– सुनंदा भोसेकर

‘बारीक बारीक आवाज वाढत चाललेत’ हा स्नेहा अवसरीकर यांचा पहिलाच कथासंग्रह. यापूर्वी दिवाळी अंकांमधून आलेल्या त्यांच्या कथांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या संग्रहात आता त्या एकत्रित स्वरुपात वाचायला मिळतात. संग्रहात एकूण अकरा कथा आहेत. लेखिकेचा पिंड चिंतनशील आहे. भोवतालच्या परिस्थितीचा आपल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न त्या प्रामाणिकपणे करतात. लिखाणाचा एकूण सूरही संयत आहे. काही कथा स्त्रीकेंद्री असल्या तरी त्यात कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश, आग्रह नाही. माणसाचा शोध आहे. सगळ्याच कथांमधून आयुष्याविषयीचा एक परिपक्व, समंजस असा दृष्टिकोन दिसतो. मात्र तो जे आहे, ते तसेच स्वीकारायचे असा शरणागत नाही. ‘शेवट नसलेली गोष्ट’ या कथेमध्ये एक वाक्य येते, ‘सत्य असत्याच्या मध्ये कितीतरी गोष्टी असतात ज्या काढून, उपटून टाकता येत नाहीत, फक्त जाचत राहतात. टोचत राहतात.’ या कथेतली कल्याणी आतूनच शांत आहे. तिला स्वत:चे आयुष्य, स्वत:च्या जबाबदारीवर, स्वत:च्या अटीशर्तीवर जगायचे आहे. अनेक आघात सोसूनही ती स्वत:च्या आवडीच्या कामात रमते. भूतकाळ, भविष्यकाळाचे संदर्भ निपटून ती ‘एका लकाकत्या चैतन्यदायी काळात वावरत होती.’

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…

‘पिंपळ’ नावाच्या कथेत दरवर्षी नव्याने बहरणारा पिंपळ नायिकेला नव्याने जगायला उमेद देणारा आहे. कथेची नायिका म्हणते, आयुष्याच्या एका टप्प्यावर अस्तित्वाचा प्रश्न धारदार लखलखीत पात्यासारखा मागे येतो तरी आतल्या आत काही होते आणि पुन्हा पोपटी गुलाबी पानं उमलतात. ‘अंत ना आरंभही’ या कथेत नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली, आपल्याला ओळखणारी असणार नाहीत, खरी सोबत आपलीच आपल्याला, अंत:करण उमलून जगायचे ते आपल्याशीच हे समजून घेते.

हेही वाचा – आदले । आत्ताचे : नखललेलं काळीज..

‘बारीक बारीक आवाज वाढत चालले आहेत’ ही कथा एका ब्याऐंशी वर्षे वयाच्या लेखिकेची आहे. रात्री बारीक बारीक आवाजांमुळे त्यांना झोप येत नाही. घरात उंदीर वाढल्यामुळे हे आवाज वाढले आहेत. पेस्ट कंट्रोल करून वृंदाताई ते आवाज कमी करवतात. त्याच दरम्यान बाल्कनीत कबुतराचे एक जखमी पिल्लू पडते. या पिल्लाला त्याच्या शत्रूंपासून वाचवून, त्याला उडता यायला लागल्यावर मोकळ्यावर सोडून देण्यात त्या यशस्वी होतात. या पिल्लाच्या निमित्ताने स्वत:च्या एकाकीपणाला पाट काढून देतात. ब्याऐंशी हे काही वय नाही की पुन्हा काही नव्याने सुरुवात करण्याचे, पण तरी मन झेपावते शरीराचे न ऐकता, अशा ऊर्जा देणाऱ्या वाक्यावर ही कथा संपते.

‘नंदीचा वाडा’ ही वेगळ्या बाजाची कथा आहे. धिप्पाड, रसरशीत, पिवळ्या धम्मक नागिणीसारखी दिसणारी, संतापी, बेताल, कचाकचा शिव्या देणारी नंदी हे एक शारीर अस्तित्व आहे. तिची दिवंगत सावत्र सासू बायजा, हिच्यासारखीच ती तापट, अधाशी आहे. वाड्यातली माणसं तिच्या दहशतीखाली वावरतात. काळाच्या ओघात म्हातारी माणसे मरून जातात आणि बाकीची वाडा सोडून जातात. फोटोतली सावत्र सासू मजबूत, दागदागिन्यांनी सजलेली, घरादाराला धाक दाखवणारी, नंदीला तसेच व्हायचे होते. वाड्यातली सगळी माणसे निघून गेल्यावर फोटोतली बायजाच नंदीला भेटते. तिच्याशी आसुरी आनंदाच्या गप्पा मारते. नंदीच आता बायजा झालीय की काय या प्रश्नापाशी येऊन कथा थबकते. भीतीने कावळेही कडुनिंबावर फिरकत नाहीत.

‘आर्त’ ही एका जटिल प्रश्नापाशी येऊन थांबलेली कथा आहे. कथा सांगणाऱ्या बाईचा नवरा, कमल या मोलकरणीच्या नवऱ्याला बाईकवरून लिफ्ट देतो. अचानक समोरून एक गाडी येते, अपघात होतो आणि मागे बसलेला कमलचा नवरा जागच्याजागीच मरतो. हेल्मेट असल्याने बाईचा नवरा थोड्या जखमांवर बचावतो. रात्रीच्या वेळी कमलच्या मुलीच्या रडण्याचा आवाज येतो आणि बाईला आठवते की कमलने सांगितले होते की हा तिचा दुसरा नवरा आहे. पहिला नवरा याच्या हाताखाली कामाला होता. अपघातात गेला तेव्हा हा देखरेखीला होता. अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्याने कमलशी लग्न केले होते. कमलचे बोलणे डोक्यात घण घालावेत तसे बाईला आठवत राहते. या संग्रहातली सगळ्यात हृद्य कथा आहे ती म्हणजे काका-पुतण्याच्या नात्याविषयीची ‘आधार’ ही दीर्घकथेचा ऐवज असलेली कथा. आईबापाच्या मृत्यूनंतर भरकटलेल्या पुतण्याच्या आठवणीने काका कासावीस होत राहतो. आपण कर्तव्य नीट पार पाडले नाही म्हणून स्वत:ला अपराधी समजतो. वाईट संगतीच्या आहारी जाऊन सर्वस्व गमावलेला पुतण्या स्वत:च स्वत:ला सावरतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबात पेईंगगेस्ट म्हणून राहताना त्यांच्यातलाच होऊन जातो. हरवलेल्या पुतण्याचा योगायोगाने शोध लागल्यावर आता जिवाला कसला घोर नाही असे म्हणत काका नव्याने बुद्धिबळाचा डाव मांडायला घेतो.

कथेचे सूत्र एवढ्या विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे, गोष्ट सांगणे काहीसे कालबाह्य झालेले असतानाही स्नेहा अवसरीकर एक ठोक गोष्ट सांगतात. तिच्या अनुषंगाने पात्रांच्या भावभावना, त्यांचे व्यक्तिमत्त्व उभे करतात. अनेक ठिकाणी कथेतल्या वातावरणाचे चित्रण, पात्रांचा स्वत:शीच घडणारा संवाद, शब्दबंबाळ किंवा भावनाबंबाळ न होता ललित अंगाने जातो. माणसांचे बदलेले जगणे, स्पर्धा, मंदी, जागतिकीकरण, नदीचे वाळवंट होणे, गावे रिकामी पडणे या गोष्टींचीही दखल लेखिकेने घेतली आहे.

हेही वाचा – ‘बीबी’चा मकबरा!

‘अंतर्नाद’ मासिकाच्या संपादकीय विभागाबरोबरच स्नेहा अवसरीकर यांनी दीर्घकाळ पुणे आकाशवाणीत काम केले आहे. आकाशवाणीतल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवरच्या कथा आहेत. ‘जाड काळ्या रेघेनंतर’ या कथेची नायिका आपल्या सुरक्षिततेचा, स्वार्थाचा विचार न करता युनियनच्या माध्यमातून संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी स्वत:ला जोडून घेते. रेडिओस्टेशनवर काम करणारी ईशा आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेले अबोल, अस्फुट नाते मनातच ठेवून त्याच्यापासून दूर होते. हा कथासंग्रहही त्यांनी जिथे कथा लिहिण्याची सुरुवात त्या पुणे आकाशवाणीच्या स्टुडिओतल्या एकांतास अर्पण केला आहे.

या सगळ्या जमेच्या बाजू असूनही मुद्राराक्षसाच्या डुलक्यांमुळे वाचताना दाताखाली खडे यावेत इतक्या मुद्रणाच्या चुका सबंध पुस्तकात विखुरलेल्या आहेत. ‘आधार’ या कथेची मांडणी सदोष आहे. वाचता वाचता मागे जाऊन नेमके कोणते पात्र बोलते आहे याची खातरजमा करून घ्यावी लागते. काही चुका टायपिंगच्याही असाव्यात. एका पात्राचे नाव एकदा मधुसुदन जोशी असे येते तर दोन पानांनतर त्याचे नाव मधुसुदन भावे असे येते. चांगली कथा वाचताना रसभंग होतो. असे असले तरी बऱ्याच दिवसांनी एक चांगला सकस कथासंग्रह वाचल्याचे समाधान मिळते.

‘बारीक बारीक आवाज वाढत चाललेत’,

स्नेहा अवसरीकर, रोहन प्रकाशन, पाने – १६४, किंमत – २५० रुपये.

sunandabhosekar@gmail.com