स्वतंत्र भारताच्या सत्तरीतही इथली जनता वैचारिक गुलामगिरीच्या जोखडात अडकलेली आहे. अर्धी जनता पुरुष असल्याचे विशेषाधिकार घेते आणि उतरलेली अर्धी जनता गप्प राहते. भारतात काम करणाऱ्या एका परकीय स्त्रीने या असमानतेवर बोट ठेवत हे विषमतेचं जोखड उतरवण्याचा एक अभिनव मार्ग सांगितला. तिची सुलक्षणी स्वप्नं दाखवणारी ही गोष्ट..

स्वातंत्र्य- म्हणजे अर्थातच पारतंत्र्यातून मुक्ती. आपली परकीय अमलातून सुटका तर झाली, पण आपण स्वतंत्र देशात राहतो म्हणजे स्वतंत्र झालो का? आपल्या घटनेने आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार दिले आहेत, म्हणजे समान न्यायाची अपेक्षा तर करूच शकतो आपण. पण खरोखर सगळ्यांना इथे या स्वतंत्र देशात समान अधिकार, समान न्याय, समान वागणूक मिळते? देशातील अध्र्या जनतेला काही खास अधिकार आहेत.. पुरुष असण्याचे. ते वारंवार उर्वरित अध्र्या जनतेवर हे अधिकार गाजवत असतात. त्याविरुद्ध ही उरलेली अर्धी जनता ते ‘देवदत्त’ अधिकार मानून मूग गिळून गप्प बसते. या उरलेल्या अध्र्या जनतेला कधी मिळणार समान वागणूक? हे सगळे प्रश्न पडायचं कारण गेल्याच महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातली एक घटना. भारतात काम करणाऱ्या एका परकीय स्त्रीने इथल्या या अशा असमानतेवर बोट ठेवलं आणि हे जोखड दूर करण्याचा एक अभिनव मार्गही दाखवला. तिच्याबरोबर घडलेली घटना काही फार वेगळी नाही. आपल्या देशातल्या अध्र्या जनतेच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर या अशा घटना घडतच असतात. हे चालायचंच, असा आपला समज.

उलरिक राइनहार्ड असं या जर्मन महिलेचं नाव. मध्यमवयाची ही स्त्री गेली काही र्वष भारतात राहून काम करतेय. मध्य प्रदेशातल्या एका स्वयंसेवी संस्थेबरोबर ती जोडली गेलेली आहे. या राज्यातल्या पन्ना या गावात ही घटना घडली. उलरिक तिच्या संस्थेच्या काही मुलांबरोबर पन्नाच्या आठवडी बाजारात गेली होती. रविवारचा बाजाराचा दिवस, म्हणजे कुठल्याही भारतीय गावा-शहरांत जेवढी गर्दी आणि किचाट असतो तसा पन्नामध्येही होताच. या गर्दीतून वाट काढत ती चालली होती. तेवढय़ात एक तरुण मुलगा तिच्या पाठीमागून अगदी खेटून तिच्या डाव्या अंगाशी आला. तिच्या दंडाला स्पर्श करत अंगाभोवती हात टाकून उजव्या अंगाने झटकन निघूनही गेला. उलरिक ओरडली, पण तो उलट तिच्याकडे बघून फिदीफिदी हसत गर्दीत चालता झाला. उलरिकनं त्या गर्दीतही त्याचा पाठलाग केला आणि हे असं करण्याचा जाब विचारला. त्या मुलाच्या चेहऱ्यावर आपण काही चुकीचं केल्याचे भाव तर नव्हतेच. उलटा तो या गोऱ्या बाईकडे बघत हसतच होता. आता हा आरडाओरडा ऐकून त्या दोघांभोवती चांगली गर्दी जमली. ‘तुला अशा प्रकारे मला हात लावायचा अधिकार कुणी दिला?’ तिनं असं विचारताच तो झटकन उत्तरला.. ‘मी पुरुष आहे.’ या उत्तरातल्या सहजतेने उलरिकला धक्का बसला. उलरिक त्याच्यावर ओरडत असताना तो अजूनही दात विचकत होता, ते बघून तिचा पारा आणखी चढला आणि ती म्हणाली, तुला पोलिसांच्या ताब्यात देते आता. त्यावर भोवती जमलेल्या गर्दीतले काही अनुभवी, ‘जाणते’ जन त्या मुलाला सल्ला द्यायला लागते की, माफी मागून टाक. प्रकरण वाढवू नकोस. उलरिकने पोलिसात तक्रार करण्याचा हेका कायम ठेवल्याचं लक्षात आल्यावर तो मुलगाही जरा गांगरला आणि त्या जाणत्या जनांच्या सल्ल्याने माफी मागता झाला. त्याच्या चेहऱ्यावर मात्र पश्चात्तापाची रेषही उमटलेली नव्हती. अशा परिस्थितीत उलरिक ही माफी स्वीकारणं शक्यच नव्हतं. ती त्याला पोलीस स्टेशनच्या दिशेने चल म्हणाली. ते गर्दीचं रिंगण तोडून निघाले. पोलीस चौकी जवळच होती. पण तिथपर्यंत जायच्या आतच या मुलाचा कुणी साथीदार मागून बाईकवर आला आणि त्याच्या मागे बसून हा मुलगा पसार झाला. जाताना निर्लज्जपणे हसत हसतच तो गेला. उलरिक तशीच पुढे गेली आणि तिने पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने घटनेची नोंद घेत लगेचच त्या मुलाला हुडकून काढायला शिपायाला पाठवलं आणि अगदी काही वेळातच त्या मुलाला पकडूनही आणलं.

दरम्यान त्या छोटय़ा शहरात ही गोष्ट पसरायला वेळ लागला नाही. त्या मुलाचं सगळं कुटुंब मित्रमंडळींसह पोलीस ठाण्यात आलं. तेव्हा उलगडा झाला तो मुलगा केवळ १४ वर्षांचा होता. आमचा मुलगा किती चांगला आहे, त्याने पूर्वी असं कधीच केलेलं नाही वगैरे शब्दांत घरचे आपल्या मुलाचं चांगुलपण सांगत राहिले. आम्ही त्याला चांगला चोप देऊ पण तक्रार करू नका, असं ते उलरिकला विनवू लागले. आपल्या मुलाच्या चांगुलपणाचं सर्टिफिकेट द्यायला त्यांनी चक्क त्याच्या शाळेतल्या शिक्षकालाही बोलवून आणलं. त्या शिक्षकांनीही हा मुलगा हुशार आणि शांत असल्याची पावती दिली. उलरिक तरीही आपल्या तक्रार नोंदवण्याच्या भूमिकेवर ठाम होती. त्या मुलाच्या शिक्षकाला तिनं एक प्रश्न विचारला-तुमच्या शाळेत किती मुलं आहेत हो? शिक्षकानं उत्तर दिलं-हजारभर विद्यार्थी आहेत. हे ऐकतानाच उलरिकच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. तिनं लगेच सर्वाच्या उपस्थितीत ती बोलूनही दाखवली. ‘मी एका अटीवर तक्रार नोंदवणार नाही.. स्त्रियांशी कसं वागावं यासंदर्भात एक कॅम्पेन आपण सुरू करायची आणि त्या मोहिमेचा चेहरा हा असेल.’ दोन क्षण उलरिक काय म्हणतेय ते समोरच्या पोलिसांनासुद्धा समजलं नाही. पण मुलाच्या घरच्यांना हा उपाय सोपा वाटला. पण म्हणजे नेमकं करायचं काय यावर विचार करायला दोन दिवसांनी पुन्हा भेटण्याचं ठरलं. स्त्रिया म्हणजे आपली मालमत्ता. पुरुषानं कधीही तिच्या शरीराशी खेळलं तर चालतं, ही मानसिकता बदलली तरच अशी छेडछाड, लैंगिक शोषण कमी होईल. उलरिकनं सुचवलेला पर्याय कदाचित ही मानसिकता बदलण्याचं पुढचं पाऊल असेल. हे सगळं उलरिकनं फेसबुक पोस्टच्या रूपानं लिहिलं. त्याला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी तिच्या या मोहिमेमध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली. हे एवढं सगळं महाभारत घडल्यानंतर आपण काय चुकीचं केलं याची किमान जाणीव त्या मुलाला नक्कीच झाली असेल. आता स्त्रियांना सन्मानानं.. खरं तर समानतेने वागणूक द्यावी म्हणून तोच त्याच्या शाळेत आवाहन करेल तेव्हा खरी बदलाची सुरुवात होईल.

या प्रकरणाची दखल माध्यमांनी घेतली, तेव्हा दोन गोष्टी झाल्या. एक चांगली आणि एक आपल्यासाठी शरमेची म्हणावी अशी. शरमेची गोष्ट अर्थातच आपल्या स्वतंत्र भारतामधली सद्य:स्थिती या निमित्ताने जगासमोर आली. एक परदेशी स्त्री म्हणते की, भारतामध्ये सगळीकडे मला हा पुरुषी वर्चस्ववाद दिसतो आणि त्याचा त्रास सोसावा लागतो, यातच आपलं मागासलेपण उघड झालं. उलरिक तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिते की, ‘भारतात कुठेही गेलं, तरी एक गोष्ट नेहमी मला दिसते. ती मला नेहमीच खटकते. पुरुषी वर्चस्वाखालचा समाज. इथल्या अनेक पुरुषांना – तरुण आणि अगदी लहान मुलांनादेखील आपल्याकडे पुरुष नावाचं वर्चस्ववादी अस्त्र असल्याची नेहमीच भावना असते आणि त्यातून आपण स्त्रीपेक्षा वरचढ असल्याचं त्यांना कायम वाटत असतं. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ते हे सतत दाखवून देत असतात. ही भावना कशी संपवायची, स्त्रीसोबत समानतेनं वागण्याचे धडे त्यांना कसे द्यायचे हा प्रश्न आहे.’

या पुरुषी वर्चस्ववादी वृत्तीला अशा प्रकारे आव्हान देण्यासाठी आजही देशाबाहेरची स्त्री पुढे यावी लागते. आपल्या स्त्रिया मूग गिळून गप्प बसतात किंवा त्यात त्यांना काही वावगं दिसत नाही, असा त्याचा अर्थ. आपण बाईमाणूस म्हणजे असा त्रास होणारच, इतकं सहज झालंय हे आपल्यासाठी. आता दहीहंडी, गणपतीच्या गर्दीचा फायदा घेत स्त्रियांचा असा अपमान करणारे वाढतील. असा त्रास देणाऱ्यांना आपण गृहीतच धरतो. दरवर्षीचं आहे हे, असंही वर म्हणतो. आज स्वत:ला स्मार्ट म्हणवून घेणारे, उद्याच्या सुपरपॉवर नेशनची स्वप्न बघणारे आपण अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत किती अडकलो आहोत, याचं हे स्पष्ट उदाहरण आहे. आपल्याच समाजाच्या वैचारिक गुलामगिरीत आपण किती अडकलो आहोत, हे यातून दिसतं.

आता या प्रकरणातली चांगली बाब म्हणजे स्थानिक पोलिसांनी घेतलेली सकारात्मक भूमिका. सर्वसाधारण परिस्थितीत, स्त्री अशी तक्रार नोंदवायला पोलिसात गेली तर, ‘बाई सोडा ना.. लक्ष देऊ नका. हातच लावला ना फक्त, त्याचं काय एवढं’; असा शहाणपणा शिकवणारे जास्त भेटतात. अगदी मुलीच्या घरातलेदेखील हेच ऐकवतात. गर्दीत कुणी असा त्रास दिला, तर त्याची काय लगेच पोलीस केस करायची? असं आपल्यापैकी कित्येकींना वाटतं. कारण पोलिस तक्रार नोंदवून घेतील की नाही, ही शंकादेखील असतेच मनात. कदाचित या केसमध्ये समोरची व्यक्ती भारतीय नसणं आणि पुढारलेल्या देशातली असणंही कारणीभूत असेल. पण ते उलरिकला तक्रार नोंदवण्यापासून परावृत्त करत नव्हते हे विशेष. मुलाच्या घरच्यांना नेमकं काय चुकतंय आणि पोराला मारून हा प्रश्न सुटणार नाही, हे पटलं हे दुसरं विशेष. मी पुरुष आहे आणि म्हणून मला हे असं वागण्याचा अधिकार आहे हे चौदा वर्षांच्या मुलामध्ये इतकं आतवर रुजलंय त्याला जबाबदार आपणच आहोत, हे समाजाला समजलं तरी सध्या पुरेसं आहे. एवढं झालं तरी, एक नवी पहाट उजाडणार असं किमान स्वप्न बघायला तरी हरकत नाही म्हणायची. स्वतंत्र भारताच्या सत्तरीत आपल्याला ही अशी स्वप्नं पडायला लागलीत हे सुलक्षणच म्हणावं का?
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com