इंग्रजी भाषेचा काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही तर जनता तुम्हाला सुखाने जगू देणार नाही, असे मी राज्यव्यवस्थेला मनातल्या मनात ठणकावले. माझ्या एका मराठी मित्राशी मी इंग्रजीत वाद घालत होतो. एका मुद्दय़ावर मला त्याची चामडीच लोळवायची होती. पण ऐनवेळेला  been की being हे ठरवण्यात माझा वेळ गेला आणि तो बाजी मारून गेला. मी जगातल्या अनेक देशांमध्ये फिरलो आहे. इंग्रजी ज्यांची मातृभाषा आहे, त्याही देशांमध्ये अनेकदा गेलो आहे. पण आपल्या मराठी लोकांशी इंग्रजीत बोलायला जितकी भीती वाटते, तितकी एखाद्या ब्रिटिश माणसाशी बोलतानाही वाटत नाही. मग आपल्याच मातृभाषेत बोलणाऱ्या मराठी लोकांशी इंग्रजीत बोलताना भीती का वाटत असावी? मुळात आपल्याला मराठी माणसाशी इंग्रजीत बोलावेसे का वाटावे, हाच एक कळीचा मुद्दा आहे. मराठी माणसाशी जर तुम्ही इंग्रजीत बोललात तरच तो तुम्हाला महत्त्वाचा समजतो, हे माझ्या लक्षात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी एकदा एका आदिवासी पाडय़ावर गेलो होतो. तिथे एका छोटय़ाशा घरात गेलो. घराचा मालक कंबरेला टॉवेल गुंडाळलेला आणि वरती संपूर्ण उघडा. आम्हाला त्याने घरात चटईवर बसवले आणि तो आत चहा आणायला गेला. मधल्या काळात मी त्याच्या भिंतीवर पाहिले तर चक्क त्याने त्याचा पासपोर्ट भिंतीवर फ्रेम करून लावला होता. मला फ्रेम करून लावलेला पासपोर्ट पाहून मजा वाटली. त्यात या आदिवासी माणसाने मुळात पासपोर्ट का काढला असेल याचेच आश्चर्य वाटले. त्याने मला चहा दिला आणि भिंतीवरून काढून त्याचा पासपोर्ट माझ्या हातात दिला. त्याच्या पासपोर्टवर चार-पाच देशांचे शिक्के होते. पासपोर्टवर चार-पाच देशांचे शिक्के आले की आपल्याकडे लोक रस्त्यावरून गुडघ्यापर्यंत पॅन्ट घालून फिरायला लागतात. त्यानेही गुडघ्यापर्यंतच टॉवेल गुंडाळला होता, या योगायोगाचे मला हसू आले. रस्त्यावरून हाफ पॅन्ट घालून फिरणाऱ्यांसारखे आर्थिक भाग्य या टॉवेल गुंडाळून फिरणाऱ्याच्या वाटय़ालाही येईल अशी मला आशा आहे. तर ते असो. ‘कुठे कुठे गेला होतास?’ मी त्याला विचारले. त्याने मला चार-पाच गावांची नावे सांगितली. कोणत्या तरी सरकारी खात्याने आदिवासी कलाकारांची कला जगभर पोहोचावी म्हणून एक उपक्रम योजला होता. त्याअंतर्गत हा टॉवेलवालापण गेला होता. ‘इंग्लंडच्या राणीनेही माझ्याकडून खरेदी केली..’ असे त्याने मोठय़ा अभिमानाने सांगितले आणि फोटोही दाखवला. त्या फोटोत तो आणि राणी चर्चा करताना दिसत होते. ‘तुला इंग्रजी येते का?’ असे मी त्याला विचारले. तर तो ‘नाय बा..’ असे उत्तरला. ‘मग तू काय बोललास?’ विचारल्यावर म्हणाला, ‘साहेबांनी मला सांगितले होते, कोणी ‘हाऊ मच?’ विचारले की ‘फाइव्ह पाऊंड’ सांगायचे. खूप लोक आले. मी त्यांना माझ्या वस्तूंची किंमत सांगितली. त्यांनी मला पैसे दिले.’ वस्तू दाखवायची आणि ‘फाइव्ह पाऊंड’ अशी किंमत सांगायची. त्याला किंमत पटली तर तो घेतो किंवा तीन पाऊंडाला मागतो. याच्या पलीकडे व्यवहार काय असतो? राणीला ‘हर मॅजेस्टी’ म्हणू की ‘ऑनरेबल हेड ऑफ कॉमनवेल्थ’ म्हणू, या गोंधळात जर तो टॉवेलवाला पडला असता तर ‘फाइव्ह पाऊंड’ सांगायचेच राहिले असते. व्यवहार महत्त्वाचा! भाषा त्यानंतर येते. हे आपल्या लोकांना कधी कळणार?

मराठीतील सर्व बघ्याची भूमिका बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandar bharde article on interesting facts of english language
First published on: 13-08-2017 at 02:47 IST