03-lp-jagrutiचित्रांच्या आधारे भविष्य कथन करणारी ही कला १७ व्या शतकात उगम पावली असे मानले जाते. टॅरो म्हणजे ७८ कार्डाचा संच असतो. टॅरो कार्ड रीिडग म्हणजे केवळ त्या कार्डावरील चित्रांचा अर्थ लावणे नाही तर दुसऱ्याच्या मनात डोकावणे. टॅरो रीडर हा उचलण्यात आलेल्या कार्डावर प्रश्नाचं उत्तर दृश्य स्वरुपात वाचतो. या टॅरो कार्ड वाचनाच्या आणि दुसऱ्याच्या अंतर्मनात डोकावण्याच्या कौशल्याचा मिलाफ या प्रक्रियेत घडत असतो. १२ वर्षांत १२ राशींच्या बाबतीत काय घडेल हे टॅरोच्या माध्यमातून वर्तवण्यासाठी काही विशिष्ट कार्डाचा आधार घेण्यात येतो.

मेष (२१ मार्च ते १९ एप्रिल)

२०१६ मध्ये केलेल्या सर्व परिश्रमाचे फळ तुम्हाला या वर्षी मिळणार आहे. २०१६ मध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्याच क्षेत्रात या वर्षी तुम्हाला प्रतिष्ठा, अधिकार प्राप्त होतील. कठोर परिश्रमाला तुम्ही कधीच घाबरत नाही आणि हे कठोर परिश्रम नक्कीच फलदायी असतात. हे वर्ष तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचे असेल. तुमच्या प्रयत्नांना उत्तम मार्गदर्शन अपेक्षित आहे. जणू काही देवदूताप्रमाणे एखादी व्यक्ती तुम्हाला भेटेल, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करेल. या वर्षी महत्त्वाकांक्षा बाळगण्यात कसलाही धोका नाही. तुम्ही सामाजिक आणि लौकिक अर्थाने यशस्वी होणार आहात. मेष राशीच्या लोकांनी एक लक्षात ठेवायला हवं की तुम्ही विश्वासू आणि निष्ठावान असणे गरजेचे आहे आणि तुमचे अधिकार हुशारीने वापरायला हवेत. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. विशेषत: आहाराची. आपल्या खाण्याच्या सवयीबद्दल अनियमित राहू नका. नियमित व्यायाम करा आणि व्यायामाचे वेळापत्रक कसोशीने सांभाळा.
शुभ महिना : जानेवारी आणि एप्रिल

वृषभ (२० एप्रिल ते २० मे)

२०१७ ही खरे तर तुमच्यासाठी नवीन सुरुवात आहे. २०१६ मध्ये तुम्ही पाहिलेले चढ-उतार आणि अडचणी या आता भूतकाळ झाल्या आहेत. एक नवी, उत्साही ताजीतवानी सुरुवात आणि नवी संधी तुमच्या आयुष्यात २०१७ मध्ये येणार आहेत. तुमच्यामध्ये असणारं कौशल्य जाणून घेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करा. अर्थातच त्यातूनच तुम्हाला या वर्षी भरघोस यश मिळणार आहे. त्याचा आनंद तुम्हाला खुणावत राहील. यशाची झिंग डोक्यात चढू देऊ नका. यशाचा मनापासून आनंद घ्या. उर्मटपणा आणि अतिआत्मविश्वासी होऊ नका. ज्या काही नव्या गोष्टी सुरू करायच्या आहेत त्या विचार करून हुशारीने करा. स्मार्ट आणि चोखंदळ व्हा.
शुभ महिना : जानेवारी आणि फेब्रुवारी.

मिथुन (२१ मे ते २० जून)

२०१७ हे वर्ष तुमच्या आयुष्यातील आजवरचा संभ्रम मिटवणारे असेल. २०१६ मध्ये अनेक बाबतीत काही प्रमाणात आपण संभ्रमात होता. पण २०१७ हे वर्ष भविष्यावर नजर ठेवून असणाऱ्या अनेक दूरदर्शी योजना आणि स्पष्टता घेऊन आले आहे. त्यामुळे संभ्रम दूर होऊन निर्णय घेणे अत्यंत सुकर ठरेल. करिअर, कुटुंब, नातेसंबंध याबाबतीत निर्णय तुम्ही नीट घेऊ शकाल. हे वर्ष तुमच्यासाठी स्पष्टता देणारे असेल. त्यामुळे तुमच्यामध्ये वेगळाच आत्मविश्वास जागा होऊन  परिणामी तुम्ही अधिक अधिकारक्षम आणि उत्साही व्हाल. अप्राप्य असे काहीही असणार नाही. फेब्रुवारी आणि ऑगस्ट हा ग्रहण काळ तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणारा आहे. आपली ऊर्जा आपल्या भल्यासाठी वापरा. इतर लोक विनाकारण तुमच्या कामकाजात डोकावणार नाहीत यासाठी एक मर्यादा आखून घ्या.

कर्क (२१ जून ते २० जुलै)

कर्क राशींच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अंतर्दृष्टी देणारे आहे. बाह्य़त: अथवा अंतर्गत असे प्रचंड मोठे बदल या वर्षी होणार आहेत. हे वर्ष धाडसी आणि उत्साही असणार आहे. ध्येय साध्य करण्याप्रति असणारी तुमची सकारात्मकता ही तुम्ही ठरवलेली सर्व ध्येयं साध्य करून देईल. तुम्हाला मिळणाऱ्या अंतर्दृष्टीमुळे ध्येयपूर्तीचा रोडमॅप आकार घेईल. हीच अंतर्दृष्टी कुठे थांबायचे आणि कुठे सुरुवात करायची हे दाखवून देईल. हे वर्ष तुम्हाला निराश आणि तुमच्या मनातील आंदोलनांमध्ये अडकू देणार नाही. आरोग्याची काळजी घ्या. नियमित, योग्य आहार महत्त्वाचा आहे. या वर्षांत अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला तुमचा गुरू किंवा मार्गदर्शक किंवा अशी वडीलधारी व्यक्ती भेटेल जिच्यामुळे तुम्ही असामान्य असं काही तरी साध्य करण्यासाठी प्रेरित व्हाल. नोकरी किंवा घरबदल होण्याची शक्यता आहे.
शुभ महिना : मार्च आणि एप्रिल

सिंह (२१ जुलै ते २० ऑगस्ट )

२०१७ हे वर्ष अनेक चांगल्या बातम्या घेऊन येणार आहे. या वर्षी करिअरमध्ये अडकून राहिलेल्या प्रकल्पांची संतुलित प्रगती होणार आहे. २०१६ मध्ये पूर्ण न झालेली कामे, मार्गी न लागू शकलेल्या संकल्पना या सर्वाची पूर्तता या वर्षी होणार आहे आणि त्याचबरोबर आपले नातेसंबंधदेखील एका तर्कसंगत निर्णयावर येतील. या वर्षी आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला मित्र, कुटुंबीय, सहकारी आणि आपले ग्रुपचे सहकार्य लागणार आहे. या वर्षी आपले कुटुंबीय आणि सामाजिक वर्तुळातून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे या वर्षी आपल्याला सामाजिक, भावनिक आणि आर्थिक आघाडय़ांवर बळ लाभणार आहे. या वर्षी आपल्या बचतीवर आपणास खासकरून लक्ष द्यावे लागणार आहे. मुख्यत: आपल्या खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवावे लागेल. तुमचे आरोग्य आणि सामाजिक संपर्कदेखील जपणे गरजेचे आहे.
शुभ महिना :सप्टेंबर आणि ऑक्टोबर

कन्या (२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर)

२०१७ हे वर्ष तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकण्याचे आहे. तुमचा स्वत:चा पुन्हा नव्याने शोध घेण्याचे हे वर्ष आहे. तुमची कौशल्य, शिस्त हे तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदतीचे ठरतील. एक विशिष्ट संधी आपली वाट पाहील. कन्या राशीच्या काही जणांना पुढील शिक्षणासाठी अथवा उच्च शिक्षणासाठी परदेश प्रवासाची संधी आहे. या वर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यासाठी तुम्ही कदाचित योगा अथवा व्यायामाच्या क्षेत्राचा आधार घ्याल. तुमच्या कठोर परिश्रमांमध्ये समतोल साधण्यासाठी ध्यानधारणा आणि तत्सम बाबींचा वापर करायला हरकत नाही. ज्यांना नवीन व्यवसाय, उपक्रम अथवा कार्यशाळा सुरू करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुरुवात करायला हे अत्यंत योग्य असे वर्ष आहे. मात्र केवळ रामभरोसे राहून चलता है अशी भूमिका न ठेवता, नेमकेपणाने काम करा. तुमच्या व्यवसाय-उद्योगात, कार्यशाळेवर तुमच्या निपुणतेचा प्रभाव कसा राहील याकडे लक्ष द्या. हे वर्ष कठोर परिश्रमाचे असून भविष्यातील लाभासाठी पायाभरणी करण्याचा आहे. या वर्षी जे बीज रोवाल त्याचा फायदा पुढील वर्षी नक्की मिळेल. तुमच्या प्रयत्नातूनच या वर्षी अनेक लाभ मिळणार आहेत.
शुभ महिना : ऑगस्ट आणि सप्टेंबर

तूळ (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर)

हे वर्ष तुमच्या परिस्थितीतील बदलाचे द्योतक आहे. मागील वर्षांत दाटलेला अंधार दूर करणाऱ्या प्रकाशकिरणांचा प्रवेश या वर्षी तुमच्या आयुष्यात होणार आहे. आजारपण, इतर अडचणींमुळे निर्माण झालेली परिस्थिती अशा अनेक बाबींमुळे झालेले नुकसान भरून काढणारे हे वर्ष आहे. तुम्ही या सर्व कटकटीतून मोकळे व्हाल. नोकरी, जागा, शहर बदलण्याचा विचार या वर्षी करायला हरकत नाही. या बदलांमुळे तुमच्या दृष्टिकोनातदेखील कमालीचा बदल होणार आहे. तुम्हाला वाटणारी भीती ही अनाठायी असल्याचे या बदलातून तुमच्या लक्षात येऊ शकेल. या वर्षी सातत्याने सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा. मनाचा कल सकारात्मकतेकडे झुकलेला असणे हे आजच्या परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी महत्त्वाचा आहे. सकारात्मक विचारसरणीच्या माणसांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता अशा व्यक्तीशी तुमच्या अडचणींवर चर्चा करा आणि संवादातून त्यावर योग्य तो तोडगा काढून ती परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करा.
शुभ महिना : फेब्रुवारी आणि डिसेंबर

वृश्चिक (२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर)

वृश्चिक राशीसाठी हे वर्ष आर्थिकदृष्टय़ा अत्यंत लाभदायी असणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी जादूई असणार आहे. भौतिक व आर्थिक फायदे या वर्षी होतील, विशेषत: प्रॉपर्टीच्या अनुषंगाने. अनेक व्यवहार तुमच्या फायद्याचे असतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, सकारात्मकता जाणीवपूर्वक वाढवा. याचे खूप मोठे लाभ मिळतील. तुम्हाला अनेक माध्यमातून भौतिक लाभ होतील, तेव्हा संयम बाळगा. हे फायदे मिळवणारे चांगले ग्राहक व्हा.
शुभ महिना : ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर

धनु (२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर)

हे वर्ष तुमच्यासाठी आरामदायी वर्ष म्हणावे लागेल. या वर्षी तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर अत्यंत चांगला काळ व्यतीत करा आणि अर्थातच त्यातून तुम्हाला मिळणाऱ्या ऊर्जेमुळे तुम्ही उत्साही राहणार आहात. तुमच्या अवतीभोवती असणारे लोक तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतील. आणि प्रत्येक वेळी त्यांना मदत केल्यानंतर तुम्हाला समाधानाची वेगळी अनुभूती लाभेल. या वर्षी तुम्ही इतरांसाठी खूप मोठा आधार असणार आहात. त्या बदल्यात तुम्हाला एका ज्ञानी व्यक्तीचा सहवास लाभेल, ज्याच्यामुळे तुमच्या स्वत:च्या आतील शोधाला बळकटी लाभेल. हा सहवास तुमच्यासाठी लाभकारक असून त्यातून तुमच्या जीवनाला एक निर्णायक वळण मिळेल. या वर्षांत आपण अनेक तरुणांना मार्गदर्शन करणार आहात, हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा घटक ठरणार आहे. या वर्षी शक्य असेल तर बागकाम वगैरेसारख्या कामांचा छंद लावून घ्या. तुम्हाला अंतर्समाधान लाभेल.
शुभ महिना : जानेवारी आणि मार्च

मकर (२१ डिसेंबर ते २० जानेवारी)
हे वर्ष मकर राशीसाठी अनिश्चित घडामोडींनी भरलेले असून अनेक चढ-उतार असणार आहेत. विलंबाने काम करण्याची तुमची सवय २०१६ मध्ये कायम होती, ती बदलण्याची गरज आहे. निर्णय करण्यास लागणाऱ्या वेळामुळे तसेच बिचकण्याच्या सवयीमुळे तुमचे सर्व निर्णय हे अनिश्चितेला आमंत्रण देणारे ठरतात आणि त्यातच अडकायला होते. आत्मविश्वास वाढव व स्वत:ला निर्णयक्षम बनवा. गरज भासल्यास इतरांची मदत घ्या, पुढे जात राहा, पण अडकून पडू नका. परिस्थितीवर निर्णय सोडू देऊ नका. एखादी गोष्ट गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत थांबू नका. स्वत:हून पुढाकार घ्या आणि पुढे जात राहा. मनावरील मळभ दूर करा, स्वत:मध्ये डोकावून पाहा आणि तुमच्या दडलेली क्षमता पाहा. आपल्या आत दडलेल्या कौशल्याचा आपल्या आतल्या आवाजाचा आधार घ्या आणि परिस्थितीतून बाहेर पडा. स्वत:ला कमजोर होऊ देऊ नका.
शुभ महिना : जुलै आणि नोव्हेंबर

कुंभ (२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी)

२०१७ हे अनेक नवनवीन युक्ती संकल्पनांचे आहे. या वर्षांच्या सर्वात नाजूक शब्द असणार आहे तो म्हणजे युक्ती. पण महत्त्वाची बाब अशी की ही युक्ती इतर कोणाही जवळ सांगू नये. हा काळ तुमच्या सर्व संकल्पना आणि युक्ती योजना गुप्त राहतील आणि सुरक्षित राहतील याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा इतर लोक ती युक्ती चोरण्याची आणि त्यांच्या भल्यासाठी त्याचा वापर केला जाण्याचा धोका आहे. अर्थातच या वर्षी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून त्याला योग्य वळण द्यावे लागेल. जे लोक तुम्हाला आवडत नाहीत त्यांना तुमच्यापासून दूर करा. आपला आतला आवज आणि त्याची ताकद पुरेपुर जाणली तर तुम्ही जे कराल ते शहाणपणाचं असेल. परिस्थिती कौशल्याने हाताळा.
शुभ महिना : जुलै

मीन (२० फेब्रुवारी ते २० मार्च)

२०१७ हे वर्ष तुमच्या आयुष्याला स्थिरता देणारे आहे. मागील काही वर्षांत तुम्ही तुमचा ट्रॅक पूर्णपणे सोडून भरकटला होतात. आता पुन्हा आयुष्याची गाडी रुळावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इतर कोठेही लक्ष विचलित होऊ न देता आता ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित करा. जेथे गरज आहे अशा ठिकाणी ठामपणे नाही म्हणायला शिका. प्रत्येकाला खूश करण्याचा प्रयत्न करू नका. या वर्षांत एखादी अतिउच्चपदावरील व्यक्ती किंवा सर्वोच्च ज्ञानी अधिकारी व्यक्ती तुम्हाला मागदर्शन करण्यासाठी पुढाकार घेईल. या वर्षांत समतोल राखणे महत्त्वाचे असल्यामुळे आरोग्य, नोकरी-व्यवसाय, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचा विचार करा. जीवन समृद्ध करण्यावर लक्ष द्या.
९ शुभ महिना : जानेवारी, एप्रिल
जागृती मेहता – response.lokprabha@expressindia.com