प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

दुसऱ्या महायुद्धानंतर एकूणच जगभर हास्यचित्रांचा प्रभाव वाढता राहिला. स्वत:ची संस्कृती, भाषा, चालीरीती, समजुती, परंपरा, स्थानिक कला यांवर गमतीशीर भाष्य करीत हजारो हास्यचित्रकार जगभर उदयाला आले. सुरुवातीच्या काळात दोन व्यक्तींमधील संभाषण म्हणजे एकाचा प्रश्न आणि त्यावर दुसऱ्याचे उत्तर आणि सोबत पूरक चित्र असं हास्यचित्रांचे स्वरूप होतं. पण हळूहळू त्यात टोकदारपणा येत राहिला. वाक्यं छोटी आणि नेमकी  झाली. चित्र बोलू लागलं. चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे याकडे चित्रकार जास्त लक्ष देऊ लागले. चित्र अधिक सुबक आणि आकर्षक होईल यासाठी नेमके व आवश्यक तेवढेच तपशील चित्रात दिसू लागले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विषयांचं वैविध्य वाढलं.

Venice Biennale, Venice, paintings,
डोळ्याला डोळा भिडवून पाहणं…
lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
Russia-Ukraine war tanks become obsolete in modern warfare
Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?

नवरा बायको, लहान मूल, ऑफिस, प्रवास, पाहुणे, शाळा, मंत्री, हॉस्पिटल, बांधकाम, कोर्ट, देऊळ, नाटक, भिकारी, धोबी, हमाल इत्यादी सुपरिचित विषय आणि पात्र या भोवती असंख्य विनोदाच्या शक्यता निर्माण होत होत्या. त्यावरचे विनोद लोकांना आपलेसे वाटत होते आणि म्हणून आवडतही होते.

या जोडीला एक अत्यंत महत्त्वाची बाब होती ती म्हणजे- अशी हास्यचित्रे प्रकाशित होण्यासाठी साप्ताहिक, मासिक व वार्षिक मुबलक प्रमाणात दिसू लागली होती. मुख्य म्हणजे त्यात संपादक पदावर जाणकार आणि साहित्य, राजकारण, समाजकारण, कला इत्यादींमध्ये उत्तम अभिरुची असणारे संपादक दिसू लागले. समाजातील नव्या लेखकांच्या, चित्रकारांच्या, व्यंगचित्रकारांच्या शोधात हे संपादक असत. प्रसंगी योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्यात असायची. नवनवीन प्रयोग करण्याला यांचा पाठिंबा असायचा. याचा परिणाम म्हणजे, ही कला अधिक सशक्त, अधिक निर्मळ आणि अधिक नेमकी होत गेली.

या साऱ्यापासून अर्थातच मराठी भाषाही दूर नव्हती. ब्रिटिशांच्या प्रभावाने स्वातंत्र्यापूर्वी रुजलेली ही कला नंतर जोमाने वाढली आणि मराठी रसिकाच्या चेहऱ्यावर प्रथमच एखादं चित्र पाहून येणारी स्मितरेषा उमटली. अनेकांनी ही कला विविध अंगांनी फुलवली. त्यातल्या काही व्यंगचित्रकारांच्या कामाचा आढावा घेणे योग्य ठरेल.

हरिश्चंद्र लचके हे हास्यचित्रकलेतील अनेक वर्षे काम केलेले कलावंत. लहानपणी रद्दीत आलेल्या परदेशी मासिकांमधली हास्यचित्रं पाहून त्यांना या कलेची भुरळ पडली, असं त्यांनी लिहून ठेवलंय. चित्रकलेचं रीतसर शिक्षण घेतल्यावर त्यांनी वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी हास्यचित्रं काढली आणि ती किर्लोस्कर मासिकाकडे पाठवून दिली. संपादक शंकरराव किर्लोस्कर हे स्वत: उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांनी जातीने लक्ष घालून लचके यांना मार्गदर्शन केलं आणि मराठी हास्यचित्रकलेमध्ये लचके कालखंड सुरू झाला.

वर उल्लेख केलेल्या असंख्य विषयांवर हलकीफुलकी कॉमेंट आणि उत्तम चित्रकला यामुळे त्यांची हास्यचित्र लोकप्रिय झाली. तो काळ मराठीमधला दर्जेदार मासिकांचा काळ होता. त्यामुळे हास्यचित्रं मोठय़ा प्रमाणावर छापली जाऊ लागली. एका पानाच्या चतुर्थाश भागात बसणारे हास्यचित्र हे अनेक वाचकांचा विरंगुळा बनलं. अक्षरश: हजारो हास्यचित्रं त्यांनी रेखाटली. ‘हसा आणि लठ्ठ व्हा’, ‘ हसा मुलांनो हसा’ अशा  त्यांच्या अनेक हास्यचित्र संग्रहांना  रसिकांनी आपलं मानलं.

चित्रकलेचे रूढ नियम न पाळून स्वत:ची चित्रकलेची आणि विनोदाची नवी शैली निर्माण केली ती हास्यचित्रकार प्रभाकर ठोकळ यांनी.  नवकवी, लेखक, प्रकाशक, समीक्षक आणि वाचक यांच्यावरती त्यांनी बहारदार हास्यचित्रं तर काढलीच, पण त्याशिवाय इतर विषयही मनसोक्त  हाताळले. म्हणजे कैदी, जेलर, वकील, कोर्ट, चोर, ज्योतिषी, डॉक्टर, नर्स  यावरतीही त्यांनी भरपूर हास्यचित्रं काढली. अतिशय साधं, पेनाने केलेलं रेखाटन, किंचित बुटकी माणसं, चित्रात  कमीतकमी तपशील हे त्यांचे वैशिटय़. एक प्रकारचा निरागसपणा त्यांच्या पात्रातून डोकावतो असं वाटत राहतं. खुरटी दाढीवाला कवी, टपोरे डोळे आणि फुलाफुलांची साडी घातलेली ठसठशीत बाई यासोबत अत्यंत हास्यस्फोटक भाष्य यामुळे ठोकळ यांच्या  हास्यचित्रांची  वाचक आतुरतेने वाट पाहत.

या कलेमधील आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे गवाणकर. चित्रकलेची आवड असूनही घरच्यांच्या आग्रहाखातर ते कॉमर्सला  गेले आणि नंतर रिझव्‍‌र्ह बँकेतून निवृत्त झाले. अत्यंत हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असं त्यांचं वर्णन करता येईल. पेंटिंग, रेखाटन याबरोबरीने ऑर्केस्ट्रामध्ये ते वाद्य वाजवत आणि बॅडमिंटनही उत्तम खेळत. पण मराठी साहित्यामध्ये त्यांची ओळख हास्यचित्रकलेमध्ये वेगळ्या प्रकारचा विनोद निर्माण करणारे चित्रकार अशीच आहे. पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, सरकारी कचेरी, राजकीय नेत्यांचे घर, साडय़ांचे दुकान, बाग, रस्ते, इथे घडणारे साधे साधे प्रसंग त्यांच्या चित्रातून दिसतात. अभावितपणे घडणारा  विनोद रेखाटणं हे गवाणकर यांचे वैशिष्टय़ असं म्हणता येईल. अर्थात, हे एक मोठंच वैशिष्टय़ आहे. हास्यचित्रकलेमध्ये जो एक सरप्राईज एलिमेंट  लागतो तो त्यांच्या चित्रात पुरेपूर होता हे महत्त्वाचे! त्याचप्रमाणे काही वेळेला शब्दांचा वापरही ते प्रभावीपणे करतात. किंचित जाडी पात्रं आणि चेहऱ्यावरचे आश्चर्ययुक्त भाव त्यांच्या चित्रातल्या पात्रांमध्ये दिसतात.

गवाणकर यांचं अतिशय गाजलेलं हास्यचित्र म्हणजे, हॉटेलबाहेर बोर्ड लावलेला असतो- ‘२५ पैशात भरपूर दुधी हलवा’ ते बघून आनंदाने आत गेलेला मुलगा एकदम आश्चर्यचकित होतो. कारण तिथे एक दुधीभोपळा अडकलेला असतो आणि शेजारी एक मिशीवाला पहिलवान बसलेला असतो आणि बोर्डावर लिहिलेलं असतं ‘कृपया दुधी जपून हलवा!’ त्यांचे सोबतचे घोडा, घोडेस्वार हे कार्टून म्हणजे परफेक्ट गवाणकर!

हास्यचित्रांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय होणारे चित्रकार म्हणजे श्याम जोशी. चित्रकलेचं त्यांनी रीतसर शिक्षण घेतलं होतं.  मिश्कील स्वभाव, उत्तम विनोदबुद्धी, हजरजबाबी संवाद कौशल्य आणि आनंदी वृत्ती यामुळे ते हसता—हसता कोटीप्रचुर संभाषण करून वातावरण हलकेफुलके आनंदी ठेवत. हे सारे गुण त्यांच्या हास्यचित्रांमध्ये दिसत. मासिक, दिवाळी अंक, साप्ताहिक यातून सुरू झालेली त्यांची कारकीर्द पुढे दैनिकांमधून चांगलीच लोकप्रिय झाली. ‘कांदेपोहे’ या नावाने ते साप्ताहिक सदर चालवू लागले. दैनंदिन घडामोडी, राजकीय,सामाजिक घटनांवर भाष्य करू लागले. यामुळे हे सदर कमालीचे लोकप्रिय झाले. कधी शब्दांशी खेळत तर कधी रेषांनी बोलत, कधी गंभीर तर कधी गमतीदार अशी त्यांची चित्रं होती. एक उदाहरणच द्यायचं तर ऑपरेशन थिएटरमधला पेशंट घाबरून डॉक्टरांना विचारतो, ‘‘ऑपरेशन सुरळीत पार पडेल ना?’’ तेव्हा डॉक्टर उत्तर देतात, ‘‘असल्या मामुली गोष्टींचा विचार आम्ही करत नाही!’’ अशा प्रकारच्या चटकदार आणि चमकदार कल्पनांनी वाचक खूश होत. पिकासो याच्या एका पेंटिंगची चोरी झाली. या तत्कालीन  बातमीवरचे त्यांचे सोबतचे हास्यचित्र हे परफेक्ट श्याम जोशी असेच आहे .

आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि शब्दांशी खेळण्याची हातोटी यातून वाचकांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा फुलवणारे आणखी एक महत्त्वाचे हास्यचित्रकार म्हणजे विजय पराडकर. औषधनिर्माण कंपनीत संशोधन विभागात काम करत असले तरी हास्यचित्रांचा छंद त्यांनी मनापासून जोपासला आणि वाढवला. वेगळ्या पाश्र्वभूमीमुळे त्यांच्या कामातही वेगळेपण आहे, ज्याचं संपादकांनी आणि वाचकांनी स्वागत केलं. पराडकर यांच्यामुळे मराठी हास्यचित्रकलेमध्ये एक ताजेपणा जरूर आला.

वास्तविक विविध शैलींनी हे दालन समृद्ध करणारे पन्नास-साठ हास्यचित्रकार तरी मराठीमध्ये नक्कीच आहेत. त्यापैकी हे एक लोकप्रिय पंचक! मराठी हास्यचित्रकला समृद्ध करण्यामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे विविध नियतकालिकांचे संपादक! त्यांनी प्रोत्साहन दिलं, प्रसंगी सुधारणा सुचवल्या, त्यामुळे व्यंगचित्रकार प्रयोग करू शकले. यात दिवाळी अंकांचाही वाटा खूप मोठा आहे. त्यामुळेच संपूर्ण देशात हास्यचित्रकलेचे समृद्ध दालन हे मराठीचे आहे. यंदाच्या दिवाळी अंकातील हास्यचित्र पाहताना वाचक याची जरूर नोंद घेतील.