कलाकृतीचा रोख जर कल्पनेवर असेल आणि ती कल्पना कलावंताच्या वास्तवाशी किती निगडित आहे हे जर पाहिलं/ जोखलं जाणार असेल, तर कॅनव्हासवरची कलाकृती काय आणि ‘परफॉर्मन्स आर्ट’ किंवा कलाघटित काय, दोन्ही सारखंच.. हे समजून नाही घेतलं; तरीही गाडी ओढणाऱ्या त्या अफगाण तरुणींकडे पाहून काही वाटतं की नाही?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘परफॉर्मन्स आर्ट’ म्हणजे काय, मराठीत त्यासाठी कुठला प्रतिशब्द वापरायचा, फिल्मवरला किंवा मुक्तनाटय़ासारखा हा कलाप्रकार आर्ट गॅलऱ्यांमध्ये कसा काय, इत्यादी प्रश्न थोडे बाजूला ठेवून आधी सोबतच्या फोटोकडे पाहा.. मोटारगाडी ढकलणाऱ्या बुरखाधारी स्त्रिया दिसल्या का? मग जरा मोटारीकडेही पाहा. त्या गंजक्या गाडीला चाकंसुद्धा नाहीत धड. तरीही बायका ती ओढताहेत, ढकलताहेत. गाडी हलावी, गाडीनं पुढे जावं म्हणून धडपड सुरू आहे. धडपड व्यर्थ आहे, हे पाहणाऱ्यांना कळतंय. पण बायका जणू भागधेय असल्याप्रमाणे गाडी ओढण्याचं काम करताहेत. त्यांची ही धडपड एका चित्रफितीद्वारे चित्रपटासारख्या पडद्यावरून कलादालनातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आहे. मुंबईतल्या ‘प्रोजेक्ट ८८’ या कलादालनानं एप्रिल-मे २०१४ मध्ये ‘परफॉर्मिग रेझिस्टन्स’ नावाच्या प्रदर्शनात ही चित्रफीत दाखविली होती. तिचा हा फोटो तिथंच टिपता आला. सुमारे आठ मिनिटांची ती चित्रफीत वारंवार (‘लूप’ किंवा आवर्तनांनुसार) वाजत होती आणि अस्वस्थही करत होती.
अस्वस्थतेचं कारण अर्थातच त्या फिल्ममधून जे सूचित होत होतं त्याच्याशी निगडित आहे. अफगाण स्त्रिया, मोडून पडलेला गाडा, तो हलवण्याचे व्यर्थ प्रयत्न- आणि हे प्रयत्न व्यर्थ असूनही ते केले जात असल्याचं सतत दिसल्यामुळेच त्या सर्वाला प्राप्त झालेलं ‘अभिजात’ वलय! ग्रीक मिथ्यकथेतला सिसिफस जसा प्रचंड मोठा गोल खडक डोंगरावर चढवत नेऊन शिखरावर खडकाला स्थिर करण्याच्या प्रयत्नात असतानाच खडक घसरून, घरंगळून पुन्हा पायथ्यापाशी जातो आणि तरीही सिसिफसचे प्रयत्न थांबत नाहीत, वेताळ पंचविशीत जसा ‘विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही’ तसं काहीतरी ध्येयप्रेरित जिद्दीनं, पण फुकाचे कष्ट देणारं या बायकांचं चाललं आहे. या साऱ्याजणींचा देश त्या गाडीइतकाच अगतिक आहे. तिथल्या पुरुष मंडळींनी हे गाडं हलवण्यातली नालायकी वारंवार सिद्ध केलेली आहेच. त्यामुळे मग त्या मिळून काहीतरी हालचाल करताहेत.. नीट पाहिल्यास दिसेल की, या बुरखाधारी अफगाण स्त्रियांच्या पायांत पाश्चात्त्य पद्धतीचे उंच टाचांचे बूट आहेत! असं कसं?
ही कलाकृती आहे तरुण अफगाण दृश्यकलावंत मसूदा नोरा हिची. मसूदानं २०१३ साली ही फिल्म आपल्या मैत्रिणींसह घडवली, तेव्हा तिचं (आणि कदाचित मैत्रिणींचंही!) वय होतं १९ च्या आतबाहेर. कदाचित त्यांच्या पायांतले नेहमीचेच बूट अनवधानानं तसेच राहिले असतील. पण मसूदाला चित्रफितीच्या ‘एडिटिंग’मध्ये तरी तो भाग कापून टाकण्याची संधी होती. ती तिनं नाकारली, तिथं या कलाकृतीला अर्थाचं आणखी एक अस्तर मिळालं. अफगाणी बुरखा आणि पाश्चात्त्य बूट अशा दोन संस्कृती आपापल्या देहावर सहज वागवणाऱ्या तरुणी! मसूदाची ही चित्रफीत म्हणजे खरं तर ‘उप-निपज’ आहे. मूळ कलाकृती म्हणजे ती गाडी त्या तरुणींनी खरोखरच भरपूर वेळा ढकलणं/ ओढणं, हीच.
‘ही कसली कलाकृती?’ या प्रश्नाला तितकंच छोटं उत्तर : ‘ही ‘परफॉर्मन्स आर्ट’ या प्रकारातली कलाकृती.’ म्हणजे काय? ‘परफॉर्मन्स’ म्हणजे मराठीत ‘सादरीकरण’.. मग नाटकच केलं का त्यांनी गाडी ओढण्याचं? अजिबात नाही, असं दिसतंयच. ‘परफॉर्मन्स आर्ट’ म्हणजे नाटकासारखा वा ‘अभिनया’तून आलेला खोटेपणा टाळून चित्रकारानं स्वत:ला (किंवा इतरांना) विशिष्ट परिस्थितीत खरोखरच असायला लावणं. ही ‘विशिष्ट परिस्थिती’ भले चित्रकाराच्या कल्पनेतली असेल; पण ती कल्पना काहीतरी सांगते.. ते अनेकदा समाजाबद्दल असतं. रेल्वेस्थानकावर, रस्त्यात कुठेही ‘परफॉर्मन्स’ किंवा आपल्या सोयीसाठी मराठीत त्याला ‘कलाघटित’ म्हणू- अशा कलाकृती होऊ शकतात. त्या काही मिनिटं/ काही तासांपुरत्याच असल्यानं चित्रफीत काढणं वगैरे सोपस्कार करून त्या ‘आर्ट गॅलरीत मांडण्यास तयार’ बनवायच्या; याला व्यावसायिक तडजोड म्हणता येईल. पण अशी तडजोड त्या कुणा अफगाणी मसूदा नूरा हिनं केली नसती तर तिला तिच्या देशभगिनींबद्दल जे उमगलंय, ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं असतं?
आपापल्या संगणकावर यू टय़ूब वा विमेओ या संकेतस्थळांवरून ‘प्रोटेस्ट आर्ट’, ‘परफॉर्मन्स आर्ट’ असा क्ल्यू देऊन या प्रकारच्या कलेची आणखी काही उदाहरणं पाहता येतील. जरूर पाहा. ती फिल्म नाही, ते नाटक नाही. कल्पना आणि कॅनव्हास यांचा जसा संबंध असतो तसाच इथं कल्पना आणि ‘घटित’ यांचा संबंध आहे असं मग तुम्हालाही वाटू लागेल.
अभिजीत ताम्हणे – abhijit.tamhane@expressindia.com

मराठीतील सर्व आजकालच्या कलाकृती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghani artist masooda noora top canvas artwork
First published on: 07-02-2016 at 01:01 IST