परवा मुंबईमध्ये एका महत्त्वाच्या सभेचे सदस्यत्व स्वीकारायची संधी मिळाली. विषय होता ‘रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांची कारणमीमांसा आणि उपाय.’ गेली तीस वष्रे मी सर्जरी करतो आहे आणि पंचवीस वष्रे ड्रायिव्हग. हे दोन्हीही विषय माझ्या जिव्हाळ्याचे आहेत. तंत्रज्ञानाच्या विविध उपलब्धींमुळे शल्यशास्त्री आणि वाहननिर्मिती क्षेत्रात गेल्या तीन दशकांत झालेल्या प्रगतीमुळे थक्क व्हायला होते. आज मोटार क्षेत्र ड्रायव्हरविरहित मोटार चालवण्याचे स्वप्न सत्यात आणत आहे. माझा एक मित्र म्हणतो, ‘‘हे आम्ही रोजच करतो. ७० टक्क्यांहून अधिक ड्रायव्हर्स चालक/ ड्रायव्हर ही संज्ञा आणि परवाना देण्याच्या योग्यतेचे नसतात. म्हणजे आपणही ड्रायव्हररहितच गाडय़ा चालवतो आहोत.’’ सभेचे आयोजन अतिशय रेखीव होते. नुसत्या वायफळ चर्चा नव्हत्या, तर २०१५-२०२० या पंचकात नेमके काय करता येणे शक्य आहे याचा ऊहापोह होता. आयोजन करणाऱ्या प्रमुख संचालकाने आपले कुटुंब रस्त्यावरच्या अपघातात गमावले होते आणि त्यामुळे हा विषय त्याच्यासाठी पोटापाण्याचा नसून हृदयाचा होता. यापकी काही विचार मला आपल्यापर्यंत पोहोचवावेसे वाटतात.. त्यावर मते यावीत.. नवे उपाय सुचावेत आणि जनमताचा रेटा निर्माण व्हावा, ही अपेक्षा आहे.
अपघात टाळायचे असतील तर त्यांची सांख्यिक भीषण सत्यता आपण सर्वप्रथम समजावून घ्यावयास हवी. आजमितीस एकटय़ा १४ वष्रे वयोगटाखालची २० मुले रोज आपल्या देशात रस्त्यावर मृत्यू पावतात. ही आकडेवारी आपल्याला अस्वस्थ करते. हे जर सत्य आहे तर त्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे हेही सत्य आहे. आपल्याला यासाठी वाहनचालक, वाहन, पादचारी आणि रस्ते निर्माण या चौकानाच्या चार टोकांवर काम करावयास हवे. एक भाग यांत्रिक, एक भौगोलिक आणि एक मानवी आहे.
ड्रायव्हर होणे हा आपला जन्मसिद्ध हक्क नाही, त्यासाठी आपण आपली पात्रता सर्वथव सिद्ध करावयास हवी. सनिक व्हायचे तर आपण मिलिटरी स्कूलमध्ये जातो, सर्जन व्हायचे तर मेडिकल स्कूलमध्ये जातो, तेथे आपल्याला ठरावीक वर्षांचा, आखीवरेखीव अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, परीक्षा द्याव्या लागतात आणि मग आपण परवानाधारक होतो. सनिक, सर्जन आणि ड्रायव्हर तिघेही जिवाशी खेळतात, पण ड्रायव्हरच्या शाळाप्रवेशाला केवळ वयाचे बंधन.. कमीतकमी शिक्षणाची आडकाठी नाही.. ड्रायिव्हग स्कूल्य या पावसाळ्यात उगवणाऱ्या अळंब्यांच्या छत्रीप्रमाणे सर्वत्र.. ठरावीक अभ्यासक्रम नाही.. जुनाट नियम.. वाहनांच्या पदफळीचा संदर्भ देणारे.. या स्कूल्सच्या Quality controlचा विचार नाही. त्यांचे Accreditationकरणारी संस्था किंवा Regulatory councilनाही… र्Simulator technology, virtual reality आणि test tracks यांचा अंतर्भाव करायलाच हवा. यापकी प्रत्येक बाब खर्चिक आहे आणि तिला स्वत:च्या मर्यादाही आहेत, पण म्हणून त्याच्याकडे डोळेझाक करू नये. गाडय़ा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी अशी Regional centres उभारावीत, सध्या गल्लोगल्ली असलेल्या शाळा या मोठय़ा सेंटर्सना संलग्नित कराव्यात. ड्रायिव्हगच्या कौशल्याची परिपूर्ण खात्री करण्यासाठी मानवी शिक्षक (trainer/assessor) आणि संगणक (Computer – track sensors) या दोहोंचाही वापर व्हावा. परवाना मळवणे इंग्लंडमध्ये FRCS पास होण्यापेक्षा कठीण आहे, तेवढे महत्त्व आणि पावित्र्य ड्रायिव्हग टेस्टला यावे. मिळालेला परवाना तहहयात असू नये. सात वर्षांनी त्याचे नूतनीकरण व्हावे. ते करताना ड्रायव्हरच्या गेल्या सात वर्षांतील शारीरिक आणि रस्त्यावरच्या performanceचा विचार व्हावा. दृष्टी तपासणे अत्यावश्यक आणि ते तपासण्यासाठी केवळ चाळिशी किंवा मोतीिबदू हेच मलाचे दगड ठरू नयेत. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई व्हावी. आíथक दंड शासनाने रस्त्यावरच्या सुधारणा आणि सोयी-सुविधांसाठीच वापरावा आणि त्या व्यक्तीच्या परवान्याला दंडात्मक कारवाईचे उणे गुण (points) जमा व्हावेत. आज आपण क्रेडिट कार्डचे पॉइंटस जमवतो, विशिष्ट विमानांनी विशिष्ट विमानांनी प्रवास करून  flying hours जमवतो. परवान्याच्या Negative pointsनी आपल्या आयुष्याची किंमत अधिक उत्तम प्रकारे समजावून घेऊया. कारण बिग बझारमधल्या सेलसारखी ती ‘एक के उपर एक फ्री’ मिळत नाही. मद्य पिऊन गाडी चालवणे तुरुंगाची दारे उघडण्याचे कारण ठरावे. परवाना आजन्म नाकारला जावा आणि थेट शिक्षा व्हावी. आपण ज्याला जीवन देऊ शकत नाही, त्याचे जीवन हिरावून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. सर्जरीची शपथ सर्जनला सांगते-God give the life. Thou shall do no Harm.’ ड्रायिव्हगही त्याला अपवाद असू नये.
रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांकडून, कडेला खेळणाऱ्या मुलांकडूनही माझ्या काही अपेक्षा आहेत. पदपथ हे जनपथ आहेत, ते चालण्यासाठी आहेत. भाजी आणि केसांतील पिना विकत घेण्यासाठी नाहीत. तसेच बाइक चालवण्यासाठी नाहीत. सुरक्षित प्रवास आणि रस्त्यावरच्या सौजन्यशील वागणुकीचे धडे के.जी.पासून द्यावेत आणि तो शालेय  शिक्षणाचा भाग व्हावा. रस्त्या ओलांडण्यासाठी Pedestrian operated signals लावावेत. रस्त्यावरचे सिग्नल पाळण्यासाठी ड्रायव्हर्सनी आणि झेब्रा क्रॉसिंग हे क्रॉस करण्यासाठी असते हे पादचाऱ्यांनी आजन्म लक्षात ठेवावे. ते विसरले की जन्म आवरता घ्यावा लागतो. झेब्राच्या पाठीवरचे पट्टे महानगरपालिकेने फक्त राणीबागेत न सांभाळता रस्त्यारस्त्यांवर सांभाळावेत. ‘रस्ते हे खणण्यासाठी नसतात’ हे वाक्य एम.टी.एन.एल., महानगर गॅस, वोडाफोन, आयडिया वगरे कंपन्यांनी आपले घोषवाक्य करावे आणि ठिकठिकाणी लावावे. बाजारहाट हॉकिंग झोनमध्येच करावयाचा निर्धार गृहिणी आणि ग्राहकांनी केला तर पदपथावरची आक्रमणे आपोआप उठतील. रस्त्यांची निर्मिती, त्यांच्यावरची प्रकाशयोजना, सौरऊर्जेचा वापर या साऱ्या तांत्रिक बाबी आहेत आणि माझा या देशातील माझ्या इंजिनीअर बांधवांवर सर्जन्सइतकाच विश्वास आहे. उत्तम तंत्रज्ञान आणणे आणि वागवणे अशक्य नाही. अधिकारी खंबीर असला की कंत्राटदारही आपल्या सवयी बदलतात हे मी अनुभवले आहे.
अपघातांच्या या चौकोनाचा चौथा कोन वाहनउद्योगाकडे अंगुलिनिर्देश करतो. वोल्वो सर्वात सुरक्षित वाहने निर्माण करते. पण जेव्हा रस्त्यावर ज्यांचा सुळसुळाट आहे त्या चार छोटय़ा गाडय़ा European crash test मध्ये सपशेल नापास होतात, मग आम्ही त्या Crash test ला दोष देतो. नापास झाल्यावर विद्यार्थी पेपर कठीण आणि पोर्शनबाहेरचा होता म्हणून कुलगुरूंच्या दालनात धरणे धरतात, तसलाच हा प्रकार. भारतात हायवेवर गाडी चालवणे म्हणजे एखादा व्हिडीओ गेम खेळण्यासारखे. फरक एवढाच आहे की, येथे बाजी तुमच्या प्राणाची लागलेली असते. Crumple zones, कमीत कमी  Air bags, Pretensioner seat belts, लहान मुलांसाठी वेगळी सीट, मुलांना नियमाने फक्त मागेच बसवणे ही सक्ती, एखाद्या पादचाऱ्याला धक्का लागल्यावर तो रस्त्यावर न पडता गाडीच्या बॉनेटवरच पडेल अशी पुढची रचना या गोष्टी प्रत्येक गाडीत सक्तीच्या असाव्यात. या बाबी आज आम्ही Luxury म्हणून गणतो आणि फक्त  Lxi  model  मध्ये त्यांचा समावेश करतो. सुरक्षा ही ऐषआरामाची गोष्ट नाही आणि मूठभर श्रीमंतांची पशाने विकत घ्यायची मक्तेदारी नाही. त्यांचा अंतर्भाव केल्यामुळे मोटारीची किंमत वाढू नये म्हणून शासनाने करप्रणालीत सुधारणा करणे आणि सुरक्षेच्या बाबी कराच्या अधिभारातून वगळणे जरुरीचे आहे. मोटार खरेदी करताना यापुढे ग्राहकांनीही ‘कितना देती है?’ या पारंपरिक प्रश्नाच्या जोखडातून बाहेर यावयास हवे.
.. करण्यासारखे खूप आहे, पण आपण सुरुवात करायलाच पाहिजे. दोष केवळ सरकारवर आणि पोलिसांवर ढकलून आपण मोकळे होणे योग्य नाही. तंत्रज्ञान झपाटय़ाने पुढे जाते आहे. “By 2050 nobody will die in a Volvo” हे वाहनउद्योगाचे ब्रीद आहे. तंत्राने प्रगत होताना आपण वर्तणुकीने शहाणे होऊया. कारण..
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा!’