मला लोक पोटापाण्यासाठी जे विविध व्यवसाय किंवा नोकऱ्या करत असतात त्याबद्दल नेहमीच फार उत्सुकता वाटत असते. मी असे ऐकले आहे की, मुंबई महानगरपालिकेत ‘उंदीरमारे’ असे एक पद आहे. ते हातात काठी घेऊन जुन्या मुंबईत गस्त घालतात आणि काठीने उंदीर मारतात. त्यांनी काम केले आहे याचा पुरावा म्हणून रोज दहा उंदरांच्या शेपटय़ा त्यांना त्यांच्या वरिष्ठांना सादर कराव्या लागतात. शासकीय कर्मचाऱ्यांना जरा प्रतिष्ठा मिळावी किंवा त्यांच्या पदाचे नाव जरा सोपे असावे याबद्दल शासन जराही प्रयत्न करीत नाही. आता ‘उंदीरमारे’ असे नाव एखाद्या पदाला का द्यावे? काही चांगले भारदस्त नाव या पदासाठी शोधायला नको का? खाजगी कंपनीत जर हे पद असते तर किमान त्याला ‘मूषकशिकारी’ किंवा ‘रॅट हंटर’ असे भारदस्त नाव त्यांनी दिले असते. आणि त्याच्या साहेबाला ‘कॉर्पोरेट व्हाइस प्रेसिडेंट- रॅट हंटिंग’ असेही म्हटले असते. आता उंदीर मारणे हेच आपले जीवनध्येय आहे असे एखाद्याला कधी वाटले असेल? रोज दहा उंदरांच्या शेपटय़ा गोळा करून आपल्या साहेबाला पुरावा म्हणून नेऊन दाखवताना त्याला काय सार्थकता वाटत असेल? या आणि अशा प्रश्नांवर मी फार विचार करत राहतो.

लोकांचे फोन त्यांना कळू न देता ऐकण्यासाठी, त्याचे टॅपिंग करण्यासाठी पोलिसात एक विभाग आहे असे मी ऐकून आहे. सध्या या विभागाच्या कामाचे स्वरूप आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर मी चिंतन करतो आहे. पोलिसांत चांगली पोस्टिंग मिळावी म्हणून खूपच चढाओढ असते असे म्हणतात. मग लोकांचे फोन ऐकण्याच्या विभागात येण्यासाठी चढाओढ असते, की शिक्षा म्हणून पोलिसांची त्या विभागात बदली करीत असतील, याची मला खूपच उत्सुकता आहे. माझ्याच माहितीत असे कितीतरी जण आणि जणी आहेत, की त्यांना जर लोकांचे फोन चोरून ऐकायच्या सेवेला जुंपले तर ते दोन वेळचे जेवण आणि दोन जोडय़ा कपडे एवढय़ा कमी मानधनावरही तहहयात या विभागात काम करतील. अमुक एक आपल्याबद्दल आपल्या पाठी काय बोलत असेल, किंवा अमक्यातमक्याला त्या अमुकतमुकबद्दल काय वाटत असेल याच्यावर विचार करण्यात सामान्य माणसाचा किती वेळ वाया जातो. इतरांच्या आयुष्याबद्दल बाकी इतरांना किती उत्सुकता असते. या विभागात काम करणाऱ्यांची मजा आहे. ज्याच्याबद्दल उत्सुकता आहे त्याचा नंबर शोधायचा आणि बसायचे ऐकत. आणि सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची थेट उत्तरे आपली आपणच मिळवायची.

Amit shah on ucc
“देश शरियावर चालवायचा का?” UCC ला विरोध करणाऱ्यांना अमित शाहांचा थेट प्रश्न, म्हणाले, “अनेक मुस्लिम देश…”
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
bhakri stomach health marathi news, chapati stomach health marathi news
Health Special: भाकरी, पोळी की चपाती – पोटासाठी काय चांगले?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: ताठरही नाही की तडजोडवादी नाही.. वंचित बहुजन आघाडी तर संधीवादी!

माझ्या चिंतनात माझ्या मनात विचार आला की, माझ्या फोनचे टॅपिंग केले तर पोलीस विभागाचे माझ्याबद्दल आणि माझ्या जवळच्या मित्रांबद्दल काय मत होईल?

आता मला साधारण असे फोन येतात :

‘हॅलो..’

‘हं. भुंक!’

‘तुझी बॉडी कुठेय? घरी तंगडय़ा वर करून पसरलीये की ऑफिसात भिंतीला तुंबडय़ा लावत बसलीये?’

‘माझी बॉडी क्लायंटच्या दारात टाचा घासतीये.’

‘दुपारी पाल्र्याला येतोय, तर तुझ्या दारावर येऊ  का?’

‘नको. मंथ एन्ड आहे. एका व्यभिचाऱ्याने माझे पैसे थकवलेत. त्याला भेटून जरा मातृ देवो भव, पितृ देवो भव करतो!’

..आता आपल्या कामाचा भाग म्हणून हे असले संभाषण ज्यांना ऐकावे लागत असेल तर त्यांना टॅपिंग करायला मजा येईल का?

माझ्या सव्वातीन हजार कविता कोणीतरी ऐकाव्यात म्हणून मी जीव खाऊन प्रयत्न करतोय. मी त्या कवितांचा नुसता उल्लेख जरी केला तरी माझे जवळचे मला टाळतात. माझ्या कवितांपेक्षा सरकारी जीआर वाचल्यावर जास्त करमणूक होते असे माझ्या मित्र-मैत्रिणींचे मत आहे. मला थोडी जरी कोणी हिंट दिली, की माझा फोन टॅपिंगवर आहे, तर कोणीतरी आपले बोलणे ऐकायला तयार आहे या आनंदात मी एका दमात सव्वातीन हजार कविता ऐकवून टाकीन. कोणीतरी आपणहून माझे बोलणे ऐकायला तयार आहे, ही भावनाच माझ्या सवयीची नाही. त्यामुळे टॅपिंगवाले आपला फोन ऐकताहेत, या कल्पनेनेच मी खूश होतो.

हल्ली जिओवाल्यांनी फोनवर बोलणे फुकट केल्यापासून टॅपिंग करणाऱ्यांचे काम जास्त वाढले असण्याची शक्यता आहे. बोलायला जर पैसेच पडत नसतील तर आपले लोक काहीही आणि कितीही बोलू शकतात. माझ्या एका मित्राला अंबानी आवडत नाहीत. रिलायन्सच्या पंपावर एकदा त्याला २० रुपयाची फाटकी नोट दिली होती तेव्हापासून तो अंबानींवर दात खाऊन आहे. त्याने तर अंबानींना धडा शिकवायला म्हणून आणि त्यांचे नुकसान व्हावे म्हणून जिओच्या एका नंबरवरून दुसऱ्या नंबरवर नुसताच फोन लावला आणि काहीही न बोलता तीन दिवस अनलिमिटेड कॉलिंग फुकट आहे म्हणून फोन चालूच  ठेवला. होऊ दे मुकेशभाईंचे नुकसान! आता त्याचा जर फोन टॅपिंगवर असेल तर त्याच्या मौनाची भाषान्तरे तरी कशी करायची टॅपिंगवाल्यांनी?

चोरून संभाषण ऐकायचे आणि त्याचे आपल्याला समजेल तसे अर्थ लावायचे.. या कल्पनेचा आद्य जनक अभिमन्यू आहे. आपला काहीही संबंध नसताना चुपचाप आईच्या पोटात पडून राहायचे सोडून चक्रव्यूह कसे भेदायचे याची माहिती पहिल्यांदा त्याने चोरून ऐकली. बरं, ऐकायची तर पूर्ण तरी ऐकावी! तर तेही नाही. त्याने ती अर्धवटच ऐकली. चक्रव्यूह भेदायचे कसे, ते त्याने ऐकले. आणि त्यातून बाहेर कसे यायचे, हे ऐकत असताना त्याचा डोळा लागला अशी नोंद आहे. गर्भातले मूल कन्फ्युज होऊ  नये म्हणून गर्भारशी बाईने काय काळजी घ्यायला हवी यावर संशोधन व्हायला हवे. तर ते असो! या टॅपिंगवाल्यांचाही फार वेळा अभिमन्यू होत असेल अशी मला शंका आहे. म्हणजे पिंपळगावला माल येणार आहे, हे त्यांनी चोरून ऐकले आणि त्याप्रमाणे नाशिकच्या पोलिसांनी बंदोबस्त लावला, तर नगरच्या पिंपळगावला माल उतरेल ही शक्यता फारच आहे. म्हणजे उगा कामाला लावले म्हणून नाशिकचेही पोलीस नाराज आणि नगरचेही पोलीस नाराज. आता पाचशे तरी पिंपळगाव जर महाराष्ट्रात असतील, तर टॅपिंगवाल्यांनी त्याचा अर्थ तरी कसा लावायचा? पिंपळगाव आणि गांधी रोडचा नेमका पत्ता समजून घेण्यात तर गूगलनेही हात टेकलेत.

फोन टॅपिंग करणाऱ्या खात्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी हल्ली खूपच सावध झालो आहे. मी आणि माझा मित्र गेली कितीतरी वर्ष करायला काही नसते तेव्हा देशात सशस्त्र क्रांती कशी घडवून आणायची याची चर्चा करतो. मधे याचाच एक भाग म्हणून आम्ही मुंबईत एकूण किती शस्त्रे ऐनवेळेला भंगार बाजारातून खरेदी करता येतील याचा अंदाज घेतला होता. जर मुंबई ताब्यात घ्यायची वेळ आली तर महापालिकेच्या कचरागाडय़ांचा उपयोग शस्त्र- वाहतुकीसाठी; आणि गरज पडली तर रणगाडा म्हणून होऊ  शकेल का? मुंबईच्या आजूबाजूचे कोणते पूल ताब्यात घेतले की मुंबईचा पुरवठा रोखता येईल, कोणती रेडिओ केंद्रे ताब्यात घेतली तर त्यावरून ‘यह शहर अब हमारे कब्जे में हैं..’ ही माहिती लोकांना देता येईल याबद्दल चर्चा करीत असतो. माझ्या मित्राला ‘निपाणी, कारवार, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही घोषणाच मुळी कमी महत्त्वाकांक्षी वाटते. त्याला तर कोलंबो, ढाक्का, कराचीसह अखंड हिंदुस्थान करायचाय. त्यामुळे मोसादला मदतीला घेऊन हे भव्य कार्य कसे करायचे याचीही आम्ही योजना आखतो. आता आमचे हे सगळे बोलणे जर टॅप होत असेल तर आमच्या कार्यात मोठेच अडथळे येतील. आता माझ्यासारख्या वाटेल त्या विषयावर फोनवर चर्चा करणाऱ्यांचे टॅपिंग करणारे काय करतात?

ज्यांना टॅपिंग करायला बसवतात त्यांच्या डय़ुटय़ा कशा लावत असतील, हेही कधीतरी समजून घ्यायला हवे. ‘तो माणूस खूप कंटाळवाणा आहे, त्याचा आवाज ऐकला की मला अर्धशिशीचा अटॅक येतो, मी नाही त्याचे फोन ऐकणार..’ किंवा ‘किती दिवस मी त्या समीक्षकाचे फोन ऐकू? आता मला गेलाबाजार सीरियलच्या हीरोईनचा फोन ऐकायला नाही दिला तर मी रजेवर जाईन..’ हे असले काही प्रसंग घडत असतील का? किंवा एखाद्या अधिकाऱ्याने आपले परदेशी उत्पन्न कुठे दडवले आहे याकरता त्याचा फोन ऐकायला बसले असतील आणि जर त्याला सारखी त्याची बायकोच फोन करून काहीतरी तक्रारी ऐकवत असेल आणि ते विनाकारणच टॅपिंगवाल्याना ऐकावे लागत असेल, तर अशा वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार त्याच्या बायकोविरोधात करता येईल का? जो माणूस शासनाच्या टॅपिंग विभागात नोकरीला असेल त्याला कोणी भेटल्यावर आपले व्हिजिटिंग कार्ड देत असतील का? ‘दहा फोन ऑफिसवाले सांगतील ते मी ऐकेन, पण मग दोन फोन आम्हाला आमच्या आवडीचे ऐकायला परवानगी मिळाली पाहिजे,’ अशी मागणी टॅपिंग करणारे करतात का? ‘तो मेला एवढा मोठा अंडरवर्ल्डचा डॉन.. पण आपल्या बायकोशी किती प्रेमाने बोलतो. मला विचारा ना! नाहीतर तुम्ही!! साधं झुरळ मारायची हिंमत नाही, पण फुकटचा रुबाब किती?’ अशा काही प्रेमळ संवादांना टॅप करणाऱ्या लोकांच्या घरच्यांना सामोरे जावे लागत असेल का?

मला तर हल्ली हीही भीती वाटते की, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे.. असे जर कोणी बोलताना सापडला तर काहीतरी खोटे बोलतोय म्हणून त्याचा फोनही टॅपिंगला टाकत नसतील?

मंदार भारदे

mandarbharde@gmail.com