अरुंधती देवस्थळे
कधी ज्यांची स्वप्नंसुद्धा आपण पाहू धजावलेले नसतो अशा गोष्टी अचानक घडून येतात आयुष्यात. लंडनहून तासाभराच्या अंतरावर एक दुसरीच दुनिया असलेलं ‘ऑक्सफर्ड’ जीवनात येऊन गेलं ते असंच. माझ्या पिढीच्या साहित्य, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना तर ही अपूर्वाईचीच युनिव्हर्सिटी.. अदबीने प्रेमात पडावंसं ठिकाण. ऑक्सफर्डमधला आठवडय़ाचा प्रत्येक दिवस मी बर्फाच्या रंगीबेरंगी गोळ्यासारखा पुरवून पुरवून खात जगले. प्रकल्पात परवलीचे शब्द होते- ‘टेक्स्ट, काँटेक्स्ट अँड इमेजरी.’ या तीन कल्पनांभोवती जे काही विचारमंथन वेगवेगळ्या संस्कृतींतील शोधकर्त्यांकडून सेमिनार आणि चर्चामधून मिळालं, त्यातून ऑक्सफर्ड हे अभ्यासू संभाषणांचं विद्यापीठ आहे असं जे ऐकून होते ते अनुभवायला मिळालं. शोधकार्य दुसऱ्याच कोणाचं होतं म्हणून आवश्यक कामकाज करून बाकी मी स्वतंत्र होते!
शांत, गंभीर विद्यानगरीय वातावरण! त्यात लपेटलेलं राखाडी, भुऱ्या रंगाच्या, उंच उंच छतांच्या, मोठय़ा चष्म्यांसारख्या खिडक्यांच्या इमारतींचं साम्राज्य. दणकट लाकडाचे रुंद दरवाजे. युनिव्हर्सिटीवर जणू काही चिरकाल जादूचं साम्राज्य असावं- की नकाशावर न सापडणाऱ्या ठिकाणांहून विद्यार्थी/ विद्वान/ अभ्यासक तिथे सतत येतात-जातात.. पण तरीही ऑक्सफर्डचं स्वत्व अक्षत राहतं. ठिकठिकाणी विस्तीर्ण हिरवळी आणि फुलझाडं. सगळे आब सांभाळून. जुनीपुराणी खडी वृक्षराजी ताजिम देत असल्यासारखी. अकराव्या शतकाच्या शेवटाला स्थापित झालेल्या या युनिव्हर्सिटीत ३८ कॉलेजेस आहेत. सगळी तशी जवळजवळ. ब्रिटिश संस्कृती लंडनमध्ये तुरळक जागी टिकवून धरलेली आहे, बाकी मग सरमिसळच. पण ऑक्सफर्ड मात्र रीतीभाती, भाषा आणि अ‍ॅक्सेंटसहित शंभर टक्के इंग्लिश आहे. इथे आपण पुस्तकात वाचलेलं इंग्लंड भेटतं.. जाणवत राहतं. ही एकच अशी युनिव्हर्सिटी असावी, जिच्या प्रतीक-चिन्हात आलेला रंगसुद्धा तिच्या नावाने ‘ऑक्सफर्ड ब्लू’ म्हणून प्रसिद्ध आहे.
इथे येणं म्हणजे बोलत्या-चालत्या पुस्तकी जगात प्रवेश करण्यासारखं. स्पष्ट दिसणारं वैशिष्टय़ म्हणजे इथे पुस्तकं बहुतांश संभाषणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हजर असतात.. भूतकाळ आणि वर्तमानकाळ, वादी आणि प्रतिवादी बनून. तुम्ही बऱ्यापैकी वाचत राहणारे नसाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी नाहीच. चॉसरपासून डोरिस लेसिंगपर्यंत सगळ्यांचं पुनर्मूल्यांकन आणि मांडणी कायम चालूच असते. अतिशय स्फोटक विधानं तेवढय़ाच सुसंस्कृत भाषेत केली जातात. पर्यावरण ते सैद्धांतिक राजकारणापर्यंत बौद्धिक चर्चाची ऑक्सफर्डला प्रचंड भूक असल्याचं ऐकलं होतं, ते अनुभवायलाही मिळालं. ‘दि ईगल अ‍ॅण्ड चाइल्ड पब’ किंवा ‘रेउले हाऊस’सारखे अड्डे या दीर्घ चर्चाचे युगानुयुगांपासूनचे साक्षीदार असतात. ओड, एलेजी, सॉनेटसारखे कालबा झालेले इंग्लिश काव्यप्रकार इथे अजूनही आपलं अस्तित्व जाणवून देतात- चर्चामध्ये आणि कॉलेजच्या मासिकांमधून. हाताळणी इतकी कल्पक, की खरोखर जीव सुखावतो.
जिथे काम होतं ते ख्राईस्टचर्च सोळाव्या शतकात स्थापना झालेलं कॉलेज, आणि विश्वविख्यात बॉडलीअन् लायब्ररी!! पाच इमारतींत विभागलेली. त्यांना वेगवेगळी नावंही आहेत. मुख्य दरवाजा मजबूत आणि देखणा. अक्षरश: राजवाडय़ाला शोभेलसा. बोलता बोलता कळलं की, इथे १३०००००० छापील पुस्तकं आहेत. डिजिटल वेगळी. केवळ अशक्य प्रकरण! ऐकून हरखून नाही गेले, आयुष्यात पहिल्यांदाच या अमाप ग्रंथसंग्रहामुळे छाती दडपली. भव्य लायब्ररीला घुमटाकार, अतिशय सुंदर लाकडी छत. इथे प्रवेश मिळवणारे विद्यार्थी तसेही विशेषच. पण माजी विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची छायाचित्रं पाहिली तर पृथ्वीवरच एक आकाशगंगा तरळून गेल्याचा भास होतो. काही देशांचे पंतप्रधान, काही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत, काही नोबेलविजेते. हिस्टरी ऑफ सायन्स म्युझियममध्ये आइन्स्टाईनच्या हस्ताक्षरातलं शिकवताना फळ्यावर लिहिलेलं समीकरण फळ्यावर अजूनही सांभाळून ठेवलं गेलं आहे.
जुन्या ब्रिटिश साम्राज्याचा एक खंड अजून जिवंत असल्यासारखा आहे या संपूर्ण वातावरणात. जगाच्या पाठीवरून अनेक देश, संस्कृती, भाषा, धर्मात जन्मलेली तरुणाई इथे येत असते, पण इथलं अस्सल इंग्लिशपण जराही उणावत नाही. लोक इथे येऊन नक्की बदलतात याची ग्वाही प्रत्येक माजी विद्यार्थी देतो. पण ऑक्सफर्डच्या मुशीत मात्र कधी हिणकसपणा शिरत नाही. सर्वत्र दिसणारं वाहन म्हणजे सायकली. मला आठवडय़ात एकदाही गाडीचा हॉर्न ऐकण्याचा योग आला नाही. क्वचित कधी हलकीशी सायकलची घंटी. रस्त्यावर संभाषण कुजबुजल्यासारखं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिवळ्या रानफुलांची शेतं. सगळं निसर्गाने दिलं तसंच राखलेलं. बांधकामाची लागण झालेली नाही, हे उत्तम. थेम्स नदीला इथे ‘आयसिस’ हे उपनाव मिळतं. इथे तिचं पात्र वळणदार, फारसं रुंद नसलेलं, मंद प्रवाहाचं! जवळच ‘कव्हर्ड मार्केट’ आहे. पारदर्शक प्लास्टिक आणि लाल रंगाच्या कनातींनी सजवलेले. मुख्यत: यात भाज्या, फळं, फुलं, किराणा माल आणि कॅफेज्. केक शॉपमधले आकर्षक, चविष्ट केक्स खाल्ल्याशिवाय ऑक्सफर्डभेट पुरी नाही होत. एक ‘पायमिनिस्टर’ नावाचं अस्सल इंग्लिश पाइजचं दुकान आहे. नावातली कल्पकता पाहूनच त्याला उत्स्फूर्त दाद जाते. त्यांचा पारंपरिक हलका गोड ‘पमकीन पाय’ आणि भाज्यांचा ‘व्हेगन पाय’ चविष्ट!
तगडय़ा दगडांच्या चौकोनी स्लॅब्जनी बनलेल्या गॉथिक आणि बारोक शैलीत बांधल्या गेलेल्या भव्य जुन्या इमारती. काहींमध्ये दोघांचं मिश्रण. सॅक्सन चर्चेस आणि गॉथिक टॉवर्सशिवायही ऑक्सफर्ड अधुरं. ख्राइस्टचर्चच्या मनोऱ्यात दररोज रात्री ९ वाजता १०१ वेळा घंटा वाजते. रात्री दगडी रस्त्यांच्या गल्ल्यांतून जाताना वाटायचं, इथे हॅम्लेटच्या तीर्थरूपांचं भूत अचानक समोर उभं ठाकलं तरी आश्चर्य वाटू नये. इथे युनिव्हर्सिटीत घडलेल्या भूतकथांचंही एक गुऱ्हाळ पिढय़ान् पिढय़ा चालू असतं. त्यापैकी काही माझे यजमान असलेल्या शार्लट आणि डेव्हच्या दोन रसाळ शैलीच्या मित्रांना बोलावून उत्स्फूर्तपणे मला ऐकवण्यात आल्या. काही पात्रं जुन्या अभ्यासक आणि शिक्षकांची, तर काही अकाली गेलेल्या कीट्सपासून ते डिकन्सच्या कादंबऱ्यांतलीही. कहाण्या रात्री उशिरा ऐकून तर घेतल्या; पण नंतर भीती वाटायला लागली. या खास ऑक्सफर्ड फ्लेवरच्या कथांचं एक संकलन कुठेतरी प्रसिद्ध व्हायला हवं असं वाटतं. त्यावर उतारा म्हणून संध्याकाळी आम्ही गेलो होतो तिथल्या म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये टिपिकल इंग्लिश परंपरेनुसार आयोजित केलेल्या बॉलचं (समूहनृत्य) सुंदर चित्रीकरण मला दाखवलं, ते बरंच झालं.
मला ऑक्सफर्डचं ‘ऑक्सफर्डपण’ जाणवलं ते मध्यरात्री रस्त्यावरून शांतपणे चालताना दोन्ही बाजूच्या अनेक खिडक्यांमधून.. अगदी जराशा दिसणाऱ्या फिक्या पिवळट प्रकाशातून.. आत पोरंसोरं अभ्यासात बुडालेली असणार. शार्लट म्हणाली, ‘इथे दिवसा टय़ुटोरियल्स आणि वर्गाबरोबर अनेक छंदांची मंडळं आणि गट असतात- संगीत, ट्रेकिंग, चित्रपट, नाटकं वगैरे. बहुतेक मुलं रोईंग किंवा बास्केटबॉलही खेळतात. अभ्यास रात्रीच जास्त होतो. सगळे स्कॉलर्स जीव ओतून बौद्धिक झटापटीत गुंतलेले दिसतात. रात्री रस्त्यावरून चालणाऱ्यांनी अगदी हळू आवाजात बोलावं, हा संकेत कसोशीने पाळला जातो.’ हे विद्येचं माहेरघर कोणाला आपल्या ध्येयावरून नजर हटवू देत नसावं. इथे यायला अनेकांनी कसोशीने केलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब रात्रीच्या नीरव शांततेत आणि खिडक्यांच्या तावदानातून दिसणाऱ्या फिक्या पिवळ्या प्रकाशात दिसत असतं. काही अमेरिकन युनिव्हर्सिटींच्या व्यक्तिस्वातंत्र्यकेंद्रित वातावरणातला आणि संयमी ऑक्सफर्ड / केम्ब्रिजमधला फरक असा एकदम जाणवून जातो. ऑक्सफर्डचा राखाडी किल्ला आणि तुरुंग बाहेरूनच फिरता फिरता पाहिला.
इथे प्रवेशासाठी येणाऱ्या अर्जामधून स्वीकृतीचं प्रमाण २०% हून कमी आहे, पण तरीही ते असाध्य वाटत नाही. कारण प्रथम फेरीतच ४ पैकी ३.७ जीपीए (ग्रेड पॉइंट अ‍ॅव्हरेज)ची चाळणी लावल्याने अपात्र अर्जदार आधीच बाद ठरतात. बाकी अ‍ॅक्टिव्हिटीज्मध्येही- जसं की ट्रेकिंग, खेळांत प्रावीण्य, समाजकार्यात सहभाग, संगीत/ नाटक वगैरे छंद किंवा काही आगळंवेगळं यश मदत करतात. ८ ते १२ वयोगटासाठी इथे ४ ते ६ आठवडय़ांचे उन्हाळी कोर्सेस आयोजित करण्यात येतात, हे मला नव्याने कळलं.
विद्यादानाबरोबर माणसं घडवणाऱ्या ऑक्सफर्डची अलिखित तत्त्वं आणि आदर्शवादी मूल्यं हा त्याचा कणा आहेत. या स्वप्नलोकासारख्या वाटणाऱ्या जगात आपल्याला पाऊल ठेवता आलं म्हणून एकीकडे कृतकृत्य झाल्याची भावना, तर दुसरीकडे असोशीने मन काठोकाठ भरून आलेलं. निघताना अवस्था ‘यॅू उठे आह, उस गली से हम, जैसे कोई जहाँ से उठता है..’ अशीच झालेली.
arundhati.deosthale@gmail.com

Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
374 Days Later Guru Enters In Shukra Rashi Big Changes Till 2025 The Kundali Of 3 Rashi Can become Billionaire
३७४ दिवसांनी गुरुचे बळ वाढले; २०२५ पर्यंत वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी, व्हाल धनाचे मालक
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo