शमिका वृषाली – response.lokprabha@expressindia.com
साडी हा वस्त्रप्रकार ग्रीकांकडून भारतात आला असे अनेक वर्ष मानले जात होते, मात्र पुरातत्वीय पुरावे असे सांगतात की प्राचीन ग्रीक आणि रोम संस्कृतीवरच भारतीय वस्त्रव्यवस्थेचा प्रचंड मोठा प्रभाव होता. त्यामुळे आता साडीचे जनकत्व भारतालाच प्राप्त झाले आहे.

स्त्रिया या जात्याच अदाकार असतात. त्यांच्या अदा हे त्यांचे उपजत सौंदर्य असते. विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत निसर्गाने आपल्या सर्वात सुंदर अंशाला स्त्रीरूपात आकार दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच बहुधा जगातील सुंदर गोष्टींचा संबंध हा स्त्रियांशीच जोडला जातो. हे सौंदर्य खुलविण्यासाठी प्रत्येक स्त्री आपापल्या परीने प्रयत्न करीत असते. आणि साडी हा तर तिच्या जिव्हाळ्याचा विषय.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट, रस्त्यावरून काही कातकरी वृद्ध महिला एका रांगेत जाताना पहिल्या. केसात अबोलीचा गजरा, गळ्यात दागिने, नाकात नथ, पारंपरिक पद्धतीच्या गुलाबी, मातकट  रंगाच्या साडय़ा असा एकूणच त्यांचा शृंगार. हे त्यांचे रूप  क्षणभर का होईना त्यांच्या वयाचे भान विसरायला लावणारे  होते. सकच्छ (कासोटय़ासह)  गुडघ्यापर्यंत नेसलेल्या साडय़ा त्यांच्या सौंदर्याची अनुभूती देत होत्या. सोनेरी काठपदराच्या, बुट्टेदार साडय़ा नीटनेटक्या नेसलेल्या, पहाटेच्या कुंद वातावरणात आपल्या सौंदर्याची उधळण करत होत्या. मग प्रश्न पडतो की, प्रत्येक वयोगटातील स्त्रीचे राजसी सौंदर्य खुलविणाऱ्या साडीचा वापर कधीपासून सुरू झाला असावा? यंदा दिवाळीच्या निमित्ताने साडीच्या इतिहासाचे विविधरंगी, नक्षीदार पदर पडताळून पाहणे सयुक्तिक ठरावे!

वस्त्र हा मानवी इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. मानवाच्या इतिहासाचा पहिला टप्पा येतो तो अश्मयुगाचा. हा मानवाच्या भटकंतीचा काळ मानला जातो. आपल्या बुद्धीच्या जोरावर मानवाने आज जगावर आधिपत्य निर्माण केलेले असले तरी मुळातच माणूस हा प्राणी आहे. अश्मयुग हा त्याचा पशुसमान वावरण्याचा काळ. पशू ते मानव या उत्क्रांतीच्या प्रवासात अन्न, वस्त्र, निवारा या त्याच्या मूलभूत गरजा झाल्या. याच गरजांच्या पूर्ततेतूनच मानवाने वेगवेगळ्या संस्कृती जन्माला घातल्या. मात्र यातील वस्त्र ही प्राथमिक गरज असली तरी आजचे त्याचे बहुतांश स्वरूप हे फॅशन म्हणूनच अधिक प्राधान्यक्रमावर आलेले दिसते.  म्हणूनच साडीच्या अस्तित्वाचा शोध घेत असताना, मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वस्त्राचा उगम केव्हा झाला हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यावर अश्मयुगीन मानव हा रानटी अवस्थेत वावरत होता. भूक व मथुन या त्याच्या प्राथमिक गरजा होत्या. मग साहजिकच प्रश्न पडतो की, या गरजांमध्ये वस्त्र ही गरज केव्हा निर्माण झाली? आजच्या मान्यतेप्रमाणे वस्त्रनिर्मितीमागे लज्जा हे कारण असावे का, या मुद्दय़ावर मानववंशशास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ यांनी सखोल संशोधन केलेले आहे. वस्त्र हे कधीच मानवाने लज्जेखातर परिधान केले नाही. ‘संरक्षण’ हीच वस्त्रनिर्मितीच्या मागची मूळ गरज असावी, असे जवळपास सर्वच संशोधकांना त्यांच्या अभ्यासामध्ये लक्षात आले. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवाच्या शरीरात अनेक बदल झाले. शरीर पूर्णपणे झाकणारे केस कमी झाले आणि शरीर प्रत्यक्ष वातावरणाला सामोरे जाऊ लागले. याच कारणामुळे ऊन, पाऊस, थंडी यासारख्या वातावरणीय बदलाशी अनुरूप होण्यासाठी मानवाने वस्त्रांचा अवलंब केला. वस्त्रनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळात झाडाची वल्कले, पाने, जनावरांची कातडी या साधनांचा वापर करून मानवाने शरीराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काळ पुढे सरकत गेला आणि निसर्गाचे ज्ञान मानवाला होऊ लागले. त्यांनतर मात्र मानवाने वस्त्रनिर्मितीसाठी कापसाचा वापर करण्यास सुरुवात केली. म्हणूनच  साडीचा इतिहास धुंडाळत असताना आजच्या वस्त्रनिर्मितीचा जनक मानल्या गेलेल्या  कापसाचे मूलस्थान शोधणे महत्त्वाचे ठरते.

जागतिक पातळीवर प्राचीन भारतालाच कापसाचे उगमस्थान मानले गेलेले आहे. म्हणूनच प्रत्यक्षात या कपाशीच्या अस्तित्वाचे पुरावे शोधत असताना अश्मयुगाकडून वैदिक काळाकडे धाव घ्यावी लागते. वेद हे भारतीय संस्कृती समजून घेण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. वेदांमध्ये कापसाचा उल्लेख सापडत नाही. मग कापसाचे उगमस्थान भारत का असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. म्हणूनच या प्रश्नाची उकल करताना पुरातत्त्वीय पुरावे मदतनीस ठरतात. त्यातून कापसाच्या उगमस्थानाचे उत्तर सापडते ते भारतीयांचा मानिबदू ठरलेल्या हडप्पा संस्कृतीच्या उदरात. या संस्कृतीच्या संदर्भातील अनेक ठिकाणच्या उत्खननात कापसाचे धागे व सूत कातण्याच्या चात्या किंवा टकळीचे अवशेष सापडले आहेत. तर प्राचीन भारतातील मेहेरगढम् (आता पाकिस्तानमध्ये) या ठिकाणी कापसापासून वस्त्रनिर्मितीचे सर्वात प्राचीन अवशेष सापडले आहेत. त्यांचा काळ सुमारे इसवी सनपूर्व ६००० वष्रे इतका मागे जातो. म्हणूनच भारत हाच कपाशीचे मूलस्थान हे संशोधकांनी मान्य केलेले आहे.

म्हणूनच बहुधा अभ्यासक साडीच्या अस्तित्वाची पाळेमुळे हडप्पा संस्कृतीत शोधण्याचा प्रयत्न करतात. हडप्पा संस्कृतीत सर्वागाला गुंडाळलेले कापड असा काहीसा वेश दिसतो. तत्कालीन समाजात शालीसारखे वस्त्र खांद्यावरून घेण्याचा प्रघात होता. हे उत्खननात सापडलेल्या शिल्पकृतींवरून लक्षात येते. म्हणूनच या प्राचीन काळच्या विशिष्ठ पेहरावामधून नंतर साडी विकसित होत गेली असावी असे संशोधक मानतात. त्यामुळे हडप्पा कालीन शिल्पकृती हा साडीच्या अस्तित्वाचा पहिला पुरातत्त्वीय पुरावा मानला जातो.

असे असले तरी वैदिक काळाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. लेखात नमूद केल्याप्रमाणे कापसाचा उल्लेख वेदांमध्ये सापडत नसला तरी आर्य लोकरीची तसंच चर्मवस्त्रे परिधान करीत असत असा संदर्भ सापडतो. वैदिक साहित्यात सूचिसिद्ध चर्मवस्त्रांचे सविस्तर वर्णन केलेले सापडते.

 

वेदांमध्ये नमूद केल्याप्रमाणे वस्त्रांचे साधारण चार प्रकारांत विभाजन होते. हे प्रकार पुढीलप्रमाणे –

’      उष्णीव : हे वस्त्र फेटय़ासारखे किंवा पागोटय़ासारखे डोक्याला गुंडाळून व मानेजवळ गाठ मारून स्थिर करण्यात येत असे.

’      अधिवास : हे उत्तरीय उपरण्यासारखे खांद्यावरून घेण्यात येत असे. अधिवास ओघळल्यामुळे उषेचे वक्षस्थळ उघडे पडल्याचा उल्लेख ऋग्वेदात येतो.

’      निवी : हे मलवस्त्र गुह्य़ांगे झाकण्यासाठी काचासारखे किंवा लंगोटासारखे बांधण्यात येत असे. हे वस्त्र रुंद कांठळीसारखे असून त्याची गाठ नाभीजवळ मारून त्याचा धागेदार सोगा मोकळा सोडण्यात येत असे. मुनींचे मलवस्त्र चर्माचे तर सुस्थितीतल्यांचे मऊ, रंगीत व रुंद असे असा उल्लेख अथर्ववेदात सापडतो.

’      वस्त्र : यालाच परिधान, वसन, वास असे म्हणत असत. हे अधोवस्त्र, निवीवरून धारण करण्यात येत असे. त्याची रुंदी व पोत परिधान करणाऱ्याच्या सामाजिक, सांपत्तिक दर्जावर अवलंबून असे.

अधिवास व वस्त्र यांच्या समीकरणात आजच्या साडीचे धागे दृष्टिपथास येतात. असे असले तरी तिथे साडी या वस्त्राचा ठोस संदर्भ मात्र येत नाही. म्हणूनच साडीच्या शोधात वैदिक काळाकडून थोडे पुढे सरकावे लागते.

नंतरच्या काळात साडीचा उल्लेख अनेक विशेषणांनी केला जातो. त्यात प्रामुख्याने सारी, सिरी, चिरी, नाटी, लुगडे, पातळ यांचा समावेश होतो. साडीची सहा ते नऊ यार्ड सलग असे, न शिवलेले वस्त्र अशी व्याख्या केली जाते. आज आपण साडी हा शब्द सहज वापरत असलो तरी हा शब्द कधी वापरात आला हे जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

काही अभ्यासक ‘साडी’ या शब्दाचा उगम ‘सत्तिका’ या प्राकृत शब्दापासून तयार झाला असावा असे मानतात तर काही ‘चिरा’ (कापड) या संस्कृत शब्दापासून झाला असे मानतात. काही अभ्यासक साडी हे नाव संस्कृत ‘शाटी’ म्हणजेच कापडाची पट्टी यावरून आले असावे  आणि त्याचेच प्राकृत रूप साडी आहे असे सांगतात. जुन्या जातक कथांमध्ये स्त्रियांच्या वस्त्रांसंबंधी सट्टिका किंवा सत्तिका या शब्दाचा उल्लेख सापडतो.

साडीचा शोध घेत असताना भारतीय संस्कृतीचा आरसा असलेल्या महाभारतात डोकावून पाहणे गरजेचे ठरते. महाभारतकालीन पुरुष उत्तरीय व अधिवास अशी वस्त्रे परिधान करीत असत. तर स्त्रियांचे नेसणे विकच्छ असे, त्यांच्या लुगडय़ाला पदर असे, तो पदर उत्तरीयाऐवजी घरातल्या घरात त्या खांद्यावरून घेत असत. परंतु त्या चोळी वापरत नसत असे चिंतामणी विनायक वैद्य यांनी ‘महाभारत : उपसंहार’ या ग्रंथात नमूद केलेले आहे. यावरून तत्कालीन स्त्रियांच्या वस्त्रांच्या रचनेतील मोकळेपणा लक्षात येतो. अशाच प्रकारचे वस्त्रप्रकार हे आपल्याला प्राचीन भारतीय शिल्पांमध्येही पाहावयास मिळतात. म्हणूनच प्राचीन भारतातील साडीचा इतिहास जाणून घेण्यासाठी या शिल्पांचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

भारतीय इतिहासातील महत्त्वाचा काळ शिशुनाग व नंद वंशांचा. या काळी म्हणजेच  इसवी सनपूर्व ६४२ – ३२० च्या सुमारास वस्त्र परिधान करण्याच्या वेगवेगळ्या पद्घती व शैली सौंदर्यदृष्टीला अनुसरून निर्माण झाल्या. त्यात प्रामुख्याने  हस्तीशौंडिक, मत्स्यवालक, चतुष्कर्णक, तालवृन्तक, शतवल्लिक, कायाबंधन इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.  याची माहिती आपल्याला तत्कालीन बौद्ध साहित्यातून मिळते. या साहित्यात नमूद केल्याप्रमाणे एखादे वस्त्र कमरेभोवती गुंडाळल्यानंतर पुढच्या बाजूस बांधलेल्या टोकाकडून उर्वरित वस्त्र हत्तीच्या सोंडेप्रमाणे सोडले जाते त्या पद्धतीस हस्तीशौंडिक असे म्हणतात. शुंग काळातील शिल्पांमध्ये ही पद्धत विशेष प्रचलित होती. तर चतुष्कर्णक या प्रकारात वर दोन व खाली दोन अशा प्रकारे चारही कोपरे दाखवत वस्त्र परिधान केले जात असे. तालवृन्तक  या प्रकारात ताल वृक्षाच्या पानाच्या आकाराप्रमाणे निऱ्या घेऊन, त्याच आकारात निऱ्या लोंबत्या सोडल्या जात असत. शतवल्लिक या प्रकारात वस्त्राच्या अनेक चुण्या दाखवत हे वस्त्र परिधान केले जात असे. तर कायाबंधनात कमरेभोवती नेसलेले वस्त्र सुटू नये यासाठी कायाबंध किंवा कायाबंधन वापरले जात असे. सोप्या शब्दात सांगावयाचे झाले तर आजचा बेल्ट म्हणजेच तत्कालीन कायाबंधन होय. या सर्वच प्रकारांत साडीचे अस्तित्व कमी-अधिक प्रमाणात मात्र प्रकर्षांने जाणवते.

शिशुनाग व नंद वंशांनंतरचा येतो तो मौर्य कालखंड. मौर्यकालीन यक्ष मूर्तीमध्ये धोतर व उपरणे प्रामुख्याने दिसते तर स्त्री मूर्तीमध्ये उत्तरीय व अधिवास यांचा वापर केलेला आढळतो. याच काळात कमरेवरच्या कायाबंधाला वस्त्र खोचले जाऊन त्याच्या निऱ्या आताच्या धोतरासारख्या खोचल्या जात असत. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात स्त्रिया टाचेपर्यंत साडी, कमरेला गोंडेदार मेखला किंवा कमरपट्टा व अंगाखांद्यावर दुपट्टा घेत असत. सांची येथील शिल्पावरून स्त्रिया त्या काळी सकच्छ लुगडी नेसत व कधी साडीचाच पदर कमरेभोवती गुंडाळून घेत, असे दिसते. मौर्यानंतरचा महत्त्वाचा शुंग कालखंड. या काळात भारहूत स्तुपावरील शिल्पातून तत्कालीन वस्त्र व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकला जातो. तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजेच कुषाण कालखंडात भारतीय वस्त्रांवर ग्रीक व मध्य आशियायी संस्कृतींचा प्रभाव आढळतो. गांधारकालीन स्त्रिया घोटय़ापर्यंत पोहोचणाऱ्या साडय़ा नेसून त्यांवर मेखला घालत व पुढच्या बाजूला खाली लोंबणारा एक पटका खोचत असत.

गुप्तकाळात म्हणजेच इसवी सन तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत  स्त्रिया साडी, वैकक्ष (उपरणे) यांचा वापर करीत. त्यांच्या साडय़ांवर फुलांचे व चिमण्यांचे भरतकाम केलेले असे. ऋतुमानानुसार वस्त्रे नेसण्याची प्रथा होती; त्यानुसार स्त्रिया वसंत ऋतूत केशरी साडय़ा व तांबडय़ा रंगाचे स्तनपट्ट वापरीत. गुप्त व वाकाटककालीन शिल्पात व भित्तिचित्रांत स्त्रियांनी परिधान केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ओढण्या आधिक्याने पाहायला मिळतात.

गुप्तकाळात वस्त्र प्रकारात अवगुंठन नावाने एक नवीन वस्त्र नजरेस पडते. शरीराच्या वरच्या भागात परिधान करावयाच्या उत्तरीयातून अवगुंठन विकासित झाले असे मानले जाते. वासवदत्तेच्या अवगुंठनाला संस्कृत कवी भासाने यवनिका ही संज्ञा दिली आहे. यावरून असे लक्षात येते की हा वस्त्रप्रकार बहुधा ग्रीकांकडून भारतात आला असावा.

त्याच काळात दक्षिणेत मात्र वस्त्रप्रकारात थोडा फरक आढळतो. उष्णीष आणि उत्तरीय ही दोन्ही वस्त्रे दक्षिणेत नष्ट झाली असून त्यांची जागा नेसत्या वस्त्रांच्या पदराने घेतलेली दिसते. तर उत्तरेतील स्त्रियांनी मात्र उत्तरीयाची व्याप्ती वाढवून त्याचा पडदा म्हणून उपयोग केलेला दिसतो.

उत्तर व दक्षिण यांचा विचार करत असताना पश्चिमेकडे म्हणजेच महाराष्ट्रात साडीचे सर्वात जुने संदर्भ हे सातवाहन काळातील आहेत. वेगवेगळ्या समाजातील साडय़ांच्या पद्धती व कंचुकीचे प्रकार हे सातवाहनकालीन प्राकृत गाथांमध्ये आढळतात. ‘गाथासप्तशती’ या सातवाहन राजा हाल विरचित ग्रंथातून तत्कालीन महाराष्ट्रीय समाज जाणून घेण्यास मदत होते. हा ग्रंथ इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील असून या ग्रंथात तत्कालीन कपडय़ांचे विविध संदर्भ सापडतात. अंशुक, दुकूल, निवसन, पट, पटक, पट्टाशुंक, वड, वस्त्र, साउली, सिचय यासारख्या नेसत्या वस्त्रांसोबत कंचुकिका, कुर्पास या  स्तनांशुकांचे संदर्भ विशेष आहेत. तत्कालीन स्त्रिया तलम, नाजूक पोताचे, रंगीत वस्त्र परिधान करीत असत. ‘गाथा सप्तशती’तील गाथा या सामान्यजनांशी निगडित आहेत. म्हणूनच या गाथांमधून साडी-चोळीचा शोध घेणे रंजक ठरते.

अप्पत्तपत्तअं पाविऊण णवरङ्गअं हलिअसोण्हा।
उअह! तणुई ण माइअ रुन्दासु वि गामरच्छासु।।४१।।

ही प्राकृत गाथा साडीच्या संदर्भासाठी महत्त्वपूर्ण आहे. या गाथेत साडीचा उल्लेख आलेला आहे, या गाथेनुसार बारीक असलेल्या कोण्या एका शेतकऱ्याच्या सुनेला नवीन साडी मिळाली आहे. त्या साडीत ती इतकी फुलली आहे की तिला रस्तादेखील कमी पडतोय, असा संदर्भ आहे.

दोअङ्गुलअकवालअपिणद्धसविसेसणीलकञ्चुइआ।
दावेइ थणत्थलवण्णिअं व तरुणी जुअजणाणम्।।२०।।

अज्जाइ णीलकञ्चुअभरिउव्वरिअं विहाइ थणवट्टम्।
जलभरिअजलहरन्तरदरुग्गअं चन्दबिम्ब व्व।।९५।।

या उपरोल्लिखित दोन गाथा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या गाथांमध्ये कंचुकीचा संदर्भ आला आहे. या गाथांमधल्या तरुणींनी गडद निळ्या रंगाची कंचुकी धारण केल्याचा उल्लेख आहे.

सातवाहन राजे हे इंडो-रोमन व्यापारासाठी प्रसिद्ध होते. सातवाहन राजांनी समुद्रमाग्रे होणाऱ्या व्यापारावर विशेष वचक ठेवला होता. या काळातील ग्रीक व रोमन साहित्यातून भारतातून येणाऱ्या निळ्या (इंडिगो ब्लू) कपडय़ाची मागणी नमूद केलेली आहे.

भारतीय साहित्यात-शिल्पांमध्ये आजच्या साडीच्या मुळाचा शोध घेत असताना, असाही एक मतप्रवाह सापडतो, की ज्यात साडीचे मूळ हे  ग्रीक व रोमन संस्कृतीत सापडते असे मानले गेलेले आहे. ग्रीकांकडून आलेली साडी ही भारताच्या वायव्य सीमेवर जन्मास आलेल्या इंडो-ग्रीक संस्कृतीच्या माध्यमातून भारतात प्रसिद्धीस पावली असे मानले जाते. ग्रीक व इंडो ग्रीक, रोमन शिल्पांमध्ये स्त्रियांनी साडीसदृश वेश परिधान केलेला दिसतो. तत्कालीन भारतीय शिल्पात कंचुकी, चोळी, स्तनपट्ट अपवादानेच आढळतात व वस्त्र परिधानाचे इतर विविध प्रकार सापडतात. म्हणूनच कदाचित साडीचे हे मूळ ग्रीक संस्कृतीत शोधण्याचा अट्टहास केला जातो. ग्रीक कला ही शिल्प निर्मितीच्या बाबतीत अतुलनीय मानली जाते, हे तितकेच खरे आहे. मानवी शरीराचे, कपडय़ांचे, भावभावनांचे हुबेहूब वर्णन आपल्याला या शिल्पांमध्ये सापडते. याच शिल्पांमध्ये स्त्रियांनी ब्लाऊजसदृश कपडय़ावर लांबलचक दुसरा कपडा गुंडाळल्याचे दिसते. मग साहजिकच प्रश्न पडतो की भारतीय संस्कृतीचे मानचिन्ह असलेली साडी इथे कशी काय? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ग्रीक शिल्पकलेचा आढावा घेणे गरजेचे ठरते.

ग्रीक शिल्पकला आर्काईक काळ (इसवी सन पूर्व ६५० ते ५००), क्लासिक काळ (इसवीसन पूर्व ५०० ते ३२३) आणि हेलेनिस्टिक काळ (इसवीसन पूर्व ३२३ ते २७) या तीन काळात विभागली गेलेली आहे. पहिल्या दोन कालखंडात शिल्पांचे स्वरूप साधे होते. या काळात सापडणारी शिल्पे साधीसरळ तसेच विवस्त्र होती. तर तिसऱ्या कालखंडात निर्माण झालेली शिल्पे उन्नत तसेच वस्त्रासहित आहेत. याच कालखंडात स्त्री तसेच पुरुष मूर्तीवर साडीसदृश वस्त्र पाहावयास मिळते. म्हणजेच नियमित वस्त्रांच्या वापराचे उल्लेख हेलेनिस्टिक काळापासून ग्रीक इतिहासात मिळावयास सुरुवात होते. साडीचा उगम ग्रीकमध्ये मानला तर तो याच काळातील असणे गरजेचे आहे. परंतु ग्रीकांचे कापूस व लोकर यांच्या उत्पादन तंत्राबद्दलाचे अज्ञान सर्वज्ञात आहे. ‘भारतात एका जंगली झाडाला लोकरीची फळे येतात व तेथील लोक त्याच्या धाग्याची वस्त्रे विणतात’, असा उल्लेख इसवी सनपूर्व पाचव्या शतकात हिरोटोडस या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या नोंदींमध्ये केलेला दिसतो. म्हणजेच ग्रीक इतिहासातील क्लासिकल कालखंड, या काळातील शिल्पे वस्त्रहीन आहेत. म्हणजेच ग्रीकांना या काळात वस्त्र निर्मितीचे ज्ञान नव्हते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  प्राचीन ग्रीसमध्ये इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकापासून लोकरीचे व लिननपासून तयार केलेले कपडे मोठय़ा प्रमाणात वापरात असलेले दिसतात. लोकर कशी मिळते याचेच ज्ञान नसणारे कापड कसे तयार करतील, हा प्रश्नच पडतो. याचाच अर्थ वस्त्र हा प्रकार ग्रीकमध्ये बाहेरून आयात केला जात असावा. याचे ठोस पुरावेही आपल्याला मिळतात. इसवी सन पूर्व ३५० मध्ये थीओकेटस या ग्रीक विचारवंताने भारतात कापसाच्या झाडांची हारीने लागवड करतात असे नोंदले आहे. तर सिकंदरच्या स्वारीपासून युरोपियन बाजारपेठांत िहदी कापडाची ख्याती झाली होती, याचे लिखित पुरावे सापडतात हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर युरोप हे रोम साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेले. भारतातून रोममध्ये निर्यात होणाऱ्या कापडाचा पहिला उल्लेख ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकातल्या ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्रिअन सी’ या ग्रंथात येतो. तसेच हा काळ भारतीय इतिहासात व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला गेलेला आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इंडो-रोमन व्यापार मोठय़ा प्रमाणात होत असे व हा काळ आपल्या देशाच्या इतिहासातील भरभराटीचा काळ होता. भारतातून अनेक वस्तू रोममध्ये निर्यात केल्या जात होत्या. या वस्तूंमध्ये रेशमाचे व लोकरीचे कपडे यांचाही समावेश होता. कौटिल्याने अर्थशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे यवन देशात लोकरीच्या चादरी, लोकरीचे कापड निर्यात केले जात होते. पेरीप्लस या ग्रंथातही भारतातून आयात होणाऱ्या लोकरीच्या वस्त्रांचा उल्लेख सापडतो. रेशीम चीनमध्ये उत्पादित केलेले असले तरी भारतातून येणाऱ्या रेशमी कपडय़ांचा उल्लेख पेरिप्लस या ग्रंथात विशेषत्वाने केला जातो. कच्चा माल चीनचा असला तरी त्यापासून तयार केलेले कपडे भारतातून जात असत. रोमन लोक रेशमी कापडाचे प्रचंड चाहते होते. रोमन सम्राट ऑगस्टसच्या काळात रेशीम व्यापार मोठय़ा प्रमाणात भरभराटीला आला होता. तर प्राचीन काळापासून चीनचे रेशीम दर्जेदार व लोकप्रियही होते. म्हणूनच पश्चिमेकडील साम्राज्ये चीनकडून रेशीम आयात करत. या व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गाचाही इतिहास तितकाच महत्त्वाचा ठरतो. हा महामार्ग सध्याचे इराण-इराक म्हणजेच प्राचीन पíशयामाग्रे युरोपात जात असे. ज्या साम्राज्याचे या मार्गावर वर्चस्व, तोच रेशीम व्यापारावर नियंत्रण ठेवू शकत होता. म्हणूनच रोम साम्राज्याने या मार्गावर आपले आधिपत्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पाíथअन या पíशअन साम्राज्याने ते होऊ दिले नाही आणि रोमच्या त्या मार्गाने होणाऱ्या व्यापारावरही बंदी घातली. त्यामुळेच रोमला पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे होते. ही कोंडी भारतीय व्यापाऱ्यांनी फोडली आणि समुद्रमार्गे रोमसोबत रेशमाच्या व्यापारास परत सुरुवात झाली. चीनच्या युनान परिसरातून गंगेच्या खोऱ्यात रेशीम येत असे व तेथून किनारपट्टीच्या बंदरांमार्फत भरोच-सिंध, मुझिरिस यासारख्या बंदरांतून त्याची निर्यात होत असे. चीनमधून येणाऱ्या पक्क्या मालाव्यतिरिक्त, कच्चा मालही भारतात येत असे. इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत चीनच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून म्हणजेच चीनच्या रेशमी धाग्यांचे कपडय़ांत रूपांतर करून मग समुद्रामाग्रे निर्यात होत असे. गंगेच्या खोऱ्यातून रेशीम कापड येत असे याचा उल्लेख पेरिप्लसमध्ये सापडतो. सीनापट्ट रेशमाचा उल्लेख व त्याच बरोबरीने या कामात सहभागी असणाऱ्या भारतीय कारागिरांना वेळोवेळी उच्चपदस्थांनी भेट देऊन प्रोत्साहित करावे असे कौटिल्य नमूद करतो. नंतरच्या काळात इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारतीयांनी रेशीम किडय़ांच्या कोशापासून रेशीम बनविण्याचे तंत्र शिकून घेतले. म्हणूनच रोमन साहित्यात भारतातून येणाऱ्या रेशमाचा उल्लेख प्रकर्षांने जाणवतो आणि भारतीय रेशमी कापड लोकप्रिय असल्याची माहिती मिळते. थोरला प्लीनी असे नोंदवतो की हा व्यापार तसाच चालू राहिला तर एक दिवस रोमन साम्राज्य भारताकडे गहाण ठेवावे लागेल. हे सर्व रोमन स्त्रियांच्या हट्टापायी घडत होते. कारण रोमन महिला सोन्याच्या बदल्यात भारतीय कापड खरेदी करत होत्या. आणि त्याचे पर्यावसान रोमचे अर्थभांडार रिकामे होण्यात झाले, असेही तो नोंदतो. औरेलिअन या ग्रीक विचारवंताने नमूद केल्याप्रमाणे भारतीय रेशीम कापडाची किंमत सोन्याप्रमाणे होती. म्हणूनच टाइबेरिअसया रोमन सम्राटाच्या काळात रोममध्ये रेशमाच्या आयातीवर बंदी घातली गेली.

याशिवाय भारतीय सुती कापडाला तत्कालीन ग्रीक-रोम बाजारपेठेत प्रचंड मागणी होती. या व्यापाराच्या काळात भारतीय वस्त्र  व्यवस्थेचा ग्रीक व रोमन वस्त्र संस्कृतीवर मोठय़ा प्रमाणात पगडा होता हे सिद्ध होते. ग्रीक व रोमन वस्त्र संस्कृतीचा आढावा घेतला असता टोगा, टय़ुनिक, स्टोला, पाला असे वस्त्रप्रकार सापडतात. हे सर्व उल्लेख इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकापासूनचे आहेत. पाला व स्टोला हा प्रकार स्त्रिया परिधान करीत असत. तर टोगा पुरुष वापरत असत. टोगा हे वस्त्र ग्रीक व रोमन यांनी मेसोपोटेनियन संस्कृतीतून आत्मसात केले असावे असे मानले जाते. टय़ुनिक या कुडत्यासमान किंवा पायघोळ वस्त्रावर पाला, स्टोला, टोगा शालीप्रमाणे गुंडाळत असत. म्हणूनच शिल्पातून त्यांचे स्वरूप हे साडीप्रमाणे भासते. टोगा हा प्रकार सुरुवातीच्या काळात गोलाकार होता नंतर त्याचे स्वरूप आयताकृती झाले व त्याला प्यालीअम असे नाव मिळाले. हा सर्व बदल इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहे. म्हणजेच इंडो-रोमन व्यापाराच्या काळातील आहे. यावरून भारतातून येणारा कपडा भारतीयांप्रमाणे परिधान करावा या जिज्ञासेतून ग्रीक स्त्री-पुरुषांनी आयताकृती कपडा गुंडाळायला सुरुवात केली असावी हे मात्र नक्की.

गुप्त काळानंतर वस्त्रांमध्ये अनेक बदल झालेले दिसतात. साधारणत इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत स्त्री वस्त्रांमध्ये पूर्वीचीच परंपरा चालू राहिली परंतु प्रांतानुसार बदल झाले असे दिसते.  कंचुकी किंवा स्तनपट्ट तसेच धोतीसदृश अधिवास, साडय़ांचे प्रकार, कुडत्यांचे प्रकार हे तत्कालीन शिल्प व चित्रांमधून पाहावयास मिळतात. महत्त्वाची बाब म्हणजे किमान दहाव्या- अकराव्या शतकापर्यंत स्त्रियांच्या वस्त्रात एक प्रकारचा बोल्डनेस-मोकळेपणा जाणवतो. वस्त्रांसंदर्भात बंधन दिसत नाही. परंतु यानंतर मात्र परकीय आक्रमणे सुरू झाली आणि स्त्रियांवर कपडय़ांसह अनेक बंधने आली.  उष्ण कटिबंधातील भारतासारख्या देशात वातावरणीय बदलांना अनुसरून वेशभूषा केली जात असे, म्हणूनच बहुदा प्राचीन शिल्पांमध्ये स्त्री ही कंचुकी विरहित वावरताना दिसते.

मध्ययुगीन काळात साडी निरनिराळ्या स्वरूपात आपल्या भेटीस येते. दहाव्या शतकानंतर मगध, ओडिशा, बंगाल आदी पूर्वेकडील प्रदेशांतील स्त्रिया लुगडे नेसत व त्याच्या एका पदराने वक्षस्थळ झाकून तोच पदर डोक्यावरून घेत. पेशवाईतील स्त्रिया प्रसंगानुरूप लुगडी, साडय़ा, चिरडय़ा, पातळ, पितांबर, शालू, पठणी आदी प्रकारची वस्त्रे नेसत व अंगात चोळी घालत. यानंतरचा काळ म्हणजे भारतातले ब्रिटिश राज्य. हा व्हिक्टोरियन कालखंड. या कालखंडात युरोपातल्या स्त्रिया डोक्यापासून पायापर्यंत वस्त्र परिधान करत. याही काळात भारतात केरळ-बंगाल यासारख्या प्रांतांत चोळी घालायची पद्धत नव्हती. मध्ययुगीन प्रवासवर्णनातदेखील याचे संदर्भ सापडतात. भारतातील स्त्रियांचा चोळीविरहित वावर ब्रिटिशांना खटकत असे. १८६० सालची गोष्ट. रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ सत्येंद्रनाथ हे आयसीएस अधिकारी असल्याने, त्यांना गव्हर्नरकडे पार्टीसाठी सपत्निक निमंत्रण असे. अशाच एका पार्टीला बंगाली पद्धतीने चोळीविरहित साडी नेसून गेलेल्या त्यांच्या पत्नीला- ज्ञाननंदिनीदेवींना प्रवेश नाकारला गेला. आणि मग टागोर घराण्यातल्या स्त्रिया पाश्चात्त्य पद्धतीचे ब्लाऊझ घालून साडी नेसू लागल्या. बंगालमध्ये इंग्रजांनी चोळी बंधनकारक केली म्हणून उठाव झाल्याचा इतिहास आहे. कंचुकी माहीत असूनही कधी सक्ती न झालेल्या भारतीय स्त्रीवर लज्जेखातर आणि परकीयांच्या संस्कृतीच्या मान्यतेखातर ब्लाउज परिधान करण्याची वेळ आली.

आज आपण पाहतो नऊवारीची जागा पाचवारी व सहावारीने घेतली असली तरी नऊवारीचे मात्र वेड आजही कमी झालेले नाही. महाराष्ट्राची शान असलेली साडी म्हणजेच नऊवारी. नऊ-वार सलग न शिवलेले कापड म्हणजे नऊवारी असा शब्दश अर्थ आहे. महाराष्ट्रीय स्त्रियांची नऊवारी साडी नेसण्याची पारंपरिक सकच्छ पद्घती अतिशय वैशिष्टय़पूर्ण व रुबाबदार असून, त्यात कलात्मकरीत्या सर्वाग झाकले जाऊन देहसौष्ठव उठून दिसते. त्यात शालीनता व भारदस्तपणा असून, ती हालचालीस सुटसुटीत व योग्य पद्घती आहे. म्हणजेच शारीरिक कष्टाचे काम करण्यासाठी नऊवारी नेसणे सोयीचे होते. त्या काळी स्त्रिया ही साडी नेसून पोहायलाही जात असत असेही संदर्भ सापडतात. नऊवारीच्या सौंदर्याची भुरळ अनेकांना पडली. विख्यात चित्रकार राजा रवीवर्माही त्यातून सुटला नाही. या प्रकारच्या साडीत स्त्रीचे सौंदर्य आणि सौष्ठव खुलून दिसते, असे त्याचे मत होते.

आजची साडी :

वर्षां ऋतूच्या आगमनानंतर आकाशात होणारी सप्तरंगांची उधळण मन मोहून टाकणारी असते. हे रंग जसे निसर्गाचे सौंदर्य वाढवत असतात तसेच ते मानवी जीवनालाही आपल्या छटा चढवत असतात. म्हणूनच मानवी मन हे या रंगांना आपल्या आयुष्यात उतरविण्याचा प्रयत्न करते. मग तो आकाशात तरळणारा सप्तरंगांचा पट्टा असो की याच सप्तरंगांत न्हायलेली साडी, म्हणूनच भारतीय संस्कृतीची ओळख असलेली ही साडी शालिनतेत सौंदर्यवती ठरते. हजारो वर्षांत जगभर वस्त्र संस्कृतीत अनेक बदल झालेत, तरीही या स्पध्रेत तग धरून आहे ती साडीच! साडीचा प्राचीन इतिहास जसा समृद्ध व कलावंतांचा आहे, तसाच वर्तमानही रसिकांचा आहे. काळाच्या ओघात या रसिक मनानेच साडीच्या रूपात अनेक बदल घडवून आणले. आज साडी आपल्याला विविध रूपांत पाहायला मिळते. प्रांतानुसार, कलाकुसरीनुसार, तंत्रानुसार, रंगांनुसार, कपडय़ानुसार या साडीची रूपे बदलतात. मग ती कधी पठणी म्हणून येते तर कधी इरकली, तर कधी नागपुरी म्हणून आपल्या भेटीस येते. प्रत्येकीची तऱ्हाच न्यारी. याच तऱ्हेचे वर्णन करणाऱ्या सरोजिनी बाबर यांच्या कवितेचा येथे उल्लेख केला तर ते सयुक्तिक ठरावे.

बनारसचा शालू भरजरी
येवल्याची रेशमी पठणी
इंदूरची ती नाजूक काळी
धारवाडची जाड इरकली
सुरतची ती छापील साडी
भिवंडीची शुभ्र पांढरी
मालेगावची साडी काकाणी
इचलकरंजीची जाडी भरडी
राजस्थानची लाल पिवळी
लखनौची ती साडी निराळी

या साडय़ांचा पदर ही तर त्यांची विशेष खासियतच. कधी मोर तर कधी चौकड तर कधी अजून काही लेवून आपल्या सौंदर्याची भुरळ हा पदर तिच्या चाहत्यांना घालत असतो. आता पदर म्हटला की कलाकुसर आलीच. साध्या चौकडीचे नक्षीकामही इतक्या विविधतेने केलेले असते की त्या विविधतेनुसार देखील साडीचे प्रकार बदलतात. याच चौकडीत कधी उभा धागा एका रंगाचा असतो तर दुसरा आडवा धागा दुसऱ्या रंगाचा अशा प्रकारे साडी दुरंगी पोत धारण करत असे. तर कधी एकच रंग लेवून ‘टोपपदर’ म्हणून समोर येते. तर पट्टय़ापट्टय़ांच्या नक्षीकामासह ‘गंडेरी’ म्हणून प्रसिद्ध पावते. प्रत्येक साडीची रचनाच वेगळी.

मागच्या काही वर्षांत साडी आधुनिकतेचीही जोड घेऊन समोर आलेली दिसते. ती यंत्रमागावरच्या पातळाच्या स्वरूपात विकसित होऊन छापील डिझाईनमध्येही दिसू लागली. साडी व चोळी असे समीकरण नेहमीच एकत्रित येते. साडीच्या छटा इतक्या निरनिराळ्या असू शकतात मग चोळी तरी का मागे राहील.. म्हणूनच चोळी ते ब्लाऊज हे परिवर्तन दिसते. तसेच साडीप्रमाणे ब्लाऊजमध्येही ही कालानुरूप बदल झालेले दिसतात.

प्रांतानुसार साडीचा प्रकार बदलतो. मराठी विश्वकोशात नमूद केल्याप्रमाणे आंध्रमधील स्त्रिया आठवारी साडी दोन-तीन प्रकारांनी नेसतात. तर तमिळ स्त्रियांची साडी सात ते दहावार लांबीची असते. कर्नाटकमधील सुती साडय़ा व इरकली, आंध्र प्रदेशातील नारायणपेठ तलम साडय़ा तसेच तमिळनाडूतील कांजीवरम् रेशमी साडय़ा, माळवा येथील माहेश्वरी, बंगालची जामदनी, गुजरातची पटोला, बांधणी, बनारसचा बनारसी शालू या साडय़ा स्त्रियांच्या विशेष आवडीच्या आहेत. आता या साडय़ांची जागा  सुती रेशमी, गर्भरेशमी, कृत्रिम रेशमी, नायलॉन, रेयॉन, शिफॉन, जॉर्जेट, र्ऑगडी, ठाण, टसर, सॅटिन, टेरिकॉट, टेरिवायल, चिकन, वुली इ.असंख्य वस्त्रप्रकारांतील साडय़ांनी  घेतली तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही. ओरिसाची इक्कत, दक्षिणेकडील कोरनाद हे भारतातील काही उत्कृष्ट साडीप्रकार होत. खडीकाम केलेली महाराष्ट्राची चंद्रकळा, बांधणी व रंगणी तंत्राच्या साहाय्याने तयार करण्यात येणारी गुजरात-राजस्थानची बांधणी, सौराष्ट्राचा घरचोला, बिहारची सुंगडी, मध्य प्रदेशची चुनरी, दक्षिणेकडील कलमकारी, मलमलीवरील लखनवी चिकनकारी, बाटिककाम, फुलकरी, खडीकाम इ. विविध सजावटी-तंत्रांनी सुशोभित व अलंकृत केलेल्या साडय़ाही स्त्रियांमध्ये विशेष प्रिय आहेत. या साडय़ा प्रसंगानुसार विविध पद्धतीने नेसल्या जातात. भारतात साडी नेसण्याच्या साधारणपणे शंभरेक पद्धती आहेत. प्रांत आणि भाषेप्रमाणे साडी नेसण्याची पद्धत बदलत जाते.

आजचे जग आधुनिकतेचे. आज पारंपरिक साडय़ांची जागा चित्रपट व टीव्ही सीरियल यामधून झळकणाऱ्या डिझायनर साडय़ांनी घेतली आहे. काळाच्या ओघात साडीने आपल्या तऱ्हा कितीही बदलल्या तरी तिचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही सणासुदीला, समारंभात साडीची जागा कोणीही घेऊ शकत नाही.