क्रिकेट किंवा इतर खेळांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी खेळाडू वाटेल त्या प्रकारचे आडमार्ग वापरू शकतात. बुद्धिबळासारख्या बैठ्या खेळात फसवाफसवीला थारा नाही, असे वाटत असेल तर त्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. फसवणुकीच्या किंवा गैरप्रकाराच्या गुंत्यात मातबर खेळाडूही अडकले आहेत.. ते कसे?

बुद्धिबळ हा खेळ असा आहे, की ज्यामध्ये पंचांनी चुकीचा निर्णय दिल्यामुळे डावावर परिणाम होईल (उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये LBW) किंवा हवामानाच्या लहरीप्रमाणे डाव लवकर आवरता घ्यावा लागेल, अशी परिस्थिती कधीही नसते. त्यामुळे या खेळात फसवाफसवी कशी होऊ शकेल, असं सामान्य क्रीडाप्रेमींना वाटणं साहजिक आहे; पण शेवटी खेळात हार-जीत ही महत्त्वाची ठरू शकते आणि त्यामुळे खेळाडू अनेक वेळा अवैध मार्गाचा अवलंब करू शकतात. तो करतातदेखील. बुद्धिबळ हा असा खेळ आहे, की मी आधीच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे त्यातील पराभव खेळाडूच्या जिव्हारी लागतो. क्रिकेटमध्ये स्वत:च्या मूर्खपणामुळे दांडी उडाली किंवा सोपा झेल सुटला तर खेळाडूला जास्त काही वाटत नाही. तो त्याला हसणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये खिलाडूवृत्तीने सामील होतो आणि नंतर विसरून जातो; पण बुद्धिबळाचा डाव हरल्यावर खेळाडू आपल्या मनाला फार लावून घेतात आणि त्यातून येनकेनप्रकारे जिंकण्याची ईर्षा त्यांच्या मनात जागृत होते. याच गोष्टीमुळे बुद्धिबळातील फसवणुकीच्या वादाचं पहिलं ऐतिहासिक उदाहरण हिंसाचाराकडे गेलं. उत्तर सामुद्रिक साम्राज्याचा सम्राट कॅनुट हा १०३५ साली झालेल्या त्याच्या मृत्यूपर्यंत इंग्लंड, डेन्मार्क आणि नॉर्वे या तीनही देशांवर राज्य करत होता. सम्राट कॅनुट एका डच उमरावाबरोबर खेळत असताना नक्की कोणी कोणाला फसवलं याचा इतिहासात उल्लेख नाही; पण दोघांमध्ये मोठा वादविवाद झाला आणि सम्राटांनी उमरावाच्या पटावरील राजाऐवजी उमरावाचाच खातमा केला याचा तपशील आहे. त्यानंतर भोळ्या लोकांना फसवण्याचं उदाहरण सापडतं ते १७७० साली! काही हुशार लोकांनी ‘तुर्क’ नावाचं एक बुद्धिबळ खेळणारं यंत्र तयार केलं. या यंत्राशी खेळायचं असेल तर तुम्हाला भरपूर पैसे द्यावे लागत. त्याच्याशी जिंकल्यावर तुम्हाला खास बक्षीसही मिळत असे. या यंत्राशी खेळण्यासाठी झुंबड उडत असे आणि यंत्राच्या मालकाला मोठी कमाई होत असे. पण (सोबतच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे) या महाकाय यंत्रात एक चांगला खेळाडू बसत असे आणि तोच खेळत असे. भोळ्या लोकांना वाटत असे की यंत्र खेळत आहे. नंतर कधी तरी या यंत्राचं गुपीत उघड झालं आणि ‘तुर्क’ नावाचं यंत्र बंद पडलं. पण सामान्य जनतेची स्मरणशक्ती कमी असते, त्यामुळे १०० वर्षांनी ‘अजीब’ आणि ‘मेफिस्टो’ या नावांनी ‘तुर्क’सारखी दोन यंत्रं आणून लोकांच्या फसवणुकीचा उद्योग सुरू झालाच.

With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!

हेही वाचा – आयुष्याविषयी परिपक्व, समंजस दृष्टिकोन

बुद्धिबळातली फसवणूक ही ‘मिशन इम्पॉसिबल’ या टेलिव्हिजन मालिकेत दाखवण्यात आली आहे. मात्र ही ५० वर्षांपूर्वीची मालिका होती, टॉम क्रूझचे चित्रपट नव्हेत. ‘चिअर्स’ नावाच्या मालिकेतही बुद्धिबळातील फसवणूक दाखवण्यात आली. भारतात ‘तेनाली रामा’ या मालिकेतील एका भागात राजा बुद्धिबळ खेळताना कंटाळून झोपतो आणि त्याचा फायदा घेऊन परराष्ट्रातील कपटी माणूस जिंकतो, असं दाखवण्यात आलं आहे. ‘छोटीसी बात’ या हिंदी चित्रपटात नायकाला बुद्धिबळात काही गती नसताना, तो आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपण किती मोठे खेळाडू आहोत असं दाखवून देतो. लहान मुलांच्या स्पर्धामध्ये अनेक वेळा ५०० मुलांसाठी १० पंच असतात. त्यामुळे चुकीची खेळी लक्षात आल्यावर ती मागे घेण्याचे प्रकार सर्रास होत असतात; पण ग्रॅण्डमास्टर्स खेळत असतानाही असं घडलेलं आहे. ‘सौस्से’ या गावी १९६७ साली झालेल्या इंटरझोनल स्पर्धेत ग्रँडमास्टर माटुलोवीच आणि ग्रँडमास्टर बिलेक खेळत असताना माटुलोवीचनं चुकीची खेळी केली. ते त्याच्या ताबडतोब लक्षात आल्यावर तो ‘मी हे खेळलो नाही, ती सोंगटी बरोबर ठेवली नव्हती,’ असं सांगू लागला. नियमाप्रमाणे तुम्ही सोंगटी नीट ठेवण्यासाठी आधी प्रतिस्पर्ध्याला सांगणं आवश्यक असतं. बिलेकनं तक्रार करून काहीही उपयोग झाला नाही, कारण पंच तेथे हजर नव्हता. साक्षात गॅरी कास्पारोव्हनेही अशी लबाडी ज्युडिथ पोल्गरविरुद्ध केली होती. त्यानं पटावरील घोडा उचलण्यासाठी त्याला हलका स्पर्श केला; पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आपली चूक आली आणि त्यानं हात मागे घेतला. ज्युडीथनं तक्रार केली; पण टेलीव्हिजन कॅमेऱ्यात स्पर्श झाला की नाही हे नीट कळत नव्हतं आणि संशयाचा फायदा मिळून गॅरी सुटला.

प्रत्यक्ष मॅग्नस कार्लसनला या अग्निदिव्यातून जावं लागलं होतं. प्रसंग होता सौदी अरेबियात झालेल्या जागतिक विद्युतगती सामन्याचा. इनार्कीव नावाचा रशियन ग्रँडमास्टर आणि मॅग्नस यांच्या डावाची अखेर जवळ आली होती. अक्षरश: काही सेकंद उरलेले असल्यामुळे दोघेही खरोखरच विद्युतगतीनं खेळत होते आणि कार्लसननं इनार्कीवच्या राजाला शह दिला. इनार्कीवनं शह न काढता कार्लसनच्या राजाला शह दिला. कार्लसननं आपला राजा हलवला. इनार्कीवनं ताबडतोब पंचांना बोलावलं आणि सांगितलं की, कार्लसननं खेळी करण्याऐवजी इनार्कीवची नियमाविरुद्धची खेळी दाखवून द्यायला हवी होती. तेथे असलेल्या दुय्यम पंचानं ही बाब मान्य केली आणि इनार्कीवला विजयी जाहीर केलं. पण मग कार्लसननं मुख्य पंचाकडे तक्रार करून सांगितलं की, आधी इनार्कीवनं नियमबाह्य खेळी केली होती, मग तो स्वत: कसा माझ्या नंतरच्या नियमबाह्य खेळीवर आक्षेप घेऊ शकतो? पंचांना ते पटलं आणि त्यांनी डाव पुन्हा खेळण्यास सांगितलं. इनार्कीव न खेळता निघून गेला आणि कार्लसनला त्या डावात विजयी घोषित करण्यात आलं. मॅग्नसनं नंतर स्पर्धादेखील जिंकली.

संगणकांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केल्यापासून एक नवीच समस्या बुद्धिबळ जगतात उद्भवली आहे. बिचाऱ्या संगणकाला माहितीही नसेल की, आपण बुद्धिबळातील किती तरी गुन्ह्यांसाठी मदत करीत आहोत. लहान लहान मुलांनाही ऑनलाइन खेळताना संगणकाचा (गैर)वापर कसा करायचा ते कळू लागले आहे. त्याचा फायदा घेऊन ते आपली ऑनलाइन रेटिंग्स (ज्याला जगात काहीही किंमत नाही) वाढवतात आणि बिचारे आईबाप खुशीत असतात, की आपल्या पोटी प्रज्ञानंद/ दिव्या देशमुख जन्माला आलेत. ज्या वेळी प्रत्यक्ष स्पर्धेत खेळायची वेळ येते, त्या वेळी त्यांना आपल्या दिवट्याचा निकाल बघून धक्का बसतो. मग त्याचा राग ते प्रशिक्षकावर काढतात. त्यामुळे प्रशिक्षकाचं हे कर्तव्य बनतं की, त्या ‘प्रज्ञानंद’च्या पालकांना खऱ्या परिस्थितीची कल्पना देणं. असो.

लहान मुलं तर निष्पाप असतात (असं समजू या). पण मोठ्या मोठ्या ग्रॅण्डमास्टर्सना संगणकाचा वापर करून बक्षिसं मिळवण्याचा मोह आवरत नाही. ग्रॅण्डमास्टर्स निकालिड्झ (जॉर्जिया) आणि इगॉर रौसिस (लॅटव्हिया) हे तर प्रसाधनगृहात मोबाइलवर संगणकाची मदत घेताना पकडले गेले होते. दादांग सुबूर नावाच्या एका बदमाशानं ऑनलाइन खेळताना यूट्यूबवर ‘गॉथमचेस’ नावानं बुद्धिबळ शिकवणाऱ्या लेवी रोझमनला हरवलं. रोझमननं तक्रार केली आणि मग इंडोनेशियाची अव्वल खेळाडू इरीन सिकंदर हिच्याशी दादांगचा सामना ठरला. तब्बल १२ लाख २५ हजार प्रेक्षक नेटवर हा सामना पाहत होते. इरीननं लागोपाठ तीन डाव जिंकून दादांगची दादागिरी बंद केली. सर्वात पहिला संगणकाची मदत घेतलेला प्रसंग १९९३ साली अमेरिकेतल्या वर्ल्ड ओपन या मोठ्या स्पर्धेत घडला. एका रेटिंग नसलेल्या खेळाडूनं चक्क ग्रॅण्डमास्टर्सशी बरोबरी साधल्यावर पंचांना संशय आला. त्याच्या टोपीखाली दडलंय काय, असं विचारल्यावर त्याचं उत्तर मिळालं- ‘हेडफोन’. आणि पठ्ठ्यानं वॉकी टॉकी खिशात ठेवला होता.

भारतात घडलेला एक प्रसंग तर डोळे उघडणारा होता. उमाकांत शर्मा या अनोळखी खेळाडूनं २००६ सालाची सुरुवात केली ती १९३३ रेटिंगनं. त्यानं एकापाठोपाठ एक स्पर्धा खेळून ६४ डावांमध्ये आपलं रेटिंग २४८४ पर्यंत नेलं. साध्या वर्तमानपत्रातच नव्हे तर क्रीडा साप्ताहिकातूनसुद्धा त्याच्या मुलाखती येऊ लागल्या. त्यानेही आपण सहा तास अभ्यास करतो, माझी पद्धत सीक्रेट आहे वगैरे वगैरे बोलून आपला दबदबा निर्माण केला. त्याची चूक झाली ती म्हणजे, त्यानं भारतीय हवाई दलानं प्रायोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतला! कोणी तरी उमाकांतविषयी तक्रार केली आणि हवाई दलाचे अधिकारी मेटल डिटेक्टर घेऊन पोहोचले. त्यांना त्याच्या टोपीत ‘हेडफोन’ सापडलं. उमाकांतचा मदतनीस जवळच एका हॉटेलमध्ये संगणक घेऊन बसायचा आणि दुसरा मदतनीस त्याला उमाकांतच्या प्रतिस्पर्ध्यानं केलेल्या चाली कळवायचा. मग संगणकानं दिलेली उत्कृष्ट चाल मदतनीस उमाकांतच्या टोपीत फोनवर पाठवत असे. उमाकांतला १० वर्षे बुद्धिबळ खेळायची बंदी घालण्यात आली.

हेही वाचा – विचित्रपट तयार करताना..

आणखी एक फसवणुकीचा प्रकार अमेरिकेत फार चालतो. त्याला sand bagging म्हणतात. अमेरिकेत रेटिंग गटाप्रमाणे बक्षिसं असतात. उदाहरणार्थ १०००-१२००, १२००-१४०० इत्यादी इत्यादी आणि बक्षिसं मोठ्या रकमेची असतात. त्यामुळे १४५० रेटिंग असलेला खेळाडू त्या मोठ्या स्पर्धेच्या आधी पटापट काही स्पर्धा खेळून मुद्दाम हरतो आणि आपलं रेटिंग ५०-६० गुणांनी कमी करतो. म्हणजे त्याला मोठ्या स्पर्धेत खालच्या गटात खेळता येतं आणि बक्षिसाची संधी जास्त राहते. हुशार भारतीय आयोजक गेल्या तीन वर्षांतलं रेटिंग बघतात आणि मगच खेळाडूला खालच्या गटात भाग घेता येतो. फसवणुकीच्या मोहातून अंध खेळाडूपण चुकलेले नाहीत. अंध खेळाडूंना लिहिणं शक्य नसल्यामुळे त्यांना टेपरेकॉर्डर वापरण्याची परवानगी असते. स्टाईन बीओरसेन नावाच्या नॉर्वेतील अंध खेळाडूला दोन वर्षांची शिक्षा झाली, कारण तो वापरत असलेल्या टेपरेकॉर्डरमध्ये ‘ब्लू टूथ’च्या साहाय्यानं बाहेरून खेळ्या यायच्या आणि हेडफोनमधून त्याला त्या ऐकू येत असत. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ या न्यायानं फसवणाऱ्या खेळाडूला पकडणाऱ्याला शिक्षा झालेली घटनाही आहे. कॉर्क नावाच्या आयर्लंडमधील गावात २००३ साली एक स्पर्धा सुरू होती. त्यात १६ वर्षांचा एक खेळाडू वारंवार प्रसाधनगृहात जाताना बघून त्याच्या प्रतिस्पर्ध्याला संशय आला. प्रतिस्पर्ध्यानं लाथ मारून प्रसाधनगृहाचं दार उघडलं तर काय? १६ वर्षांचा हा मुलगा मोबाइल घेऊन त्यातील संगणकावर डाव लावत होता. प्रतिस्पर्धी चिडला. त्यानं त्या अल्पवयीन खेळाडूला खेचून सभागृहात आणलं. बहुधा एक-दोन थपडाही मारल्या असतील. त्या १६ वर्षांच्या मुलाला ४ महिने बंदी आली; पण त्याची चोरी पकडणाऱ्याला अल्पवयीन मुलावर हिंसाचार केल्याबद्दल १० महिन्यांची बंदी घालण्यात आली. ‘न्यायदेवता आंधळी’ असते, असं म्हणतात ते उगाच नाही.

बुद्धिबळातील फसवाफसवी करणारे स्वत:ला हुशार समजत असतात; पण तेथे शेराला सवाशेर बसलेले असतात. ते या चोरांना पकडतात आणि त्या गुन्हेगारांची पूर्ण नालस्ती होते. त्यामुळे हा लेख वाचणाऱ्या खेळाडूंनी फसवाफसवी करू नये. उलट खिलाडूवृत्तीनं खेळून बुद्धिबळाचे फायदे मिळवावेत. खोटं खेळून मिळवलेलं बक्षीस आपल्याला कधीही पचत नाही, हा बोध घ्यावा.

gokhale.chess@gmail.com