scorecardresearch

Premium

चर्चा : निमित्त प्रत्युषाचं!

मुंबईतली चंदेरी दुनिया त्यांना खुणावत असते.

चर्चा : निमित्त प्रत्युषाचं!

‘बालिका वधू’फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने मनोरंजनाच्या दुनियेतील करिअरबरोबरच आजच्या तरुण पिढीच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या क्षेत्रातली ही काही पहिलीच आत्महत्या नाही, पण ती अखेरची ठरावी यासाठी या क्षेत्रातल्या मंडळींनी विचार करण्याची गरज आहे.

अभिनय क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं म्हणून अनेक तरुण मुली आपल्या घरापासून लांब मुंबईत येतात. मुंबईतली चंदेरी दुनिया त्यांना खुणावत असते. ओळख, प्रसिद्धी, कलेवरचं प्रेम, अभिनय कौशल्य या सगळ्यामुळे तरुणी ‘कधीतरी आपलाही फोटो मोठय़ा होर्डिगवर लागेल, कधीतरी आपणही टीव्हीच्या पलीकडच्या बाजूला असू’ अशी स्वप्न रंगवत असतात. अशीच स्वप्नं तिनेही रंगवली होती. तिलाही स्वत:ला
एक दिवस मोठं झालेलं बघायचं होतं. तशी ती मुंबईत आलीसुद्धा. इतरांप्रमाणेच मुंबईने तिलाही सामावून, सांभाळून घेतलं. तिलाही मुंबईची सवय होत होती. शेवटी तिने तिच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल उचललं.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?

31-lp-pratushya-banarjeeही ‘ती’ म्हणजे जमशेदपूरहून आलेली प्रत्युषा बॅनर्जी. वय २४ वर्षे. २०१० मध्ये ‘बालिका वधू’ या मालिकेतून या चंदेरी दुनियेत प्रवेश केला. मुंबईत आली तेव्हा प्रत्युषा १९ वर्षांची होती. मालिका लोकप्रिय होतीच. पण, प्रत्युषानेही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. पहिल्याच मालिकेतून ती लोकप्रिय झाली. या मालिकेत ती चार वर्षे काम करत होती. तिची मालिका सुरू असतानाच त्याच वाहिनीवर ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. २०१२ मध्ये झालेल्या या शोमध्ये ती विजेती ठरली नसली तरी तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मालिकेचं शुटिंग भरपूर तासांचं असतं. जवळपास १४-१६ तास काम करावं लागतं. सततच्या अशा वेळापत्रकामुळे प्रत्युषा आजारी पडली आणि २०१३ मध्ये तिने मालिका सोडली. एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत विविध स्वभावाच्या व्यक्तींशी संपर्क येत असतो. तसाच प्रत्युषाचाही अनेकांशी संपर्क होत होता. मुंबईतील उद्योजक मकरंद मल्होत्रा या तरुणाशी तिची भेट झाली. दोघं प्रेमातही पडले. सगळं आलबेलं सुरू असतानाच दोघांमध्ये खटके उडायला लागले. इथे प्रत्युषा चर्चेत यायला लागली. प्रत्युषाने बॉयफ्रेंड मकरंद त्रास देत असल्याची तक्रारही पोलिसांकडे केली होती. अखेर दोघांचा ब्रेक अप झाला. ब्रेकअप आणि तिचं मालिका सोडणं थोडं मागे-पुढे झालं होतं.

30-lp-vaishali-deshmukhविचार करायला उसंत घ्या
सिनेक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. या क्षेत्रात आपण उत्तम करिअर घडवू शकलो नाही तर दुसरं काय करू शकतो हा विचार करणंही आवश्यक आहे. यासाठी तरुणांनी बॅक अप प्लॅन तयार ठेवावा. भरपूर तास कामातच गुंतलेली तरुण पिढी कुटुंबासोबत गप्पा, जेवणं, फिरणं, मित्रपरिवारासोबत गप्पा या सगळ्यांपासून काहीशी लांब जाते. खरंतर या गोष्टी कामाचा ताण कमी करण्यासाठी फार उपयोगाच्या असतात. पण, पैसे आणि आघाडीवर असणं या दोनच गोष्टी त्यावेळी त्यांच्यालेखी महत्त्वाच्या असतात. या दोन गोष्टींनी त्यांचं आयुष्य व्यापून गेलेलं असतं. त्या अचानक थांबल्या की त्यांना त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटू लागते. या क्षेत्रात असलेली स्पर्धा आजच्या युवा पिढीला कधी कधी जड जाते. आजच्या जगण्याला प्रचंड वेग आहे. श्रीमंत, यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो. तर तसंच अपयश, कामाचा ताण झेलण्यासाठी मनालाही तयार व्हायला वेळ लागतोच. हाच वेळ नेमका मिळाला नाही तर ते कोलमडतं. तरुण पिढीला सगळं पटकन हवं असतं. त्यांच्याकडे संयम नसतो. पटकन मिळालं नाही तर नैराश्य येतं. तरुण पिढीकडे शांतपणे विचार करण्याची उसंतच नाही असं वाटतं.

– डॉ. वैशाली देशमुख, पौगंडावस्थातज्ज्ञ

‘बालिका वधू’ ही मालिका सोडल्यानंतर लगेचच म्हणजे २०१३ मध्ये ती दिसली ‘बिग बॉस’ या शोमध्ये. बिग बॉस या शोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेल्या सेलिब्रेटींना स्थान मिळतं. प्रत्युषा त्यावेळी तिच्या ब्रेकअपच्या घटनेमुळे चर्चेत होती. या शोमध्ये ती जवळपास दोन महिने टिकली. त्यानंतर ‘हम है ना’ या शोमध्ये तिला पुन्हा एकदा मुख्य भूमिका मिळाली. पण, हे झालं ते जवळपास वर्ष-दीड वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजे २०१४-१५ मध्ये. या दरम्यान प्रत्युषा राहुल राज सिंग नामक तरुणाच्या प्रेमात पडली. ‘हम है ना’ ही मालिका लवकर बंद झाली. त्यानंतर मात्र प्रत्युषाच्या हाती म्हणावं असं काम लागलं नाही. चारेक मालिकांमधून तिने छोटय़ा-मोठय़ा भूमिका केल्या पण, उल्लेखनीय असं काही नाही. अलीकडे ‘पॉवर कपल’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यासोबत सहभागी झाली होती. पण, तिथेही शेवटपर्यंत ती मजल मारू शकली नाही. हा तिचा शेवटचा शो. यानंतर ती पुन्हा चर्चेत आली ते तिने केलेल्या आत्महत्येमुळे. १ एप्रिल २०१६ या दिवशी अंधेरीच्या घरात तिने गळफास लावून आत्महत्या केली.

वयाच्या १९ व्या वर्षी ती मुंबईत आली आणि २४ व्या वर्षी या जगातूनच कायमची निघूनही गेली. या सहा वर्षांमध्ये ग्लॅमर इंडस्ट्रीच्या वाईट बाजूची बळी ठरली. खरं तर या इंडस्ट्रीची चांगली-वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. ती नेमकी वाईट बाजूत अडकली. या क्षेत्रात यश मिळवणं एक वेळ सोपं आहे, पण ते टिकवून ठेवणं आव्हान असतं. हे आव्हान पेलताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. इथे रोज शेकडोंनी तरुण मुलं-मुली करिअर घडवण्यासाठी येत असतात. त्यांच्यात टिकून राहणं आणि आघाडीचे कलाकार असाल तर त्या स्थानावर टिकून राहणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचू नये, असं म्हटलं जातं. ते आचरणात आणण्याची योग्य वेळ प्रत्येकाला कळायला हवी. प्रत्युषाचं १९ व्या वर्षी इंडस्ट्रीत येणं, लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका मिळणं, तिच्या कामाचंही कौतुक होणं, देशभर ओळख मिळणं, पैसा, प्रसिद्धी मिळणं हे सगळं स्वप्नवत होतं, पण ते खरं झालं होतं. या सगळ्याला प्रचंड वेग होता. ज्या वेगाने तिच्या करिअरचा आलेख वर चढत होता, त्याच वेगाने तो खालीही आला. एका मालिकेनंतर तिची लोकप्रियता कमी होऊ  लागली. कामं मिळण्याची संख्याही कमी झाली. शिवाय जे कार्यक्रम मिळायचे ते अयशस्वी ठरायचे. दुसरीकडे इतर माहितीवरून असं लक्षात येतं की, आर्थिकदृष्टय़ा ती प्रचंड तणावातून जात होतीच, शिवाय तिचे तिच्या बॉयफ्रेंड राहुल राजशी खटके उडायला लागले होते. अशा परिस्थितीत आर्थिक, नातेसंबंध, करिअर अशा तिन्हीच्या तणावाची ती बळी ठरली.

वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबईत करिअरसाठी आलेल्या नायिकांनी त्यांची मते मांडली.

34-lp-mrunal-dusanis
मृणाल दुसानीस
सिने क्षेत्रात काम करताना संगतीवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. यश-अपयश हाताळता येण्याची ताकद हवी. सिनेसृष्टीत करिअर करताना संयम आणि स्वत:वर विश्वास या दोन गोष्टी असायला हव्यात. ग्लॅमर, प्रसिद्धी यासाठी या क्षेत्रात येऊ नये. या क्षेत्रामध्ये स्टेट्स जपणं, अस्तित्व टिकवून ठेवणं या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं, हे खरंय. पण, या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. तुमचं काम किती चांगलं-वाईट यावरच तुमचं भवितव्य ठरत असतं. माणसांची पारख योग्य असली तर रिलेशनशिपबाबत अडचणी येणार नाहीत.

35-lp-neha-pendseनेहा पेंडसे
आयुष्याच्या चढ-उतारांच्या काळात कुटुंबाची साथ मिळणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी शाबूत असायला हवी. तसंच स्वत: खूप कणखर राहावं. आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या आणि कोणत्या नाही हे ज्याने-त्याने ठरवावं. चांगल्या कामांमध्ये स्वत:ला सतत गुंतवून ठेवलं तर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार मनात येऊ शकत नाही. कदाचित दोन वर्षांनी मी आजइतकं कमवू शकणार नाही. त्यामुळे आजच मी माझी लाइफस्टाइलची चौकट आखते. त्यामुळे ‘ती असं करतेय म्हणून मी असं करणार’ अशा इगोचा मला त्रास होत नाही. ग्लॅमर इंडस्ट्रीत कलाकारांना त्यांची प्रतिमा जपावी लागत असली तरी त्यांनी त्यांची मर्यादा आखून घ्यायला हवी.

36-lp-tejaswini-panditतेजस्विनी पंडित
नैराश्यातून आत्महत्या करणं ही फक्त सिनेसृष्टीची नाही तर तरुण पिढीचीही समस्या आहे. आमचं क्षेत्र दिसतं म्हणून एखाद्या कलाकाराने आत्महत्या केली तर त्याची बातमी होते. विचारांमध्ये स्पष्टता नसणे, मनाने कमकुवत असणे हे तरुण पिढीत प्रकर्षांने दिसून येतं. सिनेक्षेत्रात येणं, काम करणं, टिकणं, लोकप्रिय होणं हे सोपं नाही. अपयश स्वीकारण्याची कला अवगत करावी लागते. काहींना लहान वयात, कमी वेळात प्रसिद्धी मिळते. अचानक हे सगळं थांबलं की, त्या कलाकाराला त्रास होतो. या क्षेत्रात एकत्र काम करून एखादी व्यक्ती आवडू शकते. त्या आवडण्यामागे प्रेम आहे की ती त्याच्यासोबत राहण्याची सवय हे तपासून बघितलं पाहिजे. सतत पुढे जाण्याची घाई न करता शांतपणे दुसऱ्या पर्यायाचाही विचार करायला हवाच.

37-lp-amruta-hanwilkarअमृता खानविलकर
कामातला ताण हाताळण्याची पद्धत योग्य असायला हवी. एखाद्याची विचारसरणी त्याच्या जडणघडणीतूनच तयार झालेली असते. सिने क्षेत्रात काम करताना विशिष्ट व्यक्तीची कौटुंबिक पाश्र्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते. निवडलेल्या क्षेत्रात मिळणारं यश-अपयशाकडे सकारात्मकरीत्या बघितलं पाहिजे. कामातल्या चढउतारांविषयी घरच्यांना माहिती असणं गरजेचं आहे. विशेषत: रिलेशनशिपबाबत त्यांना माहिती असायला हवी. कारण रिलेशनशिप टिकली नाही तर पालकच सगळ्यात जास्त सांभाळून घेत असतात. सोशल नेटवर्किंगचा स्ट्रेस हा फार घातक आहे. आपण काय करतो, कुठे जातो, कोणाबरोबर आहोत, काय करणार आहोत असं सगळंच पोस्ट कशाला करायला हवं. कामापुरतं आणि फक्त कामाबाबत लोकांना सांगणं मला योग्य वाटतं. या सततच्या सोशल साइट्सच्या वापरामुळे स्वत:विषयी न्यूनगंड तयार होतो. तो होता कामा नये.

38-lp-neha-joshiनेहा जोशी
कामातला ताण फक्त मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम करतो. एखाद्या अभिनेत्रीला ती विशिष्ट स्थानावर पोहोचायला हवी असं वाटत असेल पण, ठरावीक कारणांमुळे ती तिथे नसते. ती कारणं तिने स्वीकारली की तिच्या त्रासाची तीव्रता कमी होते. म्हणजेच गोष्टी स्वीकारण्याची वृत्ती असावी. विचारांनी स्पष्ट आणि कामात प्रामाणिकपणा असला की हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त होतात. कोणत्याही परिस्थितीचा तटस्थपणे राहून विचार करणं महत्त्वाचं आहे. सध्या सोशल साइट्समुळे अनावश्यक गोष्टींची माहिती इतरांना दिली जाते. हे फार महत्त्वाचं नाही. हे आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करत असतात. रिलेशनशिपमध्ये एकमेकांना सांभाळून घेणं महत्त्वाचं असतं. हेच जमलं नाही तर अस्वस्थता, असुरक्षितता, द्वेष असं सगळं निर्माण होतं.

39-lp-sonalee-kulkarniसोनाली कुलकर्णी
आत्महत्या फक्त ग्लॅमर इंडस्ट्रीतच नाही; तर इतरही क्षेत्रात होतात. आमचं क्षेत्र सतत दिसत असतं म्हणून त्यावर बोलणं सोपं असतं. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं बालपण, तिची जडणघडण, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. कुटुंब नेहमी साथ देतं. पण, मुंबईबाहेरून आलेल्यांना मनापासून कोणावर पटकन विश्वास ठेवणं थोडं कठीण जातं. सध्या ‘रिपेअर’ ही संकल्पनाच दुर्मीळ झाली आहे. मोबाइल, गाडी खराब झाली की दुरुस्त केली जात नाही तर नवीनच घेतली जाते. तसंच नात्यांचंही झालंय. बिघडलेली नाती दुरुस्तऐवजी संपवण्याकडे अनेकांचा कल असतो. कारण ती दुरुस्त करायला कोणाकडे आता वेळच नाही आणि विश्वासही नाही. दोन महत्त्वाकांक्षी व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांनी नात्यांबद्दलही तितकंच महत्त्वाकांक्षी असायला हवं.

सिनेसृष्टी अतिशय अनिश्चित आहे. इथे कधी काम मिळतं तर कधी नाही. पूर्वी ही समस्या बहुतकरुन बॉलीवूडकरांना त्रास द्यायची. आता टीव्हीचा आवाका वाढतोय. इथे येणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तणाव आहे. खरं तर हे चित्र सगळ्याच क्षेत्रांमध्ये दिसतं, पण सिनेसृष्टी दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे त्याविषयी जास्त बोललं जातं. या क्षेत्रात काम करताना मनाची पक्की तयारी करूनच यावं. कारण इथे ‘काम न मिळण्याची’ फेज अनेकदा अनुभवावी लागते. या फेजमुळे आर्थिक तणाव निर्माण होतो. अशा अनेक गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या असतात. अशा घटना योग्य प्रकारे हाताळणं महत्त्वाचं असतं. याबाबत पौगंडावस्था तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख सांगतात, ‘अचानक आलेल्या एखाद्या प्रसंगामुळे एखादी व्यक्ती नैराश्यात गेली; असं होत नाही. त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कमकुवत होण्याला आधीपासूनच अनेक प्रसंग कारणीभूत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, एखाद्या गोष्टीचा ताण सहन करण्याची क्षमता किती आहे, कौटुंबिक वातावरण कसं आहे, घरात तणाव आहे का, त्या व्यक्तीला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाण्याची सवय आहे का, त्या व्यक्तीत आत्मसन्मान, आत्मविश्वास किती आहे; अशा सगळ्याच गोष्टींच्या खोलवर जाणं गरजेचं असतं.’ वैशाली देशमुख सांगतात यांच्या मते तरुणपणीच्या वागणुकीचा त्या मुलाची किंवा मुलीची जडणघडणीशी संबंध असतो.

अशा प्रकारे आत्महत्या करणारी प्रत्युषा ही पहिलीच किंवा एकमेव अभिनेत्री नाही. यामध्ये आधीच्या काही अभिनेत्रींचा समावेश  आहे. कुलजीत रंधवा, विवेका बाबजी, जिया खान, शिखा जोशी यांनीही आत्महत्या केली होती. ८ फेब्रुवारी २००६ मध्ये कुलजीतने मुंबईच्या तिच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ३० वर्षांच्या कुलजीतने आत्महत्येपूर्वी एका चिठ्ठीत जीवनातल्या तणावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. ‘हिप हिप र्हुे’, ‘स्पेशल स्क्व्ॉड’ अशा काही लोकप्रिय मालिकांमधून ती दिसली होती. विवेका बाबजी फॅशन इंडस्ट्री, जाहिराती, अँकरिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत होती. वयाच्या ३७ वर्षी, २५ जून २०१० मध्ये तिनेही गळफास लावून आत्महत्या केली. बॉयफ्रेंड गौतम वोहराशी नातं तोडल्यानंतर विवेका नैराश्यात गेली होती. ताणाला कंटाळूून तिने आत्महत्या केली. सगळ्यात गाजलेलं प्रकरण म्हणजे जिया खानचं. तिने ‘नि:शब्द’, ‘गजनी’, ‘हाऊसफुल’ अशा बॉक्स ऑफिस हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याच्याशी असलेल्या तिच्या बिघडलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि सिनेसृष्टीत तिचं करिअर फारसं काही घडत नसल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं. लोकप्रिय सिनेमे केल्यानंतर हाती काहीच येत नसल्यामुळे जियाला नैराश्य आलं होतं. तसंच सूरजसोबतच्या नात्यातही कटुता येत चालली होती. या दोन्ही कारणांमुळे जिया खचून गेली होती. मुंबईच्या तिच्या घरी गळफास लावून तिने आत्महत्येचं पाऊल उचललं. २०१५ साली १६ मे या दिवशी मॉडेल शिखा जोशी हिनेही प्रेम आणि नातेसंबंधाला कंटाळून आत्महत्या केली. गळा कापून तिने स्वत:ला संपवलं. शिखाने ‘बीए पास’ या सिनेमात काम केलं होतं.

या सगळ्यांचा समान धागा म्हणजे प्रेमसंबंधातून आलेलं नैरश्य. खरंतर यांनी सगळ्यांनीच त्यांच्या क्षेत्रात चांगलं काम केलं होतं. त्यांनी केलेल्या कामाची दखलही घेतली होती. सतत मिळालेल्या यशाची त्यांना सवय झाली होती. त्यामुळे अचानक आलेल्या अपयशामुळे आणि नातेसंबंधातून आलेल्या नैराश्यामुळे त्या खचून गेल्या. या सगळ्यांमध्ये आणखी एक समान गोष्ट आढळून येईल. त्यांना कमी कालावधीत 32-lp-modelsयश मिळालं होतं. अशावेळी वागण्याबोलण्यात तारतम्य ठेवणं महत्त्वाचं असतं. यासाठी सगळ्यात मोठी मदत ठरते ती कुटुंबाची आणि मित्रपरिवाराची. कुटुंबातील सदस्य नेहमी संबंधित व्यकतीच्या फायद्याचा सल्ला देतात. तर मित्रपरिवार कसा आहे त्यावरून तो योग्य
दिशा दाखवेल का हे बघितलं जातं. प्रत्युषासह या चौघीही वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबईत करिअर करण्यासाठी आलेल्या होत्या. ही यांच्यातली आणखी एक समान बाजू. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या मुलींबाबत असं काय घडतं की त्यांच्यासोबत अशाप्रकारे घटना घडतात, असा प्रश्न इथे पडतो. पण, डॉ. वैशाली देशमुख इथे हा मुद्दा स्पष्ट करतात, ‘मुंबईबाहेरून येणारे तरुण कुटुंबापासून लांब राहत असतात. आधारासाठी प्रेमसंबंधांकडे वळतात. पण, काही वेळा रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हे त्यांना कळत नाही. तसंच एका नात्यातून बाहेर पडल्यावर दुसरा चांगला जोडीदार भेटेल का, अशी अनिश्चितता असते. साधारण २०-३० या वयोगटात करिअर आणि रिलेशनशिप या दोन गोष्टी तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. काहींना कमिटमेंट फोबिया असतो. एखाद्याला किंवा एखादीला हो म्हटलं तर ते नातं टिकवता येईल का, आमचं जमेल का अशी भीती मनात असते. या दोन्ही गोष्टींचा ताण एकत्र हाताळण्यापलीकडे गेल्यामुळे आत्महत्येच्या घटना घडतात. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे, तर आत्महत्या करून त्याच्या शेवट मृत्यूमध्ये होण्यात मुलांचं प्रमाण जास्त आहे’

40-lp-amruta-subhashमनाची जिम महत्त्वाची – अमृता सुभाष
माझ्या बाबांना अल्झायमर हा आजार झाला होता. माझ्या जवळच्या एका व्यक्तीला हा आजार झालाय, थोडय़ा दिवसांनी ती व्यक्ती मला ओळखणारही नाही; हे सगळं पचवणं मला जड जात होतं. मी खूप अस्वस्थ असायचे. पण, त्याच वेळी मला हे सगळं सकारात्मकरीत्या स्वीकारायला हवं, असंही वाटायचं. त्यासाठी मला मदत हवी आहे हे मला कळत होतं पण, नेमकी कशी, काय, कोणाची मदत हे समजत नव्हतं. हा मार्ग मला विजय तेंडुलकर यांनी दाखवला. त्यांनी मला अनेक गोष्टींचं महत्त्व पटवून दिलं. मी कोणत्याही प्रकारची औषधं घेत नाही. सध्या मी ईएमडीआर (आय मूव्हमेंट डिसेंसटायझेशन अ‍ॅण्ड रिप्रोसेसिंग) या सायकोथेरपीचा उपचार घेतेय. यामध्ये डोळ्यांच्या हालचालींवरून व्यक्तीच्या अंतर्मनात असलेला ताण, अस्वस्थता, लहानपणी राहून गेलेल्या गोष्टी समोर येतात. तसंच मनात दडलेल्या राग, द्वेष, भीती या भावना आयुष्यात सतत डोकावत असतात. ईएमडीआर या थेरपीच्या उपचारांचा मला चांगला अनुभव येतो आहे. मला एक चांगली सायकोथेरपीस्ट भेटल्याने मला यातून बाहेर पडायला खूप मदत झाली. सायकोथेरपीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या थेरपीची मदत घेणं म्हणजे कमीपणा आहे, असं सुशिक्षित लोकांनाही वाटतं. वेड लागलेले लोकच मनावर उपचार घेतात, असाही गैरसमज दृढ झालेला आहे. शारीरिक आजारांसह मानसिक आजारांकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. मी गमतीने याला मनाची जिम असं म्हणते. ‘तुझं तर सगळं चांगलं सुरू आहे?, तुला काय झालंय?, लक्ष द्यायचं नाही गं फार’; असे सल्ले दिले जातात. पण, त्या वेळी त्या व्यक्तीची मानसिक स्थिती वेगळी असते. समोर आलेली परिस्थिती कठीण असेलही पण, त्याचा शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करणं चुकीचं आहे. यात मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे तुमची आसपासची माणसं. सुदैवाने मला आयुष्यात आईबाबा, मित्रमैत्रिणी आणि जोडीदार हे सगळेच उत्तम लाभले. माझी आई याच क्षेत्रात काम करते, माझ्या बाबांशी माझं नातं खूप चांगलं होतं. माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. माझ्यासोबत तोही सायकोथेरपीचा उपचार घेतो. नवरा-बायकोच्या नात्यावर तुमची मानसिक स्थिती अवलंबून असते. एखादीचं करिअर चांगलं सुरू नसेल तर काहींना अशा प्रकारचा ताण येऊ शकतो, हे खरंय. पण सुदैवाने मला करिअरमध्ये कधीच नैराश्य आलं नाही. त्यामुळे तिथला ताण मला कधीच नव्हता. ताण कुठलाही असो, आत्महत्या हा पर्याय नक्कीच नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने आत्महत्येचा निर्णय एका क्षणात घेतलेला असला तरी त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली असते. त्या व्यक्तीच्या बिघडलेल्या मानसिक अवस्थेकडे दुर्लक्ष झालेलं असतं, ते होता कामा नये.

कुटुंबापासून दूर म्हणजे त्या एकटय़ा राहात होत्या. ‘एकटेपणा’ची चांगली-वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. या अभिनेत्रींच्या बाबतीत एकटेपणाही कारणीभूत आहे का असं विचारल्यावर डॉ. देशमुख नकार देतात. ‘कुटुंबापासून दूर एकटं राहणं हे आत्महत्येचं एकमेव कारण नाही. अनेक माणसं परदेशात त्यांच्या घरापासून लांब राहतात. पण, अशावेळी कुटुंबासोबत सततचा संवाद नसेल तर मात्र मतभेद होऊ शकतात. कुटुंबासोबत संवादामध्ये दरी निर्माण झाली तर ही मुलं इतर नवीन नात्यांचा शोध घ्यायला सुरुवात करतात. अशा परिस्थितीत काहीवेळा गल्लत होते. तर काही एकटे राहणाऱ्या तरुणांमध्ये कणखरपणा, आत्मविश्वास, कुटुंबासोबत संवाद होत असेल तर अशांना काही 33-lp-models-actressअडचण येत नाही’, असं त्या सांगतात. कित्येक बॉलीवूड अभिनेत्री मुंबईबाहेरून येऊन एकटय़ा राहतात. त्याही अशा चढ-उतारांतून गेलेल्या असतात. पण वेळीच स्वत:ला सावरणं हे प्रत्येकाला जमतंच असं नाही.

दीपिका पदुकोण ही सध्याची आघाडीची नायिका. तिलाही डिप्रेशनचा त्रास झाला आहे. ती जाहीरपणे तिच्या या अनुभवाबद्दल बोलते. ‘सकाळी उठल्यावर काहीच करावंसं वाटत नव्हतं, शूटिंगला जावसं वाटायचं नाही. दिवसभरात मूड कधीही बदलायचा, उदासीन वाटायचं, काय करावं, कुठे जावं काहीच कळायचं नाही. या सगळ्यातून मी गेली आहे. पण, वेळीच कुटुंबाची मदत घेतली. उपचारही घेतले आणि त्यातून बाहेर पडले’, असं दीपिकाने अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे. पण, योग्य मार्ग शोधून ती त्यातून बाहेर पडू शकली. दीपिका नैराश्यात असतानाच तिच्या कामाचं कौतुक होत होतं. प्रेमसंबंधांमध्येही तिची गाडी रुळावर येत होती. असं असूनही ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

आजच्या पिढीकडे संयमी वृत्ती नाही असं जुनी पिढी सतत म्हणत असते. पण, आजच्या स्पर्धेच्या जगात तरुण पिढी कामाचा प्रचंड ताण सहनही करते. म्हणजे त्यांच्याकडे तो ताण सहन करण्याची संयमी वृत्ती आहे असं दिसून येतं. डॉ. वैशाली याबाबत सांगतात, ‘सहनशक्ती आणि संयमी वृत्ती या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सहनशक्तीची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. कधी कधी काही जण सहनशक्ती थोडी ताणू शकतात तर काही ताणू शकत नाहीत. एखाद्या कामाला थोडा वेळ लागला तरी चालेल, असा दृष्टिकोन आजच्या तरुण पिढीमध्ये फारसा बघायला मिळत नाही. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जास्त काम करू पण ते लवकर झालं पाहिजे, असा तरुणांचा विचार असतो आणि म्हणूनच ते जास्त काम करताना आलेला स्ट्रेस ताणू शकतात. हा स्ट्रेस ताणण्याची काहींची सहनशक्ती असते तर काहींची नसते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज प्रत्येक क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे की थांबणं, वेग कमी करणं त्यांना परवडणारं नसतं. जे यात टिकून आहेत ते त्यांची संयमी वृत्ती आहे म्हणून नाही तर त्यांची सहनशक्ती ताणण्याची क्षमता जास्त आहे म्हणून. तरुण पिढीमध्ये तुलनेने आजार कमी असतात. पण, त्यांच्यात अपघात आणि आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे. आजची पिढी कमी वयात स्वावलंबी होते. त्यांना उत्तम करिअर घडवायचं असतं. त्याच वयात योग्य जोडीदारही निवडायचा असतो. आर्थिकदृष्टय़ा स्थिर व्हायचं असतं. वयाच्या २० ते ३० च्या टप्प्यात या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या असतात. त्यांच्यासाठी हा काळ तणावाचा असतो. हा ताण सहन झाला नाही किंवा मनाविरुद्ध काही घडलं की गोष्टी टोकाला जातात.’

खरंतर ही समस्या फक्त सिनेसृष्टीतच नाही तर सर्वच क्षेत्रात आढळून येतेय. स्पर्धा सगळीकडेच आहे. पहिल्या वेळी यश मिळालं म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या वेळीही मिळेलच हा अति आत्मविश्वास बाळगल्याने तरुण पिढी अडकते. प्रत्युषाच्या बाबतीत तसंच झालं. ‘बालिका वधू’ या अतिशय लोकप्रिय मालिकेनंतर तिला कामं मिळेनाशी झाली. जी मिळाली ती अपयशी ठरली. मोठं होणं या महत्त्वाकांक्षेची तीव्रता कमी असायला हवी. प्रेमसंबंधात पडताना नीट विचार व्हायला हवा. यश मिळवणं जेवढं कठीण असतं त्याहीपेक्षा ते टिकवून ठेवणं कठीण असतं. ते हाताळण्याचं कौशल्य आत्मसात करण महत्त्वाचं आहे. असं करता आलं नाही तर एखादी व्यक्ती नैराश्यात जाण्याची शक्यता असते. नैराश्यात जाणं हा गुन्हा नक्कीच नाही. पण, त्याबाबत स्पष्ट बोलणं आणि उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कौन्सिलिंगचा पर्याय बऱ्याचदा तरुण मंडळींना पटत नाही. पण, नैराश्यातून बाहेर काढण्याचा तोच एक मार्ग असतो. नैराश्यात आहात हे जितक्या लवकर कळेल तितकं चांगलं. कारण उशिरा कळलं तर त्यावेळी फक्त कौन्सिलिंग करून चालत नाही तर तेव्हा औषधंही घ्यावी लागतात. तसंच त्या परिणामांनाही तोंड द्यावं लागतं. शारीरिक आजारांसह आता मानसिक आजारांकडेही लक्ष देण्याची वेळ आली आहे. कामाचा ताण प्रत्येक क्षेत्रात आहे. तो हाताळण्याची युक्ती मात्र प्रत्येकाने स्वत:चं शोधायला हवी. ती शोधलीत की तुम्ही जिंकलात. मग तुम्हाला यशापेक्षाही खूप काही कमावल्याचा आनंद मिळेल!
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-04-2016 at 01:24 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×