सुभाष अवचट (रेखाचित्र : अन्वर हुसेन) Subhash.awchat@gmail.com

एखादा मुद्दा, शब्द, उत्पत्ती अशा गोष्टींवर गंभीर चेहरे करून चर्वण करणारे इकडेतिकडे हररोज दिसतात. गावकऱ्यांची हकिकत वेगळी असते. माझ्या गावाभोवती काही कोस अंतरावर पाच-पंचवीस घरांच्या खेटून वसलेल्या अनेक वस्त्या आहेत. ती घरं, त्यातली माणसं एकमेकांना अनेक वर्षे चिकटून असतात. वस्तीत कोणाच्या घरात जन्मलेले मूल अथवा वासरू असो, कोणाचा म्हातारा खपला, कोणाची सोयरीक झाली, कोणी पागोटे अथवा टोपी घेतली, कोणाची चूल पेटली, किती भाकऱ्या थापल्या, कोरडय़ास कोणी काय केले याची माहिती सर्व घरांत चुलीच्या धुराप्रमाणे पसरते. तो त्या वस्तीचा सहज भाग असतो. त्यामुळे कोणतीही गैर कुजबुज नसते. लहानपणापासून कमरेला करगोटा बांधून नागडी पोरं खेळता खेळता मोठी होतात. प्रत्येक पोराच्या गालावर काळी तीट साऱ्याच आया लावतात. गव्हाणीत कडबा साऱ्या जनावरांना मिळतो. त्यामुळे सर्वाचं आयुष्य वडाखालच्या चावडीसारखं लख्ख असतं. ही लहान पोरं मग बाप्पे होतात. संध्याकाळ झाली की हनुमानाच्या पत्राच्या देवळासमोरच्या पारावर, डोक्यावरच्या टोपीशी चाळा करीत  सारे जमतात. मारुतीच्या देवळात नेहमीप्रमाणे चकणा नाथा चिरक्या आवाजात भजन गात असतो. लुकडा महादेव पेटीवर, तर लख्या पखवाज बडवत असतो. पेटवलेल्या दिव्याच्या प्रकाशात शिंपल्याचे डोळे चिकटवलेल्या, भगव्या थोपटलेल्या ऑइल पेंटमधला हनुमान अर्ध्या काळोखात, अर्ध्या प्रकाशात भारी दिसत असतो. भजनाचा आवाज साऱ्या वस्तीवर तरंगत असतो. दिवेलागण झालेली असते. चुली पेटवल्या जातात. घराबाहेर बकऱ्या खेटून बसलेल्या असतात. दमलेले बैल उगीचच माना वळवीत उभे असतात. काळ्या म्हशी अंधारात रवंथाला बसलेल्या असतात. धुळीनं भरलेली कुत्री पारापाशी पाय पोटाशी घेऊन, कान टवकारून अंधाराकडे पाहत बसलेली असतात. ही वेळ, तो प्रसंग, ते भजन, ती माणसं रिवाजाप्रमाणे दररोज तेथेच असतात. आणि मग एक अलौकिक संभाषण पारावर सुरू होतं.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…

पहिला गावकरी म्हणतो, ‘‘अरे, कुठला आवाज येतोय रे देवळातनं?’’

दुसरा म्हणतो, ‘‘हा, काहीतरी आवाज येतोय खरा!’’ 

तिसरा म्हणतो, ‘‘पेटी का तबला वाजतोय बहुतेक.’’

चौथा म्हणतो, ‘‘अरं, चकणा नाथाचा आवाज आहे का रं?’’

मग पहिला म्हणतो, ‘‘काही दिसला नाही नाथा आज! च्यायला, पेटीपण वाजतीय की!’’

तेवढय़ात तिसरा म्हणतो, ‘‘पेटी की बासरी? काहीतरी आवाज येतोय खरा!’’

असे अनेक घुमावदार संवाद चालू राहतात. पण दोन पावलांवर असलेल्या देवळात भजन चालू आहे, आपलाच मित्र भजन  गातोय, त्याला साथही मित्रच अनेक वर्षे करताहेत हे कोणी कबूल करीत नाहीत. तेथेच ‘प्रत्यक्ष’ समोर दिसत असले तरी ते कबूल करायचे नाही, हे बाळकडू गावातच मिळते.

भुईमुगाच्या तेलाचा घाणा, पिठाची गिरणी, शिंप्याचे एक दुकान, पांजरपोळ, शाळा, दोन देवळे, किराणा मालाचं दुकान, आठवडय़ाचा बाजार, एक दवाखाना यामुळे वस्त्यांच्या पुढे गावाचा रुबाब असे. पण घुमावदार स्ट्रॅटेजी येथेही मुरलेली होतीच की! एका संध्याकाळी मी वडिलांबरोबर वाडय़ाच्या पायरीवर बसलो होतो. एवढय़ात देवदर्शनाला गेलेले कांतीशेठ वेशीतून धावत, धापा टाकीत आले. ते घामाघूम झाले होते. त्यांचे धोतरही जवळपास फिटले होते. धापा टाकत ते माझ्या वडिलांना म्हणाले, ‘‘डॉक्टर, देवळाच्या रस्त्यावर बाई की पुरुष, चाकू की तलवार, खून का मारामारी, रक्त की गुलाल, मेला का पळाला..’’ असे बोलत कांतीशेठ थरथरत होते. माझे डॉक्टर वडील शांतपणे ऐकत होते. त्यांनी काही रिअ‍ॅक्शन दिली नाही. त्यांना गावकऱ्यांच्या स्वभावाची सवय होती. प्रत्यक्ष काय घडले हे कांतीशेठ कबूल करणारच नव्हते. त्यांना ‘आय विटनेस’ होणे मंजूरच नव्हते. पोलीस पाटलांनी जाऊन खुनाचा तपास केला व करीत राहिले; पण अनुमान लावू शकले नाहीत. एक मात्र झालं, की कांतीशेट काही काळ गावातून गायब झाले. त्यांना बहुधा मारेकऱ्यांनी तेथे प्रत्यक्ष बघितलं असावं! या गावकऱ्यांनी ‘प्रत्यक्ष’ या संज्ञेचा एक वेगळाच विकास केलेला आढळतो. कबूल केल्याने गोत्यात येऊ शकतो, हे जरी सूत्र असले तरी दैनंदिन जीवनात एकमेकांशी बोलतानाही हीच त्यांची परिभाषा झालेली होती.

माझ्या स्टुडिओत लख्या नावाचा गावातला एक मुलगा काही काळ काम करीत होता. मी नसताना कोणाचा फोन आला व मी त्याला विचारले की, ‘‘कोणी कॉल केला?’’ त्याचे उत्तर असे, ‘‘पवार की नाडकर्णी, मेनन मॅडम का खंबाटा साहेब, सलील का पुण्याहून तुमची रेखाताई?’’ तो खरा कोणाचा फोन आला, हे नेमकं सांगत नसे. त्यामुळे त्याला एसटीने मी गावाकडे परत पाठवला.

मनुष्यस्वभाव असा कसा झाला असावा? धुरळा उडवत राहणे हा नैसर्गिक स्वभावधर्म आहे का? त्यामुळे बखरकारांची त्रेधा उडणे साहजिकच आहे. समोर प्रत्यक्ष पाहिले अथवा ऐकले, त्याला उरफाटय़ावर मारणे ही जादूगिरी गावातच पाहायला मिळते. जे पाहिले ते सत्य बोलतात, त्यांना गावात ‘बांडगूळ’ म्हणतात. हा गावातल्या आडाच्या पाण्याचा गुणधर्म आहे. ही जादूगिरी जगभरातली आहे.

१९३४ मध्ये मायकेल हेस या लेखकाने ‘The Childrenls Hour’ या नावाचे नाटक लिहिले. त्यावर एक फिल्मही तयार झाली. तिचे नाव ‘Loudest Whisper’ हे होते. ही फिल्म मी कॉलेजला असताना पुण्यातल्या कॅम्पमधील वेस्ट एंडला पाहिली होती. त्यात माझ्या दोन आवडत्या नटय़ा होत्या. ऑड्री हेपबर्न आणि शिरले मॅकॅलेन! ही कथा एका छोटय़ा गावातल्या शाळेत घडते. या दोघी तेथे मास्तरणी असतात. काही खोडकर मुले खोटं बोलत असतात. त्यामुळे या दोघी त्यांना छोटी शिक्षा करतात. ती मुले बिलंदर असतात. त्या दोघींवरचा राग काढण्यासाठी ते या दोघी लेस्बियन आहेत अशी कुजबुज सुरू करतात. हळूहळू ही कुजबुज मोठी गॉसिप बनते व गावभर पसरते. आणि सगळे गाव त्यात आपापली भर घालून चविष्ट बनवतात. शेवटी शाळेच्या मॅनेजमेंटकडे ती गोष्ट जाते. या प्रकरणात त्या दोघींकडे जाऊन प्रत्यक्षपणे त्याचा छडा लावण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. त्या दोघींचा मन:स्ताप वाढत जातो. एकीची झालेली एंगेजमेंटही तुटण्याच्या मार्गावर येते. ती मुले, शाळा, गावकरी, घराघरांत, स्वयंपाकघरांत ही चर्चा एवढी वाढते की त्या दोघी खरोखरीच लेस्बियन आहेत, हेच सत्य मानले जाते. शेवटी हताश होऊन त्या दोघी गाव सोडतात.

एखाद्याला बदनाम करणे हे समाजातल्या प्रत्येक गटात, घटकात घडत असते. मनुष्यस्वभावातले हे एक न समजणारे अंग आहे. जो- तो त्यात आसुरी आनंद घेत जातो. पण प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या मुळाशी जाण्याचे सौजन्य यात नष्ट होते. एखाद्याला दुसऱ्याची भरभराट, सौंदर्य पाहून जेलसी वाटणे ही स्वाभाविक रिअ‍ॅक्शन असते. नंतर हताश लोक त्याला कसा बदनाम करता येईल याचा मार्ग स्वीकारतात. तो कुजबुजीने सुरुवात करतो आणि त्याचीच लाऊडेस्ट व्हिस्पर बनते. तो निर्दोष मनुष्य किंवा स्त्री या बदनामीमुळे त्रस्त होतात आणि बाकी त्याची मजा बघत परनिंदानंद घेत असतात.

नऊ रसांमध्ये हा तर दिसत नाही. ुमन नेचरमधले हे एक ‘डिफरंट व्हर्जन’ आहे. स्वत:पेक्षा सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीवरची जेलसी, शेजारणीचं गोंडस पोर, भावाची कर्तबगारी आणि श्रीमंती, आईचे मुलीवर जळणे, मित्राची प्रतिभा, शाळेतल्या वर्गातला हुशार सवंगडी, कमी पैशांत, पण आनंदात जीवन जगणारे शेजारी! एखाद्या शांत बसलेल्या माणसाकडे बघूनही ही माणसं कासावीस होतात.

‘जेलसी’ हे ुमन नेचर आहे, तर ‘गॉसिपिंग’ हा मानसिक आजार आहे. अप्रत्यक्ष पडद्याच्या आधारावर हा पसरलेला आहे. पडद्यावरील उमदे नट, सुंदर अभिनेत्री, कुशल नर्तिका, क्लासिकल गायक, तडफदार खेळाडू, कर्तबगार उद्योगपती अथवा जबाबदार राजकारणी असोत किंवा कष्टाने शिकून उच्चपदावर पोहोचलेली महिला असो- यांच्याबरोबर वैयक्तिक, प्रत्यक्ष ओळख नसताना ही माणसं क्लब, कट्टा, ठेल्यावर जणू मला ते नीट माहीत आहेत अशा थाटात त्यांच्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात करतात. शिवाय हे अत्यंत खासगी आहे असा त्यात आविर्भाव असतो. त्यात प्रामुख्याने लफडी, सेक्स, दारू, सट्टा अथवा ‘तो आता पार भिकारी झाला’ अशा त्यांच्या पातळीवरच्या पोकळ अफवा असतात. त्या ऐकताना सारे खूश असतात. याच खुशीचा धागा पकडून टीव्हीवर नवीन सीरियल्स, गॉसिप मॅगझिन्स, सोशल मीडियाचे युग अस्तित्वात आले. व्हॉट्सअ‍ॅपवर  दिवसभर गॉसिप फॉरवर्डिग करण्याचे दिवस आले. काही जणांचे सारे आयुष्य या गॉसिपिंगमध्येच संपते. हा अद्भुत खेळ आता मोठा बिझनेस झालाय. न्हाव्याचे सलून ते डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये हीच ग्लॉसी मॅगझिनमधली लफडी वाचण्यात लोकांना आनंद मिळू लागलाय. एवढेच नाही तर प्रसिद्धीसाठी उगाचच कॉन्ट्रोव्हर्सी तयार करण्याची आणखी एक शाखा निर्माण झालीय. काही नाठाळ कलाकार ही कान्ट्रोव्हर्सी मुद्दाम तयार करू लागले. जो-तो माकडचेष्टा किंवा प्रसिद्ध नट-नटय़ांच्या नकला करून व्हिडीओ बनवू लागले. प्रात:काळी उठल्यापासून ते अंथरुणात झोपेपर्यंत फेसबुकवर आपापले फोटो टाकू लागले. हा नवीन युगाचा नवा ‘गॉसिप कोव्हिड’ म्हणावा लागेल. यामागे मूळच्या  गॉसिपिंगींच्या मेंदूतले नवीन डेव्हलप झालेले केंद्रच असावे.  प्रत्यक्ष-अप्रत्यक्षातला विवेक येथे नसतो. करमणुकीचा हा नवीन सारिपाट आहे. खऱ्या तंत्रज्ञानाचा वापर सहिष्णुतेने व्हायच्या आधीच हा धुराळा उडाला.

प्रत्यक्ष पाहून अनुमान, त्याच्या स्मृती, प्रमाण, न्याय, पुरावा अशी साखळी तयार होते. फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये मी अकीरा कुरुसावा या जगप्रसिद्ध डिरेक्टरची ‘राशोमान’ ही फिल्म कॉलेजच्या दिवसांत बघितली होती. ती आजतागायत माझा पाठलाग करीत आली आहे. ‘फिलॉसॉफी ऑफ जस्टिस’ हा तिचा सेंटर पॉइंट आहे. १९५० साली ही फिल्म आली. प्रेक्षकांना एका वेगळ्याच उंचीवर ती घेऊन गेली. एका जंगलात नवरा-बायको जात असतात. त्यावेळी नवऱ्याचा खून आणि बायकोवर बलात्कार होतो. ते प्रत्यक्ष पाहणारी तीन माणसे असतात. साक्षीदार म्हणून त्यांना बोलावले जाते. ती एकच घटना हे तिघे जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. ही गोष्ट त्यामुळे फ्लॅशबॅकमध्ये दाखवली गेली आहे. त्या घटनेकडे पाहण्याचे तिघांचे वेगवेगळे परसेप्शन बघून आपणही भांबावून जातो. खरे काय, खोटे काय? यात कुरुसावाने तुम्हाला नेऊन ठेवले आहे. दररोजच्या जीवनाकडे पाहण्याचे प्रत्येकाचे परसेप्शन किती वेगळे असते? एखाद्या व्यक्तीशी तुमचा कोणताही वैयक्तिक संबंध नसताना तुम्ही त्या व्यक्तीबद्दल स्वत:ची मते बनवता. तीच खरी आहेत अशा भ्रमात त्या व्यक्तीबद्दल गॉसिपिंग करायला सुरुवात करता आणि ‘असेल बुवा!’ म्हणत इतरही त्यात सामील होतात. शेवटी ती व्यक्ती, ती घटना खरी की खोटी, हे प्रत्यक्ष तपासायची कोणीच तसदी घेत नाही. यात गुन्हेगार कोण आहेत हे तपासायला कोर्ट हवे. पण पुरावे देणारी माणसे, त्यांचे पुरावे इतके जीर्ण झालेले असतात, की तारेवर लटकलेल्या पतंगासारखी ती केस व निर्णय लटकत राहतात. ‘राशोमान’ याचा छेद घेणारी फिल्म आहे. Perceivable through the sensory organs, but related to perception of the mind  or soul directly.

चित्रकलेत चित्रकारांची वेगळीच भूमिका असते. ती संपूर्ण व्हिज्युअल परसेप्शनवर रचलेली असते. त्यातल्या परसेप्शनचा अर्थ वेगळा ठरतो. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष बाजूला पडते. निर्विकल्पाच्या जवळ ती जाते. येथे गावातल्या माणसांसारखी घटना पाहूनही घुमावदार वळणं घ्यायची गरज पडत नाही, किंवा त्याचे डिसेक्शनही करण्याची गरज नसते. प्रत्यक्ष घडलेली घटना त्याच्यासाठी एक इमेज राहते; त्यात त्याला इंटरेस्ट नसतो. त्या इमेजच्या पलीकडे आणखी त्याची स्वत:ची इमेज असते. त्याची ओढ त्याला लागते. इतरांना ती दिसूच शकत नाही. त्याच्या इमेजमध्ये गॉसिपिंग, आकस अथवा जडत्व नसते. त्या इमेजवर तो स्वत:चा अधिकारही सांगत नसतो. तो तिच्याशी समरस होतो आणि कॅनव्हासवर चितारण्याचा प्रयत्न करतो. ही प्रोसेस अधांतरी जरी वाटली तरी ती लिरिकल असते.

It appears that human brain has a big optical cortex that process visual information.

Itls amazing! Artists actually make paintings… that are perceived and processed by artistls optical cortex, so that we see what artist want us to see… हा पेंटिंगमधला ‘डिवाईन’ खेळ आहे. येथे प्रत्यक्षाच्या अंतरंगात लपलेल्या साक्षीदाराच्या सच्च्या प्रतिमांचा शोध आहे. अमर्याद घटना, स्थित्यंतरांनी जीवन भरलेले असते. हरघडी ते बदलते. त्याकडे प्रत्यक्ष पाहणे, न्याहाळणे, त्याची बूज राखणे हे आलेच. पाहून न पाहणे, समजूनही बहाणे करणे, हा खेळ चालूच राहतो. पाऊलवाटांचे जाळे सोडवत त्यावर गुणगुणत चालणे हा निसर्गाचा एक भाग आहे. या पाऊलवाटाही घरंगळत जातात. विसर्जित होतात. विसर्जन हे सूत्र आहे. बालपणातल्या आठवणींचे व्रण डिजिटली भरून येत नाहीत. क्षणात उलथापालथ होते. हे माझ्या आईने अथवा बखळीतील पोरक्या शाळेतल्या शिक्षकांनी मला शिकवले. घटनेकडे प्रत्यक्ष डोळे उघडे ठेवून पाहणे आणि त्या घटनेपलीकडची माझी स्वत:ची घटना पाहणे, ही समज मला मिळाली आणि आयुष्य मोकळे झाले! दुसऱ्यांना जीवन जगण्याची मोकळीक देणे आणि स्वत:च्या पाऊलवाटांवर गुणगुणत स्वत:ला शोधणे हाच मंत्र त्यात लपला होता.