उच्च अभिरुची ही फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आले आहे. साधारणपणे ज्या गोष्टी तुम्हा-आम्हा सामान्य बहुसंख्य लोकांना आवडतात आणि ज्या गोष्टींमुळे आपल्याला मजा येते त्या गोष्टी म्हणजे हीन अभिरुची. आणि उगा पाचपन्नास जणांना ज्या गोष्टी आवडतात आणि ज्याबद्दल ते शिष्टासारखे तासन् तास बोलू शकतात त्या गोष्टी म्हणजे उच्च अभिरुची. गजरा डोक्यात माळला की उच्च अभिरुची. आणि हाताला गुंडाळला की हीन अभिरुची. गजरा तोच! नाजूकसाजूक तुपातली भावगीते ही उच्च अभिरुची. आणि झणझणीत लावणी ही हीन अभिरुची. भावगीतांच्या कार्यक्रमाला ठेवणीतले कुडते आणि अत्तर लावून जाणाऱ्यांपेक्षा लावणीला जाऊन पागोटे आणि टोप्या उडवणारे संख्येने जास्त आहेत. पण पागोटे उडवणारे हीन आणि कुडते घालून माना डोलवणारे उच्च अभिरुचीचे. हे सगळे आपण नीट समजावून घेतले पाहिजे. आपल्याला शास्त्रीय संगीत कळत नाही, ग्रेसच्या कविता आपल्या डोक्यावरून जातात, जहांगीर आर्ट गॅलरीत गेल्यावर आपण काहीच न कळलेल्या खुळ्यासारखे चित्रांकडे पाहत राहतो. बरं, कोणाला विचारायची चोरी! या उच्च अभिरुचीच्या गोष्टींमध्ये काही कळले नाही तर कोणाला विचारता येत नाही. तुम्हाला जर उच्च अभिरुचीचे व्हायचे असेल तर काही कळो- न कळो उगाचच मान डोलवता आली पाहिजे आणि मधून मधून ‘वा! क्या बात है!’ असे म्हणता आले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थोडेसे पसे कमावल्यावर मलाही काही काळ असे वाटायला लागले, की आता बास झाले.. आपणही आता उच्च अभिरुचीचे व्हायला पाहिजे. मी माझ्या एका मित्राच्या लग्नात समरसून नागीन डान्स केला होता तेव्हा माझे उच्च अभिरुचीचे मित्र मला फारच घालूनपाडून बोलले होते. मी माझ्या प्रतिष्ठेच्या फारच खालचे वर्तन करतोय असा त्यांचा आक्षेप होता. आता रस्त्यावर वरातीत नागीन डान्स करणे आणि बाजूला नाचणाऱ्याला फणा मारण्याचा अभिनय करणे यात अप्रतिष्ठितपणाचे काय आहे? मला सगळ्यांनीच हे लक्षात आणून दिले, की आतापर्यंत जे संगीत, नृत्य, कपडे किंवा चित्रपट मला आवडायचे, ते अजूनही मला आवडत असले तरी ते मला आता शोभून दिसणार नाही. उच्च अभिरुचीचे व्हायचे असेल तर ज्या ज्या गोष्टी मला आवडायच्या, त्यांचा त्याग करावा लागेल आणि दुसऱ्या अनेक गोष्टी- ज्या मला कळतही नाहीत, आवडतही नाहीत, त्यांचा स्वीकार करावा लागेल.

मराठीतील सर्व बघ्याची भूमिका बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandar bharde article about inferior taste and superior taste
First published on: 16-04-2017 at 01:50 IST