|| भानू काळे

‘गावदाबी’ हे मोहन रणसिंग या मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मकथन आहे. गावदाबी म्हणजे गावातील जातपंचायतीला द्यावा लागणारा दंड. ‘मुस्कटदाबी’ या रूढ शब्दाशी साधम्र्य साधणारे हे बोलके  शीर्षक पुस्तकाच्या आशयाला चपखल बसणारे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यतील ठाकर समाजात जन्मलेले रणसिंग अतिशय बिकट परिस्थितीत जातपंचायतीशी लढा देत लहानाचे मोठे झाले. त्यांच्या त्या बालपणीच्या संघर्षांचे चित्रण करणारे हे पुस्तक.

प्रस्तावनेत दिनकर गांगल लेखकाचा परिचय करून देतात. लेखकाने आपल्या जमातीच्या बहुविध लोककथांचा अभ्यास केला, आपल्या सहकाऱ्यांची संघटना उभारली. महाराष्ट्रातील ठाकर हे अनुसूचित जमातीत समाविष्ट असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यतील ठाकर जमात मात्र अनेक सवलतींपासून वंचित होती. त्याविरुद्ध लेखकाने पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि शेवटी आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला. परंतु हे सारे या पुस्तकात कु ठेच येत नाही. १६ व्या वर्षी आपले गाव सोडून लेखक मुंबईला येईपर्यंतचाच कालखंड पुस्तकात आहे. पुस्तकाच्या या मर्यादेची लेखकालाही जाणीव आहे. मनोगतात त्याने म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्र वीजमंडळ व लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमधील सुरक्षित नोकऱ्या लेखकाला का सोडाव्या लागल्या; समाजाला न्याय मिळवून देण्याऐवजी त्याने समाजाचे नुकसानच केले असे त्याच्या समाजबांधवांना का वाटू लागले, अशा अनेक बाबींविषयी लेखकाने लिहावे अशी त्याच्या मित्रांची स्वाभाविक अपेक्षा होती. कारण तीच लेखकाची खरी ओळख होती. पण तो भाग या पुस्तकात नाही. याचे कारण सांगताना लेखक लिहितो, ‘हा सगळा प्रवास ज्या पायावर आधारित आहे, त्या पायाभूत परिस्थितीवर आधी लिहावं असं मला वाटू लागलं.’ लेखकाच्या दृष्टीने हे समर्थन योग्यच आहे; पण मोठेपणी लेखकाने जो प्रवास केला, त्याची काहीच माहिती नसलेल्या वाचकाला ही ‘पायाभूत परिस्थिती’ जाणून घेण्याविषयीचे कुतूहल कुठून असणार? लेखकाने भावी काळात दिलेल्या लढय़ाविषयी जर अधिक माहिती पुस्तकात असती, तर त्या लढय़ासाठी आवश्यक ती शिदोरी बालपणाने त्याला कशी पुरवली, याचे कथन वाचकाला अधिक भावले असते. कदाचित लेखकाच्या पुढील पुस्तकात हा भाग असेल. अर्थात, ही मर्यादा विचारात घेऊ नही ही संघर्षयात्रा वाचनीय झाली आहे.

लहानग्या मोहनला आपल्या गावी देवळात खेळताना एक कु त्रा चावतो आणि त्यावर इलाज करू शकणाऱ्या शिरोडे गावातील एका वैद्याला भेटण्यासाठी मोहन व त्याचे बाबा शिरोडय़ाला जातात. या प्रसंगापासून आत्मकथनाला सुरुवात होते. बाबा कमालीचे धार्मिक. गोव्यात शिरगावला असलेल्या त्यांच्या ‘लवलाई’ नावाच्या देवीचे भक्त. तिचे व्रत महाकठीण. एक महिना घर सोडून रानावनात राहायचे. विशेष म्हणजे देवीच्या वार्षिक जत्रेत निखाऱ्यांवरून चालायचे. बाबांनी पाच वर्षे हे व्रत केले. घरच्या कटकटी आणि दारिद्र्य दूर व्हावे म्हणून. पण तरी देवी काही संकटाच्या वेळी धावून आली नाही. खूपदा घरी जेवायलाही काही नसे. आई म्हणायची, पाणी खाऊ न निजा. एकदा तर बाबांनी व आईने पोटच्या मुलीला विकायचाही विचार केला होता. सुदैवाने मोहनचा मोठा भाऊ दादा याने तो हाणून पाडला. आपल्या आई-बाबांप्रमाणे या दादाचेही लेखकावर खूप संस्कार असल्याचे जाणवते. घरात दारूचा धंदा. त्यामुळे कशीबशी दोन वेळा चूल पेटायची; पण त्या दारूमुळेच घराला नरकाची अवकळादेखील यायची. नशेत घरातल्या बायकांना होणारी रोजची मारहाण. मारामाऱ्याही रोजच्या.

अशा वातावरणात राहत असतानाही लेखकाला वाचनाचे वेड लागते. साने गुरुजी, अनंत काणेकर, वि. स. खांडेकर वगैरे लेखक त्याच्या आवडीचे. शाळेत मराठीसाठी ‘साहित्यशोभा’ पुस्तक होते. त्यातील ‘श्रावणमासी हर्ष मानसी..’, ‘शर आला तो धावुनी आला काळ..’, ‘क्षणोक्षणी पडे, उठे, परी बळे, उडे बापडी..’ यांसारख्या कविता आपले जीवन समृद्ध करून गेल्या, हे लेखक नोंदवतो. प्रख्यात संगीतदिग्दर्शक वसंत देसाई कु डाळचेच. लेखक दहावीला असताना त्यांनी कु डाळ हायस्कूलला भेट दिली होती. त्याच शाळेचे ते माजी विद्यार्थी. ‘जिंकू किंवा मरू ’ हे गाणे त्यांनी विद्यार्थ्यांकडून बसवून घेतले होते. लेखक राहत असलेल्या ठाकरवाडीलाही त्यांनी भेट दिली. तेथील आदिवासींच्या लोककलांची त्यांनी माहिती घेतली. १९७५ मध्ये लिफ्ट अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्यावरील एका लेखात- ‘ठाकर जमातीच्या गीतांचाही त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला’ असे वाक्य होते आणि त्याचा लेखकाला अभिमान वाटला होता.

शाळेत अकरावीला असतानाच रत्नमाला नावाच्या एका मुलीच्या प्रेमात लेखक पडतो. त्याच प्रेमामुळे जातपंचायत त्याच्याविरोधात जाते. पुस्तकाची शेवटची बरीच पाने या प्रेमप्रकरणाने व्यापली आहेत. १९६९ सालच्या जून महिन्यात लेखक अकरावी उत्तीर्ण होतो. नोकरीसाठी मालवणला येतो. त्यानंतर लेखकाची आणि रत्नमालाची गाठ पडत नाही. तो लिहितो, ‘तू मिळाला नाहीस तर मी आत्महत्या करणार’ असं म्हणणारी माझी मैत्रीण संकटाच्या पहिल्याच पायरीवर दचकली. पण या रत्नमालेचे पुढे नेमके काय झाले, ती लेखकाला पुन्हा कधी भेटली का, वगैरे बाबी गुलदस्त्यातच राहतात. एखादी रहस्यकथा वाचताना आपण गुंगून जावे, पण त्या कथेची शेवटची एक-दोन पाने गहाळ झालेली असावीत असे काहीसे वाटते.

सर्वच तरुण गावकऱ्यांप्रमाणे लेखकालाही मुंबईची खूप ओढ असते. शेवटी तोही मुंबईत येतो. घाटकोपरला एका झोपडपट्टीत राहू लागतो. ‘मक्याच्या कणसाला दाणे चिकटावेत तशा बोळा-बोळाला झोपडय़ा चिकटलेल्या’ – येथील झोपडय़ांचे असे वर्णन विलक्षण प्रत्ययकारी झाले आहे. पुस्तकाचे ते एक उत्तमांग म्हणता येईल. लवकरच त्याचा भ्रमनिरास होतो. लेखक मुंबईला असताना एका बाईशी त्याचे अनैतिक संबंध आहेत, अशी खोटीच माहिती एक गावकरी जातपंचायतीला पुरवतो. गावदाबी म्हणून लेखकाने दहा रुपये भरावेत असा निर्णय जातपंचायत देते. लेखक त्याला प्रखर विरोध करतो. पण पुढे लेखक मुंबईला आल्यानंतर आपल्या दादाने नाइलाजाने ही गावदाबी दिली हे त्याला कळते. लेखक लिहितो, ‘हे ऐकताच नाका-तोंडात पाणी जाऊ न मलाच घुसमटल्याप्रमाणे झालं.’ आणि याच वाक्यावर हे आत्मकथन संपते.

लेखकाची शैली आणि त्याने वापरलेली ठाकरांची बोलीभाषा आशयाला साजेशी आहे. त्यामुळे निवेदनाला एक जिवंतपणाही येतो. ‘मस्तकमॅड’सारखे अनवट शब्दही लेखक घडवतो. ठाकर समाजाच्या जीवनाचे उत्तम चित्रण ही या आत्मकथनाची सर्वात जमेची बाजू म्हणता येईल.

‘गावदाबी’- मोहन रणसिंग, लोकवाङ्मय गृह प्रकाशन,

पृष्ठे – २३३, मूल्य – ३०० रुपये

bhanukale@gmail.com