. रेव्हनण्टसाठी त्याच्या एकहाती भूमिकेला सर्वोत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळण्याची शक्यता जास्त असली, तरी नेहमीप्रमाणे त्याच्या वाटेला पुरस्कार न आल्यास डेनिश गर्ल वठविणाऱ्या एडी रेडमेन या अभिनेत्याला किंवा ट्रम्बो साकारणाऱ्या ब्रायन क्रॅन्स्टनला हे पारितोषिक मिळेल. या तिन्ही स्पर्धकांना असलेले वलय आणि त्यांनी वठविलेली भूमिका एकमेकांना तुल्यबळ आहे. साहाय्यक अभिनेत्यांमध्ये  मार्क रफालो (स्पॉटलाइट), टॉम हार्डी (रेव्हनण्ट), क्रिश्चन बेल (द बिग शॉर्ट) तिन्हीही अनुक्रमे विजेत्यांच्या दावेदारीत सारख्या स्थानावर आहेत.

एका उद्योजिकेचा कौटुंबिक अडथळ्यांतून वर येण्याचा प्रवास दर्शविणाऱ्या ‘जॉय’ चित्रपटातील भूमिकेसाठी जेनिफर लॉरेन्स ही सर्वोत्तम अभिनेत्रीच्या पुरस्काराची मानकरी ठरू शकते. तिला हा पुरस्कार मिळाला नाही, तर केट ब्लान्चे (कॅरल) आणि ब्री लार्सन (द रूम) यांपैकी एक पुरस्कारधनी होऊ शकेल. साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जेनिफर जेसन ली (द हेटफूल एट), रुनी मारा (कॅरल) किंवा अ‍ॅलिशिया विकांडर (द डेनिश गर्ल) यांपैकी एकाला मिळेल.

अर्थात हे सगळे तडाखे बसू शकणारे आडाखेच. यंदा त्याचे प्रमाण कधी नव्हे इतके जास्त होण्याची शक्यता आहे इतकेच. कुणाही एका चित्रपटाला सर्वाधिक पारितोषिके मिळण्याची शक्यता यंदा कमी आहे. पारितोषिके विभागली जाण्याचे प्रमाण यंदा सर्वाधिक आहे. बिग शॉर्ट, रेव्हनण्ट आणि स्पॉटलाइट यांच्यात पारितोषिकांची विभागणी होऊ शकेल, मात्र इतर चित्रपटही पुरस्कारांच्या वाटेकऱ्यांमध्ये राहतील.

एक अंदाज

सर्वोत्कृष्ट चित्रपट
बिग शॉर्ट किंवा रेव्हन्ट किंवा स्पॉटलाइट

सर्वोत्तम अभिनेता
लिओनाडरे डी कॅपरिओ किंवा एडी रेडमेन किंवा ब्रायन कॅ्रन्स्टन

सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता
मार्क रफालो किंवा क्रिश्चन बेल

सर्वोत्तम अभिनेत्री
जेनिफर लॉरेन्स

सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री
रुनी मारा

पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscar award
First published on: 26-02-2016 at 01:27 IST